सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ : कॅरिबियन समुद्रातील लेसर अँटिलीस द्वीपमालिकेमधील विंडवर्ड द्वीपसमूहापैकी एक द्वीपीय देश. लोकसंख्या १,०३,५३७ (२०१२ अंदाज). क्षेत्रफळ ३८९ चौ. किमी. या देशात सेंट व्हिन्सेंट या मुख्य बेटाचा आणि ग्रेनेडीन्झमधील बेटांचा समावेश होतो. सेंट व्हिन्सेंट हे सर्वांत मोठे बेट (क्षेत्रफळ ३४४ चौ. किमी.) १३° ·६’ ते १४° ·३५’ उ. अक्षांश व ६१° ६’ ते ६१° २०’ प. रेखांश यांदरम्यान, सेंट लुसीया बेटाच्या नैर्ऋत्येस ३४ किमी. आणि बार्बेडोसपासून पश्चिमेस १६ किमी.वर आहे. त्याची लांबी २९ किमी. व कमाल रुंदी १८ किमी. असून समुद्रकिनाऱ्याची लांबी ८४ किमी. आहे. ग्रेनेडीन्झ हा लहान लहान अशा ६०० बेटांचा समूह असून त्यातील उत्तरेकडील काही बेटांचा या देशात तर दक्षिणेकडील काही बेटांचा समावेश ग्रेनेडामध्ये होतो. ग्रेनेडीन्झ बेटांचा विस्तार उत्तरेस सेंट व्हिन्सेंटपासून दक्षिणेस ग्रेनेडा बेटापर्यंत झालेला आहे. या देशातील ग्रेनेडीन्झ बेटांमध्ये बकीआ, बॅलिसेऊ, कॅनवॉन, मेरो, मस्तीक, डी क्वात्ते, पेती सेंट व्हिन्सेंट, युनियन, कॅरीआकू या प्रमुख बेटांचा तसेच वस्ती नसलेल्या इतर अनेक लहान लहान प्रवाळशैलभित्तियुक्त द्वीपकांचा समावेश होतो. बकीआ (१८ चौ. किमी.) हे यांतील सर्वांत मोठे बेट आहे. सेंट व्हिन्सेंट बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर असलेले किंग्स्टाउन ( लोकसंख्या २५,३०७—२००४) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : या द्वीपसमूहातील इतर बेटांप्रमाणेच सेंट व्हिन्सेंट हे सुद्धा ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले ओबडधोबड भूमिस्वरूपाचे बेट आहे. या बेटावर उत्तर-दक्षिण पसरलेला ज्वालामुखी पर्वतीय प्रदेश असून त्याच्या उत्तर भागात असलेले मौंट सूफ्रीएअर (उंची १,२३४ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. मौंट सूफ्रीएअर हा जागृत ज्वालामुखी असून, इ. स. १७१८, १८१२, १९०२ व १९७९ मध्ये झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचे वेळी बेटाची फार मोठी हानी झाली होती. याच्या मुखाशी १·६ किमी. रुंदीचे ज्वालामुखीय सरोवर आहे. ग्रँड बॉनॉम, रिचमंड व सेंट अँड्र्यू ही या बेटावरील अन्य प्रमुख शिखरे आहेत. बेटाच्या पूर्व किनाऱ्याकडील उतार मंद असून पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश ओबडधोबड आहे. या बेटावर सखल भूमी अत्यल्प आहे. घनदाट अरण्यांनी व्यापलेल्या येथील पर्वतीय प्रदेशातून अनेक वेगवान व आखूड प्रवाह वाहताना आढळतात. ग्रेनेडीन्झ बेटांचे प्राकृतिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भोवती आढळणाऱ्या पुळणी, प्रवाळशैलभित्ती व उपसागर होत. पावसाचे पाणी वगळता एरवी त्यांवर गोडे पाणी आढळत नाही. युनियन बेट हे ग्रेनेडीन्झमधील सर्वाधिक उंचीचे (३०८ मी.) आहे.

सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ हा देश ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या मार्गात असून तेथील हवामान उष्ण कटिबंधीय सागरी आहे. येथील तापमानकक्षा कमी असते. वार्षिक सरासरी तापमान २७° से. असून किंग्स्टाउन येथे सप्टेंबरमधील कमाल व जानेवारीमधील किमान तापमान अनुक्रमे ३२° से. व १८° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान पर्वतीय प्रदेशात ३८१ सेंमी. तर आग्नेय किनाऱ्यावर १५२ सेंमी. असते. जून ते डिसेंबर पावसाळा असतो. बेटांना काही वेळा हरिकेन वादळाचा तडाखा बसतो.

सेंट व्हिन्सेंट बेटावरील मृदा हलकी व सच्छिद्र आहे. बेटाचा बराचसा भाग वनाच्छादित असून वनस्पतिजीवन विविधतापूर्ण आढळते. हिबीस्कस व पानचेटी या प्रमुख वनस्पती प्रकारांशिवाय ताडाची व काही फळझाडेही आढळतात. वनपट्ट्याच्या खालच्या भागात कृषिक्षेत्र असून धूपनियंत्रणासाठी काही ठिकाणी बांध घातले आहेत. ग्रेनेडीन्झ बेटांवर खुरट्या वनस्पती आणि सभोवती समृद्ध सागरी जीवन आढळते.

पोपट हा सेंट व्हिन्सेंटचा राष्ट्रीय पक्षी असून त्यांची संख्या घटली आहे. गाणारा वॉर्बल पक्षी वर्षारण्यांत आढळतो. ऑपॉस्सम हे सस्तन प्राणी आढळतात. अनेक सागरी पक्षी येथे असून सागरी भागात मासे व इतर जलचर आढळतात.  

इतिहास व राजकीय स्थिती : सेंट व्हिन्सेंटवर पूर्वी आरावाक इंडियनांची वस्ती होती. त्यानंतर येथे आलेल्या लढवय्या कॅरिब लोकांनी बेटाचा ताबा घेतला. क्रिस्तोफर कोलंबसाने १४९८ मध्ये सेंट व्हिन्सेंट बेटाचा शोध लावला. या बेटावर येणारा कोलंबस हाच पहिला यूरोपीय असून त्यानेच याला सेंट व्हिन्सेंट हे नाव दिले असावे. येथे सापडलेल्या शिलालेखांत कॅरिब लोकांची सांस्कृतिक चिन्हे दिसतात. अठराव्या शतकापर्यंत यूरोपीयांना येथे वसाहत करणे शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र कॅरिब लोकांशी करार करून त्यांनी येथे वसाहत स्थापन केली. या बेटाचा ताबा मिळविण्यासाठी १७६३ पर्यंत फ्रेंचांची ब्रिटिशांशी स्पर्धा चालू होती. त्यानंतर मात्र पॅरिस तहानुसार त्याचा ताबा इंग्लंडकडे आला. इ. स. १७७३ मध्ये झालेल्या एका करारानुसार कॅरिबांनी ब्रिटिश आधिपत्य मान्य करून बेटाची कॅरिब व ब्रिटिश अशी विभागणी करण्यासही अनुमती दिली. १७७९ मध्ये फ्रेंचांनी बेटाचा ताबा घेतला. परंतु व्हर्सायच्या तहानुसार (१७८३) ग्रेट ब्रिटनकडे त्याचा ताबा आला. त्यानंतर पुढे सु. तेरा वर्षे फ्रेंच व कॅरिब युतीने ब्रिटिशांकडून सेंट व्हिन्सेंटचा ताबा मिळविण्याचे अयशस्वी प्रयत्न केले परंतु १७९५ मध्ये फ्रेंच व कॅरिब युतीने बेट पादाक्रांत करून तेथील सर्व ब्रिटिश वसाहतकऱ्यांना ठार मारले. परंतु ब्रिटिशांनी जादा सैन्य पाठवून कॅरिबांना वठणीवर आणले. १७९७ मध्ये येथील बहुतांश कॅरिब लोकांना हाँडुरस आखाताजवळील रोआतान बेटावर पिटाळून लावले. उर्वरित कॅरिब १८१२ व १९०२ मध्ये झालेल्या सूफ्रीएअर ज्वालामुखी उद्रेकात मृत्युमुखी पडले.

