आसाम : भारताच्या ईशान्य कोपऱ्यातले राज्य. क्षेत्रफळ ७८,५२३ चौ.किमी.लोकसंख्या १,४६,२५,१५९ (१९७१).२४९’ उ. ते २८१६’ उ. आणि ८९४२’ ते ९७१२’ पू. याच्या वायव्येस व उत्तरेस भूतान, उत्तरेस व ईशान्येस अरुणाचल प्रदेश व त्यापलीकडे तिबेट, पूर्वेस अरुणाचल प्रदेश, नागालँड व मणिपूर, दक्षिणेस मेघालय व मिझोराम, नैर्ऋत्येस त्रिपुरा आणि पश्चिमेस बांगला देश व पश्चिम बंगाल राज्याचे जलपैगुरी व कुचबिहार जिल्हे असून राजधानी शिलाँग आहे.

भूवर्णन : आसामचे तीन नैसर्गिक विभाग पडतात. ब्रह्मपुत्रा खोरे, सुरमा खोरे व या दोन्हीमधल्या डोंगररांगा. ब्रह्मपुत्रा नदीचे ८० ते १६० किमी. रुंदीचे आणि सु. ८०० किमी. लांबीचे पूर्वपश्चिम खोरे हा आसामचा मुख्य प्रदेश. त्याच्या उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याकडील टेकड्या असून दक्षिणेला मेघालयाच्या गारो, खासी, जैंतिया तसेच पूर्वेला नागालँडच्या पातकई टेकड्यांचे समूह आहेत. खोऱ्याच्या पूर्व टोकाला अनेक नद्या मिळून प्रचंड झालेला ब्रह्मपुत्रेचा प्रवाह प्रवेश करतो. हिमालयापलीकडे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला त्सांगपो म्हणतात. ती शेकडो किमी. पूर्वेकडे वाहून नामचा बारवा या उत्तुंग शिखराला वळसा घालून दक्षिणाभिमुख होते व दिहाँग अथवा सिआंग या नावाने अबोर टेकड्यांतून भारतात उतरते. तेथपासून आसामच्या पश्चिमसीमेवरील गोआलपाडापर्यंत ब्रह्मपुत्रा पश्चिमेकडे वाहात जाते. तिबेटमध्ये २,००० मीटरपेक्षा उंचावरून वाहणारा तिचा प्रवाह आसाममध्ये, समुद्र १,१०० किमी. दूर असतानाच अवघ्या १२० मी. उंचीवर येतो. मैदानात उतरल्यावर संथपणे वळणे घेत, दुभंगत, पुन्हा जुळून येत, प्रसंगी कित्येक किमी. रुंदावत तो वाहात असतो. त्याच्या मध्य विभागात मिकीर टेकड्यांपाशी ब्रह्मपुत्रेचे पात्र जरा अरुंद होते. त्याचप्रमाणे तेझपूर व धुब्रीच्या दरम्यान नदीगाळातून मधूनमधून खडक डोकावतात आणि गोआलपाडा भागातील टेकड्यांच्या रांगांमुळे प्रवाहात अनेक बेटे बनतात. एरवी खोऱ्याची सामान्य सपाटी एकसारखी आहेब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण व विस्कळीत पात्रामुळे दरवर्षी येणाऱ्या महापुरांनी उभय तीरांवर कित्येक किमी. पर्यंत पाणी पसरते. खोऱ्याचा बराच भाग काही काळपर्यंत निरुपयोगी होतो. दुसरा नैसर्गिक विभाग सुरमा किंवा बराक नदीखोऱ्याचा होय. हा २०० किमी. लांब व ९६ किमीरुंद असून हा साधारण सपाट प्रदेश आहे. सुरमा ‘बराक’ या नावाने नाग टेकड्यांच्या सीमेवर उगम पावून मणिपूर प्रदेशसीमेवर तिपैमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते. काचार भागातून वेड्यावाकड्या मार्गाने पश्चिमेला वाहात ती दुभंगून बांगला देशात शिरते. या खोऱ्यातील नदीकाठ गाळाने उंच झाले आहेत. त्यांवरील खेडी पावसाळी पुरानंतर काही दिवस तळ्यांतली बेटे बनतात. या प्रदेशात मधूनमधून खुज्या टेकड्यांच्या रांगांमुळे दलदली प्रदेश निर्माण झाला आहे. काचारच्या पूर्वेस व दक्षिणेस विस्तृत राखीव वनविभाग आहेत. दोन नदीखोऱ्‍यांच्या नैसर्गिक विभागांमधील तिसऱ्या विभागाच्या डोंगररांगा पूर्वपश्चिम पसरल्या आहेत. भूकंपाची आपत्ती आसामवर पुन:पुन्हा ओढवते गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले. १९५० चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि १८९७ चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता. ब्रह्मपुत्रेच्या अगदी काठालगतची जमीन पुराखाली बुडणारी, तिच्या पलीकडची सखल भूमी पाणी धरून ठेवणारी व पुराच्या हद्दीबाहेरची डोंगरातल्या प्रवाहांनी  भिजणारी, या सर्व गाळमातीच्या जमिनी आहेत. सुरमाकाठची जमीन विशेष सुपीक आहे. कारण तिच्या कमी वेगामुळे गाळात वाळूचे प्रमाण कमी असते. नदीगाळाची माती थरांचे खडक झिजून झालेली असून डोंगराळ भागात ती लाल व कंकरमिश्रित असते, तर वनप्रदेशात ती कुजलेल्या पाचोळ्याने बनलेली आहे.कोळसा, चुनखडी, सिलिमॅनाइट व विशेषत: पेट्रोलियम ही राज्यात मिळणारी महत्त्वाची खनिजे होत.

उत्तरेकडून दिबांग, सुबनसिरी, भरेळी, धनसिरी, बोरनदी, मनास, पामती, सरलभंगा व संकोश, पूर्वेकडून लोहित आणि दक्षिणेकडून नोआ, बुरी, दिहिंग, दिसांग, दिखो, झांझी व दक्षिण धनसिरी या मुख्य नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात. दक्षिण धनिसिरीच्या संगमानंतर काही अंतरावर ब्रह्मपुत्रेचा एक फाटा कलांग या नावाने नौगाँग जिल्ह्यातून वाहून गौहातीच्या वर १६ किमी.पुन्हा मुख्य नदीला मिळतो त्याआधी कलांगला कपिली व दिग्‍नू नद्या मिळालेल्या असतात.गौहातीखालीही कलसी व जिंजीराम सारख्या काही नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात.सुरमेला मिळणाऱ्या मुख्य नद्या उत्तरेकडून जिरी व जनिंगा आणि दक्षिणेकडून सोनाई व ढालेश्वरी या आहेत. उत्तर सुबनसिरीब्रह्मपुत्रा संगमाजवळ सिबसागरसमोर माजुली हे १,२६१ चौ. किमी. क्षेत्रफळाचे बेट सर्वांत मोठे असून त्याखेरीज अनेक लहानमोठी बेटे नदीच्या पात्रात आहेत.

आसाम राज्यात उन्हाळ्याचे दिवस कमी असून तपमानही सरासरी २९·४से. च्या वर जात नाही. एप्रिलमे महिन्यात वर्षांचा सु. पंचमांश (२५ ते ५० सेंमी.) पाऊस पडतो. दक्षिणेकडील वळचणीस (गौहातीला तपमान १६·१से.) उन्हाळी तपमान २९से. व सरासरी पाऊस १६८ सेंमी.पडतो. राज्याच्या उत्तर भागात सरासरी २०० सेंमी पाऊस पडतो व अगदी पूर्वभाग अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. उंच टेकड्यांवर हिवाळ्यात कधीकधी हिमपात होतो. पश्चिम भागात उन्हाळ्याच्या अखेरीस वादळे होतात.

