एपिक्यूरस मत : ग्रीक तत्त्वज्ञानातील एपिक्यूरसप्रणीत पंथाची तत्त्वप्रणाली. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात ॲरिस्टॉटलच्या (३८४–३२२ इ. स. पू.) मृत्यूनंतर एक नवा कालखंड सुरू झाला. ग्रीक लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अभूतपूर्व स्थित्यंतर घडून आले. त्यांची नगरराज्ये प्रथम मॅसिडोनियन राजसत्तेच्या आणि नंतर रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली गेली. त्यांचे राजकीय स्वातंत्र्य संपुष्टात आले आणि सामाजिक जीवन विस्कळीत झाले. दैनंदिन व्यवहार अत्यंत जिकीरीचा बनला आणि जगावे कसे, या प्रश्नाने व्यक्तींची मने चिंताग्रस्त झाली. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनाला दिलासा देणारी आणि व्यवहार्य नीतीचा मार्ग दाखविणारी दर्शने उदयास आली. एपिक्यूरसने (३४१–२७० इ. स. पू.) स्थापिलेल्या पंथाचे तत्त्वज्ञान हे यांपैकी एक दर्शन होय.

प्राचीन ग्रीसमध्ये सुखवादाचा पुरस्कार करणारे दोन पंथ होऊन गेले : एक ॲरिस्टिपस (सु. ४३५ – सु. ३५६ इ. स. पू.) याचा  सायरेनेइक्स पंथ आणि दुसरा, एपिक्यूरस याचा एपिक्यूरस पंथ. एपिक्यूरसचा सुखवाद ॲरिस्टिपसच्या सुखवादाहून बर्‍याच बाबतींत भिन्न होता. त्याने आपल्या सुखवादी नीतीला पोषक असे सृष्टिशास्त्र डीमॉक्रिटसपासून घेतले आणि त्या सृष्टिशास्त्रास अनुरूप अशी ज्ञानमीमांसा अंगीकारली.

ज्ञानमीमांसा : एपिक्यूरसची ज्ञानमीमांसा इंद्रियवेदनावादी, अनुभववादी होती. त्याच्या मते, इंद्रियानुभव हाच सर्व ज्ञानाचा आरंभबिंदू होय. ज्ञानेंद्रियांच्या गवाक्षांतून बाह्य वस्तूंच्या सूक्ष्म आकृती आपल्या अंतरंगात प्रवेश करतात आणि त्यायोगे त्या वस्तूंची आपल्या मनावर छबी उमटते. अशा प्रकारे त्यांची आपणास जाणीव होते. प्रत्यक्षानुभवातूनच सारे ज्ञान मिळत असते. कधी कधी प्रत्यक्षानुभवात आपली फसगत होते हे खरे परंतु ही फसगत ज्ञानेंद्रियांच्या असमर्थतेपायी होत नसून, त्या त्या प्रसंगी आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयापायी होत असते. फसव्या अनुभवांच्या वेळीदेखील आपल्या मनास खरे प्रत्यय चाटून गेलेले असतात पण त्या प्रत्ययांचा आपण जो विशिष्ट अर्थ लावतो तो मात्र चुकीचा असतो. आपल्या मनाने घेतलेले निर्णय चुकीचे असतात मूळचे प्रत्यय मात्र चुकीचे नसतात. सारांश, इंद्रियप्रचीती हीच एक सत्याची कसोटी होय.

