अंतर्गळ : प्राकृतावस्थेत शरीरातील विविध गुहांमध्ये (पोकळ्यांमध्ये) असलेले अंतस्त्य (इंद्रिय) अथवा त्याचा काही भाग त्या गुहेच्या भित्तीच्या बाहेर पडणे या विकृतीला ‘अंतर्गळ’ असे म्हणतात. डोके, छाती वगैरे शरीरविभागांतील गुहांमध्ये असणारी मेंदू, फुप्फुस वगैरे अंतस्त्ये त्या गुहेतून बाहेर पडल्यास त्यांना अनुक्रमे ‘मस्तिष्क-अंतर्गळ,’ ‘फुप्फुस-अंतर्गळ’ अशी नावे आहेत. पंरतु हे अंतर्गळ अगदी क्वचितच होत असल्यामुळे ‘अंतर्गळ’म्हणजे उदरगुहेच्या भित्तीतून तेथील अंतस्त्य बाहेर पडणे याच अर्थी अंतर्गळ हा शब्द अधिक प्रचारात आहे. त्यालाच ‘वर्ध्म’ असेही म्हणतात.

 

प्रकार : उदरभित्ती ज्या ठिकाणी दुर्बल असते तेथेच अंतर्गळ होण्याचा संभव असतो. स्थानपरत्वे अंतर्गळाला नावे दिलेली आहेत. उदा., ज्या नालातून पुरुषांमध्ये शुक्ररज्जू व स्त्रियांमध्ये गोलबंध (गर्भाशयातील बंधांपैकी गोल आकाराचा बंध) जातो तेथील अंतर्गळाला ‘वंक्षण-अंतर्गळ’,ऊरुरक्तवाहिन्या (मांडीतील रक्तवाहिन्या) ज्या नालातून मांडीत जातात तेथील अंतर्गळाला ‘ऊरु-अंततर्गळ’,मध्यपटलातून होणाऱ्या अंतर्गळाला ‘मध्यपटल -अंतर्गळ’, बेंबीच्या ठिकाणी होणाऱ्या अंतर्गळाला ‘नाभि-अंतर्गळ’ उदराच्या पुढील भित्तीतून होणाऱ्या अंतर्गळाला ‘अभ्युदर-अंतर्गळ’, श्रोणि (ओटीपोट) भागातील आसंवृत (झाकलेल्या) छिद्रातून होणाऱ्या अंतर्गळाला ‘आसंवृत-अंतर्गळ’, आणि श्रोणितंत्रिका ज्या अस्थिखोबणीतून जाते तेथील अंतर्गळाला ‘नितंब-अंतर्गळ’ अशी नावे आहेत.

 

कारणे : अंतर्गळाचे (१) जन्मजात आणि (२) अर्जित (नंतर उद्भवलेले) असे दोन प्रकार आहेत.

(१) जन्मजात कारणे : (अ) वृषण  उदरातून मुष्कात (वृषण ज्यात असतात ती पिशवी) उतरत असताना

⇨भ्रूणावस्थेतील पर्युदराची एक पिशवी त्याच्याभोवती उतरत असते. या पिशवीचा पर्युदराशी असलेला संबंध पुढे तुटतो तो न तुटल्यास पर्युदरामधील अंतस्त्ये मुष्कात उतरण्याचा संभव असतो. (आ) वृषण पूर्णपणे मुष्काप्रर्यंत न उतरल्यास ‘वंक्षण-अंतर्गळा’चा संभव अधिक असतो. (इ) उदर-भित्तीतील स्नायूंची अपुरी वाढ झाल्यासही अंतर्गळ होऊ शकतो. (ई) आंत्रयुजा (आतड्याचा आधार) फार लांब किंवा सैल असल्यास अंतर्गळ होण्याचा संभव असतो. (उ) नाभी पूर्णपणे बंद न झाल्यास तेथे अंतर्गळ होऊ शकतो. या सर्व प्रकारांना ‘जन्मजात अंतर्गळ’ म्हणतात.