ब्रिटिशांनी ऊस मळ्यांची लागवड करण्यापूर्वी कापूस हे येथील महत्त्वाचे पीक होते. ऊस मळ्यांत काम करण्यासाठी त्यांनी आफ्रिकन गुलामांना आणले. पूर्वीच्या गुलामांनी कमी वेतनावर काम करण्यास नकार दिल्यावर बेटाच्या अर्थव्यवस्थेला झळ पोहोचली (१८३४). त्यानंतर पोर्तुगीज व ईस्ट इंडियन कामगारांना येथे आणण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात साखरेच्या किंमती कोसळल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली. ती शतकाच्या अखेरपर्यंत टिकली. त्यामुळे बेटवासीयांनी कापूस, आरारूट, केळी यांच्या उत्पादनास सुरुवात केली. ब्रिटिशांनी विंडवर्ड बेटांमधील आपल्या वसाहतीला सेंट व्हिन्सेंट जोडले (१८७१). १९५६ मध्ये वसाहतीचे प्रशासन संपुष्टात आले. १९५८-६२ या कालावधीत हे बेट वेस्ट इंडीज फेडरेशनचा एक भाग राहिले. ऑक्टोबर १९६९ रोजी हे बेट ग्रेट ब्रिटनचे स्वयंशासित सहयोगी राज्य बनले. मात्र विदेशी धोरण व संरक्षण यांना ग्रेट ब्रिटन जबाबदार राहिले. ऑक्टोबर १९७९ रोजी सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ या नावाने स्वतंत्र देश अस्तित्वात आला.

हा राष्ट्रकुलांतर्गत संसदीय लोकशाही देश आहे. इंग्लंडचा राजा अथवा राणी हे देशाचे प्रमुख असतात. त्यांच्याकडून आपला प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची येथे नियुक्ती केली जाते. गव्हर्नर जनरलकडून पंतप्रधानांची आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार उप-पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. पंतप्रधान इतर सहा मंत्र्यांच्या साहाय्याने राज्यकारभार पाहतात. संसद (हाउस ऑफ असेंब्ली) एकसदनी असून तिचे २१ सदस्य असतात. त्यांपैकी १५ सदस्य प्रत्यक्ष मतदानाने ५ वर्षांसाठी निवडून आलेले असतात. उर्वरित ६ सदस्यांपैकी ४ सदस्यांची पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार तर दोघांची विरोधी पक्षनेत्याच्या शिफारशीनुसार गव्हर्नर जनरल नियुक्ती करतात. युनिटी लेबर पार्टी व न्यू डेमॉक्रॅटिक पार्टी हे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. येथील न्यायव्यवस्था ब्रिटिश सर्वसाधारण कायद्यावर आधारित आहे. येथे स्थायी सैन्यदल नाही.

आर्थिक स्थिती : देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६·४ टक्के कृषी व्यवसायातून, २० टक्के उद्योगांमधून आणि ७३·६ टक्के सेवा व्यवसायांतून उत्पन्न मिळाले (२०१२ अंदाज). १९७९ मधील मौंट सूफ्रीएअर ज्वालामुखीचा उद्रेक आणि १९८० मधील हरिकेन ॲलन वादळाचा तडाखा या दोन नैसर्गिक आपत्तींमुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घट झाली होती. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून एकूण कामकरी लोकांपैकी २३·१ टक्के लोक त्यात गुंतले आहेत. कृषियोग्य जमीन ७,००० हे. असून त्यांपैकी निम्मे क्षेत्र लहान लहान शेतकऱ्यांच्या मालकीचे आणि उर्वरित मोठ्या शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे (२००२). केळी व आरारूट ही प्रमुख नगदी पिके आहेत. देशात केळी ५०,००० टन, नारळ ३,००० टन तसेच खोबरे, मका, संत्री, ऊस, रताळी, याम यांची प्रत्येकी २,००० टन अशी कृषी उत्पादने झाली. पशुधनामध्ये शेळ्या १२,०००, डुकरे ९,०००, मेंढ्या ७,००० व गुरे ५,००० होती (२००३). मत्स्योत्पादन ६,५०० टन झाले (२०१०). एकूण भूक्षेत्राच्या २७·४ टक्के क्षेत्र अरण्याखाली होते.