सदाहरित वर्षावनांपासून समशीतोष्ण कटिबंधीय झुडुपापर्यंत वनस्पतींच्या सर्व जाती येथे आहेत. त्यांत साल, साग, देवदार, ओक, होलौंग, बंसम, अमारी, गमारी, अझार, सिसू, सिमुल, वेत, कळक, बोरू हे प्रकार प्रामुख्याने दिसतात. हिमालयाच्या पायथाटेकड्यात हत्ती, गेंडा, रानरेडा, अनेक जातीचे हरिण, काळा चित्ता, मलायी अस्वल, सांभर, कस्तुरीमृग, रानडुक्कर व शुभ्रमुख कपी (गिबन) आहेत. शासनाने कझिरंगा व मनास ही दोन विस्तीर्ण अभयारण्ये वन्यपशूंसाठी राखून ठेवली आहेत.

इतिहास : तेराव्या शतकात ब्रह्मदेशातून येऊन ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात स्थायिक झालेल्या व पुढे राज्य करू लागलेल्या शानवंशीयांना ⇨ आहोम  हे नाव स्थानिक लोकांनी दिले व त्यावरून या राज्याचे नाव पडले असावे (आहोम &gtआकाम &gtआसाम). असम या संस्कृत शब्दाशी आहोम भाषेतील अचाम (अपराजित) किंवा बोडो भाषेतील हाकोण (उंचसखल) या शब्दांचाही संबंध ह्याच्या नावाशी जोडला जातो. पुराणकाळी या प्रदेशाची प्रागज्योतिष व कामरूप ही नावे आढळतात. दिब्रुगड, सदिया, विश्वनाथपूर (दरंग जिल्हा) येथे अश्मयुगातील दगडी हत्यारे मिळाली आहेत. धनसिरी नदीच्या खोऱ्यातील कासोमारी आणि सामुबुरी येथील अवशेषांत आर्यांचा प्रभाव दिसतो, परंतु आर्यसंस्कृतीचा प्रसार या भागात बऱ्याच उशिरा झाला असावा. कालिकापुराण व योगिनीतंत्र  या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतात, ते दानव व असुर होते असे उल्लेख आहेत. मार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्‌ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरक, नरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारतभागवतात येतात. शांखायन गृह्यसंग्रहरामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहे. नरकभगदत्त, माधव, जितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केलेअसे वंशावळींवरून दिसतेपरंतु चवथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहे. या शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापले, असा अंदाज आहे. या वंशातील महेंद्रवर्मन (४५०–८०) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले. सहाव्या शतकाच्या मध्यात भूतिवर्मनने राज्यविस्तार केला. या वंशातील भास्करवर्मन हर्षाचा समकालीन होता. त्याचे व कामरूप राज्याचे वर्णन यूआन च्वांग या चिनी यात्रिकाने केले आहे. हर्षाशी संधी करून भास्करवर्मनने बंगाल्यातील कर्णसुवर्ण राज्य बळकावले, पण तो हर्षाचा मांडलिक होता की नाही, हे अनिश्चित आहे. भास्करवर्मन हा आसामचा थोर, कर्तृत्ववान राजा दिसतो. पुढील तीन शतके शालस्तंभवंशीयांनी कामरूपावर राज्य केले.त्यांतील हर्षदेवाने आठव्या शतकात नेपाळशी विवाहसंबंध जोडले होते. कनोजच्या यशोवर्म्याने त्याचा पराभव केला. या वंशातील प्रलंभ व हरिराज पराक्रमी असले, तरी कामरूप राज्य लहानच राहिले. दहाव्या शतकाच्या अखेरीस पालवंशीयांचे राज्य सुरू झाले व अकराव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले. ते शैवपंथी होते. त्यांतील रत्‍नपाल हा विशेष पराक्रमी दिसतो. जयपाल हा शेवटचा राजा होय. या काळात बंगालच्या पालांनी कामरूप जिंकून घ्यावा किंवा त्यावर अधिसत्ता गाजवावी, असा प्रकार अधूनमधून झालेला दिसतो. अकराव्या शतकाच्या मध्यास सहाव्या विक्रमादित्य चालुक्याने कामरूप जिंकला होता, असे बिल्हण कवी म्हणतो, पण ते अतिशयोक्त वाटते. बाराव्या शतकाच्या मध्यास पाल राजांचा मांडलिक तिंग्यदेव याचे बंड मोडण्यासाठी गेलेला सेनापती वैधदेव स्वतःच त्या राज्याचा स्वतंत्र अधिपती झाला. यानंतर बंगालच्या सेन राजांनी कामरूपावर आधिपत्य गाजविले. तेराव्या शतकात लखनावतीच्या मुसलमान राजांनी केलेल्या स्वाऱ्या अयशस्वी ठरल्या. वेगवेगळ्या राजवंशांच्या काळात या प्रदेशातील राज्यांचे विस्तार वेळोवेळी बदलत राहिले. पुष्कळदा अनेक लहानलहान स्वतंत्र राज्ये शेजारी शेजारी असत. विशेषत: सुरमा खोऱ्यातले राज्य कामरूपच्या आधीन नसे, त्याचा इतिहास अस्पष्ट आहे. ताम्रपटांवरून तेराव्या शतकात गोविंददेव आणि ईशान्यदेव यांनी येथे राज्य केले असे दिसते. पश्चिम आसामात कामता हे प्राचीन राज्य होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीचा येथील राजा दुर्लभनारायण विद्वानांना आश्रय देणारा होता. त्याने वैष्णवपंथाला उत्तेजन दिले. पंधराव्या शतकात या भागात खेणवंशाचा उदय झाला. त्यातला तिसरा राजा नीलांबर याचा पाडाव १४९८ मध्ये बंगालच्या हुसैनशहाने केला. काही वर्षांनंतर पश्चिम आसामातील किरकोळ राजांना जिंकून विश्वसिंगाने कोच राज्य स्थापले. त्यानेच कामाख्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, आहोमांशी सख्य राखून मुसलमानांना दूर ठेवले. त्याचा मुलगा नरनारायण याने सर्व दिशांना राज्यविस्तार केला (१५३३–८४). या काळात कलावाङ्‌मय फुलले. त्याने काही काळ आहोमांवरही अधिसत्ता गाजवली. त्याच्या वैभवाचे वर्णन अकबरनाम्यात आहे. पण त्याचा भाऊ व सेनापती शुक्लध्वज याचा पराभव पूर्व बंगालच्या इसाखानाने केला (१४९८). शुक्लध्वजाचा मुलगा रघू याने १५८१ मध्ये बंड केले तेव्हा त्याला संकोश नदीच्या पलीकडे कुचबिहार राज्य तोडून देण्यात आले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस अंत:कलहामुळे कोच राज्याचा काही भाग मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला व बाकीचा आहोमांच्या अधीन राहिला.

