उपासना : उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम, पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते. जप हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे कर्माकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्माकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.
जप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही कर्मांग नसते, तर पृथक असते. जगातील सगळे उच्च धर्म, कर्मकांडास गौण ठरवून ह्या पृथक उपासनेचे महत्त्वच अधिक वर्णितात [→ भक्तिमार्ग].
संदर्भ : 1. Meland, B. E. Modern Man’s Worship, 1936.
2. Parrinder, Geoffrey, Worship in the World’s Religions, London, 1961.
3. Underhill, Evelyn, Worship, Wel wyn Garden City, 1937.
जोशी, लक्ष्मणशास्त्री