इलेक्ट्रॉनिकी उपकरणांची जुळणी, विद्युत्, तयार कपडे, पशुखाद्य व पीठ, पन्हाळी पत्रे, औद्योगिक वायू, काँक्रीटच्या विटा, प्लास्टिकच्या वस्तू, सौम्य पेये, बीर, रम, लाकडी वस्तू, फळांचे रस, खाद्यपदार्थ निर्मिती इ. उद्योग येथे चालतात. येथील साखर उद्योग १९८५ मध्ये बंद करण्यात आला असला तरी रम उत्पादनासाठी काही प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. देशात १३२ द. ल. किवॉ. तास विद्युत्‌निर्मिती झाली (२००९ अंदाज). पर्यटन व्यवसायापासून देशाला ८१ द. ल. अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले (२००३).

ईस्ट कॅरिबियन डॉलर हे येथील अधिकृत चलन आहे. ईस्ट कॅरिबियन सेंट्रल बँक ही मध्यवर्ती बँकेची कार्ये पाहते तसेच चलन निर्गमित करते. देशाचे एकूण आयातमूल्य ३६६·५ द. ल. अमेरिकी डॉलर व निर्यातमूल्य ६८·३ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२०१२). यंत्रसामग्री, वाहतुकीची यंत्रे, खाद्यपदार्थ यांची आयात तर केळी, आवेष्टित पीठ व तांदूळ, आरारूट, नारळ, कसाव्हा यांची निर्यात केली जाते. आयात-निर्यात व्यापार प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, त्रिनिदाद व टोबॅगो, ग्रेट ब्रिटन या देशांशी चालतो.

देशातील रस्त्यांची एकूण लांबी ८२९ किमी. असून त्यांपैकी ७० टक्के रस्ते फरसबंदी होते (२०१२). प्रवासी मोटारी १०,५०४ तर व्यापारी वाहनांची संख्या ३,०१९ होती (२००२). किंग्स्टाउन हे खोल सागरी बंदर असून या शहरापासून आग्नेयीस ३ किमी.वरील अर्नोस व्हेल येथे छोटा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

लोक व समाजजीवन : कॅरिब हे येथील मूळ रहिवासी असले तरी सांप्रत आफ्रिकन गुलाम व कॅरिब यांच्या मिश्रणातून निर्माण झालेले कृष्णवर्णीय लोक येथे आढळतात. एकूण लोकसंख्येत ६५·५ टक्के कृष्णवर्णीय, १९ टक्के मिश्रवंशीय असून उर्वरितांमध्ये अमेरिकन, आशियायी व यूरोपीय होते (२०१२). देशात सु. २०,००० अँग्लिकन, १७,००० पेंटकॉस्टॅलिस्ट, १२,००० मेथडिस्ट, १२,००० रोमन कॅथलिक व ५२,००० इतर धर्म मानणारे लोक होते (२००१). इंग्रजी ही अधिकृत भाषा असून स्थानिक फ्रेंच/बोलीभाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

देशात दर हजारी जन्मदर १४·३६, मृत्युदर ७·०२ व बालमृत्युमान १३·८६ तर सरासरी जीवनमान पुरुषांचे ७२·४८ वर्षे व स्त्रियांचे ७६·३६ वर्षे होते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स २६६·१६ अशी होती (२०१२). लोकसंख्येचे केंद्रीकरण प्रामुख्याने किनारी भागात आढळते. सेंट व्हिन्सेंट बेटावर लोकसंख्येची घनता अधिक असून ग्रेनेडीन्झ बेटांवर लोकवस्ती विरळ आहे. नागरी लोकसंख्येचे प्रमाण ४९ टक्के होते (२०१०). किंग्स्टाउन व जॉर्जटाउन ही सेंट व्हिन्सेंट बेटावरील प्रमुख नागरी केंद्रे आहेत.

