सामुरी : (झामोरिन). भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मलबार भूप्रदेशातील मध्ययुगीन हिंदू राजे. मलयाळम् भाषेतील सामुरी या शब्दाचा अर्थ ‘सागराधिपती’ असा असून पोर्तुगीज त्यांना सामोरिम > झामोरिन म्हणत. या लोकांच्या सागरी भ्रमणकौशल्यामुळे त्यांना हे नाव पडले असावे. हे राजे मूळचे कोणत्या प्रदेशातील होते व ते नेमके केव्हा प्रसिद्घीस आले हे ज्ञात नाही तथापि आठव्या-नवव्या शतकांच्या सुमारास राष्ट्रकूट घराण्यातील तत्कालीन राजांनी चेरमान पेरुमाल ह्या मलबारच्या राजावर हल्ले चढविले, त्यावेळी तेव्हाच्या सामुरी राजाने पेरुमालास मदत केली. पुढे यांचे महत्त्व वाढले. चेरमान पेरुमाल मुसलमान होऊन अरबस्तानात गेल्यावर त्याच्या राज्याचे दक्षिणकोलतिरी (त्रावणकोर) व उत्तरकोलतिरी (मलबार) असे दोन भाग झाले परंतु ह्या राज्यांचा अंमल मांडलिक राजांवर नीट बसेना. त्यामुळे एरनाड नावाच्या नायर परगण्याचा अधिपती सामुरी (म्हणजे सामुद्री-झामोरिन) प्रसिद्घीस आला. त्याच्या कुटुंबाचे आडनाव ‘इरादी’ असे होते. त्याने आपल्या राज्याचा विस्तार वाढवून समुद्रावर दरारा बसविला आणि कुन्नलकोन ( गिरिसागरपती ) हे बिरुद धारण केले. पुढे पोलनाड ( कालिकतच्या आसपासचा भाग) परगणा जिंकून त्याने आपल्या राज्यास जोडला आणि कालिकतची ( कोझिकोडे ) डागडुजी करून तेथे आपली राजधानी वसविली. त्याने अरबी व्यापाऱ्यांस आश्रय व उत्तेजन देऊन कालिकतची भरभराट केली. अरबांचा अनेक वर्षे ह्या किनाऱ्यावर चांगला व्यापार होता. अरबांनीही सामुरी राजांस फौज, घोडे इत्यादींचा पुरवठा करून आसपासचा मुलूख जिंकण्यास मदत केली. सामुरी राजांच्या दरबारी असलेले अरबांचे महत्त्व पंधराव्या शतकात आलेल्या यूरोपियनांनी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. वास्को-द-गामा व पोर्तुगीज यांचे पाय भारतात कायम रुजण्यास सामुरींपैकीच एक राजा कारणीभूत झाला (१४९८). पोर्तुगीजांनी पुढे सामुरी राजांची सत्ता हळूहळू कमजोर केली. या राजांचे कोचीन-कननोर येथील राजांवर वर्चस्व होते परंतु सामुरी राजे व कोचीनचे राजे ह्यांत अनेक वेळा लढाया झाल्या. सामुरींनी कोचीन जिंकलेही, पण पोर्तुगीजांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पोर्तुगीज व सामुरी राजे ह्यांत अनेक वेळा लढाया झाल्या पुढे या राजांचा टिकाव लागेना. एका सामुरी राजास पोर्तुगीज गव्हर्नर अल्बुकर्कने विष देऊन ठार केले. १६६४ मध्ये इंग्रजांनी कालिकत येथे वखार घातली. सामुरी राजांनी इंग्रजांची मदत घेतली. पोर्तुगीजांशी स्पर्धा करणारे डच १६५६ मध्ये मलबारात घुसले. त्यांनी कोचीन व तंगासेरी ही ठाणी घेतली (१६६३) आणि १७१७ मध्ये सामुरींकडून चेटवई बेटावर ताबा मिळविला. इंग्रजांनी व्यापाराबरोबरच राजकीय सत्ता काबीज करून कालिकतच्या राजांना महाराजा बहादुर ही पदवी बहाल केली व पुढे त्यास सालिना एक लक्ष चौतीस हजारांची नेमणूक करून दिली. ह्या घराण्यातील शेवटचा ज्ञात राजा मानविक्र म सामुरी १८९६ साली मरण पावला. सामुरी राजे संस्कृत साहित्याचे चाहते होते आणि त्यांच्या पदरी काही विद्वान होते. मानविक्र म सामुरी राजाच्या दरबारी उद्दण्ड आणि वासुदेव हे श्रेष्ठ कवी होते त्यांचे अनुकमे कोकिलसंदेश व भृंगसंदेश हे रोमांचकारी काव्यगंथ प्रसिद्घ आहेत.
सामुरी राजांची संपूर्ण वंशावळ ज्ञात नाही तथापि सोळाव्या आणि सतराव्या शतकांत त्यांचा पोर्तुगीज कागदपत्रांतून सामुरी वा सामोरिम असा उल्लेख आढळतो. या राजांच्या कारभाराविषयी ⇨मार्को पोलो व ⇨अब्द-अल् रझाक ह्या परकीय प्रवाशांनी प्रशंसोद्गार काढले आहेत.
संदर्भ : Majumdar, R. C. Ed. History and Culture of the Indian People, Vols. VI and VII, Bombay, 1983.
देशपांडे, सु. र.