ऑक्टोबर : ग्रेगरियन कॅलेंडरमधील दहावा महिना. जूलियन कॅलेंडरची सुरुवात मार्चपासून होत असे. मार्चपासून आठवा म्हणून पडलेले ऑक्टोबर हे नाव पुढेही चालू राहिले. याला जर्मेनिकस, अँटोनिनस, हर्क्युलस, फाउस्टिनस, इन्व्हिक्टस, टॅसिटस ही नावे देण्याचे प्रयत्न झाले, पण ते सर्व व्यर्थ ठरले. याला स्लाव लोक यलो मंथ व अँग्लोसॅक्सन लोक विंटरफायलेथ म्हणतात. ऑगस्टचे ३० चे ३१ दिवस केले म्हणून याचेही ३० चे ३१ करण्यात आले. या महिन्यात १७ तारखेस सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो. हिंदू पंचांगाप्रमाणे ऑक्टोबर आश्विन–कार्तिकात येतो. मान्सून प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ऑक्टोबरमध्ये तपमानात झालेली वाढ विशेष जाणवते. बरेच ग्रीक–रोमन सण ऑक्टोबरात येतात.
ठाकूर, अ. ना.