ऑक्सफर्ड : मध्य इंग्लंडमधील ऑक्सफर्ड परगण्याचे प्रमुख ठिकाण व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या १,०८,५६४ (१९७१). चार्वेल व टेम्स नद्यांमध्ये, हिरव्या गवताच्या आणि वृक्षांच्या रम्य पार्श्वभूमीवर वसलेले हे शहर लंडनच्या वायव्येस ८३ किमी. आहे. आठव्या शतकापासून याचा इतिहास मिळतो. डेन लोकांच्या हल्ल्यांच्या काळात (दहावे शतक) हे प्रमुख ठाणे होते. सु. तेराव्या शतकामध्ये येथे ऑक्सफर्ड विद्यापीठ स्थापले गेले. शैक्षणिक प्रगतीबरोबर गावाची व्यापारी प्रगतीही होत गेली. सध्या येथे मोटारी, पोलादी वस्तू, कागद, छपाई व बांधणी, परिरक्षण, वीज उपकरणे इत्यादींचे कारखाने आहेत.
यार्दी, ह. ब्य.