ऊतककर : (कँबियम). उच्च दर्जाच्या वनस्पतींत श्रमविभाग व विशेषीकरण या तत्त्वांवर शरीरातील वाढ विशिष्ट स्थानी चालू राहते त्याला जबाबदार असणार्या कोशिका (पेशी) किंवा त्यांचे थर (ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) यांना ‘विभज्या’ म्हणतात. स्थानांवरून त्यांचे अग्रस्थ (टोकाकडील), अंतर्वेशी (दोहोंमधील) व पार्श्विक (बाजूचे) असे भेद पडतात. अगदी आरंभापासून सतत कार्यक्षम राहिलेल्या विभज्येस प्राथमिक व कायम (स्थायी) आणि जिवंत ऊतकापासून विभज्या-स्वरूपात आलेल्या ऊतकास द्वितीयक म्हणतात. बहुतेक सर्व एकदलिकित व वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नाची ने-आण करणारे शरीरघटक असणार्या) अबीजी वनस्पतींत प्राथमिक विभज्या शरीराची पूर्ण वाढ करते, परंतु प्रकटबीज व द्विदलिकित वनस्पतींत पूर्ण वाढ होऊन ती वर्षानुवर्षे चालू राहण्यास द्वितीयक विभज्येची मदत घेतली जाते. काही अपवादात्मक मानलेल्या एकदलिकितांत (उदा., युका, ड्रॅसीना व काही ⇨ पामी) विशेष प्रकारची द्वितीयक वाढ होते.
द्वितीयक विभज्येमुळे बनलेल्या नवीन ऊतकांना द्वितीयक ऊतक व त्यामुळे झालेल्या वाढीस द्वितीयक वाढ म्हणतात. फार प्राचीन काळी असलेल्या काही वाहिनीवंत अबीजी वनस्पतींत द्वितीयक वाढ होती असे त्यांच्या जीवाश्मांवरून (अवशेषांवरून) आढळून येते [→ एक्विसीटेलीझ कॅलॅमाइटेलीझ लेपिडोडेंड्रेलीझ पुरावनस्पतिविज्ञान]. या वाढीस जबाबदार असलेल्या पार्श्विक विभज्या प्रकारास ‘ऊतककर’ म्हणतात. द्विदलिकितांत प्रथमतः जी शरीररचना बनते तीमध्ये खोडाच्या वाहकवृंदात (पाणी व अन्न वाहून नेणार्या ऊतक समूहात) वाहक ऊतकांची पूर्ण वाढ झाल्यावरही प्राथमिक विभज्येचा काही अंश शिल्लक राहतो, त्यास वृंदस्थ (अंतर्वृदी) ऊतककर म्हणतात. वनस्पती जसजशी जून होते तसतशी वाढत्या गरजेपुढे प्राथमिक ऊतकांचा अपुरेपणा अनुभवून द्वितीयक ऊतकांची योजना सुरू होते त्याकरिता प्रथम निरनिराळ्या वाहकवृंदांमध्ये असलेल्या स्थायी ऊतकांत विभज्येची निर्मिती होते तिला अंतरावृंदीय ऊतककर म्हणतात. या दोन प्रकारच्या ऊतककरांची आता युती होऊन एक ऊतककर-वलय बनते व त्यापासून मुख्यतः नवीन द्वितीयक प्रकाष्ठ (जलीय विद्राव वाहून नेणे व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये करणारे ऊतक) व परिकाष्ठ (वाहिनीवंत वनस्पतींतील वाहक ऊतक) बनविले जातात. प्रकटबीज वनस्पतींत, काही किरकोळ फरक सोडले, तर हाच प्रकार आढळतो. मुळाच्या बाबतीत अंतर्वृदी ऊतककर नसतो, तथापि ऊतककर-वलय (प्रथम नागमोडी व नंतर गोल) बनते, तेही पार्श्विक द्वितीयक विभज्या प्रकारचे असते व त्यापासून द्वितीयक वाढ होते. खोड व मूळ या दोन्ही बाबतींत या वाढीमुळे त्यांची जाडी (घेर व व्यास) वाढते.
बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणार्या) प्रकटबीज व द्विदलिकित वनस्पतींत खोडांमध्ये ऊतककर-वलय दरवर्षी द्वितीयक ऊतकांचे एक वलय निर्माण करते व बर्याच जुन्या वृक्षांत ही वार्षिक वलये मोजून वनस्पतींचे वय अजमावता येते [→ आयु:काल, प्राण्यांचा व वनस्पतींचा कॉनिफेरेलीझ]. मुळांत ती वलये दिसत नाहीत, तथापि नवीन ऊतकांची भर पडल्याने मुळे जाडजूड, बळकट, अथवा मऊ व मांसल (उदा., बीट, गाजर) बनतात. द्वितीयक वाढीमुळे खोड मुळे ह्यांची जाडी आतून वाढत असल्याने बाहेरील अपित्वचा, मध्यत्वचा इ. प्राथमिक ऊतकांवर दाब पडून ती फुटून तुटून जाणे अपरिहार्य असते. अशा वेळी त्यांचे संरक्षक व संग्राहक कार्य करण्यास तेथे त्वक्षाकर नावाची द्वितीयक पार्श्विक विभज्या निर्माण होते व त्यापासून त्वक्षा-कोशिकायुक्त (बुचासारख्या पदार्थांने भरलेल्या कोशिकावरणाची) ऊतके व वल्कासारखी संरक्षक जाड साल बनते. काही ⇨ जलवनस्पतींत हेच त्वक्षाकार-ऊतक वायु-कोटरांनी भरलेले वायूतक बनविते. ही अनुयोजना परिस्थितीसापेक्ष असते. खोडांवर किंवा मुळांवर जखम झाल्यास तेथे संरक्षक आवरण बनविण्याचे कार्य ऊतककराचे असते त्यापासून तेथे वल्क किंवा परित्वचा बनते.
ऊतककरातील कोशिका सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यास, आडव्या छेदात विटेसारख्या आयताकृती व उभ्या छेदात लांबट दिसतात. त्यांपैकी प्रत्येक कोशिकेत एक दोन मोठ्या रिक्तिका (द्रव अथवा वायूने भरलेल्या पोकळ्या), मोठा प्रकल (केंद्रक) व प्राकल (जीवद्रव्य) ही सर्व असतात. कोशिकांची सतत विभागणी व नूतन कोशिकांची निर्मिती ही त्यांची प्रमुख लक्षणे होत. विभागणीत स्पर्शप्रतलाशी समांतर असणारी नवीन कोशिकावरणे अधिक असतात.
पहा : कोशिका त्वक्षा परित्वचा वल्क वायूतक विभज्या शारीर, वनस्पतींचे.
परांडेकर, शं. आ.
“