 


तेराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोम जमातीचा नायक सुकाफा पतकाई पर्वतरांगा ओलांडून सध्याच्या लखिमपूरसिबसागर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात आलातेथील स्थानिक वन्य जमातींना जिंकून आहोमांनी राज्यविस्ताराला सुरुवात केली.चौदाव्या शतकाच्या मध्यास पूर्व बंगालमधील मुसमानांच्या आक्रमणामुळे दक्षिणेचे कामता राज्य अगोदरच खिळखिळे झाले होते त्यावर त्यांनी जय मिळविला. पूर्वेस सदिया भोवताली चुतियांचे राज्य होते. त्यांच्याशी संघर्ष चालू ठेवून अखेर आहोम राजा सुहुंगमुंग याने त्यातला बराच भाग जिंकला (१५३८) व चुतियांना तेझपूर नजीक हद्दपार केले. दरम्यान नागांच्या विरूद्धही मोहिमा चालूच होत्या. नौगोंगच्या बाजूस काचारांचे प्रबळ जुने राज्य होते. त्यांची राजधानी दिमापूर. सोळाव्या शतकात त्यांच्याशी लढून आहोमांनी त्यांना मैबांग (उत्तर काचार) पर्यंत मागे रेटले, दिमापूर लुटून त्यांचा पूर्वेकडील प्रदेश आपल्या राज्यास जोडला. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून याप्रमाणे आहोमांचे वर्चस्व प्रस्थापित होत असता, त्यांनी पूर्व बंगालमधील मुसलमानी सत्तेच्या आसामवरील आक्रमणालाही यशस्वी रीत्या तोंड दिले. १५२९ च्या स्वारीत तर खुद्द मुस्लिम सेनापती तुर्बक पडला. त्यांचे कित्येक अनुयायी आहोम राज्यात स्थायिक झाले. आहोमांनी याच सुमारास तोफाबंदुकांचा वापर सुरू केला. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस मोगलांचे काचारवरील आक्रमण फसले, पण कुचबिहार कामरूपावर त्यांनी वर्चस्व बसविल्यामुळे पुढील शतकभर आहोमांना मोगलांशी संघर्ष करावा लागला. १६३७ मध्ये कोच राजकुलातल्या भाऊबंदकीत बलिनारायण याला आहोम राजा प्रतापसिंगाने मोगलांविरुद्ध आश्रय दिल्यामुळे संघर्षाला तीव्र स्वरूप आले. युद्धोत्तर मोगलआहोम राज्यांच्या दरम्यान बडनदी ही सीमा ठरली. १६५८ मध्ये कुचबिहारच्या प्राणनारायणाने मोगलांविरुद्ध केलेल्या उठावाचा फायदा घेऊन आहोम राजा जयध्वजसिंगाने पुन्हा ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याचा ताबा मिळविला. त्याला शासन करायला आलेल्या मीर जुम्ल्याने आहोमांना त्यांची राजधानी गोरगावपर्यंत रेटले खरे, पण त्याचा विजय तात्पुरता होता (१६६३). गेलेला मुलूख आहोमांनी दोनच वर्षांत परत मिळविला व कामरूप व्यापून मोगल ठाणे रांगामातीपर्यंत मागे ढकलले. १६८१ मध्ये राज्यावर आलेल्या गदाधरसिंगाने मोगलांना या भागातून कायमचे हाकून लावले. त्याचा मुलगा रुद्रसिंग (१६९६–१७१४)याने आणखी राज्यविस्तार केला. त्याने काचारी लोकांकडून नौगोंगचा दक्षिण भाग व उत्तरेतील मैबांग ठाणे घेतल्यामुळे काचारांनी आपली राजधानी खाग्नपूरला हलविली खासीजैंतिया जमातींचा पराभव केला, पण त्यांचा प्रदेश घेतला नाही. रुद्रसिंगाने मांडलिक राजांचा संघ निर्मिण्याचाही यत्‍न केला.

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात आहोमांनी हिंदुधर्माचा पूर्णतया स्वीकार केला. त्यांनी विद्याकलांना उत्तेजन दिले. परंतु त्यांच्यात धार्मिक झगडे सुरू झाले शाक्त विरुद्ध वैष्णव असे वाद विकोपाला गेले. राजपुरस्कृत शाक्तपंथीयांकडून होणारा छळ असह्य झाल्यावर मोआमारिया या नववैष्णवपंथीयांनी १७६९ मध्ये बंड करून राजा लक्ष्मीसिंगासच कैद केले. ते बंड मोडून काढण्यात आले. परंतु १७८६ मध्ये मोआमारियांनी राजसेनेचा पराभव केला, तेव्हा राजा गौरीनाथसिंग गौहातीला पळून आला. प्रधान पूर्णानंद बडा गोहाइन याने बंडखोरांशी कसाबसा लढा चालू ठेवला पण देशात अराजक माजले. कोच राजा कृष्णनारायण याने तर दरंग ठाण्यावर छापा घालून उत्तर कामरूप व्यापला व गौहातीलाही धोका उत्पन्न केला. यावेळी गौरीनाथसिंगाने ब्रिटिशांचे साहाय्य मागितले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीचा आसामशी व्यापार चालू करण्याचा प्रयत्‍न होता. आता त्यांना आसामच्या राजकारणातही चंचुप्रवेश मिळाला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने १७९२ मध्ये कॅप्टन वेल्शच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पाठविली. वेल्शने आसामात शांतता प्रस्थापित केल्यावर नंतरचा गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर याने त्याला परत बोलाविले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कंपनीने तटस्थपणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे १८१० मध्ये राज्यावर आलेल्या चंद्रकांताची गौहातीच्या राज्यपालावर जेव्हा इतराजी झाली, तेव्हा त्याने ब्रह्मदेशाचे साहाय्य मिळविले. त्यांच्या कलहात ब्रह्मदेशाचे फावले आणि त्यांनी आसामवर आपली सत्ता गाजवायला सुरुवात केली. अंत:कलहामुळे आहोम सत्तेचा असा ऱ्हास होत असता, खासपूरच्या काचारांनी व मणिपूरच्या राजांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्‍न केला. ब्रिटिशांची मदत १८१७ पासून मागणाऱ्या आहोमांना अखेर १८२४ मध्ये ती मिळाली. पुढील दोन वर्षे ब्रह्मदेशाशी युद्ध करून १८२६ च्या तहानुसार कंपनीने आसामवर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. मणिपूरविरुद्ध काचारला मदत करून तोही भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला. सुरुवातीला काचार तुलाराम सेनापतीकडे, लखिमपूरचा काही भाग व सिबसागर आहोम राजा पुरंदरसिंगाकडे, दक्षिण लखिमपूर बोड सेनापतीकडे आणि सदिया सदियाखोबा गोहाइन या नायकाकडे अशी व्यवस्था होती. पण १८४२ पर्यंत हा सर्व प्रदेश कंपनीने खालसा केला. चहाचे मळे व तेलाच्या खाणी यांमुळे या प्रदेशाचे महत्त्व वाढले. १८७४ पर्यंत त्याचा कारभार कलकत्त्याहून चालत असे. या वर्षी तो मुख्य आयुक्ताचा प्रांत झाला. त्याच्या अधिकारात सध्याचे नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, लुशाई टेकड्या इ. प्रदेशही असले, तरी गिरिप्रदेशातील जमातींना बरीच स्वायत्तता असे. १९०५ ते १९११ या काळात आसाम हा फाळणी झालेल्या बंगालच्या पूर्व भागाला जोडलेला होता व त्याच्यावर एक नायब राज्यपाल असे. वंगभंग रद्द झाल्यावर पुन्हा आसाम मुख्य आयुक्ताचा प्रदेश व त्यानंतर १९१९ च्या कायद्याने राज्यपालाचा प्रांत झाला. दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजा सरहद्दीवर आल्यामुळे आसामच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. त्याआधी आसामातील ब्रिटिश सत्तेला प्रतिकार करणाऱ्यांपैकी गमधर गोहाइन (१८३८)याचा उल्लेख केला पाहिजे. १८५७ मध्ये कंपनीचा पूर्वीचा नोकर मणिराम बरुआ याने शेवटचा आहोम युवराज कंदर्पेश्वरसिंगचा पक्ष घेऊन आसामातील शिपायांच्या पलटणीनांही चेतविले पण युवराज स्थानबद्ध झाला व मणिराम, पिटाली  बरुआ, मल्लिका इ. त्याच्या सहकाऱ्यांना फाशी देण्यात आले. विसाव्या शतकात स्वातंत्र्यासाठी झालेल्या सर्व काँग्रेसप्रणीत आंदोलनात आसामच्या जनतेनेही भाग घेतला. १९४७ च्या फाळणीत आसामचा सिल्हेट जिल्हा पूर्व पाकिस्तानात व देवनागरी प्रदेश भूतानात गेला. १९५० च्या संविधानानुसार आसाम ‘अ’   वर्गीय राज्य झाले, तथापि पूर्वीच्या आसाम प्रांतापैकी त्रिपुरा व नेफा हे भाग केंद्रशासित झाले. नागालँड (डिसेंबर १९६३)हे वेगळे आणि मेघालय (एप्रिल १९७०)हे स्वायत्त राज्य निर्माण झाले व त्यानंतर जानेवारी १९७२ मध्ये मेघालय वेगळे राज्य आणि अरुणाचल प्रदेश व मिझोराम केंद्रशासित प्रदेश होऊन आसामचा आणखी संकोच झाला.

