इराक : नैर्ऋत्य आशियातील एक अरब प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ४,३७,२२२ चौ. किमी. लोकसंख्या १,००,७४,१६९ (१९७० अंदाजे). २९० उ. ते ३७० ५०’ उ. व ३९० पू. ते ४८० पू. जास्तीतजास्त लांबी १,२०० किमी. व रुंदी ७६८ किमी. टायग्रिस आणि युफ्रेटीस या दोन नद्यांमधील प्रदेश (दोआब) म्हणून इराकला पूर्वी ‘मेसोपोटेमिया’ हे नाव होते. यातच फार प्राचीन काळी ॲसिरिया व बॅबिलोनिया ही राज्ये होती. इराकच्या उत्तरेस तुर्कस्तान, पश्चिमेस सिरिया व जॉर्डन, दक्षिणेस सौदी अरेबिया, एक अशासित प्रदेश, कुवेत व इराणचे आखात आणि पूर्वेस इराण आहे. जॉर्डन व सौदी अरेबिया यांच्याशी इराकच्या सरहद्दी निश्चित नाहीत. इराण व इराक यांच्यामधील सरहद्द ४०० किमी. असून इराकला सु. ६४ किमी. समुद्रकिनारा मिळाला आहे. बगदाद ही इराकची राजधानी आहे.
भूवर्णन: इराक हा सखल द्रोणसदृश प्रदेश आहे. पूर्व, उत्तर व पश्चिम दिशांकडे भव्य झॅग्रॉस व ॲनातोलियन वली-पर्वतश्रेणी आहेत. झॅग्रॉस पर्वतश्रेणी अपनती-वलनाकार असून ती वायव्य-आग्नेय अशी गेलेली आहे. बगदादच्या उत्तरेस ती क्रमाक्रमाने उंचावत गेलेली असून, काही ठिकाणी ३,०४८ मी. हूनही अधिक उंचीची शिखरे आढळतात. अगदी पूर्वेकडील उंच पर्वतराजींच्या प्रदेशास इराकी कुर्दिस्तान हे नाव तेथे राहणाऱ्या कुर्द टोळ्यांवरून पडले आहे. टायग्रिस व युफ्रेटीस या नदीखोर्यांच्या पश्चिमेकडील बाजूस ही भूमी हळूहळू उंचावत गेली असून, तिचे रूपांतर ॲनातोलिया पठारात झालेले आहे. हे पठार जुरासिक व क्रिटेशस आणि आदिनूतन-मध्य-नूतन काळांतील खडकांनी बनलेले असून इराकमध्ये त्याची कमाल उंची सु. ९१४ मी. आहे. काही ठिकाणी या पठारावर कडे निर्माण झालेले दिसतात. या कड्यांवरूनच या देशाला ‘इराक’ (अरबी शब्द इराक =कडा) हे नाव पडले असावे, असे काहींचे मत आहे. भौगोलिक दृष्ट्या इराकचे चार प्रमुख विभाग पडतात : (१) युफ्रेटीस व टायग्रिस ह्या दोन नद्यांमधील सखल प्रदेश (२) अपर इराक : या दोन नद्यांच्या वेगवेगळ्या खोर्यांतील प्रदेश (३) ॲसिरिया व इराकी कुर्दिस्तान आणि (४) पश्चिमी वाळवंटी प्रदेश.
(१)सखल प्रदेश : हा प्रदेश रामादी व बगदाद ह्यांमधील उंच कड्यांपासून सुरू होऊन ५६० किमी. लांब इराणच्या आखातापर्यंत विस्तारत जातो. बगदादपासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे अनुक्रमे टायग्रिस व युफ्रेटीस ह्या नद्या वाहतात. टायग्रिस तुर्कस्तानात उगम पावते व तेथून ती इराकमध्ये वहात येते. तिच्या मुख्य प्रवाहाचा विलक्षण वेग आणि धोक्याची अनेक वळणे यांमुळे या नदीतून नौकानयन करणे अतिशय अवघड असते. बगदाद ते कूट हे अंतर खुष्कीच्या मार्गाने जेवढे आहे, त्याच्या दुप्पट (३३९ किमी.) टायग्रिस नदीमार्गाने होते. कूटच्या पुढे टायग्रिसचा प्रवाह पुष्कळच सरळ बनतो व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलसिंचन शेती शक्य होते. गेल्या पंधराशे वर्षांत टायग्रिसने आपला मार्ग अनेक वेळा बदलला आहेअमराहच्या पुढे दक्षिणेस, टायग्रिस नदीचा प्रवाह अनेक कालवे व दलदलीचे प्रदेश ह्यांमध्ये पूर्व-पश्चिम विखुरला जातो.
युफ्रेटीसचाही उगम तुर्कस्तानात होऊन ती प्रथम सिरियातून व नंतर इराकमधून वाहते. तिचा प्रवाह रामादीपासून १३७ ते २७४ मी. रुंद अशा पात्रातून वाहत जातो व त्यावेळी पात्राची खोली ०·९ मी. ते २·१३ मी. एवढीच असते. युफ्रेटीसची लांबी २,३५० किमी. असून टायग्रिसप्रमाणे तिच्यावरही नैसर्गिक पूरतट आढळतात. सॅमॅवापासून नासिरियापर्यंतचा युफ्रेटीसचा प्रवाह रेखीव पात्रातून वाहतो. नासिरियाच्या पुढे मात्र तिचे अनेक उपनद्या व कालवे यांमध्ये रूपांतर होतेसरतेशेवटी हे सर्व पाणी लेक हामार या बोरू व वेत यांनी भरलेल्या पाणथळीस जाऊन मिळते. युफ्रेटीस व टायग्रिस या दोन्ही नद्यांचा कुर्ना येथे संगम होतोतेथून पुढे वाहणाऱ्या नदीला शट अल् अरब हे नाव मिळाले आहे. तिची लांबी १८५ किमी. आहे.
बगदादच्या वरपर्यंतच्या प्रदेशात दोन्ही नद्या रेखीव पात्रातून वाहतात. बगदादच्या खाली मात्र त्या सपाट मैदानात अनेक वळणे घेऊन वाहतात. दोन्ही नद्यांचा मार्ग अचानक बदलतो. या नद्यांनीच निर्माण केलेले पूरतट पूर आला म्हणजे भंगतात आणि शेकडो किमी. प्रदेश जलमय होतो. अखेरीस नदी पुन्हा नवीन पूरतट निर्माण करून वाहू लागते. अशा तर्हेने पूर्णपणे वा अर्धवट सोडलेले जुने नदीमार्ग हे मेसोपोटेमियाच्या सखल प्रदेशाचे एक मोठेच वैशिष्ट्य समजले याते. याबरोबरच दलदलीचे प्रदेश, सरोवरे व वालुकाभित्ती ठिकठिकाणी निर्माण होतात. टायग्रिस जरी युफ्रेटीसपेक्षा निरुंद असली, तरी तिचा प्रवाह अधिक जलद आहे व ती अधिक पाणी वाहून नेते. वसंत ऋतूत बर्फ वितळल्यामुळे दोन्ही नद्यांचे पाणी वाढू लागते टायग्रिसचे व युफ्रेटीसचे पाणी अनुक्रमे एप्रिल व मे महिन्यांत कमाल मर्यादेपर्यंत वाढते. साधारणपणे पुराचे पाणी ३·६५ ते ६·९ मी. पर्यंत चढते ९·७५ मी. पर्यंतही ते चढल्याची नोंद आहे. यामुळे विस्तीर्ण प्रदेश नेहमीच जलमय होतो, पूरतट कोसळतात आणि खेडी व रस्ते पुन्हा उंच पातळीवर बांधावे लागतात.
(२) अपर इराक : ह्यामध्ये टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांची खोरी व त्या खोर्यांमधील आग्नेयीच्या बाजूने पसरलेले एक मोठे मैदान येते. इराकमध्ये शिरताना युफ्रेटीसने १६ ते १८ किमी. रुंदीचे सपाट खोरे बनविलेले असून उपनद्यांच्या अभावामुळे पात्राचे दोन्ही काठ उंच आहेत. युफ्रेटीस ज्या खडकाळ प्रदेशांतून वाहते तेथे नदीत अनेक धबधबे व द्रुतवाह निर्माण झालेले आहेत. युफ्रेटीसच्या पूर्वेकडील प्रदेश अधिक मोकळा आहे. टायग्रिस इराकमध्ये शिरताना बरीच अनियमित वळणे घेते. काही काही ठिकाणी तिचा प्रवाह वायव्य-आग्नेय वाहतो. तर बर्याच ठिकाणी तो दक्षिणेकडे अरुंद घळीमधून वाहतो. म्हणूनच अपर टायग्रिसच्या प्रदेशांच्या स्वरूपात बराच बदल झालेला जाणवतो. ती आग्नेयीकडे वाहू लागली म्हणजे तिच्या पश्चिमेकडील काठावर उंच चढणीचे डोंगर, तर पूर्वेकडील बाजूस विस्तीर्ण मोकळा प्रदेश, असे दृश्य दिसते. तिक्रितपासून दक्षिणेकडे टायग्रिस सपाट मैदानावरून वाहते.
युफ्रेटीस व टायग्रिस या नद्यांमध्ये व उत्तरेकडे जेबेल सिंजार पर्वताने वेढलेला अल् जाझिरा हा अनेक चढउतार असलेल्या स्टेपीचा, लहान घड्या असलेला व झाकलेल्या अपवाह-द्रोणीचा प्रदेश आहे. हा पुढे सिरिया व जॉर्डनमध्येही जातो. ह्यांमधील सर्वांत मोठी अपवाह-द्रोणी वाडी अल् थार्थार ही असून ती पूर्वी चराऊ कुरणासाठी वापरात होती आता ती टायग्रिस पूर नियंत्रण प्रकल्पाचाच एक भाग बनलेली आहे.
(३) ॲसिरिया व इराकी कुर्दिस्तान : पूर्वेकडून टायग्रिसच्या समोरील बाजूने तुर्कस्तानची सरहद्द आणि टायग्रिसच्या दियाला उपनदीचे खोरे यांच्यामधील प्रदेश आयताकृती असून तो नदीच्या पातळीपासून पूर्वेकडील बाजूस वरवर चढत गेलेला आहे. जेबेल हॅमरिन हा सु. ४८८ मी. उंच असून त्याच्या पाठीमागे चढउतार असलेली नदीद्रोणी, वलित पठारे व कमीअधिक उंचीचे डोंगर असून, ते पुढे झॅग्रॉस पर्वतश्रेणीत मिळून जातात. पश्चिमेकडील कमीअधिक उंचीचा भाग हा ग्रेट झॅब व लिटल् झॅब ह्या नद्यांच्या खोर्यांनी तुटलेला असून तोच प्राचीन ॲसिरियाचा प्रदेश होय. त्याच्याही पूर्वेस उत्तुंग पर्वतांची व कड्यांची रांग वायव्य-आग्नेय दिशेला गेलेली आहे.
मोसूलच्या मैदानातून प्रामुख्याने ग्रेट झॅब ही नदी वाहते. या मैदानात २१३ मी. ते ६०९ मी. उंचीचे अनियमित डोंगराळ प्रदेश आढळतात. या मैदानातील अतिशय सुपीक जमिनीमुळे हा प्रदेश प्राचीन ॲसिरियाचे धान्याचे प्रमुख कोठार समजले जात होते. याच प्रदेशात निनेव्ह, निमरूद व खोर्साबाद ही राजधान्यांची शहरे होऊन गेली. या प्रदेशात पिकणारा गहू हा सर्व इराकमध्ये सर्वोत्कृष्ट समजला जातो.
इराकी कुर्दिस्तानमध्ये डोंगराळ भाग साधारणतः वायव्य-आग्नेय दिशेला सुरू होतो काही ठिकाणी कड्यांची उंची ३,०४८ मी. ते ३,३५२ मी. एवढी असते परंतु सरासरीने २,४३८ मी. उंची आढळते. सुलेमानिया, अल् अमादीया, रावांडूझ यांसारख्या ठिकाणी काही शेतीयोग्य जमिनीचे पट्टे आढळतात. तथापि बहुतेक कुर्दिस्तान चराऊ कुरणांकरिताच प्रसिद्ध आहे. या प्रदेशातील दीर्घ अंतर आणि दुर्लंघ्यता ह्यांमुळे त्याचा विकास व सर्वेक्षण अवघड झाले आहे.
