उपयुक्ततावाद: कृतीची नैतिक युक्तता अथवा अयुक्तता कृतीच्या परिणामावरून म्हणजे परिणामांच्या बरेवाईटपणावरून ठरते कृतीच्या मागे असलेल्या हेतूवरून किंवा तिच्या स्वरूपावरून ठरत नाही किंवा ईश्वराची वा धर्माची आज्ञा तशी आहे यावरूनही ठरत नाही, या नीतिशास्त्रीय उपपत्तीस उपयुक्ततावाद म्हणतात. खरे बोलणे युक्त आहे ते त्याच्या खरेपणामुळे नव्हे, तर खरे बोलण्याने कोणत्यातरी प्रकारच्या मानवी हिताची (उदा., सुखाची) अभिवृद्धी होते म्हणून. ‘क्ष’ ने चोरी केली ही कृती अयुक्त आहे त्याचे कारण ‘क्ष’ च्या मनातील पापवासना नव्हे, तर तिचे एकंदर परिणाम अहिताचे झाले म्हणून. व्यभिचाराचे कृत्य अप्रशस्त अथवा अयुक्त आहे ते व्यभिचार न करण्याविषयी परमेश्वराची आज्ञा आहे म्हणून नव्हे, तर व्यभिचाराचे एकंदर परिणाम अनर्थकारक होतात म्हणून.
आयुष्यातील बहुतेक प्रसंगी कृतीसंबंधी माणसापुढे अनेक पर्याय उभे असतात. त्यांपैकी जिचे परिणाम दुसऱ्या कोणत्याही एका कृतीच्या परिणामांपेक्षा अधिक वाईट नाहीत, अशी प्रत्येक कृती युक्त ठरेल व अशा अनेक संभाव्य युक्त कृतींपैकी कोणतीतरी एक करणे, हे त्या माणसाचे कर्तव्य ठरेल. कोणत्यातरी एकाच कृतीचे परिणाम इतर सर्वांपेक्षा अधिक चांगले (अथवा कमी वाईट) असतील, तर ती एकमेव कृतीयुक्त ठरेल आणि इतर सर्व अयुक्त ठरतील.
परिणामांचा चांगलेवाईटपणा मोजता येतो, असे येथे मानले आहे. हिताची (चांगलेपणाची) एक मात्रा व अहिताची (वाईटपणाची) एक मात्रा या एकमेकांस छेद देऊन निःशेष करतात, असेही येथे गृहीत आहे. हिताच्या मात्रा या धनसंख्या होत व अहिताच्या ऋणसंख्या होत, या भूमिकेवर उपयुक्ततावादाचे गणित आधारलेले आहे. एखाद्या कृतीचे परिणाम इतर संभाव्य कृतींच्या परिणामांपेक्षा अधिक चांगले आहेत याच्या अर्थात, ते कमीत कमी वाईट आहेत हाही अर्थ समाविष्ट आहे. जिचे परिणाम सर्वांत चांगले, ती युक्त कृती, अशा व्याखेत हा अर्थ जमा आहे.
आतापर्यंत ‘सर्वांत चांगले परिणाम’, ‘सर्वात अधिक हित’ अशी भाषा वापरली. अर्थात ‘चांगले’ म्हणजे काय, अथवा ‘हित’ कशास म्हणावयाचे याचेही उत्तर उपयुक्ततावाद्यास द्यावयास हवे.