 

(२) अर्जित कारणे : (अ) शस्त्रकर्मानंतर उदरभित्तीत दुर्बलता येणे. (आ) उदरभित्तीतील स्नायूंना इजा झाल्यामुळे दुर्बलता येते. (इ) जड वजन उचलताना, खोकताना अथवा मूत्रोत्सर्ग आणि मलोत्सर्ग करताना कुंथावे लागणे व त्यामुळे उदरभित्तीतील स्नायूंना शैथिल्य येणे. (ई) वृद्धावस्थेत अथवा प्रसूतीनंतर उदरस्नायू दुर्बल होणे आणि (उ) मेदोवृद्धी. या सर्व प्रकारांना ‘अर्जित अंतर्गळ’ म्हणतात.

 

अंतर्गळाची रचना : बाहेरची पिशवी आणि आतील अंतस्त्ये असे अंतर्गळाचे दोन भाग आहेत.

 

पिशवीचे बुध्न व ग्रीवा असे दोन भाग असून बुध्न प्रथम चंबूच्या आकाराचा व पुढे लांबटगोल होतो. ग्रीवा प्रथम गोल व मोठी असते परंतु वरचेवर शोथ (सूज) येऊन गेल्यानंतर ती आकसून लहान व जाड तंतूंची बनते.

 

पिशवीमधील अंतस्त्यात लघ्वांत्र (लहान आतडे), वपाजाल (पर्युदराचा पडदेवजा एक भाग), उंडुक (बृहदांत्राचा पहिला भाग), आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) किंबहुना उदरात मागे घट्ट बसविलेल्या अग्निपिंडाखेरीज इतर कोणतेही अंतस्त्य असू शकते. सर्वांत अधिक प्रमाणात लघ्वांत्र, उंडुक आणि वपाजाल ही असतात.

 

लक्षणे : सुरूवातीस ग्रस्तस्थानी लहान फुगवटी दिसू लागते. ही फुगवटी हळूहळू वाढत जाते. उभे राहिले असताना, खोकताना अथवा कुंथताना ही फुगवटी मोठी होती. परीक्षकाने फुगीर भागावर हात ठेवून रोग्याला खोकण्यास सांगितल्यास खोकल्याबरोबर तेथे धक्का बसल्यासारखा हाताला लागतो आणि फुगा मोठा होतो. आंत्राचा भाग फुग्यात असल्यास त्यावर हळू दाबले असता गुर्र असा आवाज होऊन अंतर्गळ नाहीसा होतो. वरचा दाब कमी केल्याबरोबर फुगा पुन्हा मोठा होतो. अशा तऱ्हेने फुगा कमी होऊ शकत असल्यास त्याला ‘निवर्तनीय अंतर्गळ’ असे नाव आहे. फुगा लहान होऊन अंतर्गळ परत जाऊ शकत नसल्यास त्याला ‘अनिवर्तनीय अंतर्गळ’ असे म्हणतात.

 

आंत्राचा मोठा भाग अंतर्गळात असल्यास, पोटात ओढल्यासारखे वाटणे, वेदना आणि अपचन ही लक्षणे दिसतात.

  

अंतर्गळातील अंतस्त्ये वाढत गेली असताना अंतर्गळाच्या ग्रीवेवर दाब पडतो त्यामुळे आतील अंतस्त्यातील शिरांमधील रक्तप्रवाहाला रोध उत्पन्न झाल्यामुळे त्या अंतस्त्यातील ऊतकांचा कोथ होऊ शकतो. रोधित अंतर्गळाला ‘पाशबद्ध’ अथवा ‘आवलित’ अंतर्गळ म्हणतात. हा प्रकार फार गंभीर असतो. अंतर्गळातील आंत्र अनिवर्तनीय असून आंत्राच्या रक्तप्रवाहाला रोध उत्पन्न झालेला नसल्यास त्याला ‘अवरूद्ध अंतर्गळ’ असे नाव आहे. पाशबद्ध अंतर्गळात अंतस्त्यातील ऊतकांचा ⇨कोथ होण्याचा फार धोका असल्यामुळे अंतर्गळ पाशबद्ध झाल्यापासून ५-६ तासांत तातडीची चिकित्सा न झाल्यास मृत्यूही संभवतो. 


