लूबूंबाशी : (जुने एलिझाबेथव्हिल). मध्य आफ्रिकेमधील झाईरे प्रजासत्ताकातील लोकसंख्येने आणि आर्थिक दृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ५,४३,२६८ (१९८४). देशाच्या आग्नेय भागात लूबूंबाशी नदीकाठावर, झँबियाच्या सीमेजवळ वसलेले हे शहर शाबा (कटांगा) विभागाचे मुख्य प्रशासकीय ठाणे असून राजकीय व सामाजिक दृष्ट्याही याला महत्त्व आहे. ताम्रखनिज पट्ट्यातील स्थानामुळे या शहराची वाढ झपाट्याने झाली. हे देशाबाहेर पूर्वेस, पश्र्चिमेस व दक्षिणेस जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील व लोहमार्गांवरील प्रस्थानक असून प्रमुख व्यापारकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आफ्रिकेचा पूर्व व पश्र्चिम किनारा जोडणारा ट्रान्स-काँटिनेंटल लोहमार्ग येथून जातो.

बेल्जियमच्या वसाहतकऱ्यांनी १९०९-१० च्या सुमारास खाणकामासाठी येथे वसाहत स्थापन केली. त्याकाळचा बेल्जियमचा युवराज व नंतरचा राजा ॲल्बर्ट याने या ठिकाणाला भेट दिली होती. त्याची पत्नी एलिझाबेथ हिच्या सन्मानार्थ या वसाहतीस ‘एलिझाबेथव्हिल’ असे सुरुवातीस नाव देण्यात आले होते. त्यानंतर १९६०-६३ मध्ये या शहराला फुटीरतावादी कटांगाची राजधानी म्हणून प्रसिद्धी मिळाली. देशांतर्गत बंडाळीच्या या काळात संयुक्त राष्ट्रांच्या लष्कराचे नियंत्रण येथूनच होत होते. १९६१ मध्ये झाईरचे पंतप्रधान पॅट्रिस लुमुम्बा यांचा खून कटांगात झाला. १९६६ मध्ये नदीच्या नावावरून याचे लूबूंबाशी असे नामांतर करण्यात आले. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेतून उत्तरेकडे येणाऱ्या लोहमार्गावरील हे अंतिम स्थानक होते. या प्रदेशातील पहिला तांबे शुद्धीकरण कारखाना लूबूंबाशी येथेच उभारण्यात आला. पुढे कटांगातील खाणकामाचा गुरुत्वमध्य वायव्येकडे सरकला. तसेच तेथून अटलांटिक किनाऱ्यापर्यंत जाणारे लोहमार्गदेखील तयार झाले. साहजिकच लूबूंबाशीचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीदेखील खाणकाम उद्योगाच्या दृष्टीने हे शहर अजूनही मोक्याचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रादेशिक खाणकाम कंपन्यांच्या मुख्य कचेऱ्या या शहरातच आहेत. तसेच आजूबाजूच्या लिकासी, कोल्वेझी, कीपूशीआ इ. शहरांकडून येणारा दगडी कोळसा तसेच तांबे, कोबाल्ट, जस्त, कॅडमियम, जर्मेनियम, कथिल, मँगॅनीज इ. धातूंच्या खनिजांची वाहतूक शहरामार्गेच होते. पूर्वीच्या बेल्जियन कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण झाले असले, तरी अजूनही काही प्रमाणात परदेशी कंपन्या येथे आहेत.

तांबे शुद्धीकरणाबरोबरच अन्नपदार्थ प्रक्रिया, छपाई व रासायनिक उद्योग, यंत्रे, साबण, वस्त्रे, बीर, वेगवेगळी पिठे, सिगारेट, विटा, मिठाईइ. निर्मिती उद्योगांचाही येथे विकास झाला आहे.

आज लूबूंबाशी हे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. येथे वसाहतकाळात काँगो विद्यापीठाची स्थापना झाली असून १९७१ मध्ये त्याला झाईरेच्या राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय समाजविज्ञान, संख्याशास्त्र, शिक्षक प्रशिक्षण इ. अनेक संस्था या शहरात आहेत. झाईरे इतिहास अभ्यासक मंडळाचे कार्यालय, राष्ट्रीय पुराणवस्तू केंद्र व नगरपरिषदेचे सभागृह या वास्तूदेखील शहराच्या सांस्कृतिक ठेव्यात महत्त्वाची भर घालतात. तांब्याचे छत असलेले शहरातील रोमन कॅथलिक सेंट पीटर्स कॅथीड्रल हे रोमन बायझेटिन शिल्पशास्त्राचा उत्तम नमुना असून येथील प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात खनिजांचा संग्रह केला आहे.

नगररचनेतील ठळक वैशिष्ट्यांत रुंद, सरळ रस्ते एकमेकांना काटकोनात छेदून गेलेले आढळतात. शहरात उद्याने, सार्वजनिक रुग्णालय व ग्रंथालय असून एक आधुनिक गृहनिर्माण प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. 

फडके, वि. शं.