ऊतकतापन चिकित्सा : (डायाथर्मी). उच्च कंप्रतेच्या (दर सेकंदाला होणार्‍या कंपन संख्येच्या) विद्युत् प्रवाहाने शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहांमध्ये) उष्णता उत्पन्न करण्याच्या क्रियेचा उपयोग ज्या चिकित्सेत करण्यात येतो तिला ऊतकतापन चिकित्सा म्हणतात.

एक ते शंभर दशलक्ष हर्ट्‌झ (कंप्रतेचे एकक) कंप्रतेच्या प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशांनी वाहणार्‍या) विद्युत् प्रवाहाने शरीरातील उष्णता वाढविण्याची क्रिया घडवून आणता येते. विद्युत् मंडलामध्ये उच्च प्रवर्तक (बदलत्या प्रवाहामुळे विद्युत् चालक प्रेरणा निर्माण करणारा घटक) आणि मंद रोध वापरून विद्युत् धारित्रातील (विद्युत् भार साठवून ठेवणार्‍या साधनातील) ठिणग्यांनी निर्माण करता येतो. प्रवाहाच्या शीघ्र प्रत्यावर्तनामुळे तंत्रिकाग्रे (मज्‍जातंतूंची अग्रे) आणि स्‍नायू यांच्या नेहमीच्या क्रियेत व्यत्यय येत नाही. अशा प्रवाहामुळे स्‍नायू शिथिल होतात आणि रुग्णाला केवळ उष्णतेची जाणीव होते. शरीराच्या ज्या भागावर ही चिकित्सा करावयाची असेल त्याच्यावर घट्ट बसेल अशा धातूच्या पत्र्यांचा उपयोग केला जातो. ज्या यंत्राने ही चिकित्सा करतात त्याला ऊतकतापनयंत्र असे म्हणतात.

पाच ते तीस दशलक्ष हर्ट्‌झ कंप्रतेच्या विद्युत् प्रवाहाने करण्यात येणार्‍या चिकित्सेला दीर्घ-तरंग आणि दहा ते शंभर दशलक्ष हर्ट्‌झ कंप्रतेच्या विद्युत् प्रवाहाने करण्याते येणार्‍या चिकित्सेला लघु-तरंग ऊतकतापन चिकित्सा म्हणतात. या चिकित्सा प्रकाराने ऊतकांचे तापमान वाढून तेथील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. या पद्धतीचा मुख्य फायदा असा की, तीमुळे शरीरात खोल असलेल्या ऊतकांचे तापमान वाढविता येते.

औषधिचिकित्सा आणि शस्त्रचिकित्सा यांमध्ये या पद्धतीचा वापर करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा भेद आहे. औषधिचिकित्सेत तंत्रिका व स्‍नायू यांना या विद्युत् प्रवाहाने काही इजा न होता त्वचेपासून खोलवर असलेल्या भागांत उष्णतानिर्मिती करतात. शस्त्रचिकित्सेत अवश्य तर टोकदार तारांचा उपयोग करून विशिष्ट ठिकाणच्या कोशिकांचे दहन करून त्यांचा नाश करतात. त्वचेवरील चामखिळीसारख्या अर्बुदांचा (गाठींचा) नाश करण्यासाठी विद्युत् दाहक म्हणून या चिकित्सेचा उपयोग होतो. मूत्राशयात मूत्राशयदर्शिकेच्या साहाय्याने अष्ठीलावृद्धीवर [→ अष्ठीला ग्रंथि] अशा विद्युत् दहनाने शस्त्रक्रिया करता येते. इतरत्रही या पद्धतीचा उपयोग शस्त्रक्रिया तंत्रात करता येतो.

संदर्भ : Wakeley, C. Harmer, M. Taylor, S. Eds. Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.

आपटे, ना. रा.