सृष्टिशास्त्र : एपिक्यूरसने परमाणुवादी सृष्टिशास्त्र प्रतिपादन केले. सृष्टीच्या मुळाशी भरीव परमाणू आणि पोकळ अवकाश ही दोन तत्त्वे आहेत. परमाणू हे अतिसूक्ष्म, अविभाज्य, अदृश्य आणि अविनाशी असतात. अनंत अवकाशाच्या पोकळीत या परमाणूंचे अध:पतन होत असताना, जड परमाणू त्यांच्या वजनामुळे मध्यभागी सरकतात. त्यांच्यावर हलके परमाणू येऊन आदळले म्हणजे उसळी खाऊन ते कडेला फेकले जातात. या प्रक्रियेतून नदीच्या पुरातील भोवर्‍यासारखी वर्तुळाकार गती निर्माण होते. त्या भोवर्‍यातील परमाणूंच्या उपसरण-अपसरणांमुळे जगातील विविध पदार्थ बनतात. शिवाय प्रत्येक परमाणूला स्वत:ची इच्छाशक्ती असते. तीमुळे तो नियतमार्गावरून थोडा इकडे तिकडे सरकू शकतो. अशा रीतीने अनेक विश्वे एकसारखी निर्माण होत राहतात. सृष्ट पदार्थ जन्मास येऊन विनाश पावतात. परंतु मूळचे परमाणू मात्र सदैव अभंग राहतात. त्या परमाणूंना आकार, वजन, आकृती असते परंतु रंग, गंध, रुची, ध्वनी, शीतोष्णता नसते. हे रंगादी गुणधर्म परमाणूंच्या संयोगाने उत्पन्न होणार्‍या सृष्ट पदार्थांतच प्रकट होतात.

अशा प्रकारे सृष्टीची रचना सर्वस्वी परमाणूंच्या गतिमानतेतून झालेली आहे. ती कोणा देवाच्या इच्छेनुसार झालेली नाही. सृष्टीच्या व्यापारात सुरळीतपणा आणि यांत्रिकता नांदते. निसर्गातील घटना नैसर्गिक कारणांनीच घडून येतात. तेथे निसर्गातीत अशा कोणत्याही शक्तीची लुडबुड चालत नाही. निरनिराळ्या देवदेवता सृष्टीच्या व्यापारात आणि मानवाच्या व्यवहारात ढवळाढवळ करतात, त्या मनुष्याला जीवंतपणी त्रास देतात आणि मरणानंतर त्याच्या आत्म्याला शिक्षा करतात, अशा अर्थाच्या ज्या कथा धर्मग्रंथांत सांगितलेल्या आहेत, त्यांना वास्तवात कसलाच आधार नाही.

तथापि एपिक्यूरसने देवांचे अस्तित्व नाकारले नाही. आपल्या एकंदर तत्त्वप्रणालीच्या संदर्भात, देवदेवतांचे अस्तित्व मान्य करणे, हे त्याला इष्ट वाटले. त्याच्या मते, देवदेवता ‘आंतर-अवकाशात’  म्हणजे निरनिराळ्या विश्वांच्या मधे पसरलेल्या अवकाशात राहतात. तेथे त्यांना ऊन-पाऊस-वारा आदी कशाचीही बाधा होत नाही. त्याच्या देहाकृती मानवासारख्या, पण मानवापेक्षाही अनंतपटींनी सुंदर असतात. देव अजर आणि अमर असतात. ते अखंड सुखाचा अनुभव घेण्यात दंग असतात. आपल्या सुखात खंड पडेल, असे कोणतेही कृत्य या देवदेवता करीत नाहीत. सृष्टीच्या घटनांमध्ये त्या कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. म्हणून मनुष्याने त्यांच्याविषयी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.

त्याचप्रमाणे मरणानंतर आपल्या आत्म्याला नरकवासाची दु:खे भोगावी लागतात, या धार्मिक समजुतीतही काही तथ्यांश नाही. एक तर, नरक नावाचे स्थळ कुठेच नाही आणि दुसरे म्हणजे, आत्मा मर्त्य आहे. त्याला मरणोत्तर अस्तित्व नसते. याचे कारण असे की, देहाप्रमाणे आत्मासुध्दा परमाणूंचाच बनलेला असतो. आत्म्याचे परमाणू अर्थातच देहाच्या परमाणूंपेक्षा अधिक सूक्ष्म असतात. हे आत्म्याचे परमाणू जीवंतपणी शरीराच्या वेष्टनात एकत्र राहतात परंतु मृत्यूसमयी शरीर विकल होऊन गळून पडले, की आत्म्याचे परमाणू सर्वत्र विकीर्ण होतात. शरीराप्रमाणे आत्माही नष्ट होतो.