(४) पश्चिम वाळवंट : नदीकाठच्या सखल प्रदेशांच्या दक्षिण व पश्चिम दिशांना वाळवंटी प्रदेश असून तो कुवेत व सौदी अरेबियापासून जॉर्डन व सिरियापर्यंत पसरलेला आहे. हा वाळवंटी प्रदेश क्रिटेशस व तृतीयक खडकांपासून बनला असून तो युफ्रेटीसच्या सखल खोर्यापासून वर चढत गेलेला आहे त्यामुळे याचा पृष्ठभाग एकसारखा नाही. दक्षिणेकडे अगदी टोकाला असलेल्या वाडी अल् बेतिनमुळे इराक व कुवेत यांमध्ये सरहद्द निर्माण झाली आहे. उत्तरेकडे सहारा अल् हिजरा हा खडकाळ, वालुकामय प्रदेश पसरला आहे.
अगदी उत्तरेस वाडी प्रदेश (खोर्यांचा प्रदेश) लागतो. यात उंच चढणी आहेत. ईशान्य बाजूने बरीच कोरडी खोरी रांगेने जोडल्यासारखी दिसतातती युफ्रेटीसपर्यंत गेलेली आहेत. वर्षातून फारच थोडा काळ त्या खोर्यांमधून पुराचे पाणी वाहते. टायग्रिस व युफ्रेटीस ह्या नद्यांमुळे बनलेली गाळाची जमीन आणि इतरत्र आढळून येणारी अतिशय हलकी जमीन हे इराकमधील प्रमुख मृदाप्रकार होत. गाळाच्या जमिनीमध्ये खतमाती (ह्यूमस) व चिकणमाती यांचे प्रमाण अधिक असते. हलक्या जमिनीत खतमाती जवळजवळ नसतेच, चिकणमातीचे प्रमाणही फार कमी असते. परंतु या प्रकारच्या जमिनीमध्ये वार्याने वाहून आणलेले खनिजगाळ सापडतात व त्यांपैकी काहींचा उपयोग काहीं वनस्पतींना पोषक ठरतो. देशातील कमी पर्जन्यमान व त्यानंतरचा उष्ण रुक्ष ऋतू ह्यांमुळे वरील दोन्ही प्रकारच्या मृदांमध्ये लवणतेचे मान अधिक संभवते. कडक उष्णतेमुळे जमिनीवरील आर्द्रतेची वाफ होऊन जमिनीच्या पृष्ठभागाजवळ अल्कली क्षार इतक्या मोठ्या प्रमाणात साचतात की शेती करणे कठीण होऊन बसते. युफ्रेटीस व टायग्रिस नद्या जसजशा सखल प्रदेशांतून वाहत जातात, तसतसे त्यांच्यातील क्षारभागांचे प्रमाण तिपटीने वाढते. १९४९ मधील हैग आयोगाच्या अनुमानानुसार इराकमधील एकूण जलसिंचित जमिनीपैकी ६० टक्के जमीन क्षारयुक्त बनलेली आहे मशागत केलेल्या एकूण जमिनीपैकी एक टक्का जमीन दरवर्षी तिच्यामधील लवणतेमुळे सोडून द्यावी लागते. त्यामुळे पिकांच्या पैदाशीत मोठीच घट होत असल्याचे आढळून आले आहे.
हवामान : उन्हाळ्यात आग्नेयीकडील (पाकिस्तान व इराणी आखाताचे तोंड येथील) कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहणाऱ्या वार्यांना (शमाल), तर हिवाळ्यात आग्नेयीकडून जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून येणाऱ्याजोरदार वायुप्रवाहांना (शरकी) इराकला तोंड द्यावे लागते. मे ते ऑक्टोबर ह्या काळात अतिशय कडक व शुष्क उन्हाळा असतो. या काळात ४३० ते ४९० से. तपमान असते. उन्हाळ्यामधील जोरदार वार्यांमुळे धुळीची किंवा वाळूची मोठाली वादळे उद्भवतात जुलै हा वादळाच्या दृष्टीने अतिशय वाईट महिना असतो हिवाळा (डिसेंबर–मार्च) हा कडक थंडीचा व आखातावरून येणाऱ्या वार्यांमुळे दमट हवेचा असतो. जानेवारी हा सर्वांत कडक थंडीचा महिना (-५·२० से.) असतो. बसर्याला जरी दहिवर क्वचितच पडत असले, तरी उत्तर इराकमध्ये ते अतिशय कडक व दाट आढळते. जवळजवळ सर्व देशभर सरासरी वार्षिक पर्जन्यमान अतिशय तुटपुंजे असूनही ईशान्य इराकमध्ये (ॲसिरिया प्रांतात) ते ३८·१०–६३·५० सेंमी. असते. बगदाद हे देशाच्या जवळजवळ मध्यभागी असून तेथे वर्षाकाठी २८ दिवसांत फक्त १६·३० सेंमी. पाऊस पडतो. मोसूल येथे वर्षाकाठी ६० दिवसांत ३३·०२ सेंमी., तर बसर्यास २१ दिवसांत १४ सेंमी. पाऊस पडतो.
वनस्पती व प्राणी : युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या खोर्यांत लव्हाळे, कमळे व उंच बोरूची झाडे दाट उगवतात विलो (वाळुंजी), पॉपलर आणि आल्डर वृक्षही येथे आढळतात. लिकोराइस नावाची रानटी झुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात ह्यांच्या मुळ्यांपासून काढलेला रस तंबाखू-उद्योगात व मिठाई बनविण्याकरिता वापरतात. दुसरी एक ट्रॅगाकन्थ ही रानटी वनस्पती अर्धरुक्ष स्टेप प्रदेशात वा वाळवंटात वाढते तिच्यापासून काढण्यात येणारा द्रव चटण्या व औषधे ह्यांच्यासाठी वापरतात. व्हॅलोनिया ओक जातीचे वृक्ष झॅग्रॉस पर्वताच्या उंच भागात दमट हवेत वाढतात. ह्यांच्या सालीचा उपयोग चर्मशोधनात करतात. वसंत ऋतूत वाळवंटातील व स्टेप मैदानातील झुडपे व गवत मेंढ्यांना चरण्याकरिता उपलब्ध होते. रानटी प्राण्यांमध्ये तरस, कोल्हा, चित्ता व खोकड ह्यांचा समावेश होतो. लहान काळविटांचे कळप, सारंग तसेच चिचुंद्री, साळिंदर, वाळवंटी ससे, वाघूळ इ. प्राणीही आढळतात. बीव्हर, जंगली गाढव व लांडगा हे प्राणी क्वचितच दिसतात. जंगली बदक, हंस व तितर हे शिकारीचे पक्षी होत. शहामृग फार थोडे राहिले आहेत. गिधाडे, घुबडे, डोमकावळे व बुझार्ड (एक हिंस्र पक्षी) हे पक्षी युफ्रेटीसच्या खोर्यात आढळतात बहिरी ससाण्यांना शिकारीचे शिक्षण दिले जाते. डास, वाळवंटी माशा व साध्या माशा ह्यांच्यापासून मलेरिया, वालुमक्षिकारोग आणि डोळ्यांचे व त्वचेचे रोग उद्भवतात ह्यांचे प्रमाण फार मोठे आहे. इराकमधील वॉडी भागात टोळांचीही उत्पत्ती होते.
इतिहास: इराकचा इतिहास फार प्राचीन आहे. या देशात विविध संस्कृती उदयास आल्या. इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वी सुमेरी लोकांनी दक्षिण इराकमधील गाळाची जमीन असलेल्या प्रदेशात आपली वस्ती थाटली होती. सुमेरियन संस्कृती ही इराकमधील सर्वांत प्राचीन संस्कृती समजली जाते. सु. इ. स. पू. २५०० मध्ये लॅगॅश ह्या सुमेरी नगरराज्याने चार प्रतिस्पर्धी नगरराज्ये जिंकून घेतली व आपले क्षेत्र तत्कालीन नैर्ऋत्य इराणमध्ये नांदत असलेल्या ईलम संस्कृतीपर्यंतही वाढविले. मोहेंजोदडो येथील लिपी व मोहरा यांचे सुमेरी लिपी व मोहरा यांच्याशी पुष्कळच साधर्म्य दिसते. सुमेरी लोकांच्या अर या प्राचीन नगरात वापरली जाणारी भांडी ही मोहेंजोदडो येथील भांड्यांप्रमाणेच आढळून येतात. सिंधू संस्कृतीमध्ये प्रचारात असलेले हत्ती व गेंडा हे प्राणी असलेली एक मोहर इराकच्या एशनुन्ना ह्या प्राचीन नगरात (तेल आमार्ना) सापडली आहे. मोहेंजोदडो येथील उत्कीर्ण वृषभाचे शिल्प सुमेरी लोकांच्या पवित्र वृषभाशी मिळतेजुळते आहे. हडप्पा येथे सापडलेल्या सजावापात्राचे अर येथील सजावटपात्राशी विलक्षण साम्य आहे. इतक्या प्राचीन काळीही भारत व सुमेर ह्यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे ह्यावरून सिद्ध होते. अमा राज्याच्या लुगालझॅगेसी राजाने युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांमधील सबंध दुआब जिंकला. सुमेरी संस्कृतीच्या उत्तरेकडील भागात नांदणाऱ्या अक्कड संस्कृतीच्या लोकांनी बंड करून एक अलग राज्य स्थापिले त्याचा विस्तार भूमध्य समुद्रापर्यंत गेला होता. यामुळे अमा साम्राज्यास तडा जाऊन ते नामशेष झाले. अक्कडांचे राज्यही ईलम लोकांच्या व उत्तरेकडील डोंगराळ भागातील मांडा टोळीवाल्यांच्या प्रखर हल्ल्यामुळे लवकरच नष्ट झाले. सु. दोन-तीन शतकांच्या अंदाधुंदीनंतर दक्षिण इराकमध्ये बॅबिलोनियन संस्कृतीचा उदय झाला. हामुराबीच्या कारकीर्दीत या साम्राज्याची सर्वांगीण भरभराट झाली. तथापि पुढे कॅसाइटांच्या उत्तर व पूर्वेकडून करण्यात आलेल्या स्वार्यांमुळे ते कोसळले. सु. ख्रिस्तपूर्व १६०० मध्ये सुमेर व अक्कड साम्राज्यांचा नाश झाला. यानंतरच्या १००० वर्षांच्या काळात दक्षिण इराकमध्ये फारसे महत्वाचे घडले नाही.
