एक्वादोर : दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राष्ट्र. क्षेत्रफळ २,७०,६७० चौ. किमी., लोकसंख्या ६१,७७,१२७ (१९७० अंदाज). १º२६´ ३०´´ उ. ते ५º१´ द. आणि ७५º ११´ ४४´´ प. ते ८१º १´ प. विषववृत्त या देशातून जाते, त्यावरून त्याचे एक्वादोर हे नाव पडले आहे. याच्या उत्तरेस कोलंबिया, पूर्वेस व दक्षिणेस पेरू आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. विषुववृत्तावरील ८९º ते ९२º प. रेखांशांतील ७,८३२ चौ. किमी. क्षेत्रफळाची गालॅपागस बेटे एक्वादोरचीच असून ती किनाऱ्यापासून सु. हजार अकराशे किमी. दूर आहेत. कीटो ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने एक्वादोरचे तीन स्पष्ट भाग पडतात : किनार्याजवळचा सखल प्रदेश ‘कोस्टा’, मध्यवर्ती पर्वतमय प्रदेश ‘सिएरा’ व पूर्वेकडील डोंगरउताराचा ‘ओरिएंटे’. देशाचा चौथा हिस्सा व्यापणारा कोस्टा सु. ३० ते १,८०० किमी. रुंदीचा आहे. तो गाळाने बनलेला असून अँडीज पर्वतश्रेणीच्या पायथ्यापर्यंत ४५० मी. उंचीपर्यंत गेलेला आहे. ग्वायाकीलच्या पश्चिमेस ७५० मी. उंचीची किनारपट्टीची डोंगरांची रांग आहे. ग्वायास व एझ्मेराल्डास या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांतील प्रदेश सखल व दलदलीचा आहे. सिएरा हा उंच, पर्वतमय प्रदेशही देशाचा सु. चौथा हिस्सा व्यापतो. यात अँडीज पर्वताच्या दोन रांगा असून त्यांची रुंदी १८० ते ४७० किमी. आणि उंची २,३५० ते २,८७५ मी. आहे. त्यांच्या दरम्यान सु. ६५० किमी. लांबीचा चिंचोळा पठारी प्रदेश आहे. या पर्वतमय भागात काही पूर्वेकडे व काही पश्चिमेकडे उतरत जाणारी दहा नद्यांची खोरी आहेत. तसेच या भागात सु. तीस ज्वालामुखी पर्वत असून त्यांपैकी कोटोपाक्सी हा सु. ५,८७७ मी. उंचीचा जगातील सर्वांत उंच जागृत ज्वालामुखी आहे. चिंबोराझो हा निद्रिस्त ज्वालामुखी ६,२६७ मी. उंच आहे. ओरिएंटे हा पूर्वेकडील प्रदेश अँडीज पर्वताच्या पूर्व पायथ्याकडील १,२०० मी. उंचीच्या प्रदेशापासून २५० मी. उंचीच्या प्रदेशापर्यंत उतरत गेला आहे. या भागातून पुष्कळ नद्या वेगाने खाली पूर्वेकडे उतरतात. त्यांच्या प्रवाहांनी पुष्कळ खोल दऱ्या आणि घळ्या कोरून काढल्या आहेत. या नद्यांचे प्रवाह पुढे ॲमेझॉन व तिच्या उपनद्या यांस मिळतात. गालॅपागस बेटे बहुतेक ओसाड असून १,७०० मी. उंचीचा एक ज्वालामुखी तेथे आहे. या देशात सोने, चांदी, तांबे, पारा, लोखंड ही खनिजे थोड्या प्रमाणात सापडतात.
समुद्रकिनाऱ्याकडील प्रदेशाचे हवामान उष्ण व आर्द्र असून ते उत्तरेकडे अधिकच आर्द्र होत जाते. दक्षिणेकडून पेरूच्या किनाऱ्याजवळून येणारा थंड हंबोल्ट समुद्रप्रवाह एक्वादोर किनाऱ्याच्या मध्याजवळ पश्चिमेकडे वळतो. काराकेझ आखातापासून ग्वायाकीलच्या दक्षिणेकडील सखल प्रदेशापर्यंतच्या भागातील पर्जन्यावर याचा प्रतिकूल परिणाम होतो. ग्वायाकील विभागात जानेवारी ते मेपर्यंत हवा उष्ण व पावसाळी असते. बाकीचे महिने कोरडे व कमी उष्ण असतात. समुद्रावरून येणाऱ्या शीतल वाऱ्यांमुळे येथील विषुववृत्तीय उष्ण हवामान काहीसे सौम्य बनते. पर्वतमय प्रदेशातील हवामान उंचीवर अवलंबून असते. कीटो ही राजधानी समुद्रसपाटीपासून २,८५० मी. उंच असून तेथे वर्षभर वसंतऋतूप्रमाणे हवा असते. पर्जन्यमान सु. १२५ सेंमी. असते. ५,००० मीटरपेक्षा अधिक उंचीवरील पर्वतशिखरे सदैव हिमाच्छादित असतात. उंच पर्वतांच्या उतारांवर जोरदार वारे वाहतात व हवा थंड असते. पूर्वेकडील ओरिएंटे या विभागात हवामान किनाऱ्यावरील प्रदेशांच्या मानाने अधिक उष्ण व आर्द्र असते. विषुववृत्तीय प्रदेशांच्या वैशिष्ट्याप्रमाणे येथे पाऊस वर्षभर पडत असतो.
