ऑगस्ट : ग्रेगरियन कॅलेंडरमधील आठवा महिना. ज्यूलियन कॅलेंडर मार्चमध्ये सुरू होई तेव्हाचा हा सहावा महिना असे म्हणून याचे जुने नाव सेक्स्टिलिस असून त्याचे ३० दिवस असत. परंतु ऑगस्टस सीझर या रोमन बादशहाच्या नावावरून ख्रिस्तपूर्व ८ पासून याला ऑगस्ट हे नाव देण्यात आले व फेब्रुवारीतला एक दिवस कमी करून ऑगस्टचे जुलैइतके म्हणजे ३१ दिवस करण्यात आले. १६ ऑगस्ट या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्यप्रवेश होतो. हिंदू पंचांगातील श्रावणभाद्रपदात हा महिना पडतो. एक ऑगस्ट टिळक पुण्यतिथी व पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन हे ऑगस्टमधील महत्त्वाचे दिवस होत.

ठाकूर, ना.