ऑडन, विस्टन ह्यू : (२१ फेब्रुवारी १९०७–२८ सप्टेंबर १९७३). इंग्रज कवी. जन्म इंग्लंडमधील यॉर्क येथे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर. तेथे त्याने ग्रीक साहित्य, प्राचीन इंग्रजी काव्य आणि आइसलँडिक सागा यांचा साक्षेपी अभ्यास केला. विख्यात जर्मन कादंबरीकार टोमास मान याची कन्या एरिका मान हिच्याशी विवाह (१९३६). स्पेनच्या यादवी युद्धात लढणाऱ्या डाव्यांबद्दलच्या सहानुभूतीने प्रेरित होऊन तो स्पेनला गेला (१९३७). १९३७ मध्ये त्याला काव्याचे किंग जॉर्ज सुवर्णपदक मिळाले. इंग्लंड सोडून (१९३९) तो अमेरिकेस गेला आणि अमेरिकेचा नागरिक झाला (१९४६). अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात सहप्राध्यापक म्हणून त्याने काम केले. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ या संस्थेचा सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९५४). पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठात काव्याचा प्राध्यापक म्हणून नेमणूक (१९५६–१९६१).
वाङ्मयीन कर्तृत्वाच्या आरंभकाळात त्याच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. क्रिस्टोफर इशरवुड, स्टीव्हन स्पेंडर, सेसिल डे ल्यूइस यांसारख्या मार्क्सवादाने भारलेल्या इंग्रज साहित्यिकांचे नेतृत्व ऑडनने केले.पोएम्स (१९३०) आणि द ऑरेटर्स (१९३२) हे त्याचे काव्यसंग्रह याच काळातील होत. द ऑरेटर्समध्ये काव्याबरोबरच गद्यभागही आलेला आहे. भांडवलशाहीविरोधी विचार, मोडकळीस आलेला ब्रिटनमधील मध्यमवर्ग आणि येऊ घातलेली क्रांती यांसंबंधीचे चिंतन येथे आढळते. ऑडनने इशरवुडबरोबर तीन नाटकेही लिहिली. द डॉग बिनिथ द स्किन (१९३५), द असेंट ऑफ एफ् ६ (१९३६) आणि ऑन द फ्राँटिअर (१९३८) ही ती नाटके होत. ब्रेक्ट (१८९८–१९५६) या जर्मन नाटककाराचा परिणाम त्यांवर दिसून येतो. स्पेनच्या यादवी युद्धातील त्याचे अनुभव स्पेन (१९३७) या हृदयंगम कवितेत त्याने व्यक्त केले आहेत. लेटर्स फ्रॉम आइसलँड (१९३७, ल्यूइस् मॅक्नीस या इंग्रज कवीच्या सहकार्याने) आणि जर्नी टू अ वॉर (१९३९, क्रिस्टोफर इशरवुडच्या सहकार्याने) ही त्याची प्रवासवृत्ते होत.
अमेरिकेस आल्यानंतर मार्क्सवादापासून दूर होऊन तो अँग्लोकॅथलिक पंथाकडे आणि ख्रिश्चन अस्तित्ववादाकडे वळला (१९४०). त्यानंतरच्या त्याच्या साहित्यात या परिवर्तनाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. १९३९ नंतरच्या काव्यसंग्रहांत अनदर टाइम (१९४०), न्यू इयर लेटर (१९४१, याचेच अमेरिकेतील नाव द डबल मॅन), फॉर द टाइम बीइंग (१९४४), द एज ऑफ अँग्झायटी ए बरोक एकलॉग (१९४७), कलेक्टेड शॉर्टर पोएम्स १९३०–१९४४ (१९५०), नोन्स (१९५१), द शील्ड ऑफ आकिलीझ (१९५५), होमेज टू क्लिओ (१९६०) आणि अबाउट द हाऊस (१९६५) यांचा समावेश होतो.
काव्यलेखनाबरोबरच त्याने श्रेष्ठ दर्जाचे निबंधलेखनही केले आहे. लेखनाशी निगडित असलेल्या समस्यांविषयी त्याने लिहिले. त्याचप्रमाणे किर्केगॉर, फ्रॉइड, जेम्स जॉइस, फ्रांट्स काफ्का, येट्स, रिल्के यांसारख्या लेखकांवर आणि विचारवंतांवरही लिहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘काव्याचा प्राध्यापक’ या नात्याने त्याने दिलेले पहिले व्याख्यान (१९५६, मेकिंग, नोइंग अँड जजिंग) सखोल वाङ्मय-चिंतनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय ऑक्सफर्ड पोएट्री (१९२६), द ऑक्सफर्ड बुक ऑफ लाइट व्हर्स (१९३८), द फेबर बुक ऑफ ॲफोरिझम्स (१९६२), नाइंटिंथ सेंचुरी मायनर पोएट्स (१९६६) इ. ग्रंथांचे संपादन केले. यूनोचे भूतपूर्व सरचिटणीस डाग हामारशल्ड यांच्या Vagmarken (१९६३) या रोजनिशीच्या मार्किंग्ज या नावाने प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी भाषांतरासाठी (१९६४) शबॅरी यांना त्याने सहकार्य दिले त्याची प्रस्तावनाही लिहिली.
तीन दशकांतून अधिक काळ ऑडनने लेखन केले. समकालीन वैचारिक वातावरण आणि समस्या यांचे आकलन करण्याची तीव्र संवेदनक्षमता त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एक मुख्य वैशिष्ट्य होय. साम्यवादापासून कॅथलिक धर्मनिष्ठेपर्यंत त्याने वैचारिक प्रवास केला. बौद्धिकतेमुळे त्याच्या काव्यात उद्बोधनाला व नैतिक प्रतिपादनाला महत्त्व प्राप्त झाले मात्र त्यामुळेच गूढवादाला किंवा हळुवार प्रेमभावाला त्यात फारसे महत्त्व लाभू शकले नाही. काव्याभिव्यक्ती व काव्यभाषा यांविषयी तो अधिक दक्ष व प्रयोगशील होता. त्याच्या काव्याचे बाह्यांगही त्याच्या वैचारिक परिवर्तनाबरोबर बदलत गेल्याचे दिसून येते. मुख्यत: बुद्धिजीवी रसिकवर्गाला उद्देशूनच त्याने काव्य लिहिले. इंग्रजी काव्याच्या इतिहासात १९३० च्या आसपासचा एक प्रातिनिधिक विचारवंत कवी म्हणून त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. व्हिएन्ना येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Beach, Joseph W. The Making of the Auden Canon, Minnesota, 1957.
2. Everett, Barbara, Auden, Edinburgh, 1964.
3. Hoggart, Richard, Auden : An Introductory Essay, London 1951.
कुलकर्णी, अ. र.
“