एक्विसीटेलीझ : (इं. हॉर्सटेल्स). जुन्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे टेरिडोफायटा विभागात [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] ह्या वनस्पतींचा गट अंतर्भूत असे. त्याऐवजी हल्ली कॅलॅमोफायटा या नावाच्या विभागातील एक्विसीटीनी या एकमेव वर्गात समाविष्ट असलेल्या चार गणांपैकी तो एक गण मानला जातो. एक्विसीटेलीझ गणातील काही वनस्पती प्राचीन व जीवाश्मरूप (अवशेषरूप) असून त्यांचा अंतर्भाव कॅलॅमाइटेसी कुलात व इतर काही जीवाश्मरूप व विद्यमान जातींचा समावेश एक्विसीटेसी कुलात केला जातो. उत्तर डेव्होनियन ते उत्तर कार्‌बॉनिफेरस कल्प (सु. ३२ कोटी वर्षांपूर्वीपासून ते २५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) ह्या कालखंडात या गणातील अनेक वंश व जाती उदयास आल्या, परंतु पुढे पर्मियन कल्पात (सु. २४–२० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या कालखंडात) त्यांपैकी बहुतेक सर्व नामशेष झाल्या असून आजमितीस फक्त एकाच वंशाच्या [→ एक्विसीटम] जाती शिल्लक आहेत.

     ह्या गणातील वनस्पतींची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : विद्यमान जाती ओषधीय [→ ओषधि] परंतु जीवाश्म जाती अनेक वृक्ष व थोड्या ओषधीय बीजुकधारीचे (प्रजोत्पादक भाग म्हणजे बीजुक असलेल्या जातीचे) खोड शाखायुक्त व शाखा बहुतांशी मंडलित खोड व फांद्या यांच्या कांड्यांवर उभ्या खोलगट खोबणी (सीता) व उत्तरोत्तर कांड्यावरच्या सीता बहुधा एकांतरित (एकाआड एक) पेर्‍यांवर तळाशी जुळलेल्या लहान खवल्यासारख्या पानांचे अंशत: कांड्याभोवती वेष्टन करणारे मंडल वाहक चिती (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारा दंडगोलाकार पेशीसमूह) अंतर्वर्धी (आतून बाहेर वाढत जाणारी), नलिकारंभी, पेर्‍यांमध्ये अखंड परंतु कांड्यांमध्ये उभी विवरे काही वंशांत द्वितीयक वाढ असते शंकूसारख्या प्रजोत्पादक प्ररोहामध्ये (कोंबामध्ये) बीजुककोशदंडांची मंडलित मांडणी व प्रत्येक बीजुककोश धारण करणारा प्रत्येक दंड (बीजुकपर्ण नव्हे) टोकास बिंबाप्रमाणे (छत्राकृती) काही वंशांत शंकूमध्ये छदमंडले (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतो अशा पानांची वलये) काही जाती समबीजुक (एकाच प्रकारची बीजुके असलेल्या) व इतर असमबीजुक.

पहा : कॅलॅमाइटेलीझ.

वैद्य, प्र. भ.