इशरवुड, क्रिस्टोफर : (२६ ऑगस्ट १९०४– ). इंग्रज कादंबरीकार आणि नाटककार. जन्म इंग्लंडमधील चेशर येथे. शिक्षण केंब्रिज येथे. १९३९ मध्ये तो अमेरिकेस गेला आणि १९४६ मध्ये त्याने अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. ऑल द कॉन्स्पिरेटर्स (१९२८) आणि द मेमोरियल (१९३२) या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्या. १९२८ नंतर तो जर्मनीत काही वर्षे होता. त्यावेळी तेथील नाझी राजवटीमुळे उद्भवलेले सामाजिक व राजकीय असंतोष त्याने अनुभवले. द लास्ट ऑफ मिस्टर नॉरिस (१९३५) आणि गुड बाय् टू बर्लिन (१९३९) ह्या त्याच्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत त्याने हे अनुभव चित्रित केले. जुलमी राजवटीत भरडल्या जाणाऱ्या स्वतंत्र प्रज्ञेच्या बुद्धिवंतांचा कोंडमारा त्याने समर्थपणे दाखवला. प्रेटर व्हायोलेट (१९४५) या उपहासगर्भ कादंबरीमध्ये त्याने एका ऑस्ट्रियन चित्रपटनिर्मात्याची कथा सांगितली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीचा ऱ्हास तीत दाखविला आहे. ⇨ ऑडनचा तो मित्र होता. त्याच्या सहकार्याने त्याने द डॉग बिनिथ द स्किन (१९३५), द असेंट ऑफ एफ् ६ (१९३६), ऑन द फ्राँटिअर (१९३८) ही नाटके आणि जर्नी टू अ वॉर (१९३९) हे प्रवासवर्णन लिहिले. अमेरिकेत असतानाच त्याचा ओढा हिंदू तत्त्वज्ञानाकडे वळला आणि तो योगी झाला. भगवद्गीतेसारख्या ग्रंथांची त्याने भाषांतरे केली. द वर्ल्ड इन द ईव्हनिंग (१९५४),डाउन देअर ऑन द व्हिजिट (१९६२), अ सिंगल मॅन (१९६४) आणि अ मिटिंग बाय द रिव्हर (१९६७) ह्या त्याच्या अलीकडच्या कादंबऱ्या, त्यांपैकी डाउन देअर ही कादंबरी आत्मचरित्रात्मक आहे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारा इशरवुड तीत जाणवतो.
जगताप, दिलीप