राजकीय स्थिती : भारतीय संघराज्याचे आसाम हे एक घटक राज्य असून राष्ट्रपतीने नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीने मंत्रिमंडळ कारभार पाहते. मंत्रिमंडळ एकसदनी विधानसभेला जबाबदार असून विधानसभेचे ११४ सदस्य आहेत. राज्यातून लोकसभेवर १४ व राज्यसभेवर ७ सदस्य निर्वाचित होतात. विधानसभेत नव काँग्रेसपक्षाचे बहुमत आहे (१९७३). प्रमुख विरोधी पक्ष ऑल पार्टी हिल्स लीडर्स कॉन्फरन्स हा आहे. नीओनॅशनल फ्रंट या पक्षाला संपूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. गिरीप्रदेशातील मिकिर, मिओ इ. जमाती अधूनमधून बराच पुंडावा करतात. राज्याची विभागणी काचार, दरंग, गोआलपाडा, कामरूप, लखिमपूर, नौगोंग, मिकिर टेकड्या, उत्तर काचार टेकड्या व सिबसागर या नऊ जिल्ह्यांत केलेली आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, वन, उद्योगधंदे, सहकार, महसूल, समाजकल्याण, मागासवर्गाचे पुनर्वसन, पुरवठा, उत्पादनकर, विद्युत् शक्ती, रस्ते व बांधकाम, कामगार पंचायत व गटविकास योजना इ. खात्यांचा कारभार मंत्री, कर्मचारी यंत्रणेच्या साहाय्याने पाहतात. राज्यात २,५७७ ग्रामपंचायती, १२० आंचलिक पंचायती, १६ महकमा (जिल्हा) परिषदा, १६५ विकासगट व ४९ वन्यजमातगट असून विकासयोजनांखाली सु. ,२०,००० चौ. किमी. क्षेत्र  व ८२·३ लक्ष लोकसंख्या आहे. जिल्हा व पंचायत समित्यांकडे ग्रामीण आरोग्य, प्राथमिक शिक्षण, कच्चे रस्ते, स्थानिक पाणीपुरवठा, लहान, उद्योगधंदे, शेतीसुधार, पशुसंवर्धन व आनुषंगिक विषय, सहकार, सामूहिक विकास ही कामे सोपविण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेश व मिझोराम हे केंद्रशासित प्रदेश आणि आसाम, नागालँड व मेघालय या तीन राज्यांचा राज्यपाल सध्या एकच असून या भागातील राज्यांच्या समतोल विकासासाठी स्थापलेल्या ईशान्य परिषदेचा तो अध्यक्ष असतो. सध्याची राजधानी शिलाँग असून उच्च न्यायासन गौहातीला आहे.

कुलकर्णी, ना.

 


आर्थिक स्थिती: आसाममधील जमिनदारी रद्द करून शासनाने बहुतेक भूमी रयतवारी पद्धतीने वाटून दिली आहे. राज्यातल्या श्रमिकांपैकी ७०%हून अधिक लोक कृषिउद्योगात आहेत. लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ७०% क्षेत्र अन्नधान्याखाली असून मुख्य पीक भाताचे आहे. त्याशिवाय मोहरी, बटाटा, डाळी, मका ही पिके होतात. नगदी पिके चहा, ताग, कापूस, तेलबिया, ऊस व मुसुंबी वगैरे फळे ही होत. पूर्वी ६७४ मळ्यांत ४ लाखांवर मजूर होते. सध्या ७५० चहामळे आहेत. वार्षिक उत्पादनाचा ८१%पेक्षा अधिक भाग निर्यात होतो. १९७०-७१ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन २०·७ लक्ष टन, तेलबियांचे ६२,२०० टन, ऊस (गूळ) १·६३ लक्ष टन व तागाचे उत्पादन ९·८७ लक्ष गाठी झाले होते. १९६६ च्या गणतीप्रमाणे त्यावेळच्या आसामात ६१,०४,००० गुरे, ,५१,००० म्हशी, १४,६१,००० शेळ्या व ३,५१,००० इतर म्हणजे मेंढरे, तट्टे, डुकरे वगैरे होती. १९६९७० मध्ये १,६२,००० टन दूध व ८,००० टन मांस उत्पादन झाले. याशिवाय कोंबड्या सु. ९८,८०,००० होत्या. १९७० मध्ये राबा, कटला, मिगल, माली इ. जातीचे मासे नद्यांतून काढण्यात आले. राज्यात २१·७%जमीन जंगलाने व्याप्त असून, त्यात सदाहरित, मिश्र व शुष्क पानझडी, नदीप्रदेशीय, गवताळ मुलुखातील, दलदलीतील समशीतोष्ण प्रदेशीय, बांबू जातीची इ. विविध वर्गांची झाडे, शाल, देवदार, साग, हालाक, होलौंग, बन्सम, अमारी, गमारी, अझार, सिसू, सिमुल, वेत, कळक, बोरू आणि अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यापासून कापीव इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, तेल, लाख, वेत, औषधी वनस्पती, छपरी गवत, ऊद, अत्तरे, काष्ठतंतू आणि सालबुरशी हे वन्यपदार्थ उपलब्ध होतात. भारतातील सर्वांत मोठे राखीव वेणुवन आसामात होते व देशाच्या एकूण बांबू उत्पादनापैकी ४२%या राज्यात होत असे. कोळसा, चुनखडी, पेट्रोलियम, सिलिमॅनाइट, भट्टीमाती, डोलोमाइट, कॉरंडम व नैसर्गिक वायू या खनिजांचे उत्पादन होते. १९६७ मध्ये सु. ४·८७ लाख टन कोळसा, २२,००० टन चुनखडी २,५५४ टन सिलिमॅनाइट उत्पादन झाले. दिग्बोई व गौहातीजवळील नूनमती येथे तेलशुद्धीकरणाचे कारखाने आहेत. नहरकटिआ व मोरान भोवती अंदाजे ४·३ कोटी टन तेल व ५७ कोटी घमी. ज्वलनवायू यांचे साठे आहेत. बिहारमधील बराउनीपर्यंत १,१५२ किमी. लांबीचे नळ टाकले असून ते आसाम, बंगाल व बिहार या राज्यांतील ७९ नद्या ओलांडून जातात. त्यांचा खर्च ४४ कोटी रुपये झाला. एकूण ८४,००० टन वजनाच्या या नळांपैकी काही राउरकेला लोखंड कारखान्यात तयार झाले. उत्तम चुनखडी मिकीर व काचार टेकड्यांवर मिळते. मिकीर व उत्तर काचारमध्ये पहिल्या प्रतीचा कोळसाही सापडतो. इतर खनिजांपैकी कॉरंडम, भट्टयांसाठी व विटांसाठी चिकणमाती, शाडू इ. काही प्रमाणात उपलब्ध आहेत. धुब्री येथे आगपेट्याचा एक मोठा कारखाना आहे. रेशीम धाग्याचा सरकारी कारखाना जागीरोड येथे चालू झाला आहे. नामरूप येथे सरकारी खत कारखाना आहे. त्याशिवाय एकूण ५०,००० चात्या असलेल्या दोन सूतगिरण्या, पोलाद काम व हलके कारखानदारी धंदे, साखर, ताग, रेशीम, कागद, लगदा, लाकुडचुरा, पातळ व जाड लाकडी तक्ते तयार करणे, इमारती लाकूड मुरविणे असे उद्योग सुरू करण्यास व वाढविण्यास सरकारी परवाने देण्यात आले आहेत. लहान उद्योगधंद्यांत हातमाग, रेशीम, नावा बांधणे पितळी व काशाची भांडी बनविणे मातीची भांडी, विटा व चुना भाजणे वेत व बांबूकाम, फर्निचर, भेंडाच्या सोला टोप्या, लोहारकाम, सुतारकाम तसेच तेलघाण्याच्या, भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या यांचा समावेश होतो. तेलशुद्धीकरण कारखान्यातील शिलकी इंधनावर नारंगी येथे १२·५ मेवॉ. क्षमतेचे एक औष्णिक वीजनिर्मितीकेंद्र गौहातीच्या आसपासच्या संरक्षणविषयक व औद्योगिक गरजा भागविण्यासाठी चालू झाले आहे. अवरआसाम भागासाठी नहरकटिआ तेलक्षेत्रातील ज्वलन वायूवर ६९,००० किवॉ. क्षमतेचे एक केंद्र, उम्त्रू येथे कामरूपखासीजैंतिया टेकड्यांसाठी जलविद्युत निर्मितेचे एक केंद्र आणि उमिअनउम्त्रू ग्रिड योजना यांमुळे परिणामी ८.२ मेवॉ. शक्ती पाच जिल्ह्यांना पुरविली जाईल. १९५१ मध्ये फक्त २० गावांना वीज मिळाली होती. १९७१ मध्ये ती १,००० पेक्षा अधिक गावांना मिळू लागली.

