इस्फाहान : इराणमधील इस्फाहान प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,४४,००० (१९७१). झायेंदेह रुद नदीच्या उत्तर तीरावर हे वसले असून, तेहरानच्या दक्षिणेस ४०३ किमी. आहे. सॅसॅनियन काळापर्यंत इस्फाहानबद्दल फारच थोडी माहिती मिळते. यॅझदेगेर्द (३९९–४२१) याच्या ज्यू राणीने ज्यू लोकांची एक वसाहत शहराच्या यहुदियेह उपनगरात वसविली होती. नदीवरील शाहरीस्तान पूल सॅसॅनियन काळातील मानतात. ६४२ मध्ये अरबांनी शहर ताब्यात घेतले. दहाव्या शतकात बुवैहीद कारकीर्दीत इस्फाहानची अतिशय भरभराट झाली. अकराव्या शतकाच्या मध्यास, सेल्जुक साम्राज्याचा व घराण्याचा संस्थापक तोग्रूलबेगने ही आपल्या राज्याची राजधानी बनविली. त्याचा नातू मलिकशाहच्या कारकीर्दीत (१०७३–९२) इस्फाहान शहराचे क्षेत्र व वैभव अधिकच वाढले. उत्कृष्ट स्थापत्यशिल्पाची मस्जिद-इ-जामी त्या काळचीच. त्यानंतर सु. एक शतकाने उल्जाइतू नावाच्या मंगोल राजाने मस्जिद-इ-जामी मशिदीसाठी एक अप्रतिम प्रार्थनाकेंद्र बांधले. तैमूरने १३८८ मध्ये इस्फाहान जिंकले. याच सुमारास इस्फाहानमधील कारागीरांनी धातुकाम, विणकाम व बांधकाम यांमध्ये प्रशंसनीय कौशल्य मिळविले. अपारदर्शक व विविध रंगांच्या झिलईने सुशोभित केलेल मोझेइक व उच्च दर्जाच्या पॉलिक्रोमच्या फरशांच्या निर्मितीमध्येही त्यांनी श्रेष्ठत्व मिळविले. सेल्जुक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर (१५०१) इस्फाहानची प्रसिद्धी व भरभराट पर्शियाच्या ताब्रीझ व काझ्वीन शहरांच्यामुळे मंदावली १५९८ मध्ये सफाविद घराण्याच्या शाह अब्बास (१५५७–१६२९) याने काझ्वीनऐवजी इस्फाहानला आपली राजधानी नेली. त्याने मोठ्या प्रमाणावर इस्फाहानची नियोजनबद्ध पुनर्रचना केली व त्या काळच्या जगातील सर्वोत्कृष्ट व अप्रतिम शहरांच्या मालिकेत ते शहर नेऊन बसविले. त्याने मैदान-इ-शाह नावाचा एक प्रचंड चौक बांधला. चौकाच्या दक्षिण टोकाकडील, मुलाम्याच्या नक्षीदार फरशांनी मढविलेली प्रसिद्ध मस्जिद-इ-शाह आजही कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून दाखविली जाते. तिच्या पूर्वेकडील मस्जिद-इ-शेख लुत्फुल्लाह तिच्या घुमटावर काढलेल्या गडद निळ्या व पांढऱ्या पानाफुलांकरिता व चित्रांकरिता प्रसिद्ध असून आतील भाग मोझेइक व रंगीत फरशांनी सजवलेला आहे. चौकाच्या पश्चिमेकडील ‘अलीकापू’ इमारतीतून शहा पोलो व ग्लॅडिएटरचे खेळ पाही. राजवाड्यात अनेक मोठी दालने असून त्यातील एक ‘चिहिल सुतुन’ चाळीस स्तंभांचे दालन– नावाने ओळखले जाते. याच दालनात शाह अब्बासचे सिंहासन होते. नव्या राजधानीची व्यापारउद्योगधंद्यांनी भरभराट होण्यासाठी शाह अब्बासने ६,००० आर्मेनियन कुटुंबे आणली ह्या उद्योगी व कुशल आर्मेनियन ख्रिश्चनांस अनेक सवलती दिल्या, विशेषत: पूजास्वातंत्र्य दिले. गावात बेथलहॅम चर्चसारखी अनेक ख्रिस्तमंदिरे बांधण्यात आली. सफाविदांच्या कारकीर्दीतच इंग्रज, फ्रेंच व्यापारी इकडे येऊ लागले. १६६४–७४ मध्ये येथे वास्तव्य केलेल्या फ्रेंच रत्नपारखी शार्दिन ह्याने त्या काळी शहरात १०२ मशिदी, ४८ महाविद्यालये, २७३ स्नानगृहे व १,८०२ हूनही अधिक सराया असल्याचे आपल्या प्रवासवर्णनात लिहिले आहे. अफगाणांनी १७२३ मध्ये हे घेतल्यानंतर शहरास उतरती कळा लागली. रेझाशहा पहेलवीच्या कारकीर्दीत (१९२५–४१) नदीच्या दक्षिणेकडे औद्योगिक वसाहत उभारण्यात आली तथापि शहराच्या एकंदर सौंदर्याला धक्का पोहोचणार नाही अशी दक्षता घेण्यात आली. तेहरान ते शीराझ व इराणचे आखात ह्या दक्षिणोत्तर राजमार्गावर हे वसलेले असून पूर्वेकडे पाकिस्तानला सडकांनी जोडलेले आहे. चांदीकाम, तांबे व पितळ ह्यांच्या वस्तूंवरील कलाकुसरीचे काम, मातीची भांडी, नक्षीदार फरशा यांसाठी हे आजही प्रसिद्ध आहे. यांशिवाय येथे कापड गिरण्या असून येथील गालिचे व कलमकारी वस्तू उत्कृष्ट समजल्या जातात. (चित्रपत्र ७४).
गद्रे, वि. रा.