दक्षिणेकडील निम्म्या किनारपट्टीत लहान झुडुपे, गवत व क्वचित सीबा वृक्ष दिसून येतात. याच्या पलीकडील आर्द्र अंतर्भागात आणि उत्तरेकडील आर्द्र किनार्यावर उष्ण कटिबंधातील दाट अरण्ये आढळतात. तेथूनच बालसा या बुचापेक्षाही हलक्या लाकडाचा जगाला पुरवठा होतो. ती २,५०० मी. उंचीच्या प्रदेशातही आढळतात. त्यापेक्षा उंच भागात पारॅमो नावाचे रुक्ष गवती प्रदेश आहेत. ३०० ते २,५०० मी. उंचीच्या दऱ्याखोऱ्यांतून समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वृक्ष दिसून येतात. तेथे दीर्घकाळपर्यंत मका व बटाटे यांचे पीक काढले जात आहे. पहाडी भागात १८६० मध्ये निलगिरीची लागवड करण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. पूर्वेकडील भागात नारिंगाच्या जातीचे नारिंजिला नावाचे मधुर फळ होते.
ऑसेलॉट हा लहान रानटी मांजरासारखा प्राणी, प्यूमा, जॉगर, आउन्स हा चित्त्यासारखा प्राणी, निमुळत्या, तोंडाचा तापीर, डुकरासारखा पेक्कारी, बिळे करून राहणाऱ्या प्राण्यांच्या जातीचा सर्वांत मोठा प्राणी कापीबारा हे विषुववृत्तीय अरण्यातील विशिष्ट प्राणी येथे आहेत. नद्यांत मासे व सुसरी भरपूर आहेत. जंगलांत शेकडो प्रकारचे पक्षी व कीटक आहेत. उंच पर्वतीय प्रदेशात गरूड व काँडॉर हे पक्षी आढळतात. गालॅपागस बेटांवर काही पक्षी, सरड्यांच्या जातीचे काही प्राणी व प्रचंड कासवांच्या काही दुर्मिळ जाती आहेत. या कासवांसाठीच ही बेटे जगप्रसिध्द आहेत.
इतिहास : एक्वादोरचे मूळ रहिवासी इतर अमेरिकन इंडियन लोकांप्रमाणेच मूळचे मंगोलियन वंशाचे आहेत असे मानले जाते. इ. स. १०००च्या सुमारास त्यांनी कीटोचे राज्य स्थापन केले. परंतु दक्षिणेकडील इंकांनी ते जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. इंकांचा राजा व कीटोची राजकन्या यांचा पुत्र आतावाल्पा हा सम्राट झाला, त्या वेळी स्पेनचा पिझारो किनार्यावरील प्रदेशातून सैन्यासह पुढे येत होता. त्याच्या जहाजाचा कप्तान बार्तोलोमे रईथ हा एक्वादोरच्या किनाऱ्यावर उतरणारा पहिला यूरोपीय होय. तो १५२६ मध्ये टेहळणी करून गेला व १५३१ मध्ये स्पॅनिश स्वारी झाली. परंतु इंकांच्या समृध्द साम्राज्याच्या वाटेवरील एक सोयीस्कर टप्पा यापेक्षा त्यांनी या प्रदेशाला महत्त्व दिले नाही. त्यांना येथे काही पाचूचे खडे मिळाले, त्यावरून ते प्रथम किनार्यावर जेथे उतरले, तेथे वसलेल्या शहराचे नाव एझ्मेराल्डास हे पडले आहे. पिझारोचा एक सरदार सेवास्त्य दे बेलास्काथार याने पेरूच्या उत्तरेस स्पॅनिश सत्तेचा विस्तार केला. इंकांनी माघार घेताना राजधानीची राखरांगोळी केली. तेथेच १५३४ मध्ये बेलास्काथारने कीटो हे शहर वसविले, तीच एक्वादोरच्या प्रजासत्ताक राज्याची राजधानी झाली. तेथे स्पॅनिश संस्कृतीची वाढ झपाट्याने झाली. रोमन कॅथलिक मठ व मंदिरे यांच्या सुंदर इमारती उभ्या राहिल्या. इंडियन व इंका लोकांचा मात्र विलक्षण छळ झाला. त्यांना वेठीस धरून त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली. स्पॅनिश लोकांतही सत्ता व संपत्ती यांपायी दुष्टावा, हेवेदावे व रक्तपात यांस ऊत आला.
