आर्कराइट, सर रिचर्ड : (२३ डिसेंबर १७३२ – ३ ऑगस्ट १७८२). इंग्‍लिश संशोधक. सूतकताईसंबंधी महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म प्रेस्टन (लँकाशर) येथे झाला. १७५०च्या सुमारास बोल्टन येथे त्यांनी न्हाव्याचा धंदा सुरू केला. १७६० मध्ये त्यांनी न्हाव्याचे काम करण्याचे सोडून देऊन आपले सर्व लक्ष सूतकताई चौकट बनविण्याकडे वळविले.

यापूर्वी जेम्स हार्‌ग्रीव्ह्‌झ यांनी सूतकताईचे यंत्र शोधून काढले होते पण त्यापासून बनविलेले सूत आडव्या स्थितीत (बाणा) वापरता येत नव्हते. हा दोष आर्कराईट यांनी शोधून काढलेल्या सूतकताई चौकटीमुळे नाहीसा करता येऊ लागला. यामुळे निघणारे सूत अतिशय बारीक व बळकट मिळू लागले. आर्कराईट यांनी सूतकताई चौकट साधारणतः १७६७च्या सुमारास शोधून काढली. सूतकताई काम प्रथम हातांनी करावे लागे, पुढे त्यासाठी घोडे वापरले गेले व शेवटी ते काम वाफेवर चालणाऱ्या यंत्राकडून करण्यात येऊ लागले.

याशिवाय त्यांनी सूतकताईपूर्वी तंतूंवर करावयाच्या प्रक्रियांमध्ये तसेच सूतकताई प्रक्रियेमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. त्यांनी शोधून काढलेल्या यंत्रामुळे प्रथम जी बेकारी वाढली व त्यामुळे जो लोकक्षोभ झाला, त्यामुळे त्यांचे जीवन व त्यांच्या गिरण्या अनेक वेळा धोक्यात आल्या होत्या. तसेच शोधाच्या पेटंटसाठी त्यांना कोर्टात झगडावे लागले, त्यामुळे त्यांना गिरणी मालक म्हणून राहता आले नाही. १७८६ मध्ये त्यांना सर ही पदवी देण्यात आली. क्राम्फर्ड येथे त्यांचा मृत्यू झाला.

साबळे, सु. र.