सुख-उपयुक्ततावाद आणि मूल्य-उपयुक्ततावाद: जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२), जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–१८७३) व हेन्री सिज्विक (१८३८–१९००) या तीन इंग्रज उपयुक्ततावाद्यांनी सुख हेच माणसाचे हित असे ठरविण्याचा निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न केला. सुखाची प्राप्ती करणे आणि दुःखाचा परिहार करणे या दोन प्रवृत्तींच्या अधिराज्याखाली निसर्गतःच माणसाचे सर्व व्यवहार चालतात, हे एक अंतिम मानसशास्त्रीय सत्य आहे, असे बेंथॅमने मानले. ‘युटिलिटेरिॲनिझम’ ही संज्ञा १७८१ मध्ये बेंथॅमने वापरली. पण ‘सुख’ म्हणजे काय ? ‘जे माणसाला हवे असते ते’, असे एक उत्तर आहे. तसे झाल्यास सुखासाठी माणसाची प्रवृत्ती असते, याचा अर्थ माणसास जे काही हवे असते ते हवे असते, एवढाच होईल. यात काही विशेष सांगितले असे होत नाही. पण बेंथॅमच्या म्हणण्याचा एक सूक्ष्मार्थही निघतो. माणसाने आपल्या जास्तीतजास्त वासनांची पूर्ती करावी, अशी सूचना बेंथॅमच्या लिखाणात आहे. सुखाची मात्रा सारखीच असेल, तर काव्यानंद आणि एखाद्या पोरखेळातील आनंद यांत फरक करण्याचे कारण नाही, असे त्याने म्हटले आहे. वरच्या प्रतीचे सुख आणि खालच्या प्रतीचे सुख असा सुखासुखांमध्ये प्रकारभेद करून बेंथॅमच्या भूमिकेत मिलने फरक केला. मिष्टान्न खाण्याचे सुख कितीही अधिक असले, तरी काव्यास्वादाचे सुख त्याच्याहून वरच्या प्रतीचे असल्याने अधिक मोलाचे आहे, असे मिलचे म्हणणे. त्यामुळे मिलच्या सुखवादाचा फलतः अर्थ इतकाच होतो, की ज्या कशाला चांगले अथवा श्रेय म्हणावयाचे, त्यामध्ये सुखानुभव हा एक आवश्यक घटक आहे. सिज्विकने मात्र निर्भेळ सुखवादाचा पुरस्कार केला. निर्विकारपणे विचार करता सुखानुभव हेच माणसाचे हित आहे, हे बुद्धीला पटते, असे त्याचे म्हणणे. हर्बर्ट स्पेन्सर (१८२०–१९०३) हा वास्तविक विकासवादी नीतिशास्त्रज्ञ. जी कृती जीवसृष्टीच्या विकासाला अत्यंत अनुकूल ती युक्त, असे त्याचे मत पण या मताचे समर्थन पुष्कळदा त्याने सुखवादी उपयुक्तता वादाच्या आधाराने केले. विकासानुकूल कृती सुखाधिक्याच्या दिशेने जात असते, असे दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला.
जी. ई. मुर (१८७३–१९५८) व हेस्टिंग्ज रॅशडॉल (१८५८–१९२४) यांनी सुखवाद व उपयुक्ततावाद यांतील संबंध तोडला. केवळ सुखातच हित आहे किंवा केवळ सुख हेच साध्य-मूल्य आहे, हे त्यांनी नाकारले. सौंदर्यास्वाद, प्रेमभावना, ज्ञान यांसारख्या आणखी कितीतरी गोष्टींना आणि त्यांच्या आकृतिबंधांनासुद्धा साध्य-मूल्य आहे आणि कृतीची उपयुक्तता ठरविताना तिच्यातून निर्माण होणार्या सर्व साध्य-मूल्यांचे मापन व्हावयास हवे, असे मत त्यांनी मांडले. चांगलेपणाची अथवा साध्य मूल्याची व्याख्या करता येत नाही प्रज्ञाचक्षूला त्याचे साक्षात दर्शन होते, असाही एक महत्त्वाचा विचार मुरने मांडला. मुरच्या मते पदार्थांना साध्य मूल्य असण्यासाठी ते अनुभवविषय असले पाहिजेत असे नाही. ज्याच्या अस्तित्वाची कोणालाही माहिती नाही आणि जेथे प्राणिसृष्टीही नाही, अशा एखाद्या दूरच्या जगातसुद्धा पूर्णचंद्रोदयास सौंदर्यरूपी साध्य-मूल्य आहे आणि चिखलाचे डबके वाईट अथवा हीन मूल्य आहे. अनुभव निरपेक्ष साध्य मूल्यासंबंधीचे हे मुरचे मत फारसे मान्य झाले नाही. या बाबतीत थोडे स्थिर झालेले मत असे आहे, की साध्य-मूल्य हे केवळ मानवी अनुभवाच्या विविध अवस्थांना असते. असे मानल्याने मूल्यांची वस्तुनिष्ठता नाहीशी होते असे बिलकूल नाही. एखाद्याच्या प्रेमभावनेला वास्तविक किती मूल्य आहे, हे त्या माणसाला ते किती आहे असे वाटते, यावर अवलंबून नाही. मूल्य-उपयुक्ततावाद इतकेच मानतो, की ज्या कृतीचे परिणाम म्हणून अधिकतम वास्तविक मूल्याची निर्मिती होईल, ती कृती युक्त होय.
