एपिडोट गट : मुख्यत: कॅल्शियम व ॲल्युमिनियम यांच्या जटिल सिलिकेटांचा गट. याच्यात पुढील खनिज जातींचा समावेश होतो. झॉइसाइट Ca2Al3Si3O12(OH), क्लिनोझॉइसाइट Ca2Al3Si3O12(OH), एपिडोट किंवा पिस्टासाइट Ca2(Al,Fe)3 Si3O12(OH), पीडमाँटाइट Ca2(Al,OH) (Al,Mn)2(SiO4)3, ॲलॅनाइट व ऑर्थाइट (Ca,Fe)2 (Al,OH) (Al,Ce,Fe)2 (SiO4)3. वरील खनिजांपैकी झॉइसाइट हे समचतुर्भुजी असून इतर खनिजे एकनताक्ष स्फटिक समूहातील आहेत. या गटातील खनिजांचे स्फटिक लांब व ब अक्षाला समांतर असतात [→ स्फटिकविज्ञान]. ॲलॅनाइट सोडून इतर खनिजे कमी किंवा मध्यम प्रतीच्या रूपांतरित खडकांत म्हणजे संगमरवर, सुभाजा (सहज भंग पावणारे खडक), पट्टिताश्मइत्यादींत आढळतात.
एपिडोट : लांबट, प्रचिनाकार स्फटिक व कणमय किंवा तंतुमय पुंजांच्या स्वरूपात आढळते. पाटन : (001) उत्कृष्ट [→ पाटन]. भंजन खडबडीत, ठिसूळ, कठिनता ६-७, वि. गु. ३·२५-३·५. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची काहीशी मोत्यासारखी किंवा राळेसारखी. रंग पिस्त्यासारखा पिवळसर हिरवा, कधीकधी हिरवट ते काळसर. कस रंगहीन, करडसर. द्वितीयक (नंतर बनलेले) खनिज म्हणून नेहमी आढळते. संगमरवर किंवा सुभाजांसारख्या कमी प्रतीच्या रूपांतरित खडकांत विपुल आढळते. फेरोमॅग्नेशियमी खनिजे व कॅल्शियमी फेल्स्पार यांच्या अपघटनाने तयार झालेले एपिडोट बर्याचदा अग्निज खडकांतही आढळते. अशा एपिडोट व झॉइसाइट यांच्या सूक्ष्म कणमय पुंजांना सॉस्युराइट म्हणतात. एपिडोटाचे पारदर्शक गडद हिरवे स्फटिक रत्न म्हणून वापरले जातात. वाढणे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हे नाव पडले.
क्लिनोझॉइसाइट : एपिडोटासारखेच परंतु त्यात लोह नसते आणि रंग फिकट पिवळा, हिरवा किंवा गुलाबी असतो. झॉइसाइट व क्लिनोझॉइसाइट ही द्विरूपी (रासायनिक संघटन तेच परंतु दोन वेगळ्या समूहांचे स्फटिक असणारी) खनिजे होत [→ झॉइसाइट].
पीडमाँटाइट : एपिडोटासारखेच परंतु त्यात Mn2O3 ५% ते १५% असते. त्यामुळे रंग तांबूस उदी ते तांबूस काळा असतो. कठिनता ६·५ वि. गु. ३·४ स्फटिकी सुभाजात व मँगॅनीजाच्या धातुपाषाणांबरोबर आढळते. इटलीतील पीडमाँट या स्थानावरून हे नाव पडले.
ॲलॅनाइट : लांब प्रचिनाकार किंवा वडीसारखे स्फटिक. संपुंजित स्वरूपातही आढळते. पाटन : अस्पष्ट. भंजन खडबडीत ते उपशंखाभ [→ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५·५-६ वि.गु. ३·५-४·२ पारभासी. चमक काहीशी धातूसारखी, डांबरासारखी किंवा राळेसारखी. रंग उदी ते काळा. ग्रॅनाइट, सायेनाइट, डायोराइट, ग्रॅनाइटी पेग्मटाइट इ. खडकांत आढळते. खनिजाचे प्रथम अवलोकन करणार्या टॉमस ॲलन यांच्या नावावरून हे नाव पडले.
ठाकूर, अ. ना.
“