सेन, सुकुमार-१ : (? १८९९ – ?). स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त व एक कार्यक्षम सनदी अधिकारी. त्यांचा जन्म सुसंस्कृत व सुशिक्षित कुटुंबात झाला. प्रसिद्ध विधिज्ञ व भूतपूर्व केंद्रीय कायदामंत्री अशोककुमार सेन (१९१३–९६) यांचे ते जेष्ठ बंधू होत. त्यांचे वडील जिल्हा दंडाधिकारी होते. त्यांचे सर्व शिक्षण कलकत्त्यात (कोलकाता) झाले. प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लंडन विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात विशेष गुणवत्ता दाखवून पदवी मिळविली आणि गणित विषयासाठीचे सुवर्णपदकही मिळविले. आय्. सी. एस्. होऊन ते हिंदुस्थानात परत आले (१९२१) आणि त्याचवर्षी त्यांची भारतीय नागरी सेवेत प्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बंगालमधील विविध जिल्ह्यांत त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. १९४७ मध्ये त्यांना पदोन्नती देऊन त्यांची प. बंगालचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली. पुढे त्यांची स्वतंत्र भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली तरीसुद्धा मुख्य सचिव या पदाचा कार्यभार काही काळ त्यांच्याकडे होता.

सेन हे मुख्य निवडणूक आयुक्त (२१ मार्च १९५०–१९ डिसेंबर १९५८) असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये घेण्याची घोषणा केली. त्यावेळी निवडणुकीचे तंत्र, मतपत्रिका, मतपेट्या, मतदारांच्या याद्या, मतदान केंद्रे या सर्वच गोष्टी नवीन होत्या आणि निर्वाचन क्षेत्र फार मोठे होते. शिवाय या निवडणुकांबरोबरच राज्यांच्या निवडणुकाही घेण्याचे ठरले होते. एकूण १७६ द. ल. मतदारांपैकी ८५ टक्के मतदार निरक्षर होते. त्यामुळे निरक्षर मतदारांना मतपत्रिकेवरील चिन्हांची ओळख तसेच विविध पक्षांची चिन्हे पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले. २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा हक्क असून त्यांची ओळख देण्यासाठी ग्रामीण भागातील संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. या कामात त्यांना काही प्रादेशिक निवडणूक आयुक्तांनी सहकार्य केले. सेन यांनी निवडणूक यंत्रणा अत्यंत कार्यक्षम रीत्या अंमलात आणली आणि सर्व प्रशासकीय बाबतींत पारदर्शकता ठेवली. इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक आय्. ए. एस्. अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले आणि जगातील लोकसंख्येने सर्वांत मोठ्या असलेल्या लोकशाही राष्ट्रात अत्यंत यशस्वी रीत्या निवडणुका पार पाडल्या. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची बरद्वान विद्यापीठाच्या कुलगुरू यापदी नियुक्ती करण्यात आली. या विद्यापीठाची स्थापना १५ जून १९६० रोजी करण्यात आली होती व ते या विद्यापीठाचे पहिलेच कुलगुरू होते.

अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Guha, Ramchandra, Sukumar Sen, Kolkata, 2002.

देशपांडे, सु. र.