कृतिनिष्ठ आणि नियमनिष्ठ उपयुक्ततावाद: प्रत्येक प्रसंगी माझ्यासमोर ज्या अनेक पर्यायी कृती असतात, त्या प्रत्येकीच्या परिणामांच्या साध्य-मूल्यांची बेरीज वजाबाकी करून प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे कोणती कृती युक्त अथवा आचरणीय आहे, हे ठरवावयाचे असते काय? याचे होय, असे उत्तर मुर देईल. या मताला ‘कृतिनिष्ठ उपयुक्ततावाद’ (ॲक्ट युटिलिटेरिॲनिझम) असे नाव दिले गेले आहे. मिलने पुरस्कारिलेल्या उपयुक्ततावादाच्या अगदी उलट ‘नियमनिष्ठ उपयुक्ततावाद’ (रूल युटिलिटेरिॲनिझम) आहे. मिलच्या मते ‘खरे बोलावे’, ‘वचनभंग करू नये’, ‘जवळचे रक्ताचे नाते असलेल्या स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी विवाह करू नयेत’ इ. नीतिनियमांचे प्रामाण्य उपयुक्तता वादाच्या निकषावर घासून सिद्ध करावयास हवे. असल्या नियमांना तो दुय्यम तत्त्वे म्हणावयाचा. परम नीतितत्त्व जे उपयुक्ततावाद, त्याच्या साहाय्याने नियमांचे प्रामाण्य सिद्ध झाल्यावर, त्या नियमांत बसणारी कृती करण्याच्या प्रत्येक वेळी तिच्या परिणामांचा विचार करून तिची युक्तता ठरवत बसावयाचे नाही. एखाद्या वेळी असे वाटेल, की नियमानुसारी कृती करण्यापेक्षा नियमाविरुद्ध कृती केल्याने हिताची बेरीज अधिकहोईल. अशा वेळीसुद्धा नियमानुसारी कृती करणेच योग्य होईल. ‘नियम पाळले जातील’ या सामाजिक विश्वासास नियमभंगामुळे तडे जातात. त्यामुळे होणारी एकंदर हानी फारच असते. ती होऊ नये, यासाठी विशिष्ट प्रसंगी नैतिक नियम पाळल्यामुळे होणारी तात्कालिक हानी पतकरणे शहाणपणाचे होय. म्हणून या विशिष्ट कृतीचे एकंदर परिणाम काय होतील हे मोजण्यापेक्षा, अमुक एक नियम सामान्यतः पाळला गेल्याने एकूण सामाजिक फायदे काय होतील, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. दोन नीतिनियमांत जेव्हा विरोध येतो आणि त्यांपैकी एक नियम मोडणेच भाग पडते, (उदा., खरे बोलणे आणि गुप्ततेची शपथ पाळणे) तेव्हा मात्र प्रस्तुत असलेल्या दोन्ही विशिष्ट कृतींच्या सर्व परिणामांचा विचार करून, युक्त कृती कोणती त्याचा निर्णय करावा, असे मिल मान्य करतो. उपयुक्ततावादाचा निकष लावावयाचा तो नीतिनियम अथवा दुय्यम नीतितत्त्वे यांचे प्रामाण्य ठरविताना आणि प्रत्यक्ष कृतीच्या वेळी दोन नियमांचा विरोध होईल तेव्हा. सिज्विकसुद्धा व्यवहारात नियमनिष्ठ उपयुक्ततावादच मान्य करतो.
