आरा : बिहार राज्यातील शहाबाद जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ९२,६७० (१९७१). गंगेच्या दक्षिणेस सुमारे २२ किमी. अंतरावर, आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा उंचावरचे म्हणजे अरारमधील ठिकाण म्हणून याला आरा हे नाव पडले असावे. जवळच्या मसार गावी सापडलेल्या जैन हस्तलिखितातील ‘आरामनगर’ हा उल्लेख याच शहराबद्दल आहे. कनिंगहॅमच्या मते यूआन च्वांगच्या हकीगतीतील दानवांनी बौद्धधर्म स्वीकारल्याप्रीत्यर्थ अशोकाने उभारलेल्या स्तूपाचे स्थान हेच. पुराणातील मोरध्वज राजाच्या कथेचा संबंधही या नगराशी जोडण्यात येतो. १८५७ च्या संग्रामातील सेनानी कुँवरसिंह याची कर्मभूमी म्हणून आराला महत्त्व आहे. शहराच्या पूर्वेस १३ किमी. वरून वाहणार्या शोण नदीच्या पुराने शहराला वेळोवेळी उपद्रव पोहोचतो. शहरात दोन महाविद्यालये व इतर शिक्षणसंस्था आहेत. आरानहर हा शोणच्या पूर्व कालव्याचा फाटा शहराजवळून जात असल्यामुळे भोवतालच्या सुपीक प्रदेशातील तांदूळ, गहू, हरभरा, मका, गळिताची धान्ये, ऊस इत्यादींची ही एक मोठी बाजारपेठ आहे. पूर्व रेल्वेवर पाटण्याच्या पश्चिमेस ५९ किमी. आरा स्थानक असून येथून ससरामपर्यंत मीटरमापी लोहमार्ग जातो. सडकांनी हे शहर पाटणा, वाराणशी व ससरामला जोडलेले आहे.
ओक, शा. नि.