सेन, सुरेंद्रनाथ : (२९ जुलै १८९०–३० ऑक्टोबर १९६२). मराठ्यांच्या इतिहासाचे एक साक्षेपी बंगाली इतिहासकार. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात बारिसाल (बांगला देश) या गावी झाला. जन्मगावी सुरुवातीचे शिक्षण घेऊन त्यांनी कलकत्ता (कोलकाता) विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी नाव नोंदविले पण गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडून चरितार्थासाठी नोकरी करावी लागली. त्यांनी नडिया जिल्ह्यातील (पश्चिम बंगाल) एका प्राथमिक विद्यालयात अध्यापन केले (१९०८–११). पुढे पुन्हा उच्च शिक्षणासाठी डाक्का येथील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

प्राध्यापक रिचर्ड बेरी रॅम्सबोथम यांच्यामुळे त्यांच्यात इतिहास विषयाबद्दल गोडी निर्माण झाली. सुरेंद्रनाथांनी बी. ए. (१९१३) व एम्. ए. (१९१५) या कलकत्ता विद्यापीठाच्या पदव्या संपादन केल्या आणि जबलपूरच्या शासकीय रॉबर्ट्सन महाविद्यालयात अधिव्याख्याता पदावर रुजू झाले तथापि काही महिन्यांतच त्यांनी ही नोकरी सोडून कोलकाता विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात अधिव्याख्यात्याची नोकरी पतकरली (१९१७) आणि डॉक्टरेटच्या (विद्यावाचस्पती) संशोधनास प्रारंभ केला. त्याकरिता ‘मराठ्यांची प्रशासनव्यवस्था’ हा विषय त्यांनी निवडला. मराठ्यांविषयीची सर्व कागदपत्रे-साधने मराठी, पोर्तुगीज, फार्सी व इंग्रजी या भाषांत उपलब्ध असल्यामुळे त्यांनी यांपैकी काही भाषा आत्मसात केल्या. शिवाय अनेक दप्तरखान्यांतून मूळ साधने धुंडाळली. सुरुवातीस त्यांनी सभासदाच्या बखरीचे भाषांतर शिवछत्रपती असे इंग्रजीत केले (१९२०). त्यानंतर त्यांनी फॉरिन बायोग्राफीज ऑफ शिवाजी (१९२२) हे संकलित पुस्तक प्रसिद्ध केले. अखेर सर्व साधनसामग्रीचा धांडोळा घेऊन त्यांनी ‘ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्टरी ऑफ द मराठाज’ हा प्रबंध कलकत्ता विद्यापीठास सादर केला आणि पीएच्.डी ही पदवी संपादन केली.

या विषयावर अधिक संशोधन करण्यासाठी सुरेंद्रनाथ यांनी एस्. एम्. एडवर्ड्स या इतिहासकाराच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. या काळात त्यांनी पोर्तुगालमधील अभिलेखागारातील गोव्याविषयीची काही कागदपत्रे अभ्यासली आणि प्रिलिमिनरी रिपोर्ट ऑन द हिस्टॉरिक रेकॉर्ड्स ॲट गोवा हे पुस्तक प्रसिद्ध केले (१९२५). पुढे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी. लिट्. ही पदवी ‘मिलिटरी सिस्टम ऑफ द मराठाज’ या प्रबंधाद्वारे संपादन केली (१९२७). इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांची नियुक्ती कलकत्ता विद्यापीठात नव्याने निर्माण केलेल्या मध्ययुगीन व आधुनिक भारतीय इतिहासाच्या आशुतोष प्राध्यापकपदी करण्यात आली (१९२८–३८). ब्रिटिश शासनाने त्यांची दिल्ली येथील शाही दप्तरखान्यात (इम्पिरिअल रेकॉर्ड्स डिपार्टमेन्ट) अभिलेखापाल म्हणून नियुक्ती केली. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर (१९५०) त्यांनी दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले. तिथेच त्यांची कुलगुरुपदी नेमणूक करण्यात आली (१९५१–५६). पुढे ते विस्कॉन्सिन विद्यापीठात (अ. सं. सं.) अभ्यागत प्राध्यापक होते (१९५७–५८).

