उमरुप्-पुलवर: (सु. सतरावे शतक). मुस्लिम तमिळ कवींपैकी अत्यंत प्रसिद्ध कवी. आपल्या आश्रयदात्याच्या सांगण्यावरून त्याने मुहंमद पैगंबराच्या जीवनावर आधारलेले, ५,०२७ कडव्यांचे शीराप् -पुराणम् हे महाकाव्य लिहिले. प्राचीन तमिळ महाकाव्यांच्या आदर्शानुसार ते लिहिले असून त्याची शैली सफाईदार व रसाळ आहे. मुहंमदाचे संपूर्ण जीवन ह्यात अंतर्भूत नाही शिवाय ते अपूर्णही आहे. तथापि तमिळ मुस्लिम त्याला फार पूज्य मानतात आणि धार्मिक प्रसंगी त्याचे पठन करतात. मुहंमद हा जरी अरबस्तानात होऊन गेला, तरी कवीने आपल्या वर्णनासाठी मात्र भारतीय पार्श्वभूमीचा उपयोग केला आहे.

वरदराजन्, मु. (इं.) कापडी, सुलभा (म.)