कृतिनिष्ठ उपयुक्ततावाद प्रत्येक कृतीची युक्तता स्वतंत्रपणे ठरवू पाहतो. त्यात अनेक अडचणी येतात. या क्षणी केलेल्या कृतीचे परिणाम पुढे अनंत काळपर्यंत पसरत जात असतात, त्या सर्वांना लक्षात घेता येणे शक्य नाही. म्हणून कोठे तरी विनातत्त्व मर्यादा घालावी लागते. दुसरे असे, की नेमके परिणाम काय घडतील याचा विचार करताना आणि त्या परिणामांचे मूल्यांकन करताना व्यक्ती कितीही सुबुद्ध असली, तरी तिच्याकडून चूक होणे सहज शक्य आहे. या क्षणीची परिस्थिती नेमकी काय आहे आणि तत्संबंधीचे सृष्टिनियम कोणते, यांविषयी कोणीच सर्वज्ञ असू शकत नाही. परिणाम अधिकात अधिक चांगले होतील, या बुद्धीने एखादी कृती केली आणि प्रत्यक्षात ते तसे झाले नाहीत, तर कृती अयुक्त ठरेल, असे मुरसारखा कृतिनिष्ठ उपयुक्ततावादी म्हणेल. त्यामुळे युक्ततेच्या संकल्पनेचा नीतिशास्त्रीय आशयच नाहीसा होतो. युक्त कृती कर्तव्य असते तिच्या ठिकाणी बंधकत्व असते या वेळी मी ती करावयास हवी अशी असते पण जर कृतिपूर्वकाळी ती युक्त की अयुक्त, हे मला ठरविताच येत नसेल, तर तिचे नैतिक बंधकत्व नाहीसे होते. कृतिनिष्ठ उपयुक्ततावादाला थोडी मुरड घालून ही अडचण नाहीशी करता येईल. असे म्हणता येईल, की कृतीच्या प्रत्यक्ष होणाऱ्या परिणामांवर तिची युक्तता अवलंबून न ठेवता, जे परिणाम घडावेत असा कर्त्याचा उद्देश असतो, त्यांवरून ती युक्तता ठरवावी. भर दुपारी रस्त्यावरून अनवाणी चालणाऱ्या एखाद्या गरिबास मी माझा पडून राहिलेला बूट दिला आणि तो पायात घालताक्षणी त्यात असलेल्या विंचवाने दंश केल्याने त्याला मरणप्राय वेदना झाल्या, तरी माझे उद्दिष्ट चांगले असल्याने कृती युक्त ठरावी. हा पक्ष घेतल्यावर कृतीची उपयुक्तता लक्षात घेण्याऐवजी व्यक्तीच्या हेतूला महत्त्व दिले जाते आणि त्यामुळे उपयुक्ततावादाच्या मूळ भूमिकेस हानी पोहोचल्यासारखे होते. तसे होऊ नये म्हणून कधी कधी सत्कृती आणि युक्त कृती यांत फरक केला जातो. हेतू चांगला असेल, तर कृती चांगली (सत्) ठरते आणि परिणाम चांगले असतील, तर ती युक्त ठरते.
आत्महितवादी उपयुक्ततावाद आणि सर्वहितवादी उपयुक्ततावाद: सुखवादी आणि मूल्यवादी तसेच कृतिनिष्ठ आणि नियमनिष्ठ असे उपयुक्ततावादाचे प्रकार आतापर्यंत सांगितले. आणखी एका रीतीने उपयुक्ततावादाचे प्रकार करणे योग्य होईल. ज्या कृतीने कर्त्याचे स्वतःचे अधिकात अधिक हित होईल ती युक्त, असे आत्महितवादी मानेल व ज्या प्रकारच्या कृतीने सर्व मानवांचे अथवा सर्व प्राण्यांचे अधिकाधिक हित होईल, ती युक्त असे सर्वहितवादी मानेल. प्राचीन ग्रीसमधील ॲरिस्टिपस व एपिक्यूरस यांच्या नैतिक विचारांस आत्महितवादी उपयुक्ततावाद म्हणता येईल [→ एपिक्यूरस मत]. आधुनिक विचारवंतांत आत्महितवादी उपयुक्ततावादाचा पुरस्कार कोणीही केला नाही. बेंथॅम आणि मिल यांनी कृतीची युक्तायुक्तता ठरविण्यासाठी ‘अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख’ हे सूत्र घालून दिले. अधिकतम सुख आणि अधिकतम लोकांचे सुख यांत विरोध आल्यास, ते सुख जरी संख्येने कमी भरत असले, तरी अधिकतम लोकांच्या सुखाची निवड करावी, अशीही सूचना त्या सूत्रात