नीतिशास्त्र : एपिक्यूरसने सुखवादाचा पुरस्कार केला. सुखलालसा ही निसर्गसिद्ध असून, सर्व प्राणी सुखाची प्राप्ती आणि दु:खाचा परिहार करण्यात गुंतलेले असतात. सुख हेच जीवनाचे उद्दिष्ट होय. तथापि एपिक्यूरसच्या मते, सुख म्हणजे प्राप्त क्षणीची मौज नसून आयुष्यभर पुरणारी प्रसन्नतेची प्रचीती होय. दु:खाचे निवारण केले, शरीर आणि मन यांना जाणवणारा ताप दूर केला, की सुखाचा अनुभव येतो. तसेच मानसिक सुखे ही शारीरिक सुखांपेक्षा अधिक मोलाची आणि इष्टतर असतात. कारण मानसिक सुखे ही गतकाळाच्या स्मृती आणि भावी काळाविषयीच्या आशा-अपेक्षा यांनी समृद्ध होऊन, दीर्घकाळापर्यंत जाणीवेत तरळत राहतात. शारीरिक सुखे मात्र फक्त वर्तमानकाळापुरतीच जाणवतात ती अल्पजीवी असतात. म्हणून शहाणा मनुष्य डोळसपणे सुखांची निवड करतो. तो विषयोपभोगांच्या पसार्‍यात गुंतून पडत नाही. नसत्या गरजांचा व्याप वाढवीत नाही. आकांक्षांवर नियंत्रण ठेवून तो अल्पसंतुष्ट राहून समाधानी वृत्तीने वावरतो. शरीराचे आरोग्य आणि आत्म्याची प्रसन्नता यांची जपणूक करून तो अखंड सुखाचा अनुभव घेतो. तो सद्‌गुणी आणि सदाचरणी असतो. कारण सदाचरणानेच खर्‍या सुखाची प्राप्ती होते. त्याचे चित्त निर्भय असते. आत्म्याला मरणोत्तर अस्तित्व नाही, हे त्याला कळते आणि म्हणूनच तो मरणास भीत नाही. जेव्हा आपण हयात असतो तेव्हा मृत्यू हजर नसतो आणि जेव्हा मृत्यूचे आगमन होते तेव्हा आपण अस्तित्वात नसतो हे त्याने ओळखलेले असते.

एपिक्यूरसची भोगवादी शिकवण सामान्य जनांस रुचणारी होती परंतु त्या शिकवणीतील तत्त्वे वीरोचित, स्फूर्तिदायक अथवा उदात्त नव्हती. त्याने बौद्धिक व मानसिक सुखांची महती गायिली परंतु विद्यार्जन, ज्ञानोपासना, विज्ञानसंशोधन या गोष्टींना प्रोत्साहन दिले नाही. त्याने वर्णन केलेले देवदेवतांचे जीवन आदरणीय अथवा स्फूर्तिप्रद नव्हते. त्याने पुरस्कारलेली सुखांची कल्पना ॲरिस्टिपसच्या कल्पेनेहून अधिक व्यापक होती खरी परंतु ॲरिस्टिपसच्या सुखवादात आढळणारी तार्किक संगती त्याच्या (एपिक्यूरसच्या) सुखवादात राहिली नाही. त्याचप्रमाणे परमाणूंच्या गतिमानतेत किंचित तिर्यकता संभवते, असे मत मांडून त्याने इच्छास्वातंत्र्याचा पुरस्कार केला परंतु या बौद्धिक कसरतीत त्याने डीमॉक्रिटसच्या परमाणुवादात आढळणारी तर्कसंगती मात्र गमावली.

संदर्भ : 1. Bailey, C. The Greek Atomists and Epicurus, Oxford, 1928.

           2. Dewitt, N. W. Epicurus and His Philosophy, Minneapolis, 1954.

           3. Hicks, R. D. Stoic and Epicurean, New York, 1910. 4. Taylor, A. E. Epicurus, London, 1911.

केळशीकर, शं. हि.