सेफॅलोकॉर्डेटा : (शीर्ष-रज्जुमान). कॉर्डेटा (रज्जुमान) संघातील एक उपसंघ. यातील प्राणी भाल्याच्या आकाराचे व लहान माशांसारखे असून ते समुद्राच्या उथळ पाण्यात राहतात. या उपसंघात सु. २० जातींचा समावेश करण्यात आला असून ब्रँकिओस्टोमा किंवा अँफिऑक्सस आणि इपिगोनिस्थिस किंवा असिमिट्रॉन या दोन प्रजातींचाही समावेश होतो.

सेफॅलोकॉर्डेटा या उपसंघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात : (१) प्राणी वाळूत बीळ करून राहतात. तोंडाकडचे टोक नेहमी वाळूच्या वर पाण्यात असते. रात्री प्राणी बीळे सोडून पाण्यात इकडे-तिकडे पोहत असतात. (२) पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी ५-८ सेंमी. असते. शरीरावर मृदू उपचर्माचे आवरण असते. शरीराचे धड व पुच्छ असे दोन भाग असून डोके नसते. (३) गाळातील जैवपदार्थ व लहान प्राणी हे या प्राण्यांचे अन्न आहे. (४) मुख अग्र टोकाजवळ मुखछदामधून (मुखावरील झाकणामधून) अधर पृष्ठावर उघडते. (५) मुखाभोवती संस्पर्शकांसारखे रोम (आखूड व ताठ केस) असतात. (६) शरीराचे समखंडन झालेले (सारखे भाग पडलेले) असून स्नायूचे खंडविभाग देहभित्तीवर स्पष्ट दिसतात. (७) तोंड हे आतील बाजूस ग्रसनीमध्ये उघडते. पुच्छपराच्या बुडाशी डाव्याबाजूला गुदद्वार असते. (८) पृष्ठरज्जू शरीराच्या वरच्या भागात तुंडाच्या टोकापासून शेपटीच्या टोकापर्यंत गेलेला असतो. (९) पृष्ठरज्जूच्यावर पोकळ तंत्रिका रज्जू (जाड मज्जातंतू) असतो. या तंत्रिका रज्जूचा अग्रभाग थोडासा फुगीर असून तो मेंदूचे आद्यरूप दर्शवितो. यामध्ये संवेदी (मेंदूला संदेश पोहचविणाऱ्या) आणि प्रेरक (मेंदूपासून संदेश नेणाऱ्या) तंत्रिका असतात. (१०) श्वसन आणि रुधिर परिवहन (शरीरात रक्त फिरण्याची क्रिया) माशाप्रमाणे असते. हृदय नसते. काही प्राण्यांमध्ये त्वचेमार्फत श्वसन होते. (११) मुखछदाच्या आतील पृष्ठावर असणाऱ्या पक्ष्माभिकामय (हालचाल करणाऱ्या केसांसारख्या बारीक तंतूंनी युक्त असलेल्या) पट्टांमुळे पाणी मुखात शिरते. मुखाला लागून असणाऱ्या गुंठिकेवर असणाऱ्या संस्पर्शकांचा उपयोग अन्न गाळण्यासाठी होतो. (१२) उत्सर्जन आदिवृक्ककामार्फत होते. (१३) नर व मादी वेगवेगळे प्राणी असतात (एकलिंगी). त्यांच्या बाह्यरूपात फरक आढळत नाही. इपिगोनिस्थिस प्रजातीत जननग्रंथी शरीराच्या उजव्या बाजूस असतात. ब्रँकिओस्टोमा प्रजातीत जननग्रंथी शरीराच्या दोन्ही बाजूंस असतात. (१४) नर शुक्राणू व मादी अंडाणू पाण्यात सोडतात. पाण्यात अंडाणूचे फलन होते. डिंभ पाण्यात जीवन व्यतीत करतो. डिंभाचे रुपांतरण होऊन प्रौढ प्राणी तयार होतो.

सेफॅलोकॉर्डेटा या उपसंघात लेप्टोकार्डिआय हा एकच वर्ग असून त्याची वैशिष्ट्ये वरीलप्रमाणेच आहेत. उदा., ⇨ अँफिऑक्सस.

सेफॅलोकॉर्डेटा प्राणी सुरुवातीस पृष्ठवंशी प्राण्यांचे आदिपूर्वज म्हणून समजले जात होते व या प्राण्यांपासून माशांची निर्मिती झाली असे मानले जात होते. दोन्ही प्राण्यांमध्ये असणारा अखंड पृष्ठरज्जू व स्नायूंचे खंडविभाजन यांमुळे तसे समजले जात होते. सेफॅलोकॉर्डेट हे ॲसिडियन प्राण्यापेक्षा अधिक विकसित झालेले रज्जूमान प्राणी असून दोघेही एकाच पूर्वजापासून निर्माण झाले असावेत. कॉर्डेटापासून पृष्ठवंशी प्राणी निर्माण होत असताना, अगोदर काही पूर्वअवस्था असणारे कमी विकसित पृष्ठवंशी प्राणी निर्माण झाले असावेत. सेफॅलोकॉर्डेट व पृष्ठवंशी प्राणी हे कॉर्डेटा वर्गाशी जवळचे संबंध असणारे प्राणी आहेत. सध्या सेफॅलोकॉर्डेट हे पृष्ठवंशी प्राण्याचे आदिपूर्वज समजले जात नाहीत. ते क्रमविकासातील (कॉर्डेटापासून पृष्ठवंशी प्राणी निर्माण होताना) निर्माण झालेली वेगळी शाखा असे मानले जाते.

पहा : कॉर्डेटा.

संदर्भ : 1. Sing, Gurdarshan, Advanced Chordate Zoology, Vol. 2, Delhi, 2002.

पाटील, चंद्रकांत प.