उत्तरायण : क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) खगोलीय विषुववृत्ताला छेदत असल्यामुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या कधी दक्षिणेस तर कधी उत्तरेस असतो. सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे २२ डिसेंबरला संपते. या तारखेस सूर्य दक्षिण संस्तंभी (विषुववृत्तापासून जास्तीत जास्त दूरच्या स्थानी) असतो. त्यानंतर त्याचे उत्तरेकडे सरकणे सुरू होते. सूर्याच्या या उत्तरेकडे जाण्यास उत्तरायण म्हणतात. हे उत्तरेकडे सरकणे २२ जूनपर्यंत म्हणजे सूर्य उत्तर संस्तंभी येईपर्यत चालू असते. म्हणून सायन मकरसंक्रमणाच्या २२ डिसेंबर या दिवसापासून सायन कर्कसंक्रमणाच्या २२ जून या दिवसापर्यंतचा काल उत्तरायणाचा होय. उत्तरायणामध्ये एखाद्या दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक उत्तरेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो. उत्तर गोलार्धात या काळात दिवस मोठा होत जातो. उत्तरायणालाच उद्गयन, ग्रीष्मायन किंवा देवयान अशीही नावे आहेत. हिंदूंमध्ये शुभ गोष्टी उत्तरायणात कराव्यात असा संकेत रूढ आहे. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून उत्तरायण लागेपर्यंत भीष्म शरपंजरी पडले होते असे म्हणतात. महाभारतकाली श्रवणात (माघ महिन्यात), वेदांग ज्योतिषकाळी धनिष्ठाच्या प्रारंभी, वराहमिहिरांच्या मते शके ४२७ मध्ये उत्तराषाढाच्या दुसऱ्या चरणात (चतुर्थांशात) उत्तरायणास प्रारंभ होई. परंतु सध्या मूळ नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात (सूर्य असताना) म्हणजे पौषात उत्तरायणास सुरुवात होते. कारण संपातबिंदूंना [→ संपातचलन] वर्षाला सु. ५० विकला इतकी विलोम (उलट) गती असल्याने संपातचलन होत असते. हल्ली उत्तरायणाचा काळ पौष ते आषाढ असा असतो.
पहा : अयने दक्षिणायन
ठाकूर, अ. ना.