श्पेमान, हान्स : (२७ जून १८६९ – १२ सप्टेंबर १९४१). जर्मन जीववैज्ञानिक व भ्रूणवैज्ञानिक. भ्रू-प्रवर्तन हा परिणाम शोधून काढल्याबद्दल त्यांना १९३५ सालचे शरीरकियाविज्ञानाचे किंवा वैदयकाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. भ्रूणविकासात कोशिकांच्या (पेशींच्या) एका गटाचा (प्रवर्तक) त्याच्या लगतच्या कोशिकागटावर (प्रवर्तित) पडणारा प्रभाव म्हणजे भ्रूण-प्रवर्तन परिणाम होय. कोशिकागटांचा विकास कोणत्या विशिष्ट गटांत व अवयवांत होईल, याची दिशा या परिणामाने निश्चित होते. कोशिकागटांचे भ्रूणविकासातील भवितव्य ठरविणाऱ्या या परिणामाला ‘ संघटनकारी परिणाम ‘ असेही म्हणतात.

श्पेमान यांचा जन्म स्टटगार्ट (जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण हायडल्बर्ग, म्यूनिक व वुर्ट्‌सबर्ग विदयापीठात झाले. सुरूवातीस त्यांनी वैदयकाचा अभ्यास केला आणि १८९४ साली त्यांनी वुर्ट्सबर्ग विदयापीठातून प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान व भौतिकी या विषयांची पदवी मिळविली. तेथील प्राणिवैज्ञानिक संस्थेत त्यांनी डॉक्टरेट पदवीचे विदयार्थी व अध्यापक म्हणून काम केले (१८९४ – १९०८). मग रॉस्टॉक विदयापीठात प्राध्यापक (१९०८ – १४), बर्लिन-डालेम येथील कैसर व्हिल्हेल्म जीववैज्ञानिक संस्थेचे संचालक (१९१४ – १९) आणि शेवटी निवृत्त होईपर्यंत फायबर्ग विदयापीठातील प्राणिविज्ञानाच्या अध्यासनावरील प्राध्यापक (१९१९ – ३८) म्हणून त्यांनी काम केले.

न्यूट या उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या) प्राण्याच्या भ्रूणाचा विकास (वाढ) कसा होतो, यावर त्यांनी आयुष्यभर संशोधन केले [⟶ न्यूट]. ⇨सॅलॅमँडर या प्राण्याच्या भूणात अंगकर्ता असतो, हे त्यांनी प्रथम शोधून काढले (१९२५). लगतच्या भागाच्या किंवा भागांच्या विकासाला चालना (उत्तेजन) देणाऱ्या भ्रूणाच्या भागाला त्यांनी ‘ भ्रूण-अंगकर्ता ‘ ही संज्ञा सुचविली.

न्यूटच्या फलित अंड्याभोवती जेलीचे अंडाकार संपुट असते. त्याच्याभोवती बारीक केस आवळून अंड्याचे दोन अर्धे भाग करतात किंवा त्याला डंबेलसारखा आकार देतात. डंबेलसारख्या आकाराच्या अंड्यापासून एक शेपूट व दोन शीर्षे असलेला भ्रूण तयार होऊ शकतो. अर्ध्या अंड्यापासून कधीही अर्धा भ्रूण तयार होत नाही, तर पूर्ण भूण निर्माण होतो याचा अर्थ भ्रूणविकासाच्या आधीच्या अवस्थांमध्ये अंड्याच्या विविध भागांचे भवितव्य (विकासातील भवितव्य) निश्चित झालेले नसते. याउलट बऱ्याच नंतरच्या अवस्थेत अर्ध्या अंड्यांपासून अर्धे भ्रूण तयार होतात. याचा अर्थ आधीच्या व नंतरच्या अवस्थांदरम्यानच्या काळात अंड्यांच्या भागांचे विकासातील भवितव्य निश्चित करणारी प्रकिया घडत असली पाहिजे. या प्रयोगांमुळे जैव विकास समजून घेण्याचे नवीन पर्व सुरू झाले.