उत्तर इराकमध्ये मात्र नवनवीन राज्ये उदयास येत होती. त्यांमध्ये मितानी हे पहिले राज्य होय. शस्त्रास्त्रांकरिता लोखंडाचा उपयोग करण्याची विद्या या मितानींना ज्ञात होती, असे दिसते. मितानींनी इ. स. पू. पंधराव्या व चौदाव्या शतकांत उत्तर इराकचा कबजा घेतला. त्यांचा पाडाव आशिया मायनरच्या हिटाइटांनी केला. हिटाइटांचा महाराजा शुबिलुलिउमाच्या (सु. इ. स. पू. १३९०–१३५०) कारकीर्दीत हिटाइट साम्रज्याचा विस्तार इराणच्या आखातापर्यंत झाला होता. ॲसिरियनांनी टायग्रिसच्या वरच्या बाजूस मितानी व हिटाइट साम्राज्यांचा नाश करण्यात यश मिळविले. पहिले आदादनिरारी (सु. इ. स. पू. १३००) व पहिला टिगलॅथ-पिलीझर (सु. इ. स. पू. १२००) ह्या दोघा ॲसिरियन राजांनी उरार्तू टोळ्यांच्या सामर्थ्याचा लोप केला व प्रचंड लष्करी यंत्रणा उभारली. दुसरा असुरनासिरपाल ह्याच्या कारकीर्दीत ॲसिरियन साम्राज्य स्थापन झाले. या साम्राज्याच्या वैभवकाळी (इ. स. पू. ८८३–६२६) उरार्तू, आर्मेनिया, बॅबिलोनिया, सिरिया, ईजिप्त व इराणचा काही भाग हे प्रदेश या साम्राज्याच्या ताब्यात होते. परंतु लवकरच इराकचा इराणी लोकांच्या हातून पाडाव झाला त्यांनी इ. स. पू. ५३९–५३८ मध्ये बॅबलिन काबीज केले. त्यानंतर आशिया मायनरपासून पंजाबपर्यंत आणि दक्षिण रशियापासून ईजिप्तपर्यंत पसरलेल्या ॲकिमेनिडी साम्राज्याचा इराक हा केवळ एक भाग बनला. इ. स. पू. चौथ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेटने निरनिराळ्या पराक्रमी मोहिमांतून (इ. स. पू. ३३४–३२३) इराणी साम्राज्याचा शेवट करून इराकवर आपला अंमल प्रस्थापित केला. ह्यानंतर इराकमध्ये अतिशय वेगाने राजकीय परिवर्तन होत गेल्याचे दिसून येते. अलेक्झांडरच्या व त्याच्यानंतरच्या सेल्यूकसच्या वंशजांच्या पाठोपाठ पार्थियन, पार्थियनांच्या मागोमाग रोमन व रोमनांच्यानंतर सॅसॅनिडी राजांनी इराकवर राज्य केले. अरबांनी ६३४ पासून इराकवर हल्ले करावयास सुरूवात केली. ६३७ मध्ये कादिसीया येथील लढाईत सॅसॅनिडी राजधानी टेसिफॉनचा पाडाव झाला. नाहावांद येथील पुढल्या लढाईत इराकवरील सॅसॅनिडी साम्राज्याचे वर्चस्व संपले. अरबांनी ६४१ मध्ये मोसूल काबीज केले. पुढील शंभर वर्षांपर्यंत कूफा व बसरा ही शहरे इराकमधील मुस्लिम राजवटीचा पाया म्हणून गणली जाऊ लागली. उस्मान खलीफाचा ६५६ मध्ये खून झाल्यामुळे इराकमध्ये उस्मानचा उत्तराधिकारी अली व उस्मानचा आप्त मुआविया ह्यांच्या पक्षांत यादवी युद्ध माजले. कूफा येथे ६६१ मध्ये अलीचा खून झाल्याने मुआवियास खलीफापदाचा मार्ग मोकळा झाला. या लढाईमुळे मक्का व मदीना ह्या दोन शहरांपेक्षा कूफा व बसरा ह्या शहरांना अधिक महत्त्व आले. ६६१ मध्ये मुआविया खलीफा म्हणून घोषित झाल्यावर पुढील शंभर वर्षांपर्यंत अरब साम्राज्यात सिरियाचे वर्चस्व व वाढते महत्त्व अधिकच स्पष्ट झाले. उमय्या खिलाफतीच्या काळात (६६१–७५०) इराक अलीच्या चळवळीचे केंद्र बनला. या घराण्याला विरोधी म्हणूनच ही चळवळ जन्म पावली. करबला या शहरी अलीचा मुलगा हुसेन उमय्या सैन्याबरोबरील लढाईत मारला गेला (६८०), परंतु यामुळे शियापंथीयांना आपला प्रभाव वाढविण्याकरिता राजकीय अधिष्ठानाऐवजी धार्मिक अधिष्ठान मिळाले. प्रजेचे बंड, हशमिया नामक प्रचारयंत्रणेचा इराकमधील उदय यांमुळे उमय्या राजवटही ७५० मध्ये समाप्त होऊन तिच्याजागी अब्बासी सत्तेचा उदय झाला [→ उमय्या खिलाफत]. अब्बासी खिलाफतीने ७५४–१२५८ पर्यंत इराकवर राज्य केले. हारून अल् रशीद (७६६–८०९) या खलीफाच्या कारकीर्दीत अब्बासी सत्तेने उत्कर्षबिंदू गाठला. बगदाद हे त्यावेळी ज्ञानविज्ञान, कलाकौशल्य यांचे महान केंद्र बनले. ज्ञानी, पंडित, दार्शनिक, कवी, साहित्यिक व कलाकार आशिया, यूरोप, आफ्रिका या दूरदूरच्या खंडातून बगदाद येथे एकत्र येऊ लागले. मात्र या अब्बासी राजवटीला सर्वांत मोठे अपयश लाभले, ते राजकीय ऐक्याच्या प्रयत्नात. या राजवटीने मुस्लिम श्रद्धेचा उपयोग राज्यातील विविध मानववंशीय व सामाजिक गट यांमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला, तथापि तो संपूर्ण फसला. १२५८ मध्ये चंगीझखानाचा नातू हलागूखानने बगदादवर आक्रमण करून अब्बासी सत्तेचा शेवट केला [→ अब्बासी खिलाफत]. यानंतर इराक हे मंगोल, तार्तर, इराणी, कुर्द व तुर्क लोकांच्या आपापसांतील झगड्यांचे केंद्र बनले. ऑटोमन तुर्की राज्यकर्ते व सफाविद घराणे ह्यांच्यामध्ये इराकबाबत १५१४ पासून जो संघर्ष सुरू झाला तो खंडश: १६३९ पर्यंत चालू राहिला. इराकवर ऑटोमन तुर्कांचे विधिवत् शासन १८३१ पासून सुरू झाले. तोपर्यंतच्या मधल्या काळात इराकवर हसन पाशा, अहमद पाशा व त्याच्यानंतर मामलूक पाशांनी राज्य केले.
इराणच्या आखातातून व्यापार करण्याच्या प्रयत्नांत काही यूरोपीय देशांचा फार पूर्वीपासून संबंध आला असला, तरी इराकमध्ये पश्चिमी राष्ट्रांचा प्रभाव स्थिरपद व्हावयास बराच काळ जावा लागला. १८३१ च्या पुढील काळात इराकमध्ये पश्चिमी प्रगतीचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला. १८३६ मध्ये इराकमधील नद्यांतून वाफेच्या बोटी संचार करू लागल्या १८६१ मध्ये तारायंत्रांचे जाळे टाकण्यास सुरुवात झाली. १८३१–१८५० या काळात ऑटोमन शासनाने कुर्दिस्तान व डोंगराळ भाग यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले, तथापि १८६९ मध्ये मिधात पाशा बगदादला येईपर्यंत सुधारणांना खऱ्याअर्थाने चालना मिळाली नाही. मिधात पाशाने तीनच वर्षे इराकच्या कारभार पाहिला, पण या अल्पावधीत त्याने इराकला प्रगतिपथावर आणून सोडले. एक वृत्तपत्र, लष्करी शस्त्रास्त्रांचे कारखाने, एक रुग्णालय, एक भिक्षा-केंद्र, अनेक शाळा, ट्रॅम वाहतूक, सक्तीची लष्करभरती, नगरपालिकीय व प्रशासकीय परिषदा, प्रमुख मार्गांवर बर्यापैकी सुरक्षितता आणि भटक्या टोळ्यांच्या वसाहतीचे धोरण, ह्या सर्व गोष्टी मिधात पाशाच्या सुरेख कारभाराची साक्ष देतात. १८७२ मध्ये तो तुर्कस्तानला परतला तरीही त्याने केलेल्या सुधारणा व यूरोपीय प्रभाव पुढे चालूच राहिला. डाक व तारसेवांमध्ये बरीच प्रगती झाली. १९१४ मध्ये बगदाद-समारा हा लोहमार्ग पूर्ण करण्यात आला युफ्रेटीसवर १९१०–१३ या काळात महत्त्वाचे हिंदीया धरण पुन्हा बांधण्यात आले.
ग्रेट ब्रिटन व ऑटोमन साम्राज्य ह्यांच्यात नोव्हेंबर १९१४ मध्ये युद्ध सुरू झाले. ब्रिटिश सैन्याने शट अल् अरबचा प्रदेश जिंकला व बसर्याचे एका उत्कृष्ट व कार्यक्षम बंदरात रूपांतर केले. १९१७ मध्ये ब्रिटिशांनी बगदाद आणि १९१८ मध्ये किर्कूक सर केले मोसूल घेण्यापूर्वी ऑटोमन सरकारने ब्रिटिशांबरोबर युद्धविराम घोषित केला (१९१८). १९२० पर्यंत ब्रिटिश लष्कराचा सेनापती एका मुलकी प्रशासकद्वारा बसरा ते मोसूलपर्यंतच्या प्रदेशावर अंमल चालवीत होता व त्यासाठी शासनाची सर्व अंगे बगदादमध्ये स्थापन करण्यात आली होती. इराकमध्ये अशा प्रकारचा शासकीय कारभार पाहणारी मंडळी ख्रिश्चन व परकी होती. मुस्लिम प्रजेला तसेच ऑटोमनांना हा असा परकी अंमल मान्य नव्हता. १९०८ मधील यंग टर्कच्या क्रांतीनंतर अरब राष्ट्रवादाच्या चळवळीने इराकमध्ये जोर धरला होता. इराकमधील स्थानिक पुढार्यांनी, कैरो येथे १९१२ मध्ये स्थापन झालेल्या ऑटोमन डीसेंट्रलायझेशन पार्टीशी, तसेच बेरूतमधील यंग अरब सोसायटीशी संधान बांधले. बसरा तर अरब राष्ट्रवादाचे मोठे केंद्र बनले व त्याने इराकसाठी स्वायत्त राज्याची मागणी इस्तबूलजवळ केली. १९२० च्या एप्रिलमध्ये, सॅन रेमोच्या अधिवेशनातून ब्रिटिशांनी इराककरिता महादेश आणला. ह्यामुळे दक्षिण इराकमधील टोळीवाल्यांमध्ये बंड सुरू झाले. ऑक्टोबर १९२० मध्ये इराकमधील लष्करी अंमल उठविण्यात आला. ब्रिटिशांच्या सल्ल्यानुसार वागणारी व इराकमधील प्रशासनास जबाबदार राहणारी अरब राज्य परिषद अस्तित्वात आली. अमीर फैझल इब्न हुसेन ह्याचा २३ ऑगस्ट १९२१ रोजी राज्यारोहण समारंभ झाला. इराक व सौदी अरेबिया ह्यांच्यामधील सरहद्द १९२२ मध्ये मोहमारा करारानुसार ठरविण्यात आली.
इराकमधील अतिरेकी राष्ट्रवाद्यांच्या विरोधास न जुमानता १० ऑक्टोबर १९२२ मध्ये ग्रेट ब्रिटन व इराक ह्यांत एक तह झाला. या तहान्वये इराकमध्ये महादेशाची तरतूद करण्यात आली, परकीयांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करण्यात आले आणि इराकमधील ग्रेट ब्रिटनच्या काही हितसंबंधांबाबत हमी देण्यात आली. आणखी काही करारांन्वये लष्करी सहकार्य, ब्रिटिश अधिकार्यांचा दर्जा तसेच वित्तव्यवस्था व न्यायव्यवस्था ह्यांसंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या. मे १९२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका निर्वाचक कायद्यामुळे संविधान सभा स्थापन करण्याचे कार्य सुकर झाले. अशी संविधान सभा मार्च १९२४ मध्ये भरली व तिने इराक हे सार्वभौम राज्य असून त्याला सांविधानिक आनुवंशिक राजसत्ता आणि प्रातिनिधिक शासनपद्धती असल्याचे मान्य केले. १९२६ मध्ये बगदादमध्ये सांविधानिक संसदेचे अधिवेशन सुरु झाले आणि सर्व मंत्रालयांनी तसेच प्रशासकीय खात्यांनी संपूर्ण इराकचा कारभार पहावयास सुरुवात केली. याच सुमारास इराकमध्ये सक्षम न्यायसंस्था, छोटेसे लष्कर (७,५०० सैनिक) व समर्थ पोलीस संघटना कार्य करू लागली. १९३० मधील इराक व ग्रेट ब्रिटन ह्यांच्यातील एका करारान्वये परदेशी घडामोडींबाबत सल्लामसलत व युद्धप्रसंगी अन्योन्य सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. इराकनेही ब्रिटिश सैन्यास देशात मुक्त प्रवेश देण्याचे व इतर सुविधा पुरविण्याचे मान्य केले. याशिवाय ब्रिटिश लष्कराला शुआयबा व हॅब्बानीया या दोन ठिकाणी लष्करी विमानतळ स्थापण्यास इराकने परवानगी दिली. ३ ऑक्टोबर १९३२ रोजी इराकने स्वतंत्र देश म्हणून राष्ट्रसंघात प्रवेश केला.