अठराव्या शतकात स्वातंत्र्याची चळवळ सूरू झाली. युजेनियो एस्पेहो हा तिचा प्रमुख होता. १८०९चा उठाव मोडून काढण्यात आला. परंतु १८२० मध्ये देशभक्तांनी ग्वायाकील सर केले व शेवटी पिचिंचाच्या लढाईत यश मिळवून १८२२ मध्ये स्पॅनिश सत्ता झुगारून देऊन एक्वादोर स्वतंत्र झाला. १० ऑगस्ट हा राष्ट्रीय स्वातंत्र्यदिन व २४ मे हा पिचिंचाच्या लढाईचा स्मृतिदिन हे सार्वत्रिक सुटीचे दिवस असतात. कोलंबियाचा मुक्तिवीर बोलिव्हार याच्यातर्फे जनरल सूक्रे व अर्जेंटिनाचा मुक्तिवीर सॅन मार्टिन यांनी स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष भाग घेतला. बोलिव्हारने कोलंबिया, व्हेनेझुएला, एक्वादोर व पनामा यांचे ग्रेटर कोलंबिया नावाचे संयुक्त राज्य स्थापन केले. परंतु ते टिकले नाही. १८३० मध्ये व्हान होसे फ्लोरेस याच्या नेतृत्वाखाली एक्वादोरचे स्वतंत्र प्रजासत्ताक स्थापन झाले. तोच पहिला अध्यक्ष झाला. नंतरच्या १२९ वर्षांत संविधान पंधरा वेळा बदलले व ४६ अध्यक्ष झाले. त्यांपैकी फक्त बाराजण त्यांची मुदत पूर्ण होईतो अध्यक्षपदावर राहू शकले. फ्लोरेसची कडक व पुराणमतवादी कारकीर्द १५ वर्षे टिकली. १८६० ते १८७५ पर्यंत एक्वादोरचा पहिला श्रेष्ठ मुत्सद्दी गाब्रिएल गार्शिसो मोरेनो हा जवळजवळ हुकूमशहाच बनला होता. त्याच्या कडक कारकीर्दीत रोमन कॅथलिक चर्चला विशेष सवलती, रस्त्यांची सुधारणा, ग्वायाकील ते कीटो लोहमार्गाची सुरुवात, सार्वत्रिक शिक्षणाचा विकास, तांत्रिक शाळेची स्थापना इ. गोष्टी झाल्या. १८७५ मध्ये त्याचा वध झाला. नंतरच्या धामधुमीच्या काळात पुराणमतवादी व उदारमतवादी यांपैकी कोणीच यशस्वी होईना. १८९५ मध्ये जनरल आल्फारो फ्लाव्यो एलॉय याने क्रांती यशस्वी करून रॅडिकल लिबरल पक्षाचे युग सुरू केले. राज्यसत्ता व धर्मसत्ता यांची काळजीपूर्वक फारकत करण्यात आली. विचार, धर्म, वृत्तपत्रे यांचे स्वातंत्र्य प्रस्थापित झाले. ग्वायाकील-कीटो लोहमार्ग पुरा झाला. परंतु पुढे पहिले महायुद्ध व नंतरची मंदी यांमुळे देश खिळखिळा झाला. १९४४ मध्ये डॉ. होसे इबारा हा १९३४-३५ नंतर पुन्हा अध्यक्ष झाला. तो प्रभावी वक्ता होता. परंतु त्याचा संरक्षणमंत्री गालो प्लाझा हा इबाराला हद्दपार करून सत्ताधीश झाला. त्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारली. १९५२ मध्ये शांततापूर्ण निवडणूक होऊन इबारा पुन्हा निवडून आला. त्याने प्लाझाचे आर्थिक धोरण चालू ठेवून रस्ते व शाळा यांची वाढ केली. १९५६ ते १९६० अध्यक्ष असलेला एन्रीकेथ याने सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थैर्य टिकवून धरले. त्यानंतर पुन्हा इबारा अध्यक्ष झाला. परंतु ८ जुलै १९६१ ला त्याने माघार घेतली व डॉ. कार्लोस ज्युलियो मान्रॉय त्याचे जागी आला. परंतु ११ जुलै १९६३ला लष्करी गटाने त्याला पदच्युत करून सत्ता काबीज केली. या लष्करी गटाचा प्रमुख रिअर ॲडमिरल रामाँ कॅस्ट्रो जिजाँ हा होता. परंतु १९६६ मध्ये या लष्करी सत्तेचे उच्चाटन झाले. येरोवी राष्ट्राध्यक्ष झाला. ऑक्टोबर १९६६ मध्ये संविधान समितीची निवडणूक होऊन डॉ. आरोसेमेना गोमेस हा तिचा तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवडून आला. या समितीने बनविलेले संविधान मे १९६७ पासून देशात लागू झाले. जून १९६८ मध्ये अध्यक्ष व संसद यांच्या निवडणुका झाल्या व इबारा पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आला. १६ फेब्रुवारी १९७२ ला सैन्यप्रमुख ब्रि. ज. रॉड्रिगेझ लारा याने त्याला पदच्युत करून सत्ता काबीज केली.
राजकीय स्थिती : राजकारणात काँझर्व्हेटिव्ह व रॅडिकल लिबरल हे महत्त्वाचे पक्ष आहेत. रोमन कॅथलिक चर्च व बडे भांडवलदार यांचा काँझर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा तर व्यापारी वर्गाचा रॅडिकल लिबरल पक्षाला. त्यांना सरकार व चर्च यांची पूर्ण फारकत, उद्योगधंद्यांची वाढ व परदेशी भांडवलाचे आकर्षण आहे. १८९५ मध्ये रॅडिकल लिबरल यशस्वी झाले. गुलामगिरीला बंदी, इंडियन लोकांना समान हक्क व त्यांच्यावरील वैयक्तिक कर रद्द करणे यांमुळे या पक्षाची मुळे रुजली. १९४४ व १९५६ मध्ये काँझर्व्हेटिव्ह यशस्वी झाले. सोशॅलिस्ट पार्टी इंडियन लोकांच्या हक्काचा आणि जमीनविषयक सुधारणांचा पाठपुरावा करते. कम्युनिस्ट पक्ष विशेष जोरदार नाही. वैयक्तिक प्रतिष्ठेवर आधारलेले इतर पुष्कळ पक्ष आहेत. १९४५ मध्ये एक्वादोर संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला.