नंतर श्पेमान यांनी भ्रूणाच्या इतर भागांतील प्रवर्तन अभ्यासण्यासाठी भ्रूणाच्या भागांच्या प्रतिरोपणाचे प्रयोग केले. उदा., न्यूटच्या भ्रूणाच्या ज्या भागापासून (क्षेत्रापासून) सामान्यपणे त्वचेचा भाग विकसित होणे अपेक्षित आहे अशा ऊतकाचा (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहाचा) तुकडा संभाव्य तंत्रिका (मज्जा) ऊतकाच्या क्षेत्रात प्रतिरोपित केला, तेव्हा त्याच्यापासून त्वचेऐवजी तंत्रिका ऊतक तयार झालेले आढळले. तसेच न्यूटच्या भ्रूणाच्या ज्या भागापासून सर्वसाधारणपणे मेंदूचा भाग विकसित होणे अपेक्षित आहे, त्यापासून अशा प्रतिरोपणाव्दारे आतड्याची नलिका तयार झाल्याचे आढळले. अशा प्रकारे विकासमान भ्रूणातील कोशिकांचे अंतिम भवितव्य प्रत्येक कोशिकेत अंगभूत झालेले नसते, असे या संशोधनातून उघड झाले पूर्वी तशी समजूत होती. कोशिकांचे अंतिम भवितव्य पूर्ण प्राण्याच्या गरजांनुसार ठरत नाही, तर खास करून भ्रूणातील ऊतकांच्या विविध भागांमधील आंतरकियांव्दारे ते निश्चित होते असे दिसून आले. अशा रीतीने श्पेमान यांच्या सूक्ष्म शस्त्रकिया तंत्रांव्दारे भ्रूणाचा एखादा भाग कोणत्या भागात विकसित होईल, हे ठरविणे शक्य झाले. यावरूनच भ्रूणातील ऊतककोशिकांचा विकास खास कार्य करणाऱ्या ‘ संघटक केंद्रामुळे’ होतो, हा सिद्धांत त्यांनी मांडला.

काही प्रयोगांत त्यांनी बेडकाच्या अंड्यांतील भाग न्यूटच्या अंड्यांत प्रतिरोपित केले. या प्रयोगांत बेडकातील प्रवर्तकाची न्यूटच्या ऊतकांवर किया होऊन न्यूटचा अवयव तयार झाल्याचे आढळले. याचा अर्थ प्रवर्तित (न्यूटच्या) अवयवाचे गुणधर्म मोठया प्रमाणात त्याच्या स्वत:च्या अंगभूत (आनुवंशिक) घटनेवर अवलंबून असतात व प्रेरक (बेडकाच्या) अवयवांवर फारसे अवलंबून नसतात. अशा रीतीने भ्रूणविकासाचे कार्य सुरू होण्यास प्रवृत्त करणारी व इंद्रियांचा विकास कसा व्हावा हे ठरविणारी भ्रूण-प्रवर्तनाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. या निष्कर्षांमुळे भ्रूणविकासाची प्राकृत (नियमित) प्रकिया स्पष्ट झाली आणि उपजत अपसामान्यत्वांवरही (विकृतींवरही) प्रकाश पडला. त्यांनी रूढ केलेली सूक्ष्म शस्त्रकिया तंत्रे हे जीवविज्ञानातील त्यांचे एक सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे. ही तंत्रे वापरूनच त्यांनी भ्रूणविज्ञानाच्या प्रगतीत मोठी भर घातली. यामुळे सैद्धांतिक व वर्णनात्मक भ्रूणविज्ञानाला प्रत्यक्ष पुराव्याचा आधार मिळाला.

श्पेमान यांनी आपल्या संशोधनाची संक्षिप्त माहिती Experimantelle Beitrage Zu einer Theorie der Entwicklung (१९३६) या जर्मन भाषेतील पुस्तकात दिली आहे. या पुस्तकाचा इंगजी अनुवाद एंब्रियॉनिक डिव्हेलपमेंट अँड इंडक्शन १९३८ साली प्रसिद्ध झाला.

फ्रायबर्ग (जर्मनी) येथे त्यांचे निधन झाले.

पहा : भ्रूणविज्ञान.

ठाकूर, अ. ना.