इराकला १९३२ नंतर अनेक अडचणींना व समस्यांना तोंड द्यावे लागले : सुन्नी व शिया मुस्लिमांमधील वैरामुळे राजकीय जीवनात निर्माण झालेली कटुता कुर्द लोकांच्या समस्या कुर्दांची स्वतंत्र राज्याची (कुर्दिस्तान) मागणी ॲसिरियन ह्या अल्पसंख्य जमातीचे प्रश्न भूधारणात कराव्या लागणार्या सुधारणा तसेच शेती, जलसिंचन, पूरनियंत्रण, लोकोपयोगी सेवा-उद्योग व संदेशवहन इत्यादींमध्ये करावयाची प्रगती. ऑक्टोबर १९३६ मध्ये जनरल बक्र सिदकी याच्या नेतृत्वाखाली व असंतुष्ट राजकीय नेत्यांच्या सहानुभूतीच्या जोरावर लष्कराने अवचित सत्तांतर केले. तथापि या नव्या राजवटीने सुधारणा घडवून आणल्या नाहीत. १९३७ मध्ये बक्र सिदकीचा खून करण्यात आला. याच काळात तेलउद्योगाचा मोठा विकास घडून येत होता, ही गोष्ट इराकच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. इराकी, मोसूल व बसरा पेट्रोलियम कंपन्यांना तेलउत्पादनार्थ १९२५, १९३२ व १९३८ मध्ये सवलती देण्यात आल्या. १९३७ मध्ये इराकने तुर्कस्तान, इराण व अफगाणिस्तान या राष्ट्रांबरोबर ‘सदबाद करार’ केला. यानुसार या चार राष्ट्रांच्या समान हितसंबंधांतून उद्भवणार्या कलहांबाबत विचारविनिमय केला जावा ही तरतूद करण्यात आली. १९३७ नंतर ग्रेट ब्रिटन व इराक ह्यांच्यामधील संबंध बिघडले व तणाव वाढत चालला. याचवेळी देशावर जर्मनीचा मोठा प्रभाव पडला. १९४१ मध्ये लष्करी अधिकार्यांनी रशीद अली अल्-गैलानीच्या नेतृत्वाखाली पुन्हा अवचित सत्तांतर केले. गैलानी राजवटीने ब्रिटिश सैन्याला इराकमधून जाण्याची परवानगी नाकारली. यावर ब्रिटिशांनी इराकबरोबर युद्ध पुकारून बसरा व बगदाद मे १९४१ मध्ये ताब्यात घेतले. यानंतर मात्र इराकने ब्रिटिशांना सरळ सहकार्य दिले दुसर्या महायुद्धात ते दोस्तांचे महत्त्वाचे युद्धतळ बनले. १९४३ मध्ये इराकने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले व १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसनदेवर सही केली.
दुसर्या महायुद्धानंतर इराकमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत तणाव व असंतोष वाढला. १५ मे १९४८ रोजी अरब-इझ्राएल युद्ध सुरू झाले. या युद्धात मदत म्हणून इराकने आपले सैन्य अरबांच्या बाजूने पाठविले. १९५१–५२ मध्ये मोठ्या संख्येने ज्यू लोकांनी इराक सोडला. इझ्राएलविरुद्धच्या युद्धात झालेला खर्च, खराब पिके, लोकांची विपन्नावस्था ह्या सर्व गोष्टींचा परिपाक बगदादमध्ये १९५२ साली मोठ्या प्रमाणावर दंगा होण्यात झाल. १९५३ पर्यंत लष्करी कायदा पुकारण्यात आला.
परराष्ट्रीय संबंधांच्या संदर्भात इराक पश्चिमी राष्ट्रे आणि सोव्हिएट रशिया या दोघांपैकी कोणाला निवडावे या संभ्रमावस्थेत होता. फेब्रु. १९५५ मध्ये इराक बगदाद करारात सामील झाला. या करारात ग्रेट ब्रिटन व अमेरिका सामील झाली. इराण, तुर्कस्तान, पाकिस्तान हे इतर सभासद होत. बगदाद कराराच्या योगे रशियाच्या दक्षिण सरहद्दीवर संरक्षणात्मक फळी उभारली गेली.
इझ्राएल व ईजिप्त यांच्यात २९ ऑक्टोबर १९५६ रोजी युद्ध पेटले. लगेचच ब्रिटिश व फ्रेंच सैन्याने ईजिप्तवर हल्ला केल्याने इराकची फारच चमत्कारिक अवस्था झाली. ९ नोव्हेंबरला इराकने फ्रान्सबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकले व बगदाद करारच्या परिषदेच्या बैठकांना जर ब्रिटिश प्रतिनिधी उपस्थित राहणार असतील, तर आपण त्यांत भाग घेणार नसल्याचे कळविले. सुएझ संघर्षात इराकने घेतलेल्या या भूमिकेवरून देशात अशांतता माजली. नजफ व मोसूल येथे दंगे उद्भवले व प्राणहानीही झाली. ३१ ऑक्टोबर १९५६ रोजी पुकारण्यात आलेला लष्करी कायदा २७ मे १९५७ पर्यंत चालू राहिला. सुएझ संघर्षाच्या वेळी इराक व सिरिया यांमध्येही तीव्र तणाव होते. सिरियामध्ये उभारण्यात आलेली तेलवाटप केंद्रे इराक पेट्रोलियम कंपनीच्या मालकीची होती. ती नोव्हेंबर १९५६ मध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. मार्च १९५७ पर्यंत सिरियाने इराकला तेलवाटपव्यवस्था सुरळीतपणे चालू करावयास परवानगी दिली नाही.
संयुक्त अरब गणराज्याप्रमाणे इराक व जॉर्डन या देशांनाही आपले एक अरब संघराज्य असावे, असे वाटल्यावरून १४ फेब्रुवारी १९५८ मध्ये या दोघांचे अरब संघराज्य स्थापन झाले. १९ मार्च १९५८ रोजी बगदाद व अम्मान या दोन्ही ठिकाणी संघीय संविधान घोषित करण्यात आले. परंतु त्याच वर्षीच्या जुलैमधील इराक येथील घटनांमुळे अरब संघराज्य भग्न झाले. १४ जुलै १९५८ रोजी इराकी लष्कराने केलेल्या अवचित सत्तांतरामध्ये राजा फैझल, युवराज व पंतप्रधान जनरल नुरी अल्-सैद मारले गेले. इराक हे गणराज्य म्हणून घोषित करण्यात येऊन ब्रिगेडियर कासीम याने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली आणि तो इराकचा पंतप्रधान झाला. याच सत्तांतरातून कासीमचा व उपपंतप्रधान कर्नल आरेफचा, असे दोन गट स्थापन झाले. सप्टेंबर १९५८ मध्ये कासीमने आरेफला उपपंतप्रधानपदावरून काढून टाकले. जनरल कासीमने कम्युनिस्टांविरुद्ध कडक उपाययोजना केली. १९५९ मध्ये त्याच्या खुनाचा प्रयत्न झाला. १९६१ मध्ये कुर्द टोळीवाल्यांनी मुस्ताफा बारझानीच्या नेतृत्वाखाली इराकी शासनाविरुद्ध उठाव केला. कुर्दांनी उत्तर इराकमधील बर्याच प्रदेशावर आपला ताबा मिळविला. १० फेब्रुवारी १९६४ मध्ये कुर्दांच्या हक्कांना इराकी संविधानात मान्यता मिळावी, असे ठरविण्यात आले. कुर्दांनी मात्र आपल्या राजकीय उद्दीष्टांना फल मिळत नाही, तोपर्यंत शस्त्रसंन्यास करण्याचे नाकारले व कुर्दांचा प्रश्न तसाच अनिर्णित राहिला.
बगदादमध्ये ८ फेब्रुवारी १९६३ रोजी लष्करी अवचित सत्तांतर होऊन जनरल कासीमला पदभ्रष्ट करण्यात येऊन त्याला ठार मारण्यात आले. बाथ पक्ष व राष्ट्रीय लष्करी अधिकारी ह्यांच्या सहकार्याने हे सत्तांतर घडून आले. कर्नल आरेफला राष्ट्राध्यक्ष व ब्रिगेडियर अहमद बक्र याला पंतप्रधान करण्यात आले. १९६३-६५ या काळात अरबांमध्ये ऐक्य अधिक वाढीस लागावे या हेतूने प्रयत्न करण्यात आले. १८ नोव्हेंबर १९६३ रोजी अध्यक्ष आरेफने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली व बगदाद येथे एक क्रांतिकारी विभाग स्थापण्यात आला. २० नोव्हेंबरला बगदादमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापण्यात आले. त्यात लष्करी अधिकारी, बाथिस्टांमधील मवाळ गट आणि अपक्ष ह्यांचा अधिक भरणा होता. १४ जुलै १९६४ रोजी अध्यक्ष आरेफने इराकी अरब सोशॅलिस्ट युनियन ही एक संघटना काढून तीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सामील व्हावे, असे घोषित केले. त्याच वेळी देशातील सर्व बँका, विमाकंपन्या तसेच पोलाद, सिमेंट, तंबाखू ह्यांचे कारखाने, पीठगिरण्या, अन्नोद्योग व इतर महत्त्वाचे कारखाने अशा बत्तीस उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १३ एप्रिल १९६६ मध्ये अध्यक्ष आरेफला अपघाती मृत्यू आल्यावर, त्याचा भाऊ मेजर जनरल अब्दल रहमान आरेफ अध्यक्ष झाला. १९६४–६६ या काळात पुन्हा कुर्दांविरुद्ध युद्ध सुरू झाले. जून १९६६ मध्ये अब्द अल् रहमान-अल्-बझाझ ह्या इराकी पंतप्रधानाने या संघर्षात तडजोड करण्यासाठी एक मसुदा तयार केला. त्या मसुद्यातील काही मुद्दे : कुर्दांचा राष्ट्रवाद व भाषा ह्यांना वैधिक मान्यता प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि संसद व मंत्रिमंडळ ह्या दोहोंत तसेच विविध राज्यसेवांत कुर्दांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व या मसुद्यातील कलमे मान्य असल्याने बारझानी या कुर्द नेत्याने मान्य केले.
इराक व इराण ह्या देशांमधील संबंध १९६६ पासून सुधारत गेले. १९६७ मध्ये इराकी अध्यक्ष आरेफनी इराणला भेट दिली. तेलसंशोधन कार्य संयुक्तरीत्या करण्याबाबत करार करण्यात आला. त्याचप्रमाणे दोन्ही देशांत व्यापारविषयक व सांस्कृतिक करारांबाबत चर्चाही झाली. अध्यक्ष आरेफनी नोव्हेंबर १९६७ मध्ये उत्तर इराकला भेट देऊन आल्यानंतर कुर्दांना मंत्रिमंडळात जागा देण्यात येतील, कुर्दिस्तान मधील युद्धग्रस्त प्रदेशात पुनर्वसाहतींचे काम हाती घेण्यात येईल व इराकच्या प्रशासनात कुर्दांचे बहुमोल सहकार्य घेतले जाईल, असा विश्वास प्रकट केला. तथापि १९६८ च्या पहिल्या तिमाहीतच कुर्दांमध्ये गट निर्माण होऊन दंगल माजली. १९६६-६७ च्या हिवाळ्यात सिरिया व इराक पेट्रोलियम कंपनी यांच्यात तेलाबाबत कलह सुरू होऊन परिणामी इराकला फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. जून १९६७ मध्ये उद्भवलेल्या इझ्राएल व अरब देश यांच्यामधील युद्धामुळेही, तेलउत्पादनात खंड पडून, एक महिनाभर सर्व ठिकाणचे तेलउत्पादन बंद पडले. यामुळेही इराकला जबर आर्थिक नुकसान सोसावे लागले.