सीनेट व चेंबर ऑफ डेप्युटीज या दोन विधिमंडळांची काँग्रेस, न्यायासाठी कोर्ट आणि निवडलेल्या अध्यक्षाच्या हाती कार्यकारी सत्ता अशी लोकसत्ताक राज्यपद्धती येथे आहे. चेंबरच्या सदस्यांची दोन वर्षांकरिता व सीनेटच्या सदस्यांची चार वर्षांकरिता निवडणूक होते. १८ वर्षांवरील साक्षर पुरुषांस मतदान आवश्यक आहे. स्त्रियांस वैकल्पिक आहे. अध्यक्षपदाची मुदत चार वर्षे असते. हा ४० वर्षांवरील वयाचा व एक्वादोरचा नागरिक असावा लागतो. लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. अध्यक्ष हाच सैन्यप्रमुख असतो व तो देशाची सुरक्षितता, परदेशांशी संबंध, व्यापार आणि राष्ट्राची अर्थव्यवस्था यांवर देखरेख करतो. अध्यक्ष नऊ मंत्र्यांचे मंडळ नेमतो. मंत्रिमंडळ आणि काँग्रेसचे व सुप्रीम कोर्टाचे प्रतिनिधी यांचे कौन्सिल ऑफ स्टेट होते. काँग्रेसचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा संविधान अबाधित राखण्याची जबाबदारी या कौन्सिलवर असते. देशाची २० प्रांतांत विभागणी केलेली असून प्रत्येक प्रांताला अध्यक्षाने नेमलेला गव्हर्नर असतो. तो प्रांताची सुरक्षितता व विकास पाहतो. लोकांनी निवडलेल्या प्रॉव्हिन्शियल कौन्सिलतर्फे मुख्यत: अर्थव्यवहारावर लक्ष ठेवले जाते. प्रांताचे कॅंटन म्हणून विभाग बहुधा स्वायत्त नगरपालिकांच्या स्वरूपाचे असतात. पॅरिश हा सर्वांत लहान शासनविभाग. त्याचा व कॅँटनचा अधिकारी अध्यक्षाने नेमलेला असतो.
पॅरिशचा अधिकारी २०० सुक्रेपर्यंतचे दिवाणी दावे चालवितो. त्यांच्यावर प्रत्येक कँटनचे एक न्यायालय असते. ते सामान्य दिवाणी व फौजदारी काम पाहते. त्याच्यावर प्रांतिक दिवाणी व फौजदारी न्यायालये व त्यांच्याही वर आठ वरिष्ठ न्यायालये असतात. ती महत्त्वाच्या शहरी असतात. त्यांचे न्यायाधीश काँग्रेसने निवडलेले असतात. सर्वांच्या वर सुप्रीम कोर्ट असते. त्याचे पंधरा न्यायाधीश काँग्रेसने सहा वर्षांसाठी निवडलेले असतात. सुप्रीम कोर्टाचा अध्यक्ष त्याच्या सदस्यांनी निवडलेला असतो व तोच कौन्सिल ऑफ स्टेटचा अध्यक्ष असतो.
राष्ट्रीय अर्थसंकल्पाचा सु. पाचवा हिस्सा संरक्षणासाठी असतो. त्याचा ६० टक्के भाग सैन्यावर खर्च होतो. कीटो, ग्वायाकील, क्वेंका व पास्ताझा हे चार लष्करी विभाग आहेत. लष्कराचे सहा विभाग व इतर पथके आहेत. बारा पायदळ बटालियन, तीन तोफखाना तुकड्या, १९४२ मध्ये अमेरिकेने दिलेल्या प्रत्येकी १७ हलक्या टँकच्या तीन यंत्रसज्ज तुकड्या, दोन सॅपर बटालियन व दोन विमानविरोधी बटालियन आहेत. प्रत्येकाला दोन वर्षे लष्करी नोकरी सक्तीची आहे. अलीकडे सैन्याने रस्ते व पूल बांधणे, मोजणी न झालेल्या भागाचे नकाशे तयार करणे ही कामे केली आहेत. आरमारात सु. २५ नौका आणि ४,५०० नौसैनिक व अधिकारी आहेत. वायुदलात सु. ६० विमाने व सैनिक आणि अधिकारी मिळून ३,५०० लोक आहेत. सैन्य, आरमार व हवाईदल यांसाठी प्रशिक्षणशाळा आहेत.
आर्थिक स्थिती : येथे शेती व पशुधन महत्त्वाचे आहे. उद्योगधंदे मागासलेले आहेत. पूर्वी कोकोची निर्यात मुख्य होती. केळी, कॉफी व कोको यांच्या लागवडी व काही उद्योगधंदे यांच्या आधारावर १९५० ते ५८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ४२% वाढले. या तीन वस्तूंचीच निर्यात ८०% असून त्यांपैकी ५८% केळी आहेत. पहाडी भागातील शेती पोटापुरती होते. यंत्रांचा अधिक उपयोग, उपलब्ध जमीन व मनुष्यबळ यांचा योग्य उपयोग, भांडवलासाठी बचत व लोकसंख्येला आळा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. नवीन उद्योगधंदे, रस्ते व दळणवळण सुधारणा, दुर्लक्षित भागात वसाहती यांमुळे फायदा होत आहे.
