आर्किओसायाथीड : पूर्व व मध्य कँब्रियन कल्पातील (६० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) सागरी प्राण्यांच्या एका गटाचे नाव. या प्राण्यांचा सर्व सांगाडा कॅल्शियम कार्बोनेटाचा असे. त्यांच्या शरीराच्या बाह्य पृष्ठावर कॅल्शियम कार्बोनेटाचे पातळसे आवरण असे, त्याला बाह्य भित्ती म्हणतात. बाह्य भित्ती सच्छिद्र असे. छिद्रे सामान्यतः सूक्ष्म असत. जीवाश्मांचे (अवशेषरूप प्राण्यांचे) गोत्र किंवा जाती ठरविण्यासाठी छिद्राचे आकारमान, संख्या व मांडणी यांचा उपयोग होतो. सांगाड्याचा म्हणजे बाह्य भित्तीचा आकार सामान्यतः फुलदाणीसारखा किंवा पेल्यासारखा असे. पण शंकूच्या किंवा दंडगोलाच्या व क्वचित बशीच्या आकाराच्या बाह्य भित्ती असणारी गोत्रेही असत. त्यांचे पृष्ठ सामान्यतः समतल पण क्वचित उंचसखल, वरंबे व पन्हळी असलेले असे. सांगाड्यांचा अनुप्रस्थ (आडवा) छेद बहुधा वर्तुळाकार, काहींचा किंचित दीर्घवर्तुळाकार व क्वचित नागमोडी वळणाच्या वर्तुळासारखा व सांगाड्याची उंची किंवा लांबी अडीच ते दहा सेंमी. पण सामान्यतः पाच सेंमी.पेक्षा कमी असे.
कित्येक गोत्रांतील प्राण्यांच्या शरीरात केवळ बाह्य भित्तीच असे. पण इतर कित्येकांत बाह्य भित्तीच्या आतील बाजूस काही अंतरावर व तिच्याशी साधारण समांतर व समकेंद्री (समाईक केंद्र असलेल्या) अशा पात्रासारखी आणखी एक सच्छिद्र भित्ती असे. ती व बाह्य भित्ती यांना जोडणारे उभे अरीय पत्रे असत व त्यांचा आधार आतल्या भित्तीला असे. अशा उभ्या अरीय पत्र्यांशिवाय त्या दोन भित्तींना जोडणारे तिरपे किंवा आडवे व सरळ किंवा वाकण असलेले सच्छिद्र पत्रे, काड्या किंवा नळ्या कित्येक गोत्रांत असत. सांगाड्याचे वर उल्लेख केलेले घटक कॅल्शियम कार्बोनेटाचेच असत. आंतर भित्ती माथ्याशी उघडी असे.
प्राणी जिवंत असताना, आतल्या भित्तीच्या आतील पृष्ठावर जिवंत ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांचे) आवरण असावे पण तिच्या आतील जागा म्हणजे मध्यगुहिका बहुधा रिकामीच राहात असावी. पण काही गोत्रांची मध्यगुहिका कंकाल-ऊतकांनी (सांगाड्याच्या ऊतकांनी) भरलेले आढळते.
आर्किओसायाथिडांच्या वर्गीकृत स्थानाविषयी मतभेद आहेत व कॅल्शियमी शैवल, प्रोटोझोआ, स्पंज किंवा प्रवाळ यांसारख्या अगदी भिन्न गटांत त्यांचा समावेश केला गेलेला आढळतो. सच्छिद्र सांगाडा असल्यामुळे ते स्पंजांच्या जवळचे स्थान असणाऱ्या एखाद्या गटातले असावेत असे सर्वसामान्य मत आहे. अलीकडील काही पुराप्राणिवैज्ञानिक त्यांना स्पंजांच्या संघाचा एक वर्ग मानतात व इतर काही त्यांचा एक स्वतंत्र (आर्किओसायाथा) संघ मानतात.
आर्किओसायाथिडांना आंतर-गुहा (आतील पोकळी) नसते म्हणून त्यांचे शरीर सीलेंटेरेटापेक्षा अगदी भिन्न असले पाहिजे. त्यांचा बाह्य
आकार स्पंजासारखा असे पण स्पंजांचा सांगाडा कंटिका (लहान काटे) जुळून झालेला असतो. तसा आर्किओसायाथिडांचा नसतो. आंतर व बाह्य भित्तीना जोडणारे जसे उभे पत्रे व इतर कंकाल-घटक आर्किओसायाथिडांत असतात तसे स्पंजांत नसतात.
हे प्राणी एकाच जागी चिकटून राहत असत. लहान लहान झुडपे दाटीने वाढावी त्याप्रमाणे वाढलेल्या आर्किओसायाथिडांचे विस्तीर्ण ताटवे किंवा गालिचे कित्येक समुद्रांच्या तळाशी असत व त्यांच्या सांगाड्यांपासून तयार झालेल्या चुनखडकांचे थर बहुतेक सर्व खंडांतल्या कँब्रियन कालीन खडकांत आढळलेले आहेत. दक्षिण अमेरिकेत मात्र ते सापडल्याची नोंद नाही. आर्किओसायाथिडांपासून तयार झालेल्या चुनखडकांचे पुष्कळ रीफ (शैलभित्ती) ऑस्ट्रेलियात व सार्डिनियात सापडलेले आहेत. रीफ निर्माण करणाऱ्या प्राण्यांपैकी आर्किओसायाथीड हे सर्वांत जुने होत.
कँब्रियन कल्पाच्या प्रारंभीही आर्किओसायाथीड अवतरले होते. त्यांचा विकास झपाट्याने झाला व मध्य कँब्रियन कल्पात त्यांची संख्या व विविधता अमर्याद वाढली, पण मध्य कँब्रियन कल्पाच्या अखेरीस ते निर्वंश झाले.
केळकर, क. वा.
“