जंतुरक्तता : (बॅक्टिरिमिया) सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनाबरोबर सर्व शरीरात पसरतात, त्या अवस्थेला जंतुरक्तता असे म्हणतात.

जंतुविषरक्तता (रक्तात जंतुजन्य विषे मोठ्या प्रमाणावर मिसळली गेल्यामुळे निर्माण होणारी अवस्था, सेप्टिसिमिया) व जंतुरक्तता या दोन्ही अवस्थांमध्ये रक्तात जंतूंचा प्रवेश होत असतो परंतु त्या दोन अवस्थांमधील मुख्य फरक असा आहे की, विषरक्ततेमध्ये सूक्ष्मजंतूच्या विषामुळे शरीरात त्या जंतुविरुद्ध प्रतिक्रिया चालू होत असल्यामुळे अनेक लक्षणे दिसतात. जंतुरक्ततेमध्ये लक्षणे दिसतीलच असे नाही.

प्रकार : जंतुरक्ततेचे तीन प्रकार आढळतात : (१) तात्कालिक, (२) खंडित आणि (३) सतत.

  (१) तात्कालिक : जनन व मूत्र तंत्रांमध्ये (संस्थांमध्ये) काही कारणाने शस्त्रे वापरावी लागली असता तात्कालिक जंतुरक्तता होऊ शकते, तसेच गिलायूच्या (टॉन्सिलच्या) शस्त्रक्रियेनंतर, दात काढल्यानंतर आणि विद्रधी (गळू) झालेला वा शस्त्रक्रियेत व्रण झालेला शरीरभाग चोळला गेला असता तात्कालिक जंतुरक्तता होऊ शकते.

 (२) खंडित : हृद् कपाटांवर (हृदयाच्या झडपांवर) मालागोलाणूंचा (स्ट्रेप्टोकॉकस या जंतूंचा) संसर्ग झाला असता त्या मूळच्या स्थानापासून ते जंतू मधूनमधून व वारंवार रक्तात जाऊन शरीरात इतरत्र विकार उत्पन्न करतात, हे खंडित जंतुसंसर्गाचे उदाहरण आहे.

(३) सतत : आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), परिमस्तिष्कशोथ (मेंदूवरील आवरणाची दाहयुक्त सूज) वगैरे जंतुजन्य रोगांच्या पहिल्या काही दिवसांत जंतू रक्तात सतत प्रवेश करीत असतात. या अवस्थांमध्ये त्या जंतूंचे रक्तातच गुणन (वाढ) होत असावे असे मानले जाते. जंतुरक्ततेच्या निदानासाठी रक्त घेत असताना या गोष्टीचे फार महत्त्व आहे. तपासणीसाठी एकदाच रक्त घेतले असता जंतुरक्ततेचे निश्चित निदान होईलच असे सांगता येत नाही म्हणून रक्ताची वारंवार तपासणी करावी लागते.

तसे पाहिले तर बहुतेक सर्व संसर्गजन्य रोगांत केव्हाना केव्हा रक्तात जंतूंचा प्रवेश होत असतो. आंत्रज्वर आणि फुफ्फुसशोथ (फुप्फुसांची दाहयुक्त सूज, न्यूमोनिया) या रोगात पहिले काही दिवस त्या त्या रोगाचे जंतू रक्तात असतात, ही गोष्ट त्या जंतूंचे शरीरबाह्य संवर्धन केल्यास दाखविता येते.

  जंतूंचा शरीरात प्रवेश बहुधा लसीकामार्गे (ऊतकांतून–म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांतून–रक्तात जाणाऱ्या व रक्ताशी साम्य असलेल्या द्रवाच्या मार्गे ) होतो. हृद् कपाटशोथासारख्या काही रोगांत जंतूंचा प्रवेश सरळ रक्तातच होत असतो.

  जंतूचा रक्तात प्रवेश होण्याला सुलभ अशी काही परिस्थिती आढळते. उदा., लसीकावाहिन्यांची संख्या आणि मांडणी, विशिष्ट भागात द्रव साठण्याचे प्रमाण अधिक असणे, तसेच ऊतकांतील दाब वाढणे आणि व्यायाम व संबंधित भाग चोळणे या प्रकारांमध्ये जंतूंचा रक्तात प्रवेश अधिक सुलभपणे होतो.

  जंतूंचा रक्तात प्रवेश झाला म्हणजे ऊतकांतील भक्षिकोशिका (सूक्ष्मजंतू, प्रजीव आदींना खाऊन पचविणाऱ्या पेशी) आणि रक्तांतील बहुकेंद्रकी (एकापेक्षा अधिक केंद्रके असलेल्या) कोशिका त्या जंतूंचा नाश करीत असतात. तसेच यकृत, प्लीहा (पानथरी) आणि फुप्फुसे या ठिकाणच्या जालिका अंतःस्तरी तंत्रातील (आतील पृष्ठभागावर असणाऱ्या व जालिकाकार संरचनेच्या ऊतक यंत्रणेतील) कोशिकाही त्या जंतूंचा नाश करतात. १९५० सालानंतर रासायनिक आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा प्रसार झाल्यामुळे आता जंतुरक्तता फार कमी प्रमाणात आढळते.

पहा : पूयरक्तता. 

ढमढेरे, वा. रा.