अँडीजच्या पायथ्याची गाळाची जमीन सुपीक आहे. ती जलभेद्य असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो. ती कॉफीसारख्या झाडांस धान्यापेक्षा अधिक उपयोगी पडते. पहाडी खोऱ्यांत खनिजयुक्त, ज्वालामुखी राखेची जमीन आहे. परंतु ती लहान झुडपांस बरी असते. फार चराईमुळे व पिके काढल्यामुळे काही जमिनींची नासाडी झालेली आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातील व पूर्वेकडील प्रदेशातील जमिनी चांगल्या सुपीक आहेत. सिंचाई योजनांनी पहाडी व किनारपट्टीच्या प्रदेशांत कृषिविकास होण्याजोगा आहे. केळी, कॉफी, कोको व तांदूळ निर्यात होतात कापूस, ऊस, फळे, तंबाखू, बार्ली, गहू, मका ही देशातच खपतात. रासायनिक खते, जंतुनाशके, कीडनाशके यांचा वापर व मोठ्या प्रमाणावर शेती यांबाबत विकासमंत्रालय प्रयत्नशील आहे.
पहाडी प्रदेशात पाणीपुऱवठा असलेल्या सुपीक खोर्यांत मांसासाठी व दूधदुभत्यासाठी गुरे पाळण्याचा व्यवसाय व्यापारी व आधुनिक पद्धतीने केला जातो. होल्स्टीन-फ्रिजियन, ब्राउन स्विस, ॲबर्डीन, अँगस वगैरे जातिवंत गुरे अमेरिकेतून आणून जोपासली आहेत. दुधाचे निर्जंतुकरण, लोणी, चीज व भुकटी तयार करणे हे व्यवसाय चालतात. १९६९ मध्ये सु. २४ लक्ष गुरे होती. त्यांपैकी सु. एक पंचमांश दुभत्या गाई होत्या. उष्ण हवा व रोगराई यांना तोंड देऊ शकणाऱ्या झेबूसारख्या जातीची गुरे आणविल्यामुळे किनारपट्टीच्या भागातही हा व्यवसाय वाढत आहे. मेंढ्या २२ लक्ष, डुकरे २० लक्ष होती. मेंढपाळी व कुक्कुटपालन यांस सरकारी उत्तेजन मिळत आहे.
देशाचे ७४·१% क्षेत्र जंगलांनी व्याप्त आहे. किनारपट्टीत ४०%, पहाडी भागात १२% व पूर्वेकडील भागात ९०% जंगले सरकारी मालकीची आहेत. जंगलात वनस्पतींच्या २,२४० हून अधिक जाती आढळून आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातून निलगिरीची झाडे आणून त्यांची लागवड १८६० मध्ये केली ती यशस्वी झाली आहे. भूसंरक्षण, जळण व इतर उपयोगांसाठी ती वापरतात. बालसाचे लाकूड बुचापेक्षाही हलके व टिकाऊ असते. ते तराफ्यांसाठी व विमानांच्या भागांसाठी वापरले जाते. मॉहागनीचे लाकूड फर्निचरसाठी उपयोगी पडते. टोकिल्ला पामच्या पानांपासून ‘पनामा हॅट’ म्हणून प्रसिध्द असलेली हलकी टोपी एक्वादोरमध्ये तयार होते. हा येथील एक महत्त्वाचा धंदा आहे. तागुआ पामच्या फळातील गर पांढरा व टणक असतो. तो कृत्रिम हस्तिदंत म्हणून वापरला जातो. सिंकोनाच्या सालीपासून कोयनेल तयार होते. कपॉक (सीबा)चे झाड शेवरीच्या झाडासारखे असते. रबर हे तर अनेकोपयोगी आहे.
गालॅपागस बेटांजवळ मच्छीमारीचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तेथे मुख्यत: ट्यूना जातीचे मासे सापडतात. किनार्यापासून ३२० किमी. पर्यंतच्या भागात परदेशी कंपन्यांना मच्छीमारीचे परवाने देऊन सु. तीन लक्ष डॉलरहून अधिक रक्कम मिळविली जाते. आता एक्वादोरच्या कंपन्या स्थापन झाल्या असून त्या डबाबंद ट्यूना व गोठविलेले श्रिंप (कालवे) यांची निर्यात करतात. डबाबंद मासळी आयातही होते. गालॅपागस बेटांवरील २०० वर्षांहून अधिक जगणारी व २५० किग्रॅ. पर्यंत वजनाची प्रचंड कासवे त्यांच्या मांसासाठी व त्यांपासून मिळणार्या तेलासाठी पकडली जातात. किनाऱ्याजवळ पकडलेली मासळी तेथेच विकली जाते. ती टिकविण्याची व साठविण्याची योजना होत आहे. मासे व त्यांपासून बनविलेले पदार्थ यांचे उत्पन्न १९७० मध्ये ९६ लक्ष अमेरिकी डॉलर इतके झाले. त्यापैकी निम्मे कालवांचे होते.
