ब्लॅकपूल : ग्रेट ब्रिटनमधील लँकाशर परगण्यातील शहर. लोकसंख्या १,४७,८५४. (१९८१) हे लिव्हरपूलच्या उत्तरेस ४२ किमी. आयरिश समुद्रकिनारी वसलेले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून ब्लॅकपूल विशेष लोकप्रिय आहे.

मूळचे खेडेवजा असलेले हे नगर अठराव्या शतकापासून भरभराटीस आले. ब्रिटिश लेखक विल्यम हटन याने शास्त्रीय लेखांतून समुद्रस्नानाच्या आरोग्यवर्धक गुणांचे महत्व विशद केल्यामुळे ब्लॅकपूल शहरास प्रसिद्धी मिळाली आणि पर्यटनकेंद्र म्हणून त्याचा विकास होऊ लागला. लँकाशर परगण्यातील औद्योगिक शहरांचे सान्निध्य व वेगवान रेल्वे गाड्यांची सेवा यांमुळे ब्लॅकपूलचा एकोणिसाव्या शतकात जलद औद्योगिक विकास झाला. येथे विमाने, बिस्किटे, खडीसाखर इत्यादी उद्योग विकास पावलेले आहेत.

शहरास लाभलेला ११.३ किमी. लांबीचा समुद्रकिनारा व विस्तृत पुळणी शहरातील उपाहारगृहे, नृत्यगृहे, उद्याने, पोहण्याचे तलाव, गोल्फ मैदाने, पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या नमुन्यावर उभारलेला १५८ मी. उंचीचा ‘ब्लॅकपूल टॉवर’ (१८९५) तसेच इतर अनेक मनोरंजन सुविधा यांमुळे येथे प्रतिवर्षी ८० लाखांवर पर्यटक येतात.

यार्दी, ह. व्यं.