शासकीय रुग्णालये व सामूहिक आरोग्य केंद्रांमार्फत शासन आरोग्यसेवा पुरविते. स्त्रियांना प्रसवपूर्व व प्रसूतिनंतरच्या आणि कुटुंब नियोजनासंबंधीच्या सेवा व बालकांना आरोग्यसेवा मोफत पुरविल्या जातात. देशात ३८ रुग्णालये, ८९ डॉक्टर, ५ दंतवैद्यक, ३९८ परिचारिका व २७ औषधनिर्माते होते (२०००).

देशात प्राथमिक शिक्षण मोफत असले तरी ते सक्तीचे नाही. विद्यालयांतील मुलांचे उपस्थितीचे प्रमाण कमी असते. प्राथमिक शिक्षण ७ वर्षांचे, कनिष्ठ माध्यमिक ५ वर्षांचे तर उच्च माध्यमिक शिक्षण २ वर्षांचे असते. शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै असे असते. इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम आहे. कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच २५ टक्के मुले शाळा सोडतात. माध्यमिक विद्यालयांत ६० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेश घेतात. काही माध्यमिक विद्यालयांना शासनाचे अनुदान मिळते. बरीच विद्यालये धार्मिक संघटनांकडून चालविली जातात. देशातील पूर्व प्राथमिक विद्यालयांत १६२ शिक्षक व २,५३७ विद्यार्थी, प्राथमिक विद्यालयांत ७६१ शिक्षक व ९,७५६ विद्यार्थी होते (२०००-०१). विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अलीकडे वाढत असून, वेस्ट इंडीज विद्यापीठात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी जावे लागते. प्रौढ साक्षरता प्रमाण ८८·१ टक्के होते (२००४). द हेरॉल्ड  हे देशातील प्रमुख दैनिक वृत्तपत्र असून सहा साप्ताहिके प्रकाशित केली जात होती (२००६). किंग्स्टाउन येथील ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, वनस्पतिउद्यान (स्था. १७६५), सेंट जॉर्जेस कॅथीड्रल इ. उल्लेखनीय आहेत.

लोकांच्या आहारात सभोवतालच्या सागरी प्रदेशात सापडणारे मासे, स्थानिक रीत्या उत्पादित होणारी फळे, भाजीपाला, भाकरीचे फळ (विलायती फणस), रताळी, भोपळा, केळी, खोबरे, संत्री यांचा समावेश असतो. संगीत, नृत्य, लोककथा, दंतकथा इत्यादींवर कृष्णवर्णीय कॅरिब व पश्चिम आफ्रिकन यांच्या संस्कृतीचा प्रभाव आढळतो. क्रिकेट व सॉकर हे येथील लोकप्रिय खेळ आहेत. सागरी खेळही मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. देशातील सु. ४० टक्के कुटुंबे मातृसत्ताक आहेत. कुटुंबात वेगवेगळ्या साथीदारांपासून झालेली मुले असणे ही येथील सामान्य बाब आहे. किंग्स्टाउन हे प्रमुख नागरी केंद्र असून साप्ताहिक सुट्ट्यांदिवशी येथे खरेदीविक्री, मनोरंजन इ.साठी लोकांची गर्दी असते.

चौधरी, वसंत


सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ
किंग्स्टाउन येथील वनस्पतिउद्यान सेंट मेरी कॅथलिक चर्च, किंग्स्टाउन.