उद्योग : एक्वादोरमध्ये थोडा लिग्नाइट कोळसा व थोडे पेट्रोलियम सापडते. परंतु पेट्रोल व वंगण तेले आयात करावी लागतात. मुख्य शक्तिसाधन जलविद्युत् हे आहे. १९७० मध्ये २,२०,२८५ किलोलिंटर क्रूड ऑईल उत्पादन व १९६९ मध्ये ८,५०,००० किवॉ. तास वीज उत्पादन झाले. किनारपट्टी प्रदेशात औष्णिक वीजकेंद्रे आहेत.
ग्वायाकीलजवळ सांता एलेना द्वीपकल्पात पेट्रोलियम क्षेत्रे आहेत. किनार्याजवळ व पूतूमायो नदीजवळ १९६७ मध्ये तेल सापडले आहे. तेलाचा व्यवसाय परकीय कंपन्यांकडे आहे. सोने, चांदी, तांबे, लोखंड, शिसे व जस्त ही इतर खनिजे थोड्या प्रमाणात सापडतात. मीठ, थोडा कोळसा व थोडे गंधकही सापडते.
पहाडी प्रदेशात कापड विणण्याचा धंदा मुख्य आहे. सर्वांत अधिक कामगार या धंद्यात आहेत. जुनी पद्धती व साधने आणि कोलंबियाची स्पर्धा यांचा परिणाम जाणवतो. पिठाच्या गिरण्या, साखरेचे कारखाने, खाद्य तेले, पेये, मद्ये, टिकविलेले अन्नपदार्थ व माशांचे पदार्थ यांचे कारखाने आहेत. रसायने, औषधे, कपडे, पादत्राणे, फर्निचर, कागद व छपाई, सिमेंट, रबर, कातड्याच्या वस्तू, रंग, विटा, कौले यांचेही कारखाने आहेत. पोलादाचा एक नवीन कारखाना उभारला आहे. पनामा हॅटच्या धंद्याला आशियातील देशांची स्पर्धा जाणवू लागल्यामुळे लोकरीचे उत्तम रग विणण्याचा धंदा पुढे येत आहे. चैनीच्या व प्रवाशांच्या हौसेच्या वस्तू तयार करण्यास उत्तेजन मिळत आहे. एकूण औद्योगिक उत्पादनापैकी ८५% उत्पादन ग्वायास, पिचिंचा आणि मानाव्ही या प्रांतांत केंद्रित झाले आहे.
१९५० मध्ये ६०% कामगार पहाडी प्रदेशात, ३७% किनारपट्टीच्या भागात व फक्त ३% ओरिएंटे व गालॅपागस भागांतील होते. १९६७ मध्ये लोकसंख्येच्या ३२% लोक अर्थार्जन करणारे होते. त्यांपैकी ५६% शेती, १५% निर्मिती व खाणकाम, १३% सेवा, ७% व्यापार, ३% बांधकाम, ३% दळणवळण व ३% इतर व्यवसायांत होते. कामगारांच्या संघटना १९२० मध्ये सुरू झाल्या. १९५४ मध्ये १,३१५ मान्य संघटना होत्या. त्यांपैकी ६०% ग्वायास व पिचिंचा भागांतील होत्या. सी. टी. ई. ही प्रमुख संघटना आहे. ८ तासांचा कामाचा दिवस व ५ १/२ दिवसांचा कामाचा आठवडा असतो. स्त्रियांना रात्री व अनारोग्यकारक जागी काम करू दिले जात नाही. त्यांना ७ आठवडे भरपगारी प्रसूतीची रजा असते. किमान वेतन, दोन आठवड्यांची पगारी सुटी, जादा कामाबद्दल जादा पगार आणि विभक्त राहण्याबद्दल पगार यांची तरतूद आहे.
व्यापारी कंपन्यांच्या नऊ गटांच्या हाती व्यापार आहे. कीटो व ग्वायाकील ही त्याची केंद्रे आहेत. परदेशी व्यापार पूर्वी मुख्यत: ब्रिटनशी होत असे. आता अमेरिकेशी होतो (१९७० निर्यात ४३%, आयात ३५%). मुख्य निर्यात केळ्यांची त्यानंतर कॉफी व कोको. पनामा हॅटची निर्यात कमी झाली आहे. औषधी पदार्थांची निर्यात वाढती आहे. आयातीत यंत्रे, हत्यारे व वाहने प्रमुख आहेत. गहूही आयात होतो. १९७० मध्ये एकूण आयात २९·६४ कोटी अमेरिकन डॉलर व निर्यात २३·२८ कोटी अमेरिकन डॉलर होती. सामान्यत: व्यवहारशेष फायद्याचा असतो. कच्च्या मालाचा तुटवडा, तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव व मर्यादित क्षेत्र यांमुळे फारसे परकी भांडवल गुंतविले जात नाही. करात सवलती देऊन परदेशी भांडवल गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाते. आंतरराष्ट्रीय सहकार्याचे धोरण आहे. १९४८ च्या कीटो सनदेप्रमाणे व्हेनेझुएला, कोलंबिया, पनामा व एक्वादोर यांचे जकातविषयक सहकार्य अभिप्रेत आहे.