सुरेंद्रनाथ यांचे स्वतंत्र लेखन मर्यादित आहे. त्यांनी मुख्यत्वे मराठ्यांच्या इतिहासावर व तेही इंग्रजीमधून लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी बंगालीमधून पेशवादिगेर राष्ट्रशासन पद्धती, अशोक आणि हिंदू गौरबेर शेष अध्याय या तीन छोट्या पुस्तिका लिहिल्या तसेच दोन इतिहाससाधनग्रंथांचे संपादन केले व प्रस्तावना लिहिल्या. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज (१९२३) हा त्यांचा ग्रंथ पीएच्. डी. च्या संशोधनाचे ग्रंथरूप असून मराठी इतिहासावरील तो एक विश्‍वसनीय दस्तऐवज आहे. शिवाय भाषाशैली दृष्ट्याही एक उत्तम साहित्यकृती होय. या ग्रंथात त्यांनी प्रामुख्याने छ. शिवाजी महाराजांच्या कार्यक्षम प्रशासनाचे मुद्दे चर्चिले असून तद्नंतरच्या प्रशासनातील सरंजामशाही व त्या अनुषंगाने आढळणारे प्रशासकीय दोष दाखविले आहेत. मिलिटरी सिस्टम ऑफ द मराठाज (१९२८) आणि एटीन फिफ्टीसेवन (१९५७) हे दोन ग्रंथ मराठ्यांच्या लष्करविषयक प्रशासकीय पद्धतीवर प्रकाश टाकतात. याही ग्रंथांत त्यांनी छ. शिवाजींच्या राजनीतीची, युद्धकौशल्याची प्रथम चर्चा करून त्यानंतर एकूण मराठी अंमलातील, विशेषतः उत्तर पेशवाई व तद्नंतर शिरजोर झालेले संस्थानिक यांच्या ढिसाळ लष्करी व्यवस्थेवर साधार टीका-टिपणी केली आहे. एकूण मराठ्यांच्या इतिहासावर सर्व बाजूंनी प्रकाश टाकणारे हे ग्रंथ आहेत. सेन यांनी कालखंडानुसार प्रस्तुत पहिल्या दोन ग्रंथांची तीन विभागांत मांडणी केली आहे आणि तात्त्विक चर्चेबरोबरच प्रत्यक्ष कार्यपद्धतीचे तपशील नोंदविले आहेत. एक संशोधनात्मक साधनग्रंथ म्हणून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज चे मूल्य वादातीत आहे.

वरील ग्रंथांशिवाय सुरेंद्रनाथ हे दिल्लीच्या अभिलेखागारात असताना थेव्हेनर आणि केरेरे या दोन पाश्चात्त्य प्रवाशांचा चरित्रात्मक वृत्तांत त्यांनी आपल्या इंडियन ट्रॅव्हल्स ऑफ थेव्हेनर अँड केरेरे या पुस्तकात प्रकाशित केला. याच दप्तरखान्यातील काही बंगाली पत्रे एकत्र करून त्यांनी प्राचीन बांगला पत्र-संकलन हा पत्रसंग्रह प्रसिद्ध केला. यात अप्रसिद्ध १६९ पत्रे असून ती १७७९–१८२० दरम्यानची आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी अश्विनीकुमार दत्त या देशभक्ताचे चरित्र आणि पखीर कथा हे पक्षांवरील पुस्तक बंगाली मुलांसाठी लिहिले.

सुरेंद्रनाथ हे अलाहाबादच्या अखिल भारतीय इतिहास परिषदेच्या मध्ययुगीन इतिहास विभागाचे (१९३८) तसेच मद्रास (चेन्नई) येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष होते (१९४४). याशिवाय या परिषदेच्या इतिवृत्तांत समितीचे ते अनेक वर्षे सचिव होते. त्यांना ऑक्सफर्ड व दिल्ली विद्यापीठांनी सन्मान्य डी. लिट्. देऊन गौरविले.

मस्तिष्क आंतरक्लथनाच्या विकाराने कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Sen, S. P. Ed. Historians and Historiography of Modern India, Calcutta, 1973.

            २. कुलकर्णी, अ. रा. मराठ्यांचे इतिहासकार, पुणे, २००७.

            ३. देशपांडे, सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, आवृ. २ री पुणे, २००६.

देशपांडे, सु. र.