सेरीस : मंगळ व गुरू या ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या मुख्य पट्ट्यातील सर्वांत मोठा व सर्वप्रथम सापडलेला लघुग्रह. त्याचा व्यास सु. ९५० किमी. असून त्याचे सूर्यापासूनचे अंतर २·७६६ ज्योतिषशास्त्रीय एकके (ज्यो. ए.) एवढे आहे (सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतराला ज्यो. ए. म्हणतात व ते सु. १४,९५,९७,८७१ किमी. येते).

मंगळ व गुरू यांच्यामधील मोकळ्या भासणाऱ्या जागेत ग्रह का नाही, याविषयी ⇨ योहानेस केप्लर यांच्या काळापासून अंदाज बांधण्यात येत होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सूर्यापासूनच्या ग्रहांच्या अंतराविषयीच्या अनुभवसिद्ध टिटिअस-बोडे नियमानुसार या मोकळ्या जागेत ग्रह असायला हवा होता. ⇨ सर विल्यम हर्शेल यांनी १७८१ मध्ये शोधलेल्या प्रजापती (युरेनस) ग्रहाच्या स्थानावरून वरील नियमाला पुष्टी मिळाल्याचे दिसते. त्यामुळे मंगळ व गुरू यांदरम्यानच्या प्रदेशात हा गहाळ ग्रह शोधण्याचे तीव्र प्रयत्न झाले. १ जानेवारी १८०१ रोजी पालेर्मो वेधशाळेतील (सिसिली) जुझेप्पे पिआझी यांना आकस्मिकपणे सेरीस हा पहिला लघुग्रह आढळला. पिआझी यांनी त्याचे जादा वेध घेतले नाही आणि १ जानेवारी १८०२ रोजी फ्रांट्झ क्सावर फोन झाक यांनी त्या लघुग्रहाचा पुन्हा शोध लावला. कार्ल फ्रीड्रीख गौस यांनी त्याच्या कक्षेविषयी केलेली आकडेमोड झाक यांनी वापरली होती. या लघुग्रहाचे नाव रोमन कृषिदेवतेवरून ठेवले गेले. त्यावेळी तो ग्रह असल्याचे खात्रीने वाटले होते, मात्र नंतरच्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे अनेक खस्थ पदार्थ (लघुग्रह) आढळले. तसेच त्यांचे आकारमान आगणन करून काढण्यात प्रगती झाली. यामुळे हे खस्थ पदार्थ ग्रहांपेक्षा पुष्कळच लहान असल्याने दिसून आले. हर्शेल यांनी लघुग्रहांसाठी ‘ॲस्टेरॉइड’ हे नाव सुचविले. या मुख्य पट्ट्यातील खस्थ पदार्थ तसेच क्विपर पट्ट्यातील आणि पृथ्वीलगतचे छोटे खस्थ पदार्थ यांना मायनॉर प्लॅनेट (गौण ग्रह) म्हटले जाते.

सेरीस हा G प्रकारचा लघुग्रह अतिशय गडद रंगाचा व सूर्यासारखी अबाष्पनशील (बाष्परूपात उडून न जाणारी) रासायनिक संरचना असलेला लघुग्रह आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला (पृथ्वीवरील) ४·४ वर्षे लागतात. त्याच्या कक्षेचा अर्धबृहदक्ष २·७ ज्यो. ए. असून कक्षेची विकेंद्रता ०·०९७ आहे. त्याची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची दिशा पृथ्वी व इतर ग्रहांप्रमाणे असून त्याचे दृश्य भूमितीय परावर्तन गुणोत्तर सु. ०·१० आहे. हा सर्वांत मोठा लघुग्रह असला, तरी सर्वांत तेजस्वी लघुग्रह नाही. त्याची निरपेक्ष ⇨ प्रत ३·३२ आहे. म्हणजे तो व्हेस्टा या लघुग्रहापेक्षा अंधुक आहे. त्याचे द्रव्यमान ९·५ X १०२० किग्रॅ. म्हणजे पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या ०·०००१६ पट आहे आणि त्याचा मोजण्यात आलेला व्यास सु. ९५० किमी. असल्याने त्याची घनता दर घ. सेंमी. ला २·१ ग्रॅ. आहे. सेरीन आद्यग्रहाचा अवशिष्ट भाग असून सूर्यकुलाच्या आतील भागातील तो सर्वांत जुना व जसाच्या तसा टिकून राहिलेला पृष्ठभाग आहे.

सेरीस लघुग्रहाचे हबल अवकाश दूरदर्शकातून अनेकदा वेध घेतले गेले आहेत. त्याच्या अंतर्गत संरचनेचे विश्लेषण करण्यासाठी ही निरीक्षणे वापरण्यात आली. त्यावरून तो गुरुत्वीय आकर्षणाच्या दृष्टीने सैलावलेला खस्थ पदार्थ असून अपेक्षित समांग खस्थ पदार्थाच्या तुलनेत त्याचा आकार पुष्कळ कमी चापट असल्याचे दिसते. मात्र मध्यवर्ती द्रव्यमानाच्या एकीकरणाच्या बाबतीत हा सुसंगत वाटतो. यावरून त्याच्यात द्रव्याचे भिन्नीभवन झाल्याचे सूचित होते. म्हणजे खडकाळ गाभ्याभोवती पाणी-हिम विपुल असलेले प्रावरण असावे, असे दिसते.

नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲड्‌मिनिस्ट्रेशन (नासा) या अवकाश संशोधन संस्थेच्या डिस्कव्हरी मोहिमेअंतर्गत डॉन कार्यक्रमाचे लक्ष्य सेरीस लघुग्रह हे आहे. २००७ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमात सेरीस व व्हेस्टा यांच्याभोवतीच्या कक्षेत २०१५ मध्ये फिरून अभ्यास करण्यात येणार आहे. हे सर्वांत मोठे दोन आद्यग्रह त्यांच्या निर्मितीपासून जसेच्या तसे टिकून राहिले आहेत. त्यांचे तपशीलवार अनुसंधान करून सूर्यकुलाच्या सर्वांत आधीच्या काळातील परिस्थिती व प्रक्रिया यांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. [⟶ सूर्यकुल].

पहा : लघुग्रह.

ठाकूर, अ. ना.