सेंट्रल बँक ऑफ एक्वादोर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर चालते. खासगी बँकांना ५% भांडवल व राखीव निधी सेंट्रल बँकेत ठेवावा लागतो. बँक ऑफ लंडन व बँक ऑफ माँट्रिऑल यांच्या शाखा कीटो व ग्वायाकील येथे आहेत. सूक्रे हे येथील मुख्य नाणे. ते ५९·२४४७ मिग्रॅ. सोन्याच्या किंमतीचे असते. एक सूक्रे = १०० सेंटाव्हो. ५, १०, २० सेंटाव्हो व एक सूक्रे यांची नाणी असतात. एक सूक्रेचे नाणे शुध्द निकेलचे असते. बाकीची तांबे व निकेल किंवा तांबे व जस्त यांची असतात. १९५० मध्ये सूक्रे ७·४०७४१ अमेरिकन सेंटवरून ६·६६६६७ वर घसरला. ऑगस्ट १९७० मध्ये १ अमेरिकन डॉलर = २५ सूक्रे अधिकृत विनिमय दर होता. १९५७ मध्ये ६ एक्वादोरियन व २२ परदेशी विमा कंपन्या होत्या.
भूरचना व हवामान यांमुळे वाहतुकीस अडचणी आहेत. १९६९ मध्ये १७,१९५ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यातील बहुतेक अरुंद असून डोंगरावरून दगड पडल्याने ते बरेच वेळा नादुरूस्त होतात. पहाडी भागातून ‘पॅन अमेरिकन हायवे’ जातो. या देशातील त्याची लांबी १,१४६ किमी. आहे. तो पुष्कळ ठिकाणी अरूंद व खडकाळ आहे. पहाडी व किनारी प्रदेश जोडणारा पूर्वपश्चिम रस्ता लाटाकुंगापासून केव्हेडोपर्यंत जातो. तेथून एक फाटा कॉफीच्या प्रदेशात मांताकडे व दुसरा ग्वायाकीलकडे जातो. कीटोहून सांतो दोमिंगोवरून एझ्मेराल्डासपर्यंत दुसरा पॅन अमेरिकन हायवे आहे. पूर्वेकडे आंबाटो ते पूयो रस्ता जंगलसीमेवर आहे. तेथून पूर्वेकडे फाटे आहेत. १९६९ मध्ये २६,०९१ प्रवासी गाड्या, २६,०६४ व्यापारी गाड्या व ३,६७३ बस होत्या. ग्वायाकीलसह सात प्रमुख बंदरे आहेत. ग्वायास, दाउले व बीन्सेस या नद्यांतून पावसाळ्यात ३०० किमी. पर्यंत आगबोटी जातात. ग्वायाकीलजवळ दूरान ते कीटोपर्यंत ४६४ किमी. रेल्वे आहे. एक्वादोरच्या नऊ रेल्वेंची मिळून लांबी १,३४० किमी. आहे. सरकारी मालकीची रेल्वे ९९० किमी. हून जास्त आहे. विमानाने कीटोहून पनामाला ४ तास, बोगोटाला १ तास, न्यूयॉर्कला ८ तास लागतात. विमानतळ लहान आहेत परंतु मुख्य शहरे विमानांनी जोडलेली आहेत. भूरचनेमुळे हवाई वाहतूक जलद वाढली. पेरू व कोलंबिया यांच्याशी तारायंत्राने दळणवळण ठेवता येते. समुद्री तारेने जगाशी संबंध आहे. मुख्य शहरे बिनतारी दूरध्वनीने जोडलेली आहेत. तीनशेवर नभोवणी केंद्रे आहेत. १९७१ मध्ये ९५,००० दूरध्वनी होते. ग्वायाकील (१९६०), कीटो (१९६१) व क्वेंका (१९६७) येथे दूरचित्रवाणी सुरू झाली आहे. १९६७ मध्ये २,१०,००० रेडिओ होते.
लोक व समाजजीवन : मूळचे इंडियन, वसाहतीसाठी आलेले गोरे यूरोपीय व मजुरीसाठी मुद्दाम आणलेले निग्रो असे लोकांचे तीन प्रमुख प्रकार येथे आहेत. त्यांची अनेकविध मिश्रणे झालेली आहेत. त्यांना मेस्टिझो म्हणतात. किनार्यावरील भागात निग्रो व गोरे जास्त तर पहाडी भागात इंडियन व मेस्टिझो विशेष आहेत. पूर्वेकडील जंगल विभागात अनेक रानटी टोळ्या आहेत. त्यांपैकी जिवारो व झापारो यांचे सरकारशी संबंध चांगले आहेत. दगडविटांचा व काँक्रीटचा उपयोग शहरांतून होऊ लागला आहे. बाकी कुडाच्या भिंती व ताडाचे किंवा पत्र्याचे छप्पर असे सर्वसाधारण घर असते. पहाडी भागात दगडमातीची घरे असतात. लाकूड महाग असल्यामुळे घरासाठी फारसे वापरले जात नाही. अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. इंडियनांची केचुआ भाषा आहे. ती ७% लोक बोलतात. ६% लोक केचुआ व स्पॅनिश दोन्ही भाषा बोलतात. ९०% हून अधिक लोक रोमन कॅथलिक आहेत. तथापि सध्या सरकारी धर्म कोणताच नाही. रोमन कॅथलिक चर्चतर्फे ४६५ खासगी शाळा चालविल्या जातात. प्रॉटेस्टंट पंथाच्या फक्त १२ शाळा आहेत. पहाडी प्रदेशातील लोक नाममात्र तरी रोमन कॅथलिक आहेत. पूर्वेकडील भागात प्राचीन काळातील धार्मिक समजुती रूढ आहेत.