राज्यातील एकूण जलमार्ग सु. १०,००० किमी. असून त्यांपैकी ५०० किमी. मार्गावर मोठ्या आगबोटी चालतात. बहुतेक व्यापारी वाहतूक नदीमार्गाने चालते. निआमती, तेझपूर, गौहाती, गोआलपाडा, धुब्री, करीमगंज, सिल्चर आणि इतर ठाण्यांच्या दरम्यान जलमार्गाने दळणवळण चालते. १९५८ पासून राज्यातील ३,३३४ किमी. लोहमार्ग ईशान्यसीमा रेल्वे या नावाखाली एकत्रित करून गौहातीजवळ पांडू (मालीगाव) येथे त्याचे केंद्र ठेवण्यात आले आहे. १९६८ मध्ये मोटारवाहतुकीस योग्य रस्ते २०,६७८ किमी. पैकी २,९३४ किमी. राष्ट्रीय हमरस्ते होते. मैदानी प्रदेशात ८०% रस्ते असून बाकीचे डोंगरी मुलुखात आहेत. मोटारवाहतुकीचे १९६५ मध्ये राष्ट्रीयीकरण झाले असून एकूण वाहनांपैकी ४४४ उतारू गाड्या, २४ आरामगाड्या, १५५ मालट्रक व २६ इतर वाहने होती. भारताच्या बाकीच्या भागाशी केवळ एका चिंचोळ्या पट्टीने जोडलेल्या आसामला लगतच्या राज्यांशी संपर्क व अंतर्गत स्वयंपूर्णता ठेवण्यासाठी रस्ते अत्यंत आवश्यक असल्याने त्या दृष्टीने रस्तेबांधणी कामाला अग्रक्रम आहे. हे राज्य बाकीच्या राज्यांपासून एकाकी पडल्याने विमानवाहतुकीला आसामात फार महत्त्व आहे. गौहातीहून तेझपूर, जोरहाट, दिब्रुगड, लखीमपूर, सिल्चर, धुब्री इ. ठाण्यांकडे रोजची नियमित उड्डाणे असतात. नेफामधील पासीघाट व आलोंगही आता वायुमार्गाने जोडली आहेत.

लोक व समाजजीवन :१९७१ च्या शिरगणतीत आसामच्या १,४६,२५,१५९ लोकसंख्येपैकी स्त्रियांचे प्रमाण दर १,००० पुरुषांस ८९६ इतके होते. लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण चौ. किमी. ला १८६ होते. जननप्रमाण हजारी ३४ व मरण प्रमाण हजारी ३६ होते (१९६१). ग्रामीण वस्ती १९७१ मध्ये ९१·६% होती. एक लाखावर लोक असलेल्या एकाच गौहाती शहराची नागरी वस्ती १,२२,९८१ होती. १९६१ मध्ये राज्यात अनुसूचित जमातींचे २०,६४,८१६ व अनुसूचित जातींचे ७,३२,७५६ लोक होते. आसामच्या लोकात अनेक वंशीयांचे मिश्रण आहे. मिकीर, नागा, पाची, लखेर, कुकी, हमार व चकमा या डोंगरी जमाती आणि बर्मान, बोरोकाचारी, लालुंग, राधा, मिरी, देवरी, व मेच या मैदानी जमाती आहेत. काचारी व हनाँग या जमाती डोंगरी व मैदानीही आहेत. चहाच्या मळ्यांतून काम करणारे मजूर बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आलेले आहेतबांगला देशातून आलेले मुस्लिम शेतकरी काचार व गोआलपाडा जिल्ह्यांत वसले आहेत. इतर निर्वासित नौगाँग, कामरुप व गोआलपाडा जिल्ह्यांतून पसरले आहेत. राज्यातल्या ७३% हिंदूधर्मीयांत शैव व श्रीशंकरदेवमाधवदेवप्रणीत महापुरुषीय नववैष्णव पंथाचे अनुयायी आहेत. २४·५% लोक इस्लाम धर्माचे, २·६% ख्रिश्चन आणि ११,९२० शीख, २२,५६५ बौद्ध, १२,९१४ जैन आहेत. मैदानातील ग्रामीण प्रजा कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असलेल्या घरातून राहते. नागरी वस्तीतही पक्की घरे कमी. लोकांचा पोषाख, सामान्यतः पुरुषांचा धोतर व पांघरण्याची शाल आणि स्त्रियांचा साडी व शाल असा असतो. कृषीखालोखाल हातमाग हा पूरक उद्योग मैदानी व डोंगरी प्रदेशातही महत्त्वाचा आहे. हे काम बहुधा स्त्रिया करतात. रेशमाची पैदास, कताई व सुती-रेशमी कापड विणकाम मुख्यत: कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी होते तथापि उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने सहकारी संस्थांमार्फत व यंत्रशक्ती उपलब्ध करून देऊन उत्तेजन दिले आहे. कुटीरोद्योगात बांबू, वेत व गवताच्या टोपल्या, इतर कलापूर्ण वस्तू, विशेषत: झापी या शेतकामाच्या वेळी वापरण्याच्या मोठ्या गोल गवती टोप्या या वस्तू विशेष उल्लेखनीय आहेत. आसामी लोकांचा सर्वसाधारण आहार, भात, डाळी, भाज्या व मासे आणि मधूनमधून मांस असा असतो.