इराकमध्ये १७ जुलै १९६८ रोजी अवचित रक्तहीन सत्तांतरामध्ये चालू राजवटीचा शेवट होऊन जनरल अहमद हसन अल्-बक्र हा पूर्वीचा पंतप्रधान इराकचा अध्यक्ष बनला. पदभ्रष्ट अध्यक्ष आरेफ अज्ञातवासात गेला आणि पंतप्रधान ताहेर याह्यास भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात टाकण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात कुर्दांचेही दोन मंत्री घेण्यात आले. ३० जुलै १९६८ मध्ये बक्र ह्यांनी सबंध मंत्रिमंडळात बरखास्त केले व तेच स्वत: पंतप्रधान बनले. नंतर त्यांनी नवे मंत्रिमंडळ बनविले. इराकपुढील समस्या सोडविण्यात या नव्या सत्तांतराला अपयशच आल्याचे दिसते. १९६८ च्या दुसर्या सहामाहीत अंतर्गत राजकीय तणाव वाढत गेले. १९६९ च्या एका विशेष क्रांतिकारी न्यायालयाने इझ्राएलसाठी हेरगिरी करण्याच्या व चालू राजवट उलथून पाडण्याचा प्रयत्नात असणार्या चौदाजणांना मृत्युदंडाची सजा फर्माविली. ह्या चौदा जणांना देण्यात आलेली फाशी व त्यांची उघडपणे बगदाद व बसरा येथे वेशीवर टांगण्यात आलेली प्रेते, ह्यांबद्दल सबंध जगात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या चौदांपैकी नऊ लोक ज्यू होते याकडे व ज्यूंवर लादण्यात आलेल्या निर्बंधांकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. क्रांतिकारी राजवटीने ज्यूविरोधी कृत्ये करीत असल्याचा इन्कार केला. मात्र इराकमधील अल्पसंख्य ज्यू लोकांचे जीवन ज्यूधर्माच्या उदयामुळे व इझ्राएल देशाच्या स्थापनेमुळे अधिकच बिकट बनले. १९३९ मध्ये ज्यू लोकांची संख्या इराकमध्ये सु. २·५ लक्ष होती आणि ती भौगोलिक व व्यावसायिक दृष्ट्या सबंध इराकभर विखुरलेली होती. १९६९ मध्ये ती केवळ २,५०० एवढीच राहिली. कुर्दिस्तान प्रांतातील परिस्थितीही फारशी समाधानकारक राहिली नाही. ऑक्टोबर १९६८ मध्ये उघड संघर्ष सुरू झाला. मार्च १९६९ मध्ये कुर्द बंडखोरांनी इराकी पेट्रोलियम कंपनीच्या किर्कूक येथील कारखान्यावर हल्ला करून मोठे नुकसान घडवून आणले. मे १९६९ मध्ये इराकी शासनाने कुर्दाच्या मागण्यांचा विचार होत असल्याचे जाहीर केले. इराकी पेट्रोलियम कंपनी व इराक शासन ह्यांच्यामधील संबंधही तणातणीचेच राहिले आहेत. मार्च १९६९ मध्ये जॉर्डन, सिरिया व इराक ह्या देशांचे मिळून संयुक्त पूर्वीय दल स्थापन करण्यात आले. इराकचे इराणबरोबरचे संबंध फारसे सुधारलेले नाहीत. इराकची सोव्हिएट युनियनबरोबरची मैत्री, हा इराकी परराष्ट्रीय धोरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण रशियाकडून आता इराकला मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री पुरविली जाते. ह्या मैत्रीचे प्रतीक म्हणून म्हणा किंवा पश्चिम जर्मनीचे इझ्राएलबरोबर वाढते संबंध न रुचल्यामुळे म्हणा, इराकने पूर्व जर्मनीबरोबर राजदूतीय स्तरावर आपले राजनैतिक संबंध दृढ केले. असे कृत्य करणार्या बिगरसाम्यवादी देशांत इराकचा पहिला क्रम लागेल. इराकचे पश्चिमी राष्ट्रांबरोबरचे व विशेषत: अमेरिकेबरोबरील संबंध बेताबातीच राहिलेले आढळतात.
राजकीय स्थिती : २२ सप्टेंबर १९६८ रोजी घोषित करण्यात आलेल्या तात्पुरत्या संविधानाप्रमाणे इराक हे लोकशाही गणराज्य आहे. इस्लाम हा देशाचा धर्म असून त्याच्यावरच सर्व कायदे व संविधान अधिष्ठित आहे. इराकची अर्थव्यवस्था समाजवादी पद्धतीची असून देशात धर्म, भाषण, मत व सार्वजनिक सभास्वातंत्र्य आहे. जात, धर्म वा भाषा ह्यांबाबत भेदभाव केला जात नाही. वृत्तपत्रस्वातंत्र्य असून, संघटना व कामगारसंघटना यांच्या वैधिक स्थापनेबाबतच्या हक्कास मान्यता आहे. कुर्द लोकांच्या राष्ट्रीय हक्कांबाबत, इराकच्या ऐक्यास तडा जाणार नाही, या बेताने हमी देण्यात आली आहे. देशात सर्वोच्च प्राधिकार क्रांतिकारी परिषदेकडे असून तीच राष्ट्रीय विधानसभेची नियुक्ती होईपर्यंत सर्व कायदे प्रस्थापित करते. ह्या परिषदेचे पाच सभासद असून ते नियुक्त उपराष्ट्राध्यक्ष असतात.
क्रांतिकारी परिषदेचे अध्यक्ष मेजर जनरल अहमद हसन अल्-बक्र हे आहेत. परिषदेनंतर मंत्रिपरिषदेकडे शासकीय अधिकार दिलेले आहेत. प्रधानमंत्री हसन अल्-बक्र हेच असून बाकीची खाती विविध मंत्र्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत (ऑगस्ट १९६९). देशात बाथ पक्ष, अरब सोशॅलिस्ट युनियन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इराक, कुर्दिश डेमोक्रॅटिक पार्टी व बाराती पार्टी असे पाच पक्ष असले, तरी शेवटच्या तिहींवर बंदी घालण्यात आली आहे.
मार्च १९७० मध्ये कुर्द लोकांशी चाललेले युद्ध संपले कुर्दांना स्वायत्तता देण्यात आली. मंत्रिमंडळात पाच कुर्द मंत्री घेण्यात आले. आखातामधील रास अल् खाइमा ह्या ट्रूशिअल राज्यांपैकी एका राज्याच्या मालकीची टंब बेटे इराणने नोव्हेंबर १९७१ मध्ये बळकाविल्यामुळे पुन्हा इराण व इराक ह्या दोन देशांत वितुष्ट व संघर्ष निर्माण झाला. परिणामी इराकने इराण व ग्रेट ब्रिटन ह्या दोन देशांशी संबंध तोडले आणि देशातील ६०,००० इराणी लोकांना देशाबाहेर घालविले. इराकचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून एका कुर्द प्रतिनिधीची निवड करण्यात आली आहे (एप्रिल १९७४). देशाचे प्रशासनाच्या दृष्टीने १४ लिवा (प्रांत) करण्यात आले असून त्यांवर एकेका मुहाफीजाची नियुक्ती केलेली असते ह्या प्रांताचे क्वाधिक व नाहिया असे आणखी भाग केलेले असून त्यांची प्रशासकीय व्यवस्था अनुक्रमे क्वैमक्वॅम व मुदीर ह्या अधिकार्यांकडे आहे. १९६० च्या सुमारास उत्तरेकडील, दक्षिणेकडील आणि अल् जाझीरा हे तिन्ही वाळवंटी प्रदेश १४ प्रांतांत प्रशासनाच्या सोयीसाठी सामील करण्यात आले.
बगदाद येथे दिवाणी खटले व दावे यांच्याकरिता सर्वोच्च न्यायालय असून पाच अपील न्यायालये बगदाद, बसरा, हिल्ला, मोसूल व किर्कूक या शहरी आहेत. सहा शांतता न्यायालयेही आहेत. ह्याशिवाय देशात अमर्यादित अधिकारांची १४ व मर्यादित अधिकारांची ४४ प्रारंभिक न्यायालये आहेत. धार्मिक बाबींसंबंधी वेगवेगळी न्यायमंडळे बगदादमध्ये आहेत. देशाच्या सुरक्षिततेस राजकीय, आर्थिक वा वित्तीय क्षेत्रांत बाधा आणणारे महत्त्वाचे खटले क्रांतिकारी न्यायालयांत चालविण्यात येतात. डिसेंबर १९६८ पासून हेरगिरीसाठी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेली आहे.
अठरा वर्षांच्या प्रत्येक युवकास लष्करी प्रशिक्षण सक्तीचे असून प्रशिक्षणानंतर दोन वर्षे लष्करातील व अठरा वर्षे राखीव सेवा धरण्यात येते. इराकच्या लष्कराचे भूसेना, नौसेना व वायुसेना असे तीन विभाग आहेत. भूसेनेत ९०,००० सैनिक असून तिची रचना दोन पायदळे, दोन डोंगरी दले, एक चिलखती दल व संरक्षणमंत्रालयाची फौज अशी असते. पायदळाची संघटना व उभारणी ब्रिटिश पायदळाच्या धर्तीवर केलेली आहे. इराकी शस्त्रसंभारापैकी तीन चतुर्थांश शस्त्रसंभार रशियन बनावटीचा आहे. लष्करासाठी दोन महाविद्यालये आहेत. नौसेनेमध्ये बारा रशियन टॉर्पेडो बोटी, पाणबुडीचा पाठलाग करणार्या दोन रशियन बोटी, चार प्रशिक्षण बोटी, नदीतून संचार करणार्या चार गनबोटी, आठ बंदर आरक्षक बोटी, चार लाँचेस वगैरे साहित्य आहे. वायुसेनेची एकूण संख्या ७,५०० व लढाऊ विमानांची २२५ आहे. ब्रिटनकडून मिळविलेली हंटर जातीची फायटर बाँबरजेट विमाने आणि वेसेक्स हेलिकॉप्टर तसेच फ्रान्सकडील अल्यूएट तीन जातीची हेलिकॉप्टर वगळता, राहिलेली सर्व प्रकारची लढाऊ व दळणवळण करणारी विमाने रशियाकडून मिळविण्यात आली आहेत. याशिवाय रशियाने इराकला अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे पुरविली आहेत. अर्थसंकल्पातील ४० टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करावी लागते.
आर्थिक स्थिती : इराक कृषिप्रधान देश असून एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के लोक शेती व पशुपालन ह्या उद्योगधंद्यांत गुंतलेले आहेत. १९५० पर्यंत कारखानदारी वाढलेली नव्हती, त्यानंतर ती वेगाने वाढत असली तरी तिचे प्रमाण कमी आहे.
ॲसिरिया व कुर्दिस्तान या पर्जन्याधिष्ठित कृषिप्रदेशांत बार्ली, गहू व भूमध्यसामुद्रीय पिके (फळफळावळ, तंबाखू व कवचीची फळे) ही प्रमुख पिके होतात. जलसिंचनाधिष्ठित प्रदेशांत बार्ली, खजूर व तांदूळ ही पिके होतात. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य मानतात. जलसिंचनक्षेत्रीय सखल भागात भाताचे पीक काढतात. बार्लीप्रमाणेच गव्हाचे पीकही हिवाळ्यात काढतात ॲसिरिया भागातून देशामधील एकूण गव्हाच्या पिकाच्या ७० टक्क्याहून अधिक उत्पादन होते. या ठिकाणी ते बार्लीबरोबर किंवा आळीपाळीने काढले जाते. गहू-उत्पादन थोड्या प्रमाणात युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या वरच्या खोर्यात होते. मिलेट व मका यांच्या लागवडीस नव्यानेच सुरुवात झालेली आहे. ही दोन्ही पिके उन्हाळ्यात निघत असल्याने बदलत्या पिकांच्या दृष्टीने ती अतिशय उपयुक्त ठरली आहेत. मिलेटचा उपयोग चार्यासाठी व अपमिश्रधान्य म्हणून केला जातो. इराक हा जगाला सर्वाधिक खजूर पुरवितो. रुक्ष व वालुकामय जमीन, पुरेसा पाण्याचा पुरवठा आणि उष्ण, दीर्घकालीन व स्वच्छ सूर्यप्रकाश यांमुळे दक्षिण इराकमध्ये खजूर बेसुमार पिकतो. त्यामुळे इराकी जेवणात खजूर मुख्य पदार्थ असतो. खजुराच्या बियांचा गुरांचे खाद्य म्हणून मोठा उपयोग होतो. खजुरापासून आराक नावाचे मद्य तयार करतात. कापूस मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. तथापि त्याच्या उत्पादनात क्षारयुक्त जमीन आणि टोळधाड ह्या दोन समस्या आहेत. कापसाची प्रत उच्च नसते तंबाखू व द्राक्षे ह्यांचे उत्पादन अंतर्गत मागणीपुरतेच आहे. त्यांची लागवड ईशान्य इराकच्या डोंगराळ प्रदेशात करतात. काष्ठौषधी झाडे काही भागांत आहेत. अंबाडी, ताग, अल्फाल्फा, तीळ, भुईमूग, बटाटे, रताळी व क्लोव्हर ही पिके काढण्याचे प्रयोग चालू आहेत.
