उसण : मानेतील आणि पाठीतील स्नायुतंतू अकस्मात आखडले गेल्यामुळे त्यांना जी इजा होते तिला ‘उसण’ असे म्हणतात. जड वजन उचलणे, थंडी, गारठा, स्नायूंचे अनपेक्षित आणि अकस्मात आकुंचन यांमुळे उसण भरते. उदा., स्नान करताना एकदम गार पाणी डोक्यावर घेतले असता पाठीचे स्नायू एकदम आकुंचित होतात त्यावेळी उसण भरते. ग्रस्त भागांत जोराने चमक मारते. मान व पाठ यांची हालचाल तीव्र वेदनायुक्त होते म्हणून त्या भागांची हालचाल न करण्याची प्रवृत्ती होते. मान व पाठ ताठल्यासारखी एकाच स्थितीत ठेवावी लागते त्यामुळे पाठ एका बाजूस वाकल्यासारखी दिसते. वेदना तीव्र असल्यास वेदनानाशक औषधांचा तात्पुरता उपयोग होतो. ग्रस्त स्नायूंना पूर्ण विश्रांती देण्यासाठी रोग्याला निजवून ठेवावे लागते. चोळून, शेकून अथवा विद्युत् उपचारांनी दोन-चार दिवसांत उसण बरी होते.

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा : यात जड ओझे उचलल्यामुळे किंवा एकदम वेडेवाकडे वळल्यामुळे स्नायू पिरगळले जाऊन वेदना होतात. अशा वेळी स्वस्थ पडून रहावे. हालचाल अतिशय जपून हळूच करावी. नारायण तेल व देवदार तेल (टर्पेटाइन) एकत्र करून वेदनांच्या जागी व भोवताली हळूहळू मर्दन करावे आणि शेकावे. चतुर्वीज गरम पाण्यातून एक मासा, दिवसातून तीन वेळा घ्यावे. पुष्करमूळ, एरंडमूळ, शतावरी व देवदार यांचा काढा द्यावा. महावात विध्वंस किंवा महायोगराज गुग्गुळ, आल्याचा रस व तूप यांतून द्यावा. नारायण तेलाचा बस्ती द्यावा. गरम कपडे अंगात घालावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री