 


१९७१ च्या जनगणनेप्रमाणे ६८,०३,४६० लोकांची भाषा आसामी व १,५४,८९३ लोकांची मिकीर होती. आसाम खोऱ्याची आसामी किंवा असमिया ही इंडोआर्यन वंशाची भाषा असून तिचे व्याकरण बंगालीसारखे आहे. शब्दभांडार मुख्यत: तद्‌भव शब्दांचे त्यावर आणि रचनेवरही तिबेटी-ब्रह्मी बोलींच्या सान्निध्याचा परिणाम दिसून येतो. असमिया साहित्याची परंपरा बरीच जुनी असून त्यात गौरवाचे स्थान ऐतिहासिक लिखाणाला आहे. सची किंवा अगरूवृक्षाच्या अंतर्सालीवर लिहिलेल्या बुरंजी या आहोम राजांच्या बखरी तेराव्या शतकापासूनच्या असून पुष्कळशा अजून सांभाळून ठेवलेल्या आहेत. सोळाव्या शतकापासून गद्यलेखन सुरू झाले. भट्टकृत कथागीता व कथाभागवत (१५९३), शंकरदेव-माधवदेव यांचे महापुरुषीय पंथनिरूपण, अनेक अधिकारी लेखकांच्या ज्योतिष, गणित, रतिशास्त्र, नृत्यमुद्रा, पशुरोग, इत्यादींविषयक कृती, वैष्णवोत्तर कालात कीर्तन व नामघोषासंबंधी धार्मिक ग्रंथ, इतर प्रांतासारखी लोकगीते, दोहे, तंत्रमंत्रविषयक लेखन, बिहुगीते, बारगीते अशा प्रकारांनी असमिया साहित्य समृद्ध झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्यनिर्मितीस सुरुवात झाली. तेव्हापासून विशेष उल्लेखनीय लेखक गुणाभिराम बरुआ, हेमचंद्र बरुआ, हेमचंद्र गोस्वामी, लक्ष्मीनाथ बेझबरुआ, चंद्रकुमार अगरवाला, रजनीकांत बार्दोलोई, पद्मनाथ गोहाइन बरुआ, रघुनाथ चौधरी, डॉ. एस्. के. भूयान, डॉ. वाणीकांत काकती, डिंबेश्वर नेओग, ज्योतिप्रसाद आगरवाला, रत्‍नकांत बरकाकती, दंडिनाथ कलिता, चंद्रधर बरुआ, माफिनुद्दीन अहमद इझारिका व वेणुधर राजखोवा हे झाले. साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते (व त्यांचे ग्रंथ) जतीन्द्रनाथ दुआरा (वनफूल), वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य (ऐरूगिननाम), वेणुधर शर्मा (काँगेसोर कंचिआली रोदोत), डॉ. बिरिंचीकुमार बरुआ (लोकसंस्कृती), अंबिकागिरी रायचौधरी (आहुती), त्रैलोक्यनाथ गोस्वामी (आधुनिक बाल साहित्य) हे होते. आसामात साक्षरतेचे प्रमाण १९७१ च्या शिरगणतीत २८·८% होते. साधारणपणे दर ४ साक्षर पुरुषांमागे २ स्त्रिया साक्षर होत्या. १९६१ मध्ये १३ मोठ्या गावांत व ४,४०५ खेड्यांत प्राथमिक शिक्षण सक्तीचे होते. २ विद्यापीठे, ८० महाविद्यालये, पैकी ३ वैद्यकीय व २ अभियांत्रिकी १,००० वर माध्यमिक व २०,००० वर प्राथमिक शाळा यांतून एकूण २१ लाखांवर विद्यार्थी शिकत होते. १९६५ मध्ये राज्यात ५,७०३ समाजशिक्षण केंद्रातून ८६,३७८ प्रौढांना शिक्षण मिळत होते. माध्यमिक व प्रशिक्षण विद्यालयांतून हिंदी भाषा शिक्षण अनिवार्य होते. २७ मूलोद्योग प्रशिक्षण केंद्रांतून ३,४६४ शिक्षक तयार झाले. १८,९५३ प्राथमिक व कनिष्ट आणि ७९९ माध्यमिक आणि वरिष्ठ मूलोद्योग शाळा राज्यात चालू होत्या. लोककला व हस्तव्यावसायिक कलांचे शिक्षण राज्यात देण्यात येते. तरुण दुआरा हे प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार शासनाचे कला सल्लागार असून दिब्रुगडच्या कलानिकेतनचे संचालक आहेत. राज्याच्या मालकीचे एक चित्रपटनिर्मितीकेंद्रही निघाले आहे.

ओक, शानि.

 

कला व क्रीडा: आसामात ‘अंकिया नाट’ हा प्राचीन लोकनाट्यप्रकार आजही रूढ असून त्यास ‘भावना’ म्हणतात. ‘ओजापाली’ ह्या दुसऱ्या लोकनाट्यप्रकारात एक माणूस गात असतो व त्या अनुषंगाने इतर पात्रे मूकाभिनय करतात. दुर्गापूजा आणि होळी ह्या सणांव्यतिरिक्त आसाममध्ये नूतनवर्ष, शेतीचा हंगाम, गौहातीच्या कामाख्या मंदिरातील अंबुबाशी मेळा इप्रसंग नृत्यसंगीताने साजरे केले जातात.

प्राचीन आसामी संगीताच्या कंठसंगीत आणि वाद्यसंगीत अशा दोन्ही प्रकारांचे उल्लेख कालिकापुराणात सापडतात. आसाममधील भक्तिमार्गी चळवळीमुळे आसामी संगीतामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ‘बरगीत’ हा वीरश्रीयुक्त आणि उमद्या गीतांचा प्रकार, तसेच ‘अंकियागीत’ ह्या नावाने ओळखली जाणारी नाट्यगीते आसामी संगीताला उपकारक ठरली. आसामी साहित्याचे पितामह समजण्यात येणाऱ्या शंकरदेव ह्यांना आसामी संगीताचेही पितामहपद देण्यात येते कारण त्यांनी चौदाव्यापंधराव्या शतकांत आपल्या भक्तिसंप्रदायासाठी विपुल स्वररचना केल्या. त्या आसामी संगीताचे एक अमोल भांडार आहेत. शंकरदेवांनी आपल्या शिष्यांना संगीत, नृत्य आणि नाट्य (भावना) ह्यांचे शिक्षण दिल्यामुळे त्यांना आसामी गांधर्वविद्येचे ‘बरागायना’ (संगीत कुलगुरू) समजतात. आरंभीच्या आसामी साहित्यामध्ये विविध रागांवर आधारलेली गीतरचना विपुल आहे. परवीन सुलताना व ‘बनगीत’ गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली दीपाली बरठाकूर या सध्याच्या लोकप्रिय आसामी गायिका होत. आसामी वाद्यवादनाची प्रथाही फार पुरातन असून येथील जुन्या मंदिरांमध्ये विविध वादकांच्या मूर्ती आढळतात.

