उदासी : सोळाव्या शतकात स्थापन झालेला हिंदू साधूंचा एक संप्रदाय. शीखगुरू नानकांचे ज्येष्ठ पुत्र श्रीचंद (ज. सु. १४९४) यांनी या संप्रदायाची स्थापना केली असे काही विद्वानांचे मत आहे, तर काहींच्या मते नानकांचे नातू धर्मचंद यांनी त्याची स्थापना केली. हा संप्रदाय ॐकारापासून निघाला, असे या संप्रदायाचे अनुयायी मानतात. अनुयायांची संसारातील उदासीनता व विरक्ती पाहून या संप्रदायाला ‘उदासी’ असे नाव पडले असावे. ‘नानकपुत्र’ आणि ‘नानकशाही’ अशीही त्याची अन्य नावे आढळतात.
या संप्रदायाचे त्र्याहत्तरावे गुरू श्रीचंद मानले जातात. त्यांनी हा संप्रदाय विशेष रूपाने संघटित करून नावारूपास आणला. नानकांनी अंगद यांना शीखगुरू म्हणून आपला वारस नेमल्यामुळे श्रीचंद निराश होऊन विरक्त जीवन जगत होते व नग्नावस्थेत फिरत होते. त्यांच्या अनुयायांचे वर्तनही त्यांच्याप्रमाणेच होते. हल्ली या संप्रदायाचे अनुयायी भगव्या रंगाची आवश्यक तेवढीच वस्त्रे परिधान करून साधू-संन्याशांप्रमाणे राहतात, अंगास भस्म फासतात. ते सहसा भिक्षा मागताना आढळत नाहीत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना संस्कृतचे ज्ञान असते व ते अद्वैत वेदान्ती तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करताना आढळतात. त्यांच्यावर हिंदू आचारविचारांचा पगडा आढळतो. हा संप्रदाय सुधारकी असून सर्व थरांतील व सर्व वर्णांच्या स्त्रीपुरुषांना त्यात प्रवेश आहे. उदासी साधू अद्वैत मताचे पुरस्कर्ते असले, तरी मूर्तिपूजेला त्यांचा तितकासा विरोध नाही. भस्माला ते अधिक पूज्य मानतात. हे हिंदूंचे धार्मिक सण व उपवासादी नियम पाळतात. तथापि ⇨ ग्रंथसाहिबावर त्यांची अनन्य श्रद्धा असते. भाद्रपद शु. नवमीला, श्रीचंदांचा जयंत्युत्सव ते साजरा करतात. या संप्रदायात कायिक, वाचिक व मानसिक अशी त्रिविध साधना असून संसाराच्या बाबतीत ते उदासीन व विरक्त असतात. त्यांचा दीक्षाविधी म्हणजे ज्याच्याकडून दीक्षा घ्यायची, त्याचे चरणतीर्थ साखर घालून प्राशन करावयाचे. दीक्षेनंतर गुरू अनुयायास मंत्र देऊन नवीन नाव ठेवतो. ‘चरण साधका धो धो पियो । अरण साधको अपना जियो’ हा सांप्रदायिकांचा आवडता मंत्र असून ‘ॐ नमो ब्रह्मणे’ असे म्हणून ते एकमेकांना अभिवादन करतात.
उदासींमध्ये ‘नागा’ (नंगे) आणि ‘परमहंस’ असे दोन भेद आहेत. सिंध मधील सक्कर या गावी त्यांचे साधुबेला नावाचे पवित्र केंद्र होते. त्यांची बहुतेक वस्ती पंजाब व सिंध प्रांतांत असून बनारस, वृंदावन, हरद्वार यांठिकाणी त्यांचे मठ आहेत व तेथे त्यांच्या स्वतंत्र पाठशाळाही चालविल्या जातात. उदासींच्या चार शाखा (धुनी) असून त्यांचे चार प्रवर्तक आहेत : (१) बहादुरपूर- फुलसाहेब, (२) चरनकौलबाबा हसन, (३) नैनिताल व पुरी-अलमस्न साहेब आणि (४) शिकारपूर व अमृतसर-गोविंदसाहेब. ह्या चारही शाखा स्वतंत्र असून त्यांची व्यवस्थाही चार वेगवेगळ्या महंतांकरवी चालते. काबूलच्या उदासी मठात स्वतः श्रीचंदांनी जी धुनी पेटविली, ती अद्याप प्रज्वलित असल्याचे सांगतात. ‘बडा आखाडा’ नावाची ह्या सर्व शाखांची एक सभा (संघटना) आहे. ‘छोटा आखाडा’ अशी दुसरीही एक सभा असून तिची स्थापना हरराय या शीखगुरूचा शिष्य फेरू याने केली आहे.
आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.); कापडी, सुलभा (म.)