इस्लाम, काजी नज्‍रूल : (२४ मे १८९९–        ). क्रांतिवादी बंगाली मुसलमान कवी. त्यांचा जन्म चुरुलिया (जि. बरद्वान) या खेडेगावी गरीब कुटुंबात झाला. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत बंगाली, अरबी व फार्सी भाषांचा त्यांनी झटून अभ्यास केला. पुढे विद्याभ्यास सोडून ते कवीवाल्यांच्या (ग्रामीण पद्यकार व नाटक्यांच्या) सहवासात राहू लागले आणि गाणी रचून ती गानोत्सवांत (बैठकींत) गाऊन दाखवू लागले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस (१९१७) कवीवाल्यांना सोडून ते सैन्यात भरती झाले. ह्या नोकरीच्या निमित्ताने त्यांना कराची व मेसोपोटेमिया येथे जावे लागले. तेथे फार्सी कवी हाफिजच्या काव्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यामुळे फार्सी धर्तीच्या कविता त्यांनी बंगालीत लिहिल्या. त्यांपैकी काही कविता वंगीय मुसलमान साहित्य-पत्रिका  व प्रवासी  या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. 

नज्‍रूल १९१९ च्या एप्रिलमध्ये बंगालमध्ये परत येऊन पद्यलेखनाबरोबरच गद्यलेखनही करू लागले. मॉस्लेम भारत या नियतकालिकासाठी त्यांनी बाँधनहारा(१९२७) नावाची कादंबरी लिहिली. तसेच नवयुग  (दैनिक – १९२०), धूमकेतु  (साप्ताहिक – १९२२), लांगल (साप्ताहिक-१९२५) ह्या पत्रांचे संपादन केले. मात्र सरकारी अवकृपेमुळे ती सर्व अल्पायुषी ठरली. विद्रोही, प्रलयोल्लासकेमाल पाशा या तीन कविता तसेच अग्‍निवीणा (१९२२) ह्या कवितासंग्रहामुळे ते एकदम प्रसिद्धीस आले. ‘विद्रोही’ (बंडखोर) ह्या कवितेमुळे बंगाली जनता त्यांना ‘विद्रोही कवी’ याच नावाने ओळखू लागली. अग्‍निवीणा  हा कविता संग्रह प्रचंड प्रमाणात खपला व त्याने बंगाली जनतेच्या अंत:करणात स्वदेशाभिमानाचा व परसत्तेविरुद्धच्या रोषाचा अंगार फुलविला.

नज्‍रूल हे रवींद्रानुसारी बंगाली कविगणात मोडतात. त्यांच्या विद्रोही कवितेचा जन्मच मुळी रवींद्रनाथांच्या बलाका या संग्रहातील कवितांतून स्फूर्ती मिळाल्यामुळे झाला आहे. विषेरबाँशी (विखारी  बांसरी, १९२४) हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रहही बराच गाजला. ह्या दोन संग्रहांमुळेच ते विशेष प्रख्यात झाले. त्यांची काव्यरचना जितकी विपुल तितकीच भावगीतरचनाही विपुल आहे. त्यांनी दोन हजारांहून अधिक भावगीते नवनवीन छंदांत रचली आहेत. त्यांची पंचविसाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांतील काही ब्रिटिश अमदानीत जप्तही झाली होती. कविता, भावगीते, लघुकथा, कादंबरी, नाटक, निबंध असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या काही कवितांचे अनुवाद इतर भारतीय भाषांत झाले असून निवडक कवितांचे रशियन भाषेतही रूपांतर झाले आहे (१९७०). ते लोककवी असून त्यांची कविता समकालीन समाजाच्या स्थिती-गतीचे वर्णन करणारी लोकांच्या सुखदु:खाची, आशाआकांक्षांची समरस होणारी मानवतेचा पुरस्कार करणारी परंतु तितकीच दाहक व निर्भय आहे. 

नज्‍रूल इस्लाम हे केवळ साहित्यिकच नाहीत, तर राजकीय क्षेत्रातील एक धडाडीचे कार्यकर्तेही आहेत. गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी कारावास भोगला. आद्य भारतीय कम्युनिस्ट मुजफ्फर अहमद यांच्या सहकार्याने त्यांनी कामगार व किसान-संघटना निर्माण केली. बंगालमधील ही आद्य संघटना असून ते स्वत: तिचे अध्यक्ष होते. नज्‍रूल हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे थोर उद्‌गाते असून भारताच्या फाळणीचे प्रखर विरोधक आहेत. त्यांनी १९२४ मध्ये एका बंगाली ब्राम्हण मुलीशी, तिला इस्लामची दीक्षा न देता, विवाह केल्यामुळे दोन्ही जमातींचा रोष त्याना सहन करावा लागला. 

एकोणिसशे बेचाळीसमध्ये अचानकपणे त्यांची वाचा गेली व मेंदूला विकलता आली. अनेक उपचार करूनही त्यांचा हा आजार बरा होऊ शकला नाही. 

संदर्भ: Chakravarty, Basudha, Kazi Nazrul Islam, Delhi, 1968.

खानोलकर, गं. दे.