मणिपुरी हा एक प्रमुख भारतीय नृत्यप्रकार आसामच्या पूर्व सरहद्दीवरून आसाममध्ये प्रचारात आला. प्राचीन काळापासूनð मणिपुरी नृत्यप्रकारामध्ये आसामी कलावंत पारंगत आहेत. त्यांत अमुबी सिंग हे सध्याचे ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंत आहेत. मणिपुरी नृत्याप्रमाणेच ‘लायहरोबा’ हा नृत्यनाटिकाप्रकारही आसामात लोकप्रिय आहे. साधारणपणे दर वर्षी मे महिन्यात आसाममध्ये हा नृत्यप्रकार दहा दिवस रंगमंचावर सादर केला जातो आणि त्यात माणसाचा जन्म, तारुण्य, विवाह, प्रौढत्व इ. वेगवेगळ्या अवस्था दाखविल्या जातात. प्रेमलता देवी, टंडन देवी, रजनी माईबी, बिनोकुमारी देवी, सुधीर सिंग इ. नर्तक या नृत्यप्रकारात पारंगत आहेत. आसामी लोकनृत्याचेही काही प्रकार प्रसिद्ध आहेत. त्यांतील काही वन्य जमातींमध्ये विशेष प्रचलित आहेत. ओजापाली ह्या नृत्यप्रकारात ‘शक्तिपूजा’ केली जाते आणि ढोलाच्या साथीवर गाणी म्हणण्यात येतात. ह्या नृत्यामधील एकसुरीपणा घालविण्यासाठी अधूनमधून जादूचे प्रयोगही करण्यात येतात. ‘देवधनी’ ह्या नृत्यप्रकारात देवाचा ध्वनी ऐकू येतो, असा समज रूढ असल्यामुळे नृत्य चालू असताना देवतेच्या वेषातील नर्तिका भविष्यकथन करतात. बंगालमधील ‘जात्रा’ ह्या लोककलाप्रकाराशी जुळता असा आसामी नृत्यप्रकार म्हणजे ‘खुलिया’  नृत्य. ह्या प्रकारात वीस-पंचवीस पखवाज आणि मृदंग वाजवून गोपीकृष्णाची रासक्रीडा दाखविली जाते. ‘ढुलिया’ या नृत्यप्रकारामध्ये नर्तक आपल्या चेहऱ्यांवर मुखवटे चढवितात आणि नृत्याच्या अखेरीस कुस्ती खेळली जाते. कळसूत्री बाहुल्यांच्या धर्तीवरील ‘पुतला’ नृत्यामध्ये ढोलकच्या तालावर संपूर्ण रामायणाची कथा सांगितली जाते. त्याशिवाय मंदिरासमोरील मंडपात देवदासींचा एक विशिष्ट प्रकारचा नाच होतो. सूर्यास्तानंतर उघड्यावर करण्यात येणाऱ्या पुष्कळशा लोकनृत्यांच्या वेळी सभोवती जाळ केला जातो. नृत्यकलेत रममाण झालेल्यांना हिंस्र पशूंपासून संरक्षण लाभावे आणि एक प्रकारचे विशिष्ट वातावरण निर्माण व्हावे, हाच ह्या जाळाचा उद्देश. आसामच्या सुरमा नदीच्या खोऱ्यातील गावकरी नौकानृत्य करतात. ह्या प्रकारात दोन होड्यांमध्ये शर्यती होतात आणि ह्या होड्यांच्या मधल्या ताफ्यांवर नृत्य केले जाते‘बिहू’ हा आसामचा एक प्रादेशिक नृत्यप्रकार असून तेथील वेगवेगळ्या सणांच्या वेळी त्याचे कार्यक्रम होतात. उदा., नूतनवर्षप्रसंगी रंगाली बिहू व शेतीच्या हंगामात भोगाली बिहू, वन्य जमातींमधील ‘बोडा’ या सांघिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे.

 

आसाममधील पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे दरंग जिल्ह्यातील दाह पर्वतीया या गावातील दगडी देऊळ. गुप्तकाळातील वास्तुकलेच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या ह्या मंदिराचे बांधकाम आजही अभेद्य आहे. कामाख्यामधील ‘उमाचल शिलालेख’ हा उपलब्ध असलेला अतिप्राचीन शिलालेख होय. गौहातीच्या आसपास सरकारी पुरावास्तुसंरक्षण खात्याला अनेक जुन्या प्रतिमा सापडल्या असून त्यावरून प्राचीन वास्तुकलेची कल्पना येते. सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये आहोम राजांनी आसाममध्ये शेकडो मंदिरे बांधली. महावैदाब, विश्वनाथ, शिव, कामाख्या, नवग्रह, उमानंद इत्यादींची मंदिरे आसामी वास्तुकलेचे वैभव दर्शवितात. शिवादोल, देवीदोल, विष्णुदोल, रानघर आणि कारेनघर येथील मंदिरे वास्तुकलेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कामाख्येचे मंदिर महाभारतकालीन राजा नरक ह्याने बांधल्याचा समज आसामी लोकांमध्ये रूढ आहे. आसामममधील सर्वांत जुने कलात्मक मंदिर ह्या दृष्टीने या मंदिराला विशेष महत्त्व आहे.

 


घुमटाकार स्तूप, पॅगोडासारखी छपरे, मंदिरांची शिखरे, चैत्य गवाक्षे, स्तंभ अशा विविध प्रकारच्या आकृतिबंधांनी आसामातील प्राचीन वास्तुकला समृद्ध झाली आहे. तीत भौमितिक आकृतिबंध, मानवी आकृत्या, पशुपक्षी आणि अन्य प्राणी यांच्या उत्कृष्ट शिल्पाकृती आढळतात. दक्षिण कामरूप, तेझपूर आदी भागांतील पॅगोडासारख्या छपरांचा संबंध शिवाच्या कळसाशी जोडला जातो, तर चैत्य गवाक्षांच्या कमळपत्रांच्या आणि पिंपळपानांच्या ज्ञापकांवरून ब्रह्माशी अथवा शिवाशी अशा आकृतिबंधांचे नाते जोडले जाते. बुद्ध, ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, वासुदेव, राम, लक्ष्मण इत्यादींची मूर्तिशिल्पे आसाममध्ये जागोजाग दृष्टीस पडतात.

 

आसाममधील चित्रकलेलाही पूर्वपरंपरा आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकांत शंकरदेवांच्या नाटकांच्या प्रयोगांसाठी तयार केलेल्या पडद्यांवर देवदेवतांची चित्रे रंगविलेली होती. त्या काळातील चित्रकारांनी श्रेष्ठ लेखकांच्या हस्तलिखितांची मुखपृष्ठे रंगविण्यासाठीही आपली कला राबविली. गीतगोविंद आणि भागवतपुराण  यांच्या अनेकांनी केलेल्या हस्तलिखित प्रतींवरील चित्रे रंगविण्यासाठी तत्कालीन चित्रकारांमध्ये अहमहमिका लागलेली असे. पौराणिक प्रसंगांवरील चित्रांप्रमाणेच आसामी चित्रकारांनी आहोम राजांच्या दरबारांतील प्रसंगांची चित्रे हस्तलिखितांसाठी काढली होती.

