उफा: रशियाच्या बश्किर स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ८,२१,००० (१९७२). दक्षिण उरल औद्योगिक विभागात, ब्येलाया आणि उफा यांच्या संगमाजवळ वसले आहे. व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठाणे म्हणून सोळाव्या शतकापासून हे प्रसिद्ध होते. उरलमधील खनिजसंपत्ती आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर बाकू येथील खनिज तेलउद्योग यांमुळे उफाची वाढ झपाट्याने झाली. येथे शक्तीची यंत्रे, खाणयंत्रे, विद्युत् उपकरणे, दूरध्वनियंत्रे, टंकलेखनयंत्रे बनतात. याशिवाय येथे तेलशुद्धीकरण, लाकूड कापणे, आगपेट्या, कागद आदींचे उद्योग आहेत. उफा हे दळणवळणाचे केंद्र असून येथे विद्यापीठ, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आणि खनिज तेल, वैमानिकी, कृषी व वैद्यक यांच्या संशोधन संस्था आहेत.
शाह, र. रू.