आहे. सिज्विकने केवळ अधिकतम सुखाचा पुरस्कार केला. पण स्वसुखप्राप्तीविषयीची प्रवृत्ती आणि इतरांच्या सुखाविषयीची प्रवृत्ती यांमध्ये अनुल्लंघ्य अंतर आहे व ते अंतर नाहीसे करण्यासाठी परमेश्वराचे अस्तित्व मानावे लागेल, असे त्याचे मत आहे. मुरने असे प्रतिपादन केले, की एखाद्या गोष्टीचा चांगले असण्याचा आणि ती गोष्ट माझी अथवा इतरांची असण्याचा काही तार्किक संबंध नाही म्हणून ज्या कृतीच्या परिणामांचे साध्य मूल्य ‘अधिकतम’ आहे ती युक्त होय मग ते मूल्य सुखरूप असो की अन्यरूप असो, माझ्या वाट्यास आलेले असो, की इतरांच्या वाट्यास आलेले असो. मुरचे हे मत उपयुक्ततावादासंबंधीची अंतिम भूमिका म्हणून मानता येईल.
उपयुक्ततावाद आणि सामाजिक परिवर्तन: बेंथॅम पासूनच्या किंबहुना त्याच्याही आधीपासून उपयुक्तता वाद्यांनी दुःखपरिहार आणि सुखप्राप्ती हीच माणसाची ध्येये आणि त्यांच्या अनुरोधाने जे सुखकारक ते इष्ट आणि जे तसे नाही, ते अनिष्ट अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. परंतु म्हणून उपयुक्ततावादी हा आत्यंतिक स्वार्थाचा किंवा अनिर्बंध आचाराचा पुरस्कर्ता असतो, असे मानणे चूक होईल. व्यक्तीला समाजात समाजाचा एक घटक म्हणून रहावयाचे असते. त्या समाजाची दखलच न घेता किंवा त्याच्याविरुद्ध जाऊन आपल्या एकट्याच्या स्वार्थाचा पाठपुरावा करणे माणसाला शक्यच नाही, ह्याची जाणीव उपयुक्ततावाद्याला असते.
आपले हित साधीत असताना इतरांच्या हिताच्या आड येऊ नये एवढेच नव्हे, तर आपल्यासारखेच इतरांचेही कल्याण साधण्यासाठी प्रत्येक माणसाने जास्तीत जास्त प्रयत्नशील असावे, असे बेंथॅमचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. ‘अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख’ (ग्रेटेस्ट हॅपिनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर) हे बेंथॅमने दिलेले सुप्रसिद्ध सूत्र उपयुक्तता वाद्यांच्या सर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांचे आणि चळवळींचे मूलभूत तत्त्व होय. सुख म्हणजे निश्चित काय आणि आपले सुख नक्की कशात आहे, हे माणसाला कळले पाहिजे चांगल्या शिक्षणाशिवाय ते त्याला कळणार नाही आणि म्हणून सर्वांना भरपूर शिक्षण मिळाले पाहिजे असे तो म्हणे. अधिकांचे अधिक सुख साधण्यासाठी राजकीय, सामाजिक व आर्थिक स्वरूपाची क्रांती आवश्यक असली, तर ती झालीच पाहिजे, घडवून आणली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊनही, कोणत्याही प्रकारच्या हिंसक स्वरूपाच्या आंदोलनाला मात्र त्याचा विरोध असे. मत परिवर्तनानेच बदल घडवून आणून प्रगती साधीत जावे असे त्याने प्रतिपादन केले आहे. इंग्लंडमध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणांना बेंथॅमने चालना दिली. गुन्हेगार व कैदी ह्यांना अधिक समजुतीने आणि सहानुभूतीने वागविले पाहिजे, त्या दृष्टीने शिक्षा सौम्य झाल्या पाहिजेत, तुरुंग सुधारले पाहिजेत यांसारखे विचार त्याने कळकळीने सांगितले. आर्थिक क्षेत्रात त्याने खुल्या व्यापाराचे तत्त्व उचलून धरले. आंतरराष्ट्रीय ऐक्यावर बराच भर देऊन जागतिक न्यायालयाची कल्पनाही त्याने मांडली होती.