चिकित्सा : शस्रक्रिया करुन अंतर्गळाची पिशवी कापून काढून टाकणे, अंतर्गळग्रीवा शिवून बंद करणे आणि निर्बल झालेले स्नायू शिवून भक्कम करणे हाच अंतर्गळ कायम बरे करण्याचा उपाय आहे. क्वचित एकदा शस्त्रक्रिया केल्यानंतरही अंतर्गळ पुन्हा होऊ शकतो. पाशबद्ध अंतर्गळावर त्वरेने शस्त्रक्रिया करून आंत्रकोथ होण्यापूर्वीच रक्तप्रवाहाला झालेला रोध नाहीसा करावा लागतो. उशीर झाल्यास कोथ झालेला आंत्रभाग काढून टाकावा लागतो.  

  

वृद्धावस्था, चिरकारी खोकला, अशक्तपणा वगैरे कारणांमुळे शस्त्रक्रिया शक्य नसेल तर अंतर्गळ होणाऱ्‍‍या भित्तिभागाला आधार देईल असा चामड्याचा किंवा रबराचा पट्टा वापरतात. असा पट्टा योग्य आहे की नाही ते तज्ञांकडून तपसून घेणे आवशयक असते. पट्टा योग्य नसेल तर अंतर्गळावर वेडावाकडा दाब पडल्याने उपायाऐवजी उपद्रव होण्याचाच संभव असतो.

 

ढमढेरे, वा. रा.

 

अंतर्गळ, पशूंतील : मनुष्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांतही अंतर्गळ संभवतात. त्याचे भाग, प्रकार व करणे ही मनुष्यात आढळतात त्याप्रमाणेच प्रांण्यातही असतात.

 

वंक्षण-अंतर्गळ : अंतस्त्य किंवा त्याचा काही भाग वंक्षण-नालेत असतो तेव्हा ‘वंक्षण-अंतर्गळ’ म्हणतात. तो बाहेर पडून मुष्कात आढळतो तेव्हा ‘मुष्क-अंतर्गळ’ होतो. हा प्रकार वळू घोड्यात किंवा एक अंड असलेल्या घोड्यात होणे अशक्य नसते. पुष्कळ वेळा असा प्रकार गुरांमध्येही होतो. कधीकधी कुत्रीमध्ये वंक्षण-नालेतून गर्भाशय बाहेर येऊन अंतर्गळ संभवतो.

 

नाभि-अंतर्गळ : (उदरभित्तीतील). जन्मापूर्वी नाभिरज्जू (नाळ) जातो त्या नाभीच्या ठिकाणचे वलय बंद होण्याऐवजी तेथे छिद्र राहिलेले असते. लहानपणी बद्धकोष्ठ, अतिसार किंवा खेळकर प्रवृत्तीमुळे असामान्य ताण पडण्याने किंवा प्रसूतीच्या वेळी आंत्राचा किंवा सामान्यपणे वपाजालेचा भाग ह्या छिद्रातून बाहेर येतो तेव्हा त्याला नाभि-अंतर्गळ म्हणतात.

 

अभ्युदर-अंतर्गळ : उदरभित्तीच्या काही स्नायू असलेल्या भागास गंभीर जखम झाल्यामुळे सामान्यत: हा अंतर्गळ संभवतो. प्रजननाच्या कामी ज्या मादी-घोड्यांचा उपयोग करतात त्यांच्यात हा प्रकार सामान्यपणे आढळतो. मादी गाभण नसताना काहीच दिसत नाही. गाभण राहिल्यानंतर उदरभित्तीवर ताण वाढल्यामुळे स्नायूंचा भाग तुटतो व उदराच्या खालच्या भागावर मोठी सूज दिसते. गाई-म्हशींमध्ये शेजारी बांधलेल्या जनावराने भोसकण्यामुळे झालेल्या जखमेनेही अंतर्गळ होतो. अशा वेळी बाह्य त्वचा शाबूत आढळली तरी आतील स्नायू फाटलेले असतात व जखम झालेल्या जागेवर सूज दिसते. बगलेसारख्या कोमल स्नायू असलेल्या भागात अशा प्रकारच्या अंतर्गळ होतो. कुत्र्यांमध्ये शस्त्रक्रियेनंतरच्या व्रणाच्या जागेवर उपद्रव झाल्यास किंवा घोड्यामध्ये तो खाली पडण्यामुळे गंभीर अवस्था झाल्यास अंतर्गळ संभवतो.