वाडी अल् थार्थार हा सर्वांत मोठा प्रकल्प १९५६ मध्ये पूर्ण करण्यात आला. युफ्रेटीसवर अशाच प्रकारचे पण छोटे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. लिटल् झॅब नदीवर डोकान येथे १०६ मी. उंचीचे मोठे धरण असून ग्रेट झॅब नदीवर बेख्मे येथे व टायग्रिसवर मोसूलजवळ धरणे बांधली आहेत. हिंदीया येथे १९१३ मध्ये प्रथम जलसिंचन-कार्यास प्रारंभ झाला. हामार सरोवराच्या मुखाशी लहान प्रकल्प बांधण्यात आले. टायग्रिसवर कूट येथील धरण हिंदीया धरणाच्या तिप्पट मोठे आहे. हामार सरोवर, शट अल् अरब, सुलेमानिया, इर्बिल व मोसूल ह्या ठिकाणी लहान प्रकल्प बांधण्याचे काम चालू आहे.
अल् जाझीरा व बहुतेक सर्व कुर्दिस्तान ह्यांमध्ये पशुपालन हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय मानतात मेंढ्यांची संख्या सु. १.३१ कोटी (१९७०) असून त्यात प्रामुख्याने अरबी (मुख्यत्वेकरून सखल प्रदेशांत), करडी किंवा कुर्दिश (मोठी व लठ्ठ परंतु जाड्याभरड्या लोकरीची), तार्तार (जाड शेपटीची व उत्कृष्ट मांसाकरिता प्रसिद्ध) आणि आवासी (अरबी व करडी ह्यांपासून तयार केलेली) या आहेत. बकर्यांपासून दूध, मांस व केस ह्यांचा पुरवठा होतो. केसांपासून जलरोधक असे तंबूचे कापड व कपडे तयार करण्यात येतात. इराकमध्ये १९७० मध्ये गुरे १६·९ लक्ष, म्हशी २ लक्ष, शेळ्या २३ लक्ष, उंट २·५२ लक्ष, घोडे १·२४ लक्ष व कोंबड्या ६२·७ लक्ष होत्या. गाढवांची संख्या पाच लक्षांवर असून त्यांचा ओझ्यासाठी व स्वारीसाठीही उपयोग होतो. कुर्दिस्तानात खेचरांची पैदास महत्त्वाची मानतात.
इंधनाकरिता आणि गाईगुरांना, शेळ्या-मेंढ्यांना चराऊ जमीन उपलब्ध होण्याकरिता जंगले मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्यामुळे १९५५ मध्ये जंगलविषयक कायदा करण्यात आला. आता देशात सु. ७,२५२ चौ. किमी. जंगलक्षेत्र राहिले आहे. जंगले वाढविण्यासाठी शासनाने वीस व पन्नास वर्षांच्या योजना हाती घेतल्या असून एक जंगल-पोलीसदल स्थापण्यात आले आहे. ईशान्य भागात पॉप्लरची मोठी वाढ झाली असून, कोरड्या वालुकामय प्रदेशांत निरगिरीची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.
उत्तर, मध्य व दक्षिण योजनांखाली अनुक्रमे किर्कूक, बगदाद व बसरा येथे अनुक्रमे साठ, ऐंशी व पंचेचाळीस हजार किवॉ. क्षमतेची वीजनिर्माणकेंद्रे बांधलेली आहेत. त्यांची क्षमता अनुक्रमे १·५ लक्ष, २ लक्ष व १·५ लक्ष किवॉ. पर्यंत वाढविण्याची योजना आहे. समारा, डोकान व डरबेंडी येथे जलविद्युत् केंद्रे उभारण्यात येत आहेत. बगदाद येथे १,२०,००० किवॉ. क्षमतेचे एक औष्णिक विद्युत् केंद्र बांधले आहे.
उत्तर इराकमध्ये लोहधातुक, क्रोमाइट, तांबे, शिसे व जस्त ह्यांच्या खाणी चालू आहेत. ह्याशिवाय निरनिराळ्या भागांत चुनखडी, जिप्सम, मीठ, डोलोमाइट, बिट्यूमेन, फॉस्फेट व गंधक ह्यांचे साठे सापडले आहेत. शासनाने १९६९ मध्ये इराक नॅशनल मिनरल्स कंपनी स्थापन केली. मिश्राक भागात पोलंडच्या सहकार्याने गंधकाचे उत्पादन वाढविले जात आहे. किर्कूक येथील शासकीय कारखान्यात प्रतिवर्षी १२ लक्ष टन गंधकाचे उत्पादन होते.
पेट्रोलियम हे इराकचे सर्वांत महत्त्वाचे खनिज असून ते देशाच्या ईशान्य, उत्तर व दक्षिण भागांत सापडते. किर्कूक, खानकीन व बगदादजवळ तेलशुद्धीकारखाने आहेत. बसर्याजवळ अब्रू फुलूस येथे ३५ लक्ष टन व मोसूल येथे १२ लक्ष टन तेलउत्पादनक्षमतेचे तेलशुद्धीकारखाने बांधण्याची योजना आहे. एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३२% उत्पादन तेलाचे असून तेलउत्पादन हा इराकच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तेलापासून मिळणार्या राजस्वामुळे (१९६९ साली ४५ कोटी डॉलर) देशाच्या अर्थसंकल्पाचा समतोल, चलनाला स्थैर्य व बळकटी, आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांमध्ये आधिक्य आणि विकास कार्यक्रमांच्या पूर्ततेसाठी पैसा उपलब्ध झालेला आहे. देशात २,७५० कोटी बॅरल तेल-उत्पादन होईल एवढे क्रूड तेलसाठे असल्याचे अंदाज करण्यात आले आहेत (१९६९) सध्याचे सु. ७५० लक्ष टनांचे तेलउत्पादन प्रमाण लक्षात घेतल्यास आणखी ५० वर्षे सहज तेल पुरवठा होण्याची शक्यता आहे. १९६७ मध्ये ‘इराक नॅशनल ऑईल कंपनी’ ह्या १९६४ मध्ये स्थापण्यात आलेल्या सरकारी तेलकंपनीकडे तेलसंशोधन व उत्पादनासंबंधीचे सर्व हक्क व अधिकार देण्यात आले. ह्या कंपनीने फ्रेंच व रशियन तंत्रज्ञांच्या सहकार्याने तसेच आर्थिक साहाय्याने इराकमध्ये नवीन तेलविहिरींचा शोध लावला आहे. इराकमधील एकूण तेल उत्पादन १९५७ पासून सतत दहा वर्षे वाढत गेले. इराक-सिरिया करविषयक वाद व अरब-इझ्राएल युद्ध यांमुळे १९६७ मध्ये उत्पादन घसरले तरी १९६८ पासून ते सतत वाढतच आहे. इराकमधील एकूण तेल उत्पादनापैकी एक तृतीयांश तेल बसर्याहून टँकरने व दोन तृतीयांश तेल ट्रिपोली (लेबानन) व बनियास (सिरिया) येथे तेलनळांतून निर्यात केले जाते. १९६६ मध्ये किर्कूक तेलखाणींपासून बगदादपर्यंत जाणारा ३२१ किमी. लांबीचा, ४०·४५ सेंमी. व्यासाचा तेलनळ बांधण्यात आला. इटालियन तेलकंपनीशी १९७३ मध्ये झालेल्या कराराप्रमाणे किर्कूक व उत्तर रुमैला येथील तेलखाणी नळाने जोडून तेथील तेल बनियास व त्रिपोली येथे निर्यात करावयाचे आहे. किर्कूक तेलक्षेत्रामधील व्यवहाराचे १९७२ मध्ये राष्ट्रीयीकरण झालेले असून १९७३ मध्ये बसरा तेलकंपनीतील अमेरिकन व डच भागभांडवलाचे व हितसंबंधाचे राष्ट्रीयीकरण केले आहे.
तेलउद्योग वगळता इराकमध्ये मोठे उद्योगधंदे फारसे नाहीत. बगदादमध्ये वीजनिर्मिती व पाणीपुरवठा, वीटउद्योग, सिमेंटउद्योग हेच काय ते मोठे उद्योग आहेत. लहान उद्योगांचे प्रमाण मात्र मोठे आहे. त्यांत अन्न व पेय उद्योग (खजूर, मद्ये), सिगारेट, पादत्राणे, कताई व विणाई, रसायने, फर्निचर, जडजवाहीर व इतर धातू ह्यांचे उत्पादन करणार्या उद्योगांचा समावेश होतो. १९६९ मध्ये अशा उद्योगांची संख्या १,३६८ होती व त्यांपैकी निम्मे उद्योग एकट्या बगदादमध्ये होते. मोसूलच्या दक्षिणेस क्वैयाराह येथे बिट्यूमेनचा कारखाना बांधलेला असून त्यात प्रतिवर्षी साठ हजार टन डांबर तयार होते मोसूलमध्ये एक कापडगिरणी असून तिच्यात बाराशे कामगार आहेत. तसेच तेथे दोन सिमेंट-कारखाने आहेत. देशात एकूण सु. दहा लक्ष टन सिमेंटचे उत्पादन होते व अंतर्गत मागणीला ते पुरेसे पडते. मोसूलमध्येच प्रतिवर्षी ३५,००० टन उत्पादनक्षमतेचा साखर कारखाना बांधण्यात येत आहे. करबला व सुलेमानिया येथे प्रत्येकी एक साखर कारखाना बांधण्यात यावयाचा आहे. बसरा येथे रासायनिक खतनिर्मितीचा एक कारखाना बांधण्यात येत असून, त्यामधून अमोनियम सल्फेट, यूरिआ व गंधकाम्ल ह्यांचे उत्पादन होईल. बसरा येथे एक पेपरबोर्ड कारखाना आणि हिंदीया व हिल्ला येथे प्रत्येकी एक रेयॉनचा कारखाना उभारण्यात येत आहे. सुलेमानिया येथे सिगारेटनिर्मितीचा व कूफा येथे पादत्राण-निर्मितीचा कारखाना सुरू झाला आहे.
रशियाच्या सहकार्याने बगदाद येथील पोलाद-कारखाना व विद्युत्उपकरणांचा कारखाना, समारा येथे एक औषधकारखाना आणि मुसायिब येथे कृषियंत्रनिर्मितीचा कारखाना तसेच करबला येथे डबाबंद अन्नपदार्थांचा कारखाना आणि वस्त्रोद्योग व कापडगिरणी ह्यांची उभारणी होत आहे.
बहुतेक सर्व मोठ्या उद्योगांचे १९६४ मध्ये राष्ट्रीयीकरण झालेले आहे. १९६१ च्या औद्योगिक विकास कायद्यान्वये नव्या उद्योगधंद्यांना विविध सवलती जाहीर करण्यात आल्या मात्र ह्या उद्योगांतील ९० टक्के कामगार व ६० टक्के भांडवल इराकी असण्यावर भर देण्यात आला आहे.
देशातील एकूण कामगारसंख्या १९६५ च्या जनगणनेनुसार ४६ लक्ष होती. एकूण मनुष्यबळाच्या ५५·८% मनुष्यबळ शेतीउद्योगात गुंतलेले असूनही हा उद्योग हंगामी असल्यामुळे हे मनुष्यबळ वर्षातील बराचसा काळ बेरोजगार राहते. १९६७ साली शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये काम करणार्यांची संख्या ३,१८,८६६ (यांपैकी ३३,८९३ स्त्रीकामगार ) होती. १९६९ मध्ये उद्योगक्षेत्रात १,४८,०८९ (पैकी १०,३४५ स्त्रिया) व व्यापारक्षेत्रात ७७,६३७ (३,५९१ स्त्रिया) कामगार होते. औद्योगिक कामगारांपैकी ८८,५३७ (५९%) कामगार अकुशल होते. उद्योगधंद्याची जसजशी वाढ होत आहे, तसतशी कुशल कामगारांची वाणही वाढत आहे. पारंपरिक कलाकुसरीच्या उद्योगधंद्यांत बालकामगारांचे प्रमाण बरेच आहे. दहा वर्षांची मुले उमेदवार म्हणून कारखान्यांतून काम करीत असली, तरी त्यांचे प्रमाण एका कारखान्यातील एकूण कामगारसंख्येच्या २० टक्केच असते. स्त्रिया बहुधा शेती उद्योगात किंवा घरगुती उद्योगधंद्यांत काम करतात. कामगार कायद्यांच्या योगे किमान वेतन, कामाचे तास, अपघात, आजार वा मृत्यू यांबद्दल भरपाई आणि साप्ताहिक व वार्षिक सुट्ट्या यांवर नियंत्रण केले जाते. कुशल व अकुशल कामगारांना प्रतिदिनी किमान वेतन २७० फिल्स (०·७० डॉलर) एवढे असते. १९५८ नंतर आलेल्या राजवटीमुळे इराकमध्ये कामगार चळवळ खर्या अर्थाने संघटित झालेली दिसते. १९६९ मध्ये देशात १६ कामगार संघटना (१३७ शाखा) असून सदस्यसंख्या ३,१५,०१० होती.