जॉन स्टूअर्ट मिलनेही बेंथॅमचेच सूत्र धरून उपयुक्ततावादाचा राजकीय आणि सामाजिक व्यवहाराच्या संदर्भात अधिक ऊहापोह केला. ‘अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख’ म्हणजे काय? ते ठरवायचे कसे? ह्या प्रश्नांना मिलचे उत्तर असे आहे, की अधिकात अधिक प्रातिनिधिक अशी लोकसभाच ते ठरवू शकते आणि म्हणूनच मतदानाचा हक्क समाजातील अधिकात अधिक लोकांना मिळाला पाहिजे. परंतु नव्या कल्पना, नवे विचार आल्याखेरीज प्रगती होत नाही. बहुसंख्य अज्ञांच्या अरेरावीमुळे असे काही नवीन सांगणाऱ्या, स्वतंत्र विचारांच्या पाच दहा बुद्धिमंतांची गळचेपी होण्याची शक्यता मिलला दिसत होती आणि म्हणूनच व्यक्तिमात्राचे संपूर्ण विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य सर्व समाजाने मानले पाहिजे, असे त्याने प्रतिपादन केले. सामाजिक सुधारणांचाही त्याने हिरिरीने पुरस्कार केला. मजूर वर्गाला न्याय मिळाला पाहिजे, कारखान्याचा नफा हा मजुरांच्या सेवेतूनच निर्माण होत असल्यामुळे त्या नफ्याच्या योग्य त्या वाट्यावर मजुरांचा हक्कच आहे आणि तो त्यांच्या पदरात पडला पाहिजे, अशा तऱ्हेचे प्रागतिक अर्थशास्त्रही त्याने सांगितले.
मिलपासून नंतर आजतागायत सिज्विक, मुर, टौलमिन, नोव्हेलस्मिथ, सिंगर इ. कित्येक उपयुक्ततावादी राजकीय व सामाजिक जीवनाच्या क्षेत्रात बेंथॅमच्या मूळ सूत्रावर आधारलेले विविध विचार आणि योजना देत आले आहेत. जास्तीत जास्त जनकल्याण साधावयाचे हा मूळ विचार पक्का असला, तरी आधी कोणते आणि मग कोणते तसेच त्याची साधने कोणती ह्या तपशीलांबाबत मतभेद राहणारच. तथापि समाज जीवनाच्या संदर्भात अधिकात अधिकांचे इहलोकीचे अधिकतम सुख ह्याखेरीज आणखी कोणताही विचार कर्तव्य राहत नाही, हे उपयुक्ततावाद्यांचे मूळ तत्त्व कधीच सुटले नाही. सूक्ष्मपणे पाहिले तर स्वतःला उपयुक्ततावादी न म्हणविताही समाजवादी, साम्यवादी किंवा अशा कोणत्यातरी अन्य पंथांची नावे स्वीकारणारे विचारवंत तसेच बर्ट्रंड रसेलप्रमाणे स्वतंत्रपणे विचार सांगणारे व कार्य करणारे बहुतेक सर्व इहलोकवादी व बहुजनकल्याणवादी तत्त्वचिंतक व नेते उपयुक्ततावादाच्या मागोव्यानेच जात आले आहेत असे दिसून येते.
