परजा : मध्य प्रदेश राज्यातील एक आदिवासी जमात. गोंड जमातीची ‘परजा’ ही एक शाखा असून यांची वस्ती मुख्यत्वे बस्तर जिल्ह्याता आढळते. या जिल्ह्यात यांना धुर्व असेही म्हणतात. १९७१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ८,३५० होती. जमातीतल्या दोन पूर्वज भावांपैकी थोरल्याच्या वंशजांना ‘परजा’ (प्रजा = सबजेक्ट) समजतात. गोंडी भाषेची एक बोली पारजी ही यांची रोजच्या जीवनातील बोलीभाषा आहे. या जातीचे तीन पोटविभाग आढळतात : तगर, पेंग व मुदरा. यांपैकी फक्त तगर बस्तरमध्ये आढळतात. हे लोक मध्यम बांध्याचे आणि निमगोरे असून जंगलातील कंदमुळे, मध, डिंक, लाख इ. वस्तू विकून गुजराण करतात. काही शेती, शिकार व औषधी वनस्पती विकणे हे व्यवसाय करतात.

हे लोक कुळीचिन्हवादी असून या कुळी अंतर्विवाही आहेत पण जमातीची संख्या कमी असल्याने क्वचित बहिर्विवाहसुद्धा होतात. मुलामुलींच्या संमतीनं लग्न होते. देज द्यावे लागते. मुलगी सासरी जातेवेळी तिच्याबरोबर तिचे पुरुष नातेवाईक जात नाहीत. अविवाहित पुरुषाला समाजात मान नसतो. त्यामुळे अशा प्रौढाला मामेबहिणीशी लग्न लावल्याचा औपचारिक समारंभ करावा लागतो. पुरुष लंगोटी घालतात, तर स्त्रिया कमरेभोवती एक अपुरे वस्त्र गुंडाळतात. त्यांचा उरोभाग उघडाच असतो. त्यांना दागिन्यांची हौस असून त्या पितळी दागिने घालतात.

हे लोक जडप्राणवादी असूनही हिंदू दैवते पूजतात. दांतेश्वरी या देवतेला ते पूजतात. भुताखेतांवर व जादूटोण्यावर ह्यांचा विश्वास आहे. विशिष्ट प्रसंगी कोंबडे बळी देऊन भूमिपूजा करतात.

सूर्य मावळतो तिकडे मरणानंतर जायचे असते, अशा समजुतीने मृताचे पाय पश्चिमेकडे ठेवून त्याला पुरतात. मृताच्या आत्म्याचे प्रतीक म्हणून घरी येताना एक मासा धरून आणतात. पुरलेल्या जागेवर भात वा पाणी ठेवून तीन ते नऊ दिवस सुतक पाळतात. त्यानंतर इतरांचे घरी न जाता बाजारात जमातीच्या लोकांना भेटून दारू व गोड पदार्थ वाटतात.

संदर्भ : 1. Russell, R. V. Hira Lal, Tribes and Castes of the Central Provinces of India, Vol. IV, Delhi, 1975.

   2. Thakkar, A. V. Tribes of India, Delhi, 1950.

   3. Thusa, K. N. The Dhurwa of Bastar, Calcutta, 1968.

कीर्तने, सुमति