निर्यात पदार्थांमध्ये पेट्रोलियम हे एकूण निर्यातीच्या ८५ टक्के ते ९० टक्के असून, प्रतिवर्षी साधारणत: २८ कोट डॉलर किंमतीचे (१० कोट पौंड) पेट्रोलियम निर्यात केले जाते. बहुतेक सर्व तेल त्यावर प्रक्रिया न करता, यूरोपला पाठविले जाते थोडेसे (आता हळूहळू वाढते) तेल पूर्व आशियाकडे व आफ्रिकेकडे निर्यात होते. निर्यातीच्या इतर पदार्थांत शेतमाल व पशुपालनउद्योगनिर्मित पदार्थांचा भरणा असतो. उदा., बार्ली व गहू अरबस्तान, जॉर्डन, लेबानन आणि काही प्रमाणात इंग्लंड. खजुराची निर्यात करण्यात (जागतिक विक्रीच्या ८० टक्के) सर्व जगात इराकचा पहिला क्रम लागतो. कच्च्या कापसाचीही वाढत्या प्रमाणात जपान, हाँगकाँग, भारत व पूर्व यूरोपीय देशांस निर्यात केली जाते. यूरोपकडे लोकर व चामडे आणि जॉर्डन, लेबानन व तुर्कस्तान या देशांकडे पशुधनाचीही थोड्या प्रमाणात निर्यात होते. आयातीमध्ये मुख्यत: भांडवली वस्तू (लोखंड व पोलाद सामग्री, यंत्रे व अवजारे आणि वाहने), अन्नसामग्री (साखर, चहा इ.), कापड आणि औषधे ह्यांचा समावेश होतो. १९६९ मध्ये वार्षिक निर्यात, तेल वगळता, २,२५,६५,००० इराकी दिनार, तर आयात १५,७२,००,००० इराकी दिनार एवढी होती. यांतील फरक तेलाच्या निर्यातीने व परदेशांकडून घेतलेल्या कर्जाच्या योगे भरून काढण्यात येतो. आयात व्यापार मुख्यत्वेकरून इंग्लंड (इंग्लंड हा इराककडून एकूण तेलनिर्यातीपैकी अर्धे तेल विकत घेतो व इराकमध्ये होणार्या एकूण आयातीच्या ३० टक्के आयात पदार्थ पुरवितो), पश्चिम जर्मनी, अमेरिका, कॅनडा, रशिया व जपान ह्या देशांशी चालतो. इराकी दिनार हे येथील अधिकृत चलन असून एक इराकी दिनार = १००० फिल = १० रियाल = २० दिरहॅम आहे. विदेश-विनिमय दर १०० इ. दि. = ११७ पौंड स्टर्लिंग = ३०५ डॉलर असा आहे.
देशात साधे व विकासलक्षी अर्थसंकल्प सादर केले जातात. १९६५–७० या पंचवार्षिक विकास योजनेकरिता शासनाने सरकारी क्षेत्रात ६४ कोटी इ.दि. खर्च करावयाचे ठरविले त्यात शेती व उद्योग ह्यांवर प्रत्येकी २०·५ कोटी इ. दि. वीज : ३·५ कोटी, वाहतूक व संदेशवहन : ९ कोटी आणि इस्पितळे, शाळा, सार्वजनिक इमारती व गृहनिवसन ह्यांवर १०·५ कोटी इ.दि. खर्च करावयाची योजना होती. खाजगी क्षेत्रात १८ कोटी इ.दि. गुंतवणूक असून एकूण गुंतवणूक ८२ कोटी इ.दि. आहे. महसुली उत्पन्नामध्ये सर्वांत मोठा वाटा (४० ते ४५ टक्के) पेट्रोलियम स्वामित्वशुल्करूपाने शासनाला मिळतो. बाकीचे उत्पन्न प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांवाटे मिळते. इराकमध्ये १९६४ साली सर्व देशी व परदेशी बँकाचे आणि विमाकंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इराक ही मध्यवर्ती बँक असून इतर चार व्यापारी बँका आहेत. शेती, सहकार, उद्योग, गहाण आणि स्थावर ह्यांसाठी प्रत्येकी एक विशिष्ट बँक स्थापण्यात आली आहे.
देशात एकूण ८,५०० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ३,५०० किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. कित्येक नवीन प्रमुख रस्ते व पूल बांधण्यात आले आहेत. महत्त्वाचे मार्ग पुढलप्रमाणे : बगदाद-किर्कूक-मोसूल (४८५ किमी.) बगदाद-शरकात-मोसूल (४३३ किमी.) किर्कूक-सुलेमानिया (११६ किमी.) बगदाद-अमराह-बसरा (५९८ किमी.) बगदाद-हिल्ला-बसरा (६२२ किमी.) बगदाद-हेल-मदीना (१,१०० किमी.). बगदादमधील क्वीन अलीया व ऐग्मा हे पूल बांधण्यात आले असून इतर पूल बांधण्याचे कार्य चालू आहे. बगदाद-मोसूल हमरस्त्यासाठी जागतिक बँकेने २·३ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. १९७० साली देशात ४६,०२४ मोटारी, २१,३९६ टॅक्सी, ३२,७३१ ट्रक, ९,२४४ बसगाड्या, आणि ५,८०० मोटरसायकली होत्या. देशात २,५२८ किमी. लांबीचा लोहमार्ग (१९७०) असून किर्कूक-सुलेमानिया, कूट-नासिरिया व करबला-सॅमॅवा ह्या लोहमार्गांचे बांधकाम करण्याची योजना आहे. रेल्वे प्रशासन-मंडळ हेच इराकी हवाईवाहतूक व्यवस्था पाहते. बगदाद व बसरा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून मोसूल येथे तिसरा विमानतळ बांधण्याचे काम चालू आहे. बगदाद येथे आणखी एक विमानतळ बांधण्यात येत आहे. बसरा व उमक्वास्त्र ही दोन प्रमुख व्यापारी बंदरे जगातील भागांशी निरनिराळ्या समुद्रमार्गांनी जोडलेली असल्याने ती महत्त्वाची वितरणकेंद्रे बनली आहेत.
देशात १९६६ मध्ये ३२८ डाकघरे व तारघरे आणि २०० दूरध्वनिकेंद्रे होती. १९७१ मध्ये १,१९,६५० दूरध्वनी वापरात होते. नभोवाणी व दूरचित्रवाणी शासनाच्याच अखत्यारात येतात. १९७१ मध्ये २,०१,००० रेडिओ-संच आणि दोन लक्ष दूरचित्रवाणी-संच होते.
लोक व समाजजीवन: इराकची लोकवस्ती अतिशय विषम प्रमाणात विखुरलेली आढळते. लोकसंख्येची सरांसरी घनता दर चौ. किमी. स ६६ असून बगदाद प्रांतात दर चौ. किमी. स १२० तर बसरा प्रांतात ३२० लोक राहतात. शट अल् अरब नदीच्या काठी, मध्य व अपर टायग्रिस नदीच्या तीरी, बगदादच्या सभोवती आणि युफ्रेटीसच्या काठी हिल्लाजवळ सुलेमानियासभोवतालच्या सखल खोर्यात व अपर युफ्रेटीस भागातच लोकवस्ती एकवटल्याचे आढळते. इराकची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते. काही खेडेगावांत दोन हजारांपेक्षा जास्त वस्ती नाही. देशातील सु. वीस शहरांचीच लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधूनही शेती उद्योगात बरेच मनुष्यबळ गुंतलेले आढळते. कुर्दिस्तान व ॲसिरिया ह्यांमध्ये मात्र सर्वत्र समप्रमाणात लोकवस्ती पसरल्याचे आढळते. पश्चिमेकडील वाळवंटांत तसेच दोन नद्यांमधील प्रदेशातही भटक्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर संचार असतो. महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी व उत्सवांच्या वेळी हे भटके लोक करबला, नजफ, समारा, ह्यांसारख्या शहरांत येतात.
इराकी लोकसंख्येत जाती व संस्कृती ह्यांच्या दृष्टीने शेष महत्त्वाचे फरक कुर्द व अरफ ह्यांमध्येच आहेत. कुर्द हे इराणी लोकांना जातीच्या दृष्टीने अधिक जवळचे त्यांची वस्ती मुख्यत: उत्तर व पूर्व इराकमध्ये आहे कुर्द हे बव्हंशी मीडांचे वंशज समजले जातात. कुर्द व कुर्दांचे सहजातबांधव असे अग्निपूजक येझीदी व ॲसिरियन हे १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ८·५ लक्ष किंवा एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के होते. याशिवाय देशात तुर्कमेन, मँडिअन, आर्मेनियन लोक आहेत. ज्यू मात्र आता बहुतेक नाहीत. मँडिअन हे चांदीची कलाकुसरीची कामे करणारे म्हणून सुविख्यात आहेत तुर्कमेन हे सामान्यत: शासकीय सेवेत शिरतात, तर आर्मेनियन हे व्यवसायात शिरतात किंवा यंत्रज्ञ-तंत्रज्ञ म्हणून कौशल्याची कामे करतात.
एकूण अरब लोकसंख्येच्या ७५ टक्के अरब आणि एकूण कुर्दांच्या ५० ते ६० टक्के कुर्द हे शिया पंथाचे आहेत. २५ टक्के अरब आणि सु. ४० टक्के कुर्द सुनीपंथीय आहेत. अल्पसंख्य असूनही सुनींचा इराकच्या राजकारणावर फार मोठा प्रभाव आहेत. ह्याशिवाय नेस्टोरिअन, जॅकोबाइट, खाल्डिअन, सिरियन कॅथलिक व ग्रेगोरिअन आर्मेनियन असे ख्रिश्चनांचे लहान समूहही देशात आहेत.मुस्लिम सणांव्यतिरिक्त ६ जानेवारी हा सैनदिन, १ मे हा कामगार दिन आणि १४ जुलै व १७ जुलै हे अनुक्रमे १९५८ आणि १९६८ साली घडून आलेल्या क्रांत्यांचे वर्षदिन म्हणून पाळले जातात. देशातील आरोग्यमान खालच्या दर्जाचे आहे. मोठ्या शहरांतील आधुनिक भाग वगळता, सर्वत्र स्वच्छताविषयक स्थिती अतिशय हलाखीची आहे. जंतरोग, खुपरी, आमांश वगैरेंसारख्या रोगांचे, शासनाने त्यांबाबत प्रतिबंधक उपाय योजूनही, अद्यापि प्राबल्य आहे. हिवतापामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वर्षाकाठी पन्नास हजार व बालमृत्युमान दर हजारी ३००–३५० आहे. क्षयाचे प्रमाणही मोठे आहे. कमाल जननमान व किमान मृत्युमान अनुक्रमे दरहजारी ३०–३३ व ८–१२ आहे. बहुतेक खेडेगावांत स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अद्यापीही मिळू शकत नाही. दर पाच हजार लोकांमागे एक वैद्य असे प्रमाण आहे. परिचारिकांबाबतही अशीच स्थिती आहे. १९६७ मध्ये देशात १,९०५ वैद्य, १४७ रुग्णालये व १५,५४२ खाटा होत्या. रेडक्रॉसच्या धर्तीवरील ‘रेड क्रेसेंट सोसायटी’ कार्यशील आहे. एकूण रुग्णालयांपैकी एक तृतीयांश बगदाद व आसमंतात आहेत.ग्रामीण भागात सु. ४५० दवाखाने आहेत. काही ग्रामीण आरोग्यकेंद्रांना प्रतिबंधात्मक रोगनिवारणाकरिता जागतिक आरोग्य संघटना, यूनेस्को इत्यादींचे साहाय्य मिळते.
देशात १९५६ साली पास करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यान्वये कामाची स्थिती, किमान वेतन आणि रोजगारीचे वय ह्यांवर नियंत्रण घालण्यात आले असून विकलांगता, प्रसूती, वार्धक्य, बेकारी, आजारपण व अंत्यसंस्कार ह्यांबद्दलचे लाभ मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. तीसपेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व उद्योगधंद्यांना हा कायदा लागू आहे. विमेदार कामगाराला विम्याची २५ टक्के रक्कम भरावी लागते, तर ७५ टक्के रक्कम शासन व मालक मिळून भरतात. इराकी पेट्रोलियम कंपनीच्या सामाजिक योजनेचे अनुकरण केले जात आहे.