उपयुक्ततावादातील अडचणी: सुखाच्या अथवा हिताच्या वाटणीचा हा प्रश्न क्षुल्लक नाही. माझे अधिक हित आणि इतरांचे थोडे कमी हित यांत निवड करावयाचा प्रसंग आला, तर उपयुक्ततावादाच्या सिद्धांताप्रमाणे माझ्या अधिक हिताची निवड करणे रास्त ठरेल. पण सर्वसामान्य माणसाच्या नीतिदृष्टीस हे मान्य होणार नाही. दहा रुपयांचे तिकिट काढून मी नाटकास गेलो, तर मला श्रेष्ठ मूल्यानुभव येणार आहे असे समजू. तेच दहा रुपये खर्च करून घरातील मुलाबाळांकरिता खाऊ आणल्यास निर्माण होणारा एकंदर मूल्यानुभव माझ्या आनंदाहून थोडा कमी असला, तरी या दुसऱ्या बाबीवर पैसे खर्च करण्यात माझी नैतिक चूक झाली किंवा ती कृती अयुक्त होती, असे कोणी म्हणणार नाही. उपभोग्य वस्तूंची वाटणी करताना थोड्या व्यक्तींना खूप वस्तू देऊन बऱ्याच व्यक्तींना प्रत्येकी फारच कमी दिल्या, तर काही वेळा, त्याच वस्तू सर्वांना समान वाटल्याने निर्माण होणाऱ्या हितापेक्षा (मूल्यापेक्षा) अधिक हितनिर्मिती होईल. अशा वेळी उपयुक्ततावादाचा सिद्धांत न मानता सामान्य माणूस, हिताची (वस्तूंची) शक्य तेवढी समान विभागणी पतकरेल. प्रत्येकाच्या हिताचा वाटा आहे त्यापेक्षा किंचित कमी करून अधिक लोकांना हिताचा वाटा दिला, तर एकंदर मानवी हित अधिक निर्माण होईल. अशाही परिस्थितीत सामान्य माणूस एकूण हितनिर्मिती कमी करूनसुद्धा, प्रत्येक व्यक्तीचे हित अधिक असणे रास्त आहे असे म्हणेल.
उपयुक्ततावादासंबंधी वरील आक्षेप आणताना प्रत्येक वेळी सामान्य माणसाला काय वाटते याचा उल्लेख आला आहे. पण नीतिशास्त्रीय तत्त्वांचे प्रामाण्य सामान्य माणसाच्या मतावर अवलंबून ठेवावयाचे काय? होय आणि नाही, अशी दोन्ही उत्तरे संभवतात. सामान्य माणूस प्रत्येक प्रसंगी जे नैतिक निर्णय घेतो, त्यांच्यात अनुस्यूत असलेले नीतिशास्त्र उपयुक्ततावादी आहे, म्हणून ते स्वीकार्य आहे, असे प्रतिपादन काही वेळा केलेले असते. याला ‘वर्णनात्मक उपयुक्ततावाद’ असे म्हणता येईल. सिज्विक, मुर यांच्यासारखे लेखक मात्र उपयुक्ततावाद समाजाला मान्य आहे म्हणून नव्हे, तर बुद्धीला पटतो म्हणून स्वीकार्य आहे, असे म्हणतात. उपयुक्ततावादाच्या या प्रकाराला ‘आदर्शात्मक उपयुक्ततावाद’ म्हणता येईल.
तार्किक दृष्ट्या उपयुक्ततावाद ही नैतिक उपपत्ती म्हणून अपूर्ण ठरेल. कोणत्याही भावी परिणामांची बिलकुल दखल न घेता, किती तरी कृती युक्त अथवा अयुक्त ठरतात, असे दाखवून देता येईल. एखाद्या विवक्षित प्रसंगी वचन पाळण्याचे परिणाम वचन मोडण्याच्या परिणामांहून अधिक हानिकारक आहेत, असे दाखविता येईल. या विशिष्ट प्रसंगीसुद्धा वचन पाळावे, असे नियमनिष्ठ उपयुक्ततावादी म्हणेल. त्याचा युक्तिवाद असा, की वचन मोडल्याने समाज घटकांच्या परस्परविश्वासाला जो हादरा बसतो, त्याचे दुष्परिणाम हे त्या विशिष्ट काळी वचन मोडण्याने होणाऱ्या सुपरिणामांहून किती तरी अधिक होत. पण हे नेहमीच खरे नसते. परिणाम कमी चांगले असूनही वचन पाळणे युक्त असते. एखाद्या मरणोन्मुख व्यक्तीस गुप्तपणे काही वचन दिले असल्यास, वचनपूर्तीच्या फायद्या तोट्याचा विचार न करता ते पाळणे हेच युक्त होईल आणि एखाद्या निरपराघ व्यक्तीस बळी देऊन कितीही मोठे सामाजिक कल्याण होणार असले, तरी त्या व्यक्तीच्या संमतिविरुद्ध तिचा बळी देणे, हे केव्हाही अयुक्तच होईल.