 

आसामी मुलांमध्ये विशेष प्रचलित असलेला काठयांचा खेळ म्हणजे ‘भंटा’ हा होय. आसामात खूप पाऊस पडत असल्यामुळे आसामी मुले घरातील बैठे खेळ खेळणेच अधिक पसंत करतात. त्यांपैकी सर्वात अधिक लोकप्रिय खेळ म्हणजे राजाचे झाड हा होय. या खेळात सर्व मुले गोलाकार बसून आपल्या डाव्या हाताची मूठ जमिनीवर ठेवून आणि अंगठा वर ठेवून उंच उंच झाड लावीत जातात आणि शेवटी ज्याची मूठ सर्वांत वर असेल, ते मूल ते राजाचे झाड मध्यावर तोडून टाकते आणि खेळ संपतो. घोड्यांच्या शर्यती, पोहणे, नौकाविहार, शिकार इ. आसामींच्या मनोरंजनाचे आणि छंदाचे विषय आहेत. श्री.बी.एस्. बरुआ या खेळाडूस १९६६ साली व्यायामी खेळांबद्दल अर्जुन पुरस्कार लाभला.

 

आसामी लोकांची वेशभूषा साधीच पण आकर्षक असते. प्राचीन काळी आसामी स्त्रियांत किनखाब हा जरीकामाचा प्रकार फार लोकप्रिय असे. रेशमी वस्त्रांचा वापर करण्याकडे असलेला त्यांचा पूर्वीचा कल आता लोप पावलेला आहे. त्याऐवजी कझिरंगा-कपूर आणि गामोशा हे येथील वेशभूषांचे लोकप्रिय प्रकार आहेत. कझिरंगा येथे आसामातील वन्य पशूंसाठी राखीव राने असून या पशूंची चित्रे आसामी कपड्यांवर रेखाटलेली असल्यामुळे कझिरंगा-कपूर (कपडा) असा वाक्प्रचार रूढ झाला. गामोशा हे हातमागावर विणलेले पंचे असून आप्तेष्टांमध्ये मंगलप्रसंगी त्यांची देवाणघेवाण होते. साधारणपणे येथील बायका व मुली परकरवजा मेखला, त्यावर घट्ट गुंडाळून घेतलेली रिहा आणि तीन वारी चद्दर वापरतात व त्यावर रंगसंगती साधणारे पोलके घालतात. अलीकडे रिहाचा वापर फक्त विवाहित आणि जुन्या बायकांत दिसतो. आसामी स्त्रियांमध्ये अंबाड्याचे गाठी-खोपा आणि कोल्डिलिआ-खोपा असे दोन प्रकार प्रचलित असल्याचे दृष्टीस पडतात. गाठी-खोपा हा साध्या अंबाड्याचा प्रकार असून कोल्डिल या प्रकारच्या फुलाशी कोल्डिलिआ – खोप्याचे साम्य असते. घील-खोपा हाही केशभूषेचा एक प्रकार आसामी स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे.

 

महाम्बरे, गंगाधर

 

महत्त्वाची स्थळे : शिलाँग ही राज्याची राजधानी व थंड हवेचे ठिकाण असून येथून ३१० किमी. मौसमै धबधबा आहे. चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पर्जन्याचे स्थान पाहण्यास जाण्याच्या सोयी आहेत. येथे एप्रिलमे मध्ये बिहू व नोनक्रेम हे प्रादेशिक उत्सव होतात. गौहाती हे कामरूपचे मुख्य ठाणे असून राज्यातील सर्वांत मोठे एकमेव शहर आहे. हे पुरातन प्राग्ज्योतिषपूर, तसेच ब्रह्मपुत्रा खोऱ्याचे महाद्वार असून जवळ प्राचीन कामाख्या देवीचे मंदिर आहे. पांडू येथे रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सभोवार अनेक शिक्षणसंस्था व उद्योगधंदे असून ते नदी, रस्ते, रेल्वे व विमानमार्गाचे मुख्य केंद्र आहे. मार्चमध्ये उमानंदा यात्रा व ऑगस्टमध्ये अंबंबाचा उत्सव भरतो. दिब्रुगड ही प्रामुख्याने चहानगरी समजली जाते. येथून थेट कलकत्त्यापर्यंत १,२८० किमी. नदीमार्गे वाहतूक होते. गाव वार्षिक महापुरांसाठी प्रसिद्ध आहे. सिल्चर ही सुरमा खोऱ्यातील तागाची पेठ असून जुन्या काचार राज्याची राजधानी आहे. नौगाँगपासून ९६ किमी. वर कझिरंगा या ४३२ चौ.किमी. अभयवनात दुर्मिळ वन्य पशू पाहण्यास मिळतात.याशिवाय इतर अभयवने म्हणजे गौहातीपासून १७६ किमी. वर उत्तर कामरूपमध्ये मनास हे १२२ चौ.किमी. तेझपूर पासून ३२ किमी. वर खोररूपा २२१ चौ.किमी. आणि तिलबारी विमानतळापासून जवळच रानरेड्याचे ४९ चौ. किमी. आश्रयस्थान आहे. बाणासुराची पौराणिक राजधानी मानलेले तेझपूर, अगदी पूर्वेकडील जुन्या आहोम राजधानीनजिक सिबसागर हे तेलबंदर, तिनसुकिआ येथील कृषिमहाविद्यालये, जोरहाट हे महापुरुष पंथाचे क्षेत्र ही स्थळे प्रसिद्ध आहेत. आसाम हा विरळ वस्तीचा पण सुसंघटित समाजव्यवस्था असलेला अविकसित पावसाळी प्रदेश आहे. चहा, ताग, तांदूळ, पेट्रोल, कोळसा इ. साठी भारतात तो महत्त्वाचा असला तरी प्रामुख्याने सरहद्दीवरील राज्य म्हणून त्याला अधिक महत्त्व आहे. बांगला देशची सरहद्द आसामला लागून आहे, तर चीन व ब्रह्मदेश यांची हद्द फारशी दूर नाही. १९६२ च्या भारत-चीन युद्धात आसामसरहद्दीवर बरीच गडबड झाल्याने तिकडे कायमची संरक्षणव्यवस्था करण्यात आली आहे. बांगला देशच्या १९७१ च्या उठावात बऱ्याच निर्वासितांचा लोंढा आसाममध्ये आल्याने कित्येक प्रश्न निर्माण झाले होते(चित्रपत्र २७, २८).

ओक, शानि.

संदर्भ : 1. Acharya, N. N. TheHistory of Medieval Assam, Gauhati, 1966.

            2. Barpujari, S.K. Assam in the Days of the Company, Gauhati, 1963.

            3. Barua, Hem, The Red River and the Blue Hills, Gauhati, 1962.

            4. Bhuyan S. K.Anglo-Assamese Relations, Gauhati, 1950.

       5. Choudhary, P.C. The History &amp Civilization of the People of Assam to the 12th Centry A.D. Gauhati, 1966.

     6. Das, H. P. Geography of Assam, New Delhi, 1970.

7. Gait, Sir Edward, A History of  Assam, Calcutta, 1963.


आसाम

 

 

 


आसाम

 

शिलाँग : बडा बझार आसाममधील एक प्राचीन दरवाजा, सु. ५-६ शतक ब्रह्मपुत्रेवरील मच्छीमारी एकशिंगी गेंडा : आसामचे वैभव कामाक्षी मंदिर, गौहाती आसाममधील वनसंपत्ती : एक बांबूवन