खेडेगावातील बहुतेक घरे मातीची व एका खोलीचीच असतात. उत्तर इराकमधील घरबांधणीत दगडाचा थोडाफार उपयोग केलेला असून या घरांना एकाहून जास्त खोल्या असतात, तथापि त्यांमधून आरोग्यविषयक सुविधा व वीज ह्यांचा अभाव आढळतो. मोठाल्या शहरांमध्ये पश्चिमी देशांप्रमाणे विस्तीर्ण मार्ग व बागा ह्यांनी युक्त असे काही भाग, तर बाजार व मशिदी ह्यांच्याभोवती एकवटलेल्या व वाढलेल्या जुन्या वस्त्या, असे विरोधी दृश्य आढळते. फक्त बगदादमध्येच आधुनिक भूमिगत गटार योजना उपलब्ध आहे. १९४७ च्या कायद्यामध्ये शंभरांहून अधिक सेवक असलेल्या उद्योगधंद्यांनी व जमीनदारांनी त्या सेवकांसाठी घरे बांधावीत अशी तरतूद असूनही, त्या कायद्याची जारीने अंमलबजावणी होत नाही. गृहनिवसनाकरिता शासनाने एक विकासमंडळ स्थापन केले आहे. दुसर्या पंचवार्षिक योजनेत (१९६५–७०) गृहनिवसनकार्याकरिता २१·५ टक्के गुंतवणूक करण्यात आलेली होती.
इराकमध्ये १९२० नंतर शिक्षणाचा बराच प्रसार झाला. त्यापूर्वी देशात शंभरांहून कमी प्राथमिक शाळा होत्या १९६८–६९ मध्ये प्राथमिक शाळा ५,१३७, विद्यार्थी १०,१७,०५० सरकारी व खाजगी माध्यमिक शाळा ८४० असून विद्यार्थी २,८५,७२१ आणि ९,८७८ शिक्षक होते. त्याच साली व्यवसायविद्यालये ४३, विद्यार्थी १०,३८८ अध्यापक प्रशिक्षण विद्यालये ४८, विद्यार्थी १०,८६१ तांत्रिक विद्यालये ४१, विद्यार्थी ८,२८२ महाविद्यालये ४५, विद्यार्थी ४१,१८९ होते. खाजगी शाळा व विद्यापीठे वगळता, शिक्षण संपूर्णपणे मोफत आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. शिक्षणाचे माध्यम अरबी असले, तरी उत्तर इराकमधील प्राथमिक शाळांतून कुर्द भाषाही वापरतात. मुले व मुली ह्यांचे प्रमाण अजूनही ४ : १ असेच आढळते. विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांचे नावनोंदणीचे प्रमाण वाढले आहे १९५८ मध्ये ४,३५४ विद्यार्थी व १,३८७ विद्यार्थिनी, तर १९६४ मध्ये ही संख्या अनुक्रमे १७,७२१ व ६,१५८ झाली. बगदाद विद्यापीठ १९५८ मध्ये आणि बसरा व मोसूल विद्यापीठे १९६७ मध्ये सुरू झाली. देशात एकूण सहा विद्यापीठे (त्यांपैकी तीन बगदादमध्येच) आहेत. त्यांमधील विद्यार्थी व प्राध्यापक ह्यांची संख्या अनुक्रमे ३८,०१० व १,८३२ होती (१९७०). विज्ञान, वैद्यक व अभियांत्रिकी ह्या शाखांचा विस्तार करण्यात आला आहे. १९६४ मध्ये परदेशात शिकणार्या इराकी विद्यार्थ्यांची संख्या २,६१८ होती. त्यांच्याकरिता इराकी पेट्रोलियम कंपनीच्या काही शिष्यवृत्त्याही आहेत. देशामध्ये अमेरिकन स्कूल ऑफ ओरिएंटल रिसर्च, ॲरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, ब्रिटीश स्कूल ऑफ आर्किऑलॉजी (गर्ट्रूड बेल मेमोरिअल), हिस्पॅनो-अरेबिक कल्चरल इन्स्टिट्यूट, इराक अकादमी, कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च वगैरे शैक्षणिक व संशोधनपर संस्था आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट्स ह्या संस्थेत चित्रकला, नाट्य व नृत्य या कलांचे शिक्षण मिळते त्याचबरोबर संस्थेतर्फे कलाप्रदर्शनेही भरविली जातात. इराकमध्ये वीसहून जास्त सार्वजनिक ग्रंथालये असून त्यांतील प्रमुख बगदाद विद्यापीठाचे ग्रंथालय हे आहे. त्याचे स्वरूप राष्ट्रीय ग्रंथालय व आंतरराष्ट्रीय विनिमय केंद्र असे आहे. त्यामध्ये १,३०,००० च्यावर ग्रंथ आहेत.
निरक्षरतेचे प्रमाण फार (सु. ८९ टक्के) असूनही सक्तीच्या प्राथमिक शिक्षणामुळे आणि सैनिकी व इतर शिक्षणसंस्थांच्या प्रयत्नांमुळे निरक्षरतेच्या समस्येवर शासन हळूहळू मात करीत आहे. १५–४० ह्या वयाच्या गटातील पुरुषांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण बरेच खाली– एक-तृतीयांशावर– आले आहे. १९५८ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी १·४४ कोट, १९६२ मध्ये २·९८ कोट व १९६५ मध्ये ४·२८ कोट इराकी दिनार या प्रकारे वाढती तरतूद आढळते. १९६७ च्या अखेरीस देशातील सर्व खाजगी वृत्तपत्रे शासकीय हुकुमान्वये बंद करण्यात आली शासन-नियंत्रित पाच वृत्तपत्रांना मान्यता मिळाली. कायद्यान्वये नवीन वृत्तपत्र सुरू करण्याकरिता मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे. १९६८ मध्ये कुर्दी भाषेतून एक वृत्तपत्र निघू लागले. ही सहाही वृत्तपत्रे बगदादमध्येच निघतात. ह्यांशिवाय बगदादहून बारा साप्ताहिके व चौदा नियतकालिके प्रसिद्ध होतात.
भाषा व साहित्य : अरबी ही शासकीय भाषा असून मोठ्या प्रमाणात बोलली जाते. कुर्दी भाषा व तिची पोटभाषा कुर्द, येझिदी आणि शाबॅक लोक बोलतात. ॲसिरियन लोक सिरियाक पोटभाषा वापरत असले, तरी ती हळूहळू चर्चभाषा (धार्मिक भाषा) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे तसेच मँडिअन ही दुसरी सिरियाक पोटभाषादेखील मँडिअन लोक चर्चभाषा म्हणूनच वापरतात. लूर लोक पर्शियन पोटभाषा उपयोगात आणतात, तर तुर्कमेन हे तुर्की भाषेच्या सर्वाधिक वापरामुळे हळूहळू मागे पडत आहेत. देशात अरबी भाषा बोलणारे ७९ टक्के, कुर्दी १६, फार्सी तीन व तुर्की बोलणारे दोन टक्के आहेत.
मध्ययुगात बगदाद हे भरभराटलेल्या इस्लामी संस्कृतीचे माहेरघरच होते त्याकाळात अनेक तत्त्ववेत्ते व शास्त्रज्ञ होऊन गेले. अल्-गझाली (सु. १०५८–११११) हा प्रसिद्ध अरबी तत्त्ववेत्ता बगदादमधील निझामिया विद्यापीठात बरीच वर्षे प्राध्यापक होता अल्-किंदी (८५०–?) हा दुसरा अरबी तत्त्ववेत्ता इराकीच होता. इराकमधील दोन प्रसिद्ध अर्वाचीन कवी म्हणजे अल्-झहावी (१८६३–१९३६) व अल्-रसाफी (१८७५–१९४५) हे होत नसिक अल्-मलैकाह ह्या कवयित्रीस साहित्याच्या प्रांतात मोठे स्थान आहे धू अन-नून अयूब व अब्द अल्-मलीक नूरी हे कादंबरीकार, तर अन्वर शौल व अब्द अल्-मजीद लुफ्ती हे लघुकथाकार म्हणून विख्यात आहेत.
कला, क्रीडा इत्यादी : जावेद सलीम (१९२०– ) हा देशातील एक अतिशय ख्यातनाम चित्रकार आहे. देशात अकरा संग्रहालये असून त्यांपैकी काही अतिशय महत्त्वाची आहेत. इराक संग्रहालय हे सर्वांत जुने संग्रहालय असून त्याची स्थापना १९२३ साली बगदाद येथे झाली. या संग्रहालयात प्रारंभीच्या अश्मयुगापासून ते सतराव्या शतकापर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीतील प्राचीन अवशेषांचा संग्रह करण्यात आलेला आहे. प्रदर्शनातील वस्तूंची संख्या पन्नास हजारांहूनही अधिक आहे, तर संग्रहालयाच्या कोठीत सु. दोन लक्ष वस्तू आहेत. अब्बासी राजप्रासाद संग्रहालय (बगदाद) १९३५ मध्ये सुरू झाले. ॲकर कूफ संग्रहालयात (१९४२) ॲकर कूफ येथे सापडलेल्या उत्खननातील (१९४२–४५) वस्तू ठेवलेल्या आहेत. बगदादमधील शस्त्रसंभार संग्रहालयात (१९४०) तेराव्या शतकातील बगदादच्या प्रवेशद्वारांचे व भिंतींचे नमुने, तसेच तत्कालीन शस्त्रास्त्रे व आयुधे आढळतात. बॅबिलन संग्रहालयात (१९४९) बॅबिलन येथील पुरातन अवशेषांच्या प्रतिकृती, छायाचित्रे व रंगीत चित्रे आहेत. हे संग्रहालय बॅबिलन येथील अवशेषांच्या जागीच उभारलेले आहे. बगदादमधील एका संग्रहालयात (१९४१) इराकमधील वेषभूषाप्रकार व मानववंशविषयक वैशिष्ट्ये ग्रथित करण्यात आलेली आहेत तसेच येथे फैझल राजाचे स्मारकावशेष मांडलेले असून चित्रवीथीह़ी आहे. मोसूल संग्रहालयात इ.स.पू. नवव्या व आठव्या शतकांत निमरुद येथे सापडलेले पुरातन अवशेष, हात्रा येथील इ.स.पू. दुसरे शतक ते इसवी दुसरे शतक ह्या कालावधीत उत्खनित केलेल्या वस्तू, इ.स.पू. चारपाच सहस्र वर्षांपूर्वी सापडलेली शेतीची अवजारे व मातीची भांडी, तेपे गावरा येथील उत्खननात सापडलेल्या इमारतींची छायाचित्रे, ॲसिरियन साम्राज्याचे नकाशे वगैरे महत्त्वपूर्ण गोष्टी पहावयास मिळतात.
इराकमध्ये सुसंघटित असे खेळप्रकार नाहीत. थोड्या प्रमाणात फुटबॉलचा खेळ खेळला जातो. शिकार आणि मैदानी सामने पाहण्यात इराकी लोक रस घेतात.
इराकमधील सु. वीस शहरांची लोकसंख्या दहा हजारांवर आहे. बगदाद हे राजधानीचे शहर असून त्याची लोकसंख्या २१,८३,७६० होती (१९७०) बसरा (४,२०,१४५), मोसूल (३,४३,१२१), करबला (१,२३,०००), किर्कूक (१०,०००) व शाइइस्लाम ही मोठी व प्रमुख शहरे आहेत. बसरा हे इराकचे प्रमुख बंदर, तर किर्कूक व मोसूल ही इराकची तेलउत्पादनकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत शाइइस्लाम, करबला व नजफ ही पवित्र व धार्मिक शहरे असल्याने अतिशय प्रसिद्ध आहेत. सुमेरियन, बॅबिलोनियन, ॲसिरियन, खाल्डियन, पर्शियन इ. संस्कृतींचे अवशेष देशभर पसरलेले असल्याने पर्यटकांचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. १९६८ मध्ये देशाला ३,९६,२७५ पर्यटकांनी भेट दिली. (चित्रपत्र ४७, ४८).
संदर्भ : 1. Longrigg, S. H.; Stoakes, F. Iraq, London, 1958.
2. Roux, Georges, Ancient Iraq, New York, 1964.
गद्रे, वि. रा.