एक नैतिक उपपत्ती या दृष्टीने जरी उपयुक्ततावाद अंतिमतः अपुरा ठरला, तरी सामाजिक बदल घडवून आणण्याचे एक साधन या दृष्टीनेही त्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. बेंथॅमने आपले इन्ट्रोडक्शन टु द प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल्स अँड लेजिस्लेशन (१७८९) हे पुस्तक लिहिले, तेव्हा त्याच्यापुढे शासनसंस्थेने कायदे करताना कोणते धोरण पाळावे, याविषयीचाच विचार प्रामुख्याने होता. ते धोरण उपयुक्ततावादाचेच असणे योग्य आहे. अधिकात अधिक लोकांचे हित व्हावे हीच कायद्यामागील नीती असणे सामंजस्याचे आहे. कृतीच्या स्वरूपावरून अथवा व्यक्तीच्या हेतूवरून नीती ठरते असे मानले, तरी कायदा त्यासंबंधी काही करू शकत नाही. गुन्हा कशास म्हणावे आणि कोणत्या गुन्ह्याला किती शिक्षा असावी, हे ठरविताना उपयुक्ततावादाच्या दृष्टीने विचार केला जातो. सामाजिक व्यवहारांचे आणि संकेतांचे मुख्य सूत्र परस्परांची सोय अथवा उपयुक्तता हेच असते. परिस्थिती बदलल्यामुळे जेव्हा रूढ संस्था व आचरणाचे नियम निरुपयोगी होतात, तेव्हा ते मोडून त्यांच्या जागी नवीन नियम व संस्था आणण्यासाठी सामाजिक क्रांतिकारकांनी उपयुक्ततावादाचा आश्रय घेतलेला असतो. आगरकर व इतर सुधारक यांनी हिंदू समाजाच्या जीर्ण रूढींवर हल्ला करताना उपयुक्ततावादाचे प्रामाण्य मानले. सामाजिक सुधारणेच्या संदर्भात उपयुक्ततावाद हा बुध्दिवादाचा एक घटक होय. ‘गाय हा उपयुक्त पशू आहे’, हे सावरकरांचे वाक्य बुद्धिवादाच्या संदर्भात उद्धृत केले जाते. निरनिराळ्या काळी लिहिल्या गेलेल्या स्मृतींनी भिन्नभिन्न आचारांचे बंधकत्व सांगितले. त्याची उपपत्ती उपयुक्तवादाने लागू शकते. परिस्थिती बदलल्यावर जे आचार अनुपयुक्त ठरले, त्यांचा निषेध झाला व जे उपयुक्त वाटले, त्यांना प्रामाण्य मिळाले. जे उपयुक्त ते युक्त, ही नैतिक विचारसरणी लोकप्रिय आहे.
‘अधिकतम लोकांचे अधिकतम हित’ या उपयुक्तता वाद्यांच्या सूत्रातून एक अडचण निर्माण होते. अमुक गोष्ट हिताची आहे हे ठरवावयाचे कोणी? लोकांचे हित लोकांनाच समजते अथवा व्यावहारिक पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींना समजते, असा पक्ष घेतल्यास उपयुक्ततावाद लोकशाहीकडे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याकडे झुकतो. लोकांचे खरे हित लोकांना न समजता शासकांच्या गटाला, पंडितांना वा विशिष्ट व्यक्तींना समजते, अशी भूमिका घेतल्यास उपयुक्ततावाद लोकशाहीविरोधी बनतो. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास पाहता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनीच उपयुक्ततावादाचाही स्वीकार केला आहे असे दिसते.
पहा : नीतिशास्त्र सुखवाद.
संदर्भ : 1. Albee, Ernest, A History of English Utilitarianism, New York, 1902.
2. Grote, J. An Examination of the Utilitarian Philosophy, Cambridge, 1870.
3. Smart, J. J. C. An Outline of a System of Utilitarian Ethics, Melbourne, 1961.
4. Stephen, Lesslie, The English Utilitarian, London, 1900.
दीक्षित, श्री. ह.
“