एड्रिॲनोपल : (तुर्की एदिर्ने). यूरोप खंडात मोडणार्‍या एदिर्ने प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,१८,३१८ (१९७०). ही व्यापारी पेठ असून येथे रेशीम व कापूस यांचे उद्योग आहेत. तसेच येथून रेशीम, तंबाखू, दारू, अफू, गुलाबाची अत्तरे, गुलाबपाणी, मेण, तुर्की लालरंग आणि फळे इत्यादींची निर्यात होते. हेड्रिएनस या रोमन सम्राटाने सु. १२५ मध्ये या नगराची स्थापना केली म्हणून त्याच्या नावाने हे शहर प्रसिद्ध झाले. यूरोपच्या बाल्कन प्रदेशातून आशियात येण्याच्या अतिशय मोक्याच्या रस्त्यावर असल्याने या शहराला खूप महत्त्व आले. रोमन साम्राज्याधिपती व्हेलेन्झ याचा गॉथ टोळ्यांनी ३७८ मध्ये येथेच धुव्वा उडवला. गॉथ नंतर शहर आव्हार्झ, बुल्गार, धर्मयोध्दे आणि १३६१ मध्ये तुर्क यांच्या ताब्यात आले. १४५३ पर्यंत तेथे तुर्की सुलतानांचे वास्तव्य होते. एकोणिसाव्या शतकातील रशियन-तुर्कांच्या लढाईत ते रशियाने दोन वेळा जिंकले पहिल्या बाल्कनयुध्दात (१९१३) बल्गेरियाकडे व दुसर्‍या बाल्कनयुध्दात तुर्कांकडे आले. १९२० च्या करारानुसार ते ग्रीकांकडे गेले आणि १९२३ मधील दुसर्‍या करारानुसार ते परत तुर्कांकडे आले. सोळाव्या शतकातील बायझंटिन पूल, राजवाडा व तुर्कांनी बांधलेल्या मशिदी अजूनही तेथे भग्नावस्थेत आढळतात. परंतु त्या सर्वांमध्ये सेलीम मशिद भव्य, आकर्षक व मनोवेधक आहे.

जोशी, चंद्रहास