श्यामसुंदर दास : (१८७५१९४५). हिंदी भाषेच्या समृद्धीसाठी अनन्य निष्ठेने, आयुष्यभर कार्यरत राहिलेले हिंदी साहित्यिक. त्यांचा जन्म काशी येथे झाला. त्यांचे पूर्वज सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोरचे. त्यांचे वडील काशीला कपड्यांचा व्यापार करीत. श्यामसुंदर दास १८९७ मध्ये बी.ए. झाले. १८९९ मध्ये ‘ हिंदू स्कूल’
ह्या शाळेत ते अध्यापन करू लागले. त्यानंतर लखनौच्या ‘ कालीचरण स्कूल’ मध्ये ते मुख्याध्यापक होते. १९२१ मध्ये काशी हिंदू विश्वविदयालयात हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हिंदी भाषा समृद्घ करणे आणि तिला प्रतिष्ठा मिळवून देणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले. विदयार्थी असतानाच त्यांनी ‘ काशी नागरी प्रचारिणी सभे’ची स्थापना, रामनारायण मिश्र आणि ठाकूर शिवकुमार सिंह ह्यांच्या सहकार्याने केली (१६ जुलै १८९३). १९०० साली त्यांनी सरस्वती पत्रिका हे मासिक काढण्यात पुढाकार घेतला. न्यायालयांत हिंदी भाषेचा प्रवेश व्हावा, म्हणून ह्याच वर्षी त्यांनी आंदोलन केले. १९०३ मध्ये ‘ आर्य भाषा पुस्तकालया’ची स्थापना केली. हिंदी भाषेचा प्रसार करणे, हे नागरी प्रचारिणी सभेचे उद्दिष्ट राहिले. सरस्वती पत्रिका ही हिंदीतील आद्य दर्जेदार व प्रतिष्ठित पत्रिका होय. ह्या पत्रिकेच्या माध्यमातून अनेक कवीलेखक पुढे आले. त्यांत ⇨प्रेमचंद, ⇨मैथिलीशरण गुप्त, ⇨सुमित्रानंदन पंत, गणेशशंकर विदयार्थी, ⇨काशीप्रसाद जयस्वाल अशा अनेकांचा समावेश होतो. आर्य भाषा पुस्तकालयात विविध भाषांतील हजारो पुस्तके असून, काही हस्तलिखित गंथही आहेत. श्यामसुंदर दास ह्यांनी महत्त्वपूर्ण अशा प्राचीन गंथांचे संपादन केले. हिंदी पाठ्यपुस्तकनिर्मितीचे कार्यही त्यांनी आरंभिले होते.
श्यामसुंदर दास यांनी लिहिलेले आणि संपादिलेले काही गंथ असे - स्वतंत्र गंथ: साहित्यालोचन (१९२२), भाषा विज्ञान (१९२३), हस्तलिखित हिन्दी गंथोंका संक्षिप्त विवरण (१९२३), हिन्दी भाषाका विकास (१९२४), हिंदी भाषा और साहित्य (१९३०), गोस्वामी तुलसीदास (१९३१), हिन्दी गद्यके निर्माता (२ भाग, १९४०), मेरी आत्मकहानी (आत्मचरित्र १९४१) इत्यादी. संपादित गंथ- रामचरितमानस (१९०४), पृथ्वीराज रासो (१९०४), हिंदी वैज्ञानिक कोश (१९०६), हिन्दी शब्दसागर (४ खंड, १९१६), कबीर गंथावली (१९२८), सतसई सप्तक (१९३३) इत्यादी. यांशिवाय त्यांनी भाषा सार संग्रह (भाग १, १९०२), हिन्दी पत्रलेखन (१९०४), हिन्दी ग्रामर (१९०६), हिन्दी संग्रह (१९०८), बालक विनोद (१९०८), साहित्य सुमन (४ भाग, १९२८), साहित्य प्रदीप (१९३२), हिन्दी गद्य संगह (१९४५) इ. पाठ्यपुस्तके लिहिली.
हिंदी भाषेतील त्यांना जाणवणाऱ्या उणिवा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. हिंदी समीक्षेचा सैद्धान्तिक आधार संस्कृत आणि इंगजी ह्या दोन्ही भाषांतील समीक्षाविचारांच्या समन्वयातून उभा राहिला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. हिंदी साहित्याचा इतिहास लिहिताना साहित्यिकांच्या कर्तृत्वाचा वृत्तान्त दयावाच पण संबंधित वाङ्मयीन युगातील परिस्थितीचेही त्यात विवेचन असावे. हिंदी भाषेच्या विदयार्थ्याला अन्य भाषांचा सर्वसाधारण परिचय व्हावा, तसेच हिंदीच्या ऐतिहासिक विकासाचेही ज्ञान मिळावे, असे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या समीक्षापद्ध तीत ऐतिहासिक व्याख्या, विवेचन, तुलना, निष्कर्ष, निर्णय इ. तत्त्वे विहित आहेत.
त्यांच्या प्रयत्नांमुळे हिंदी भाषा विदयापीठात प्रविष्ट झाली. हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना ‘ साहित्य वाचस्पती’ , तर काशी हिंदू विश्वविदयालयाने त्यांना डी.लिट्. ही सन्मान्य पदवी देऊन गौरविले.
सारडा, निर्मला
“