आर्टिचोक : या नावाने ओळखल्या जात असलेल्या तीन ⇨ ओषधीय वनस्पती आहेत (१) जेरूसलेम आर्टिचोक ( इं. जिरॅसोल ) ही सूर्यफुलाच्या वंशातील जाती (हेलिअँथस ट्युबरोजस; कुल-कंपॉझिटी ) असून अधिक परिचित आहे; (२) ग्लोब आर्टिचोक ही त्याच कुलातील पण अन्य वंशातील जाती (सायनॅरा स्कोलिमस ) आहे; (३) चिनी आर्टिचोक (स्टॅकिस ट्युबरिफेरा ) ही लॅबिएटी कुलातील आहे. तिन्ही भाज्या आहेत.

आ. १. जेरूसलेम आर्टिचोकाचा गड्डा ( ग्रंथिक्षोड ).

(१) जेरूसलेम आर्टिचोक : हिंदी भाषेत हिला ‘हतिचुक’ म्हणतात. ही सुमारे २-३ मी. उंच, बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणारी) ओषधी मूळची उ. अमेरिकेतील असून भारतात (बंगाल, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व आंध्र) व इतर कित्येक देशांत लागवडीत आहे. हिला पिवळे फुलोरे [ स्तबक, → पुष्पबंध ] येतात. हिचे बटाट्यासारखे गड्डे [ ग्रंथिक्षोड, → खोड] मनुष्यांचे खाद्य असून इतर भाग गुरांना खाऊ घालतात. खोडातील धाग्यांपासून जाडेभरडे कापड व दोरा बनवितात. खोडातील नायटर द्रव्य पोटॅशनिर्मितीत वापरतात. पूर्वी फ्रान्समध्ये पाळीव जनावरांना व मेंढ्यांना आणि अमेरिकेत डुकरांना खाण्यास देत. ग्रंथिक्षोडातील इन्युलीन हे कार्बोहायड्रेट मधुमेही रोग्यांना उपयुक्त ठरले आहे.  ग्रंथिक्षोडाचा उपयोग औद्योगिक अल्कोहॉल निर्मितीत करतात. ह्या ओषधीचे तीन प्रकार आहेत. नवीन लागवडीकरिता ग्रंथिक्षोडच वापरतात [ → कंपॉझिटी ].

आ. २. ग्लोब आर्टिचोकाचा फुलोरा.

(२) ग्लोब आर्टिचोक : हिंदीत या ओषधीलाही ‘हतिचुक’ म्हणतात. ह्या मोठ्या व बहुवर्षायू ओषधीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश व कॅनरी बेटे असून भारतात व इतरत्र पिकविली जाते. हिचे तीन प्रकार आहेत. हिचे नरम, फुगीर व कोवळे स्तबक शिजवून लोण्याबरोबर खातात. त्यातही इन्युलीन असून त्याचा उपयोग वर सांगितल्याप्रमाणे होतो. हिची मोठी व अतिखंडित पाने कडू व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून संधिवात व जलशोफ (पाणी साचल्याने येणारी सूज) यांवर उपयुक्त असतात. बिया व फुटवे लागवडीकरिता वापरतात.

आ. ३. चिनी आर्टिचोकाचे मांसल मूळ.

(३) चिनी (किंवा जपानी) आर्टिचोक : ही बहुवर्षायू व खुजी, केसाळ ओषधी नावाप्रमाणे मूळची त्या देशांतील असून चीन, जपान, बेल्जियम व फ्रान्स येथे लागवडीत आहे. हिला बारीक लालसर फुले येतात [→ लॅबिएटी ]. हिची पांढरी, मांसल, पेरेदार व ५–८ सेंमी. लांब मुळे बहुधा शिजवून पण क्वचित कच्ची भाजीसारखी खातात. हिची मुळे खारवून किंवा शिरक्यात मुरवून खातात. १८८२ मध्ये फ्रान्समध्ये, १८८७ साली ब्रिटनमध्ये व १९५० च्या सुमारास अमेरिकेत हिची लागवड सुरू झाली.

 

आफळे, पुष्पलता द.