एडन शहर : अरबस्तानातील दक्षिण येमेन राज्यातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,५०,००० (१९७० अंदाज). तांबड्या समुद्राचे पूर्वेकडील प्रवेशद्वार समजले गेलेले हे बंदर बाब-एल्-मांदेब सामुद्रधुनीच्या १७६ किमी. पूर्वेस आहे. रोमन काळापासून हे व्यापारी ठाणे म्हणून प्रसिद्ध होते. मध्ययुगात अरबांच्या भरभराटीच्या काळातही तांबड्या समुद्रावरून पूर्वेकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या मालाची ही उतारपेठ होती. १५१३ मध्ये अल्बुकर्क या पोर्तुगीज अधिकाऱ्याने एडन घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १५३८ मध्ये ते तुर्कांच्या अधिपत्याखाली आले. सतराव्या शतकात सन्नाच्या सुलतानाची येथे हुकमत होती. १८३९ पासून हे ब्रिटिशांकडे आले. प्रथम हा ब्रिटिश हिंदुस्थान सरकारचा शासकीय भाग म्हणून होता. एडन संरक्षित प्रदेश झाल्यावर एडन शहर त्याची राजधानी झाली. १८६९ मध्ये सुएझ कालवा सुरू झाला आणि एडनचे महत्त्व वाढले. इंग्लंड व यूरोपहून पूर्वेकडे जाताना तेथे तेल, कोळसा इ. घेण्यासाठी बोटी थांबत म्हणून शहराला खूपच महत्त्व प्राप्त झाले. महिन्याला सरासरी ५५० बोटी या बंदराला भेट देत. नवीन एडन अद्ययावत असून दक्षिण येमेनच्या स्थापनेनंतर (१९६७) राजधानी मेडिनेत अल् शाब येथे गेली असली, तरी एडन शहर हीच दक्षिण येमेनची अनधिकृत राजधानी मानली जाते. (चित्रपत्र ७६).
शाह, र. रू.