इफ्नी : मोरोक्कोच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील प्रदेश. क्षेत्रफळ सु. २,४०० चौ. किमी. लोकसंख्या सु. ४०,००० (१९६८). सिदिइफ्नी (लोकसंख्या १६,०००) या इफ्नीच्या सध्याच्या प्रमुख शहराजवळ स्पॅनिशांनी १४७६ मध्ये प्रथम ठाणे उभारून किल्ला बांधला. मूरांनी किल्ला उद्ध्वस्त केल्यामुळे १५२४ मध्ये स्पॅनिशांनी हे ठाणे सोडले. १८६० मध्ये मोरोक्कोच्या सुलतानाने स्पेनचा इफ्नीवरील हक्क मान्य केला, परंतु स्पॅनिशांना ह्या ठाण्यावर आपला पूर्ण अंमल बसविण्यास १९३४ साल उजाडले. अटलांटिक महासागराला लागून ८० किमी. आणि ३० किमी. रुंद असलेला हा निमओसाड प्रदेश स्पेनच्या कानेरी बेटांनजीक असल्याने उपयुक्त होता. परंतु मोरोक्कोच्या स्वातंत्र्यसैनिकांनी १९५७ मध्ये यावर हल्ला केला. १९५८ मध्ये स्पेनने हा आपला प्रांत बनविला. १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ठराव करून स्पेनला ही वसाहत सोडून देण्याची विनंती केली त्यानुसार जून, १९६९ मध्ये स्पेनने इफ्नी मोरोक्कोकडे दिला.
शाह, र. रू.