 

मध्यपटल-अंतर्गळ : हा प्रकार कोणत्याही प्राण्यामध्ये शक्य असतो तरीपण कुत्र्यामांजरांत सामान्यत: होतो. फार उंचावरुन खाली उडी मारताना, प्राणी पायांवर उभे रहाण्याचा प्रयत्न करतो अशा वेळी उदरातील सर्व अंतस्त्यांचा भार पुढच्या भागातील मध्यपटलावर पडतो, तसेच घोड्यामध्ये आंत्रशूल झाला म्हणजे जमिनीवर धाडदिशी पडण्यामुळे किंवा पाठीवर जास्त भार असताना पुढे पडण्यामुळेही हा अंतर्गळ होतो.

 

ऊरुमूल-अंतर्गळ : हा क्वचित होतो तरीपण कुत्र्यांना मागच्या दोन पायांवर पुष्कळ वेळ चालण्याची कसरत करावी लागते तेव्हा संभवतो. मांडीच्या वळणाच्या भागातील स्नायूंवर उभे राहण्यामुळे असामान्य भार पडून ते तुटतात.

 

विटप-अंतर्गळ : नर व मादी-कुत्र्यांत मलावरोध किंवा अतिसारामुळे कुंथताना, चिरकाली खोकला, दमा किंवा श्वसनलिकाशोथ झाला असताना प्राणी कासाविस होतो, तेव्हाही असा अंतर्गळ संभवतो. वयस्कर कुत्र्यांत अष्ठीलाग्रंथीची वाढ झाली असताना हा सामान्यपणे होतो काही अवस्थांत उदरातील काही अंतस्त्ये, विशेषत: मूत्राशय, गुदांत्र व श्रोणिस्थित अंतस्त्ये आपल्या जागेतून विटपातील (मूत्र-जनन नलिका व गुदांत्र यांमधील ऊतकातील) मागच्या भागातून बाहेर पडतात.

लक्षणे : प्राण्यांमध्ये आंत्राचा भाग किंवा वपाजाल वा दोन्हीही अंतर्गळामध्ये असू शकतात. सूज जन्मत: आढळते किंवा पुढील आयुष्यात अंतर्गळ झाल्यास अकस्मात किंवा हळूहळू दिसते.

 

नातू वा. रा.

  आयुर्वेदीय चिकित्सा : जेव्हा आतडे पोटाच्या भित्तीतून त्वचेमध्ये बाहेर येते, वृषणात जात नाही, तेव्हा ‘त्रैवृत’ नावाचे तूप विधिपूर्वक पाजून, सर्वांग शेकून लेप द्यावा किंवा एरंडेल पाजावे रेच झाल्यावर क्रमाने नेहमीच्या अन्नावर आल्यावर महिनाभर एरंडेल रेच होणार नाही इतक्या प्रमाणात द्यावे नंतर वातघ्न वनस्पतींचे बस्ती द्यावेत ज्येष्ठमधसिद्ध तेलाचा बस्ती द्यावा वातनाशक लेप द्यावेत पोटिसांनी शेकावे किंवा अर्धेदुवक्र सळई लाल तापवून आतडे बाहेर येणण्याच्या द्वारावर डाग द्यावा.

 

अंतर्गळ असलेल्या विरुद्ध बाजूच्या पायाच्या आंगठ्याच्या वरची त्वचा कापून आतला पिवळा तंतुसारखा स्नायू सुईने वर उचलून तो तिरपा डागावा. कोणत्याही बाजूच्या कानसळीवरची कानाच्या शेवटी असलेली शीर तोडून रक्तस्त्राव करावा म्हणजे अंतर्गळ बरा होतो. या चिकित्सेचा रूढ प्रकार म्हणजे तांब्याची अंगठी आंगठ्यात नेहमी घालतात. वृषणात आंत्र उतरले असेल तर चिकित्सा करु नये.

 

 पहा: शल्यतंत्र.

 

जोशी, वेणीमाधवशास्त्री