एडो : हे बेनिन शहराचे लोकभाषिक नाव. दक्षिण नायजेरियातील निग्रो लोकांना संबोधण्यासाठी ते पुढे रूढ झाले. हे लोक पश्चिम सूदानी भागातील क्वा भाषा-समूहातील बिनी या पोटभाषेतील बोली वापरतात. पंधराव्या शतकात ही जमात संघटित व बलवान झाली आणि तिने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांची वस्ती मुख्यत्वे नायजर नदीच्या पश्चिमेस डोंगरी भागातून खाली नायजरच्या त्रिभुज प्रदेशात पसरली आहे. त्याचे बेनिन, कुकुरुकू, सोबो व ईशान असे चार शासकीय विभाग पाडण्यात आले. त्यांच्यात राजाला ओबा म्हणतात. हे राजपद सतराव्या शतकापासून वंशपरंपरागत झाले. राजाच्या हाताखाली दरबारी अधिकारी असत. देशाचा कारभार स्थानिक पुढारी किंवा प्रमुख चालवीत. ह्या राजकीय संघटनेत खेड्यास महत्त्व होते. पूर्वी यांची कुटुंबपद्धती विशाल म्हणजे अधिक विस्तारलेल्या पद्धतीची होती. ती कुळीची पद्धत आता शिथिल झालेली आहे. यांच्यात समान कुळीत लग्न होत नाही. यांच्यात मुख्यत्वे पितृवंशीय कुटुंबपद्धती असली, तरी काही ठिकाणी मातृवंशीय कुटुंबपद्धतीदेखील आढळते. वारसा मात्र बापाकडून थोरल्या मुलाकडे व मुलगा नसल्यास भावाकडे जातो. एडो जमातीची संघटना वयपरत्वे केलेल्या वर्गावर आधारलेली होती. अलीकडे ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्म अनेक एडो लोकांनी स्वीकारलेला आढळतो परंतु ते पारंपारिक अशा एका विश्वकर्म्यावर विश्वास ठेवतात. भूताखेतांवरही ते विश्वास ठेवतात. ह्याशिवाय काही स्थानिक देवदेवता व पंथ आहेत. त्यांच्यात पूर्वजपूजाही रूढ आहे. यांची १९५२ मध्ये नायजेरियात सु. ५०,००० लोकवस्ती होती.

देशपांडे, सु. र.