अपुरे पोषण व बालमृत्यू हे आरोग्यविषयक महत्त्वाचे प्रश्न आहेत. गेल्या काही वर्षांत अन्नाचे उत्पन्न वाढले, परंतु लोकसंख्या दरवर्षी २·७% वाढतच आहे. रॉकफेलर फौंडेशनच्या मदतीने पीतज्वर नाहीसा झाला आहे. प्लेग व मलेरियाही जवळजवळ नि:शेष झाला आहे. क्षयरोगाला व साथीच्या रोगांना प्रतिबंधक उपाय योजिले जात आहेत. खासगी संस्था, व्यक्ती, सरकार, धार्मिक संस्था यांच्यातर्फे रूग्णालये चालविली जातात. परंतु ती अपुरी पडतात.
खासगी कारखान्यातील कामगारांसाठी निधी आहे. बँका, विमासंस्था, सार्वजनिक खात्यातील कामगार यांच्यासाठी निवृत्तीनिधी आहे. त्यात कामगार वेतनाचा १०% , मालक ७% व सरकार ३% घालते. प्रसूतिविमा, अपघात व व्यावसायिक रोगांसाठी विमा, वार्धक्यवेतन, मोफत वैद्यकीय मदत इत्यादींच्या योजना आहेत. शिक्षण व वारसा यांबाबत औरस व अनौरस संततीला सारखेच हक्क आहेत.
निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. १९५० मध्ये ते ४३·७% होते. इंडियन वस्तीत ६०% पेक्षा जास्त. १९६२ मध्ये १५ वर्षे वयावरील लोकांपैकी ३२% निरक्षर होते. अर्थसंकल्पाचा २०% खर्च शिक्षणावर करण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात १० टक्केच होतो. शाळेत जाण्यायोग्य मुलांपैकी तिसरा हिस्सा मुलेच शाळेत जातात. १९६८-६९ मध्ये ७,४७२ प्राथमिक शाळांत ९,७५,४८० मुले, ७२० माध्यमिक शाळांत १,९४,६८२ मुले व १० विद्यापीठांत ३१,३३० विद्यार्थी होते. कीटो येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ एक्वादोर १७६९ मध्ये स्थापन झाली. ग्वायाकील विद्यापीठ १८९७ मध्ये निघाले. साक्षरता मोहीम व शिक्षकांचे प्रशिक्षण यांसाठी संयुक्त राष्ट्रे व संयुक्त संस्थाने यांच्या मदतीने प्रयत्न होतात. शिक्षण मोफत व सक्तीचे आहे.
कीटोच्या राष्ट्रीय ग्रंथालयात ५०,००० ग्रंथ आहेत. प्रमुख शहरी ग्रंथालये आहेत. पुराणवस्तू, इतिहास, चित्रे, नाणी, शिल्प इत्यादींची संग्रहालये आहेत. शास्त्रीय व सामाजिक प्रश्नांच्या विचारांसाठी ‘हाऊस ऑफ एक्वादोरियन कल्चर’ व ‘एक्वादोर अकादमी’ यांसारख्या संस्था प्रयत्न करतात. रोटरी क्लब, लायन्स क्लब, रेडक्रॉस यांच्या शाखा आहेत. शेतकरी संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स यांची प्रगती बेताचीच आहे.
१९७० मध्ये देशात १५ दैनिके होती. ग्वायाकीलहून निघणाऱ्या एल् युनिव्हर्सो दैनिकाचा खप ८४,००० होता. ११,००० खपाचे, डाव्या विचारसरणीचे ला काले हे लोकप्रिय नियतकालिक आहे.
महत्त्वाची स्थळे : कीटो ही राजधानी पिचिंचाच्या डोंगराजवळ आहे. तेथून १२-१३ किमी. अंतरावर थेट विषुववृत्तावर ०º ०´ ०´´ असा निर्देश केलेली शिला बसविलेली आहे. किनारपट्टीच्या भागात ग्वायाकील हे मुख्य शहर कीटोपेक्षा जास्त वस्तीचे आहे. याशिवाय क्वेंका, आंबाटो, रीओव्हांबा ही प्रमुख शहरे आहेत. गालॅपागस बेटांवर काही पक्षी, सरड्याच्या जातीचे प्राणी व प्रचंड कासवे यांच्या दुर्मिळ जाती आहेत. १८३५ मध्ये चार्ल्स डार्विन याने या कासवांचा अभ्यास करून निष्कर्ष काढल्याने जगाचे लक्ष इकडे वेधले. पनामा कालवा जवळ असल्यामुळे या बेटांना लष्करी महत्त्व आहे. १९४१-४२ मध्ये एका बेटावर अमेरिकेचा विमानतळही होता. आता तेथे राष्ट्रीय उद्यान निर्माण करून पर्यटन खात्यातर्फे प्रवासी लोकांसाठी सोयी करण्यात येत आहेत. (चित्रपत्र ७५).
संदर्भ : 1. Carlson, Fred A. Geography of Latin America, Prentice Hall, 1961.
2. Grolier, N. Y. Lands and People Vol. VIII, New York, 1963.
3. Preston, E. James, Latin America, New York, 1959.
कुमठेकर, ज. ब.
“