शेषन्, टी. एन्. : (१५ डिसेंबर १९३२ ). भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त, एक कार्यक्षम सनदी अधिकारी आणि लेखक. पूर्ण नाव तिरूनेल्लयी नारायण अय्यर शेषन्. त्यांचा जन्म टी. एस्. नारायण अय्यर आणि सीतालक्ष्मी या दांपत्यापोटी पालघाट या जिल्ह्याच्या ठिकाणी (केरळ राज्य) झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जयलक्ष्मी. त्यांनी सुरूवातीचे शिक्षण पालघाट येथे घेऊन मद्रास विदयापीठातून बी.एस्सी.(ऑनर्स) पदवी मिळविली आणि उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत गेले. तिथे त्यांनी हार्व्हर्ड विदयापीठातून एम्.ए. व एम्.पी.ए. या पदव्या संपादन केल्या. एम्.ए.ला असताना त्यांनी लोकप्रशासन हा विषय निवडला होता. पुढे त्यांनी आय्.ए.एस्. ही भारतीय नागरी प्रशासनातील पदवी घेऊन सनदी सेवेत प्रवेश केला. सुरूवातीस त्यांनी वाहतूक संचालक म्हणून चेन्नई येथे काम केले. पुढे त्यांना पदोन्नती मिळून ते मदुराई येथे जिल्हाधिकारी झाले. अणुऊर्जा खात्याचे संचालक व अणुऊर्जा आयोगाचे सचिव, अवकाश खात्याचे सहसचिव, उदयोग खात्याचे सचिव, तमिळनाडू राज्याच्या कृषी खात्याचे सचिव, ओ.एन्.जी.सी.चे सदस्य, अवकाश खात्याचे अतिरिक्त सचिव, वने आणि पर्यावरण खात्याचे सचिव (१९८५), संरक्षण सचिव (१९८८), कॅबिनेट सचिव आणि सुरक्षा सचिव (१९८९) वगैरे अनेक उच्च अधिकारपदे त्यांनी भूषविली. त्यानंतर त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (१२ डिसेंबर १९९०- ११ डिसेंबर १९९६) म्हणून काम केले. या सु. सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी निर्वाचन पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करून सार्वजनिक निवडणुका शांततेत व कायदेकानूंच्या चौकटीत कशा पार पडतील, यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे अनेक संवेदनशील निर्वाचन क्षेत्रांतील निवडणुका निर्वेधपणे पार पडल्या. या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना मागसायसाय हा आशियातील नोबेलसदृश पुरस्कार देण्यात आला (१९९६). त्यांनी विविध देशांना सदिच्छा भेटी दिल्या. निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सकिय राजकारणात सहभाग घेतला आणि राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविली मात्र तीत ते पराभूत झाले (१९९७). त्यांनी काही इंग्रजी पुस्तके लिहिली असून त्यांपैकी ए हार्टफुल ऑफ बर्डन, डिजनरेशन ऑफ इंडिया आणि द रिजनरेशन ऑफ इंडिया ही पुस्तके प्रसिद्घ व मान्यवर आहेत. त्यांची नियोजन आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. उर्वरित काळ ते लेखन-वाचन यांबरोबरच व्याख्याने देण्यात व्यतीत करीत आहेत.
गायकवाड, कृ. म.
“