डेल्फाय : प्राचीन ग्रीसचे पवित्रतम नगरराज्य. हे फोसिस जिल्ह्यात, पार्‌नॅसस डोंगराच्या दक्षिण उतारावर, सिरा बंदराच्या ईशान्येस सु. १० किमी. ६१० मी. उंचीवर, हल्लीच्या थेल्फी (कास्ट्री) खेड्याच्या जागी वसलेले होते व दैववाणीसाठी प्रसिद्ध होते. जगाचा मध्यबिंदू ठरविण्यासाठी झूसने सोडलेले दोन गरुड येथे सापडले. त्या जागी आँफिलॉस (नाभी) चे मंदिर उभारण्यात आले. तेथील संरक्षक ड्रॅगन पायथॉनला ॲपोलोने ठार केल्यामुळे भूदेवतेऐवजी ॲपोलोची पूजा होऊ लागली व ॲपोलोलाच कौल मागू लागले. कौलाची देववाणी उच्चारणारी स्त्री-पीथिआ -संमोहित अवस्थेत जे शब्द उच्चारी त्यांचा अर्थ तेथील पुजारी सांगत. अनुकूल कौल मिळावा म्हणून श्रीमंत, मुत्सद्दी, नगरराज्ये इ. मंदिरांना मोठमोठ्या देणग्या देत त्यामुळे त्याचे वैभव खूपच वाढले. धर्म, अर्थ, राजकारण यांवर या दैववाणीचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. डेल्फाय अँफिक्टिऑनी या नगरराज्यसंघटनेचेही स्थान होते. इ. स. पू. ५९० मध्ये या संघटनेने क्रिसा राज्याविरुद्ध मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ दर चार वर्षांनी भरणारे पिथिअन गेम्स हे खेळांचे सामने सुरू केले. इ. स. पू. ३७३ मधील भूकंपाने उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा उभारले गेले. इ. स. पू. ३५६ ते ३४६ कोसिअनांनी डेल्फाय बळाने व्यापले. त्यांना मॅसिडॉनचा दुसरा फिलिप याने हाकलले. पुढे हळूहळू येथील महत्त्व कमी झाले. रोमन काळात सुला व नीरो यांनी येथील संपत्ती लुटली आणि थिओडोसिअसने दैववाणी ३९० मध्ये कायमची बंद केली. १८९२ मध्ये फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्यांनी येथे उत्खनन केले, तेव्हा तेथे ॲपोलोचे प्रमुख मंदिर, क्रीडापटांगण, प्रेक्षागृह व इतर इमारती आढळून आल्या. येथे सापडलेल्या डेल्फिक सारथ्याचा ब्राँझचा पुतळा सुबक आणि सुंदर आहे. येथील मंदिर साऱ्या ग्रीसचे समजले जात असल्यामुळे निरनिराळ्या अस्मितेच्या ग्रीक नगरराज्यांत एकतेची भावना जोपसण्यात डेल्फाय व पिथीअन गेम्स यांचे मोठे साहाय्य होई.

देशपांडे, सु. र.