आयोनीय : तुर्कस्तानच्या पश्चिमेकडील इजीअन समुद्रकाठचा प्रदेश. तो आयोनिया या नावाने ओळखला जाई. या प्रदेशातील लोकांना व त्यांच्या संस्कृतीला आयोनीय अशी संज्ञा दिली गेली आहे. प्राचीन ग्रीक लोक आयोनियनांना त्यांच्यापैकीच एक मानीत. आयोनियात आलेले बहुतेक ग्रीक लोक अथेन्समधून आले होते, अशी समजूत होती पण तज्ञांच्या मते ॲकियन टोळ्यांच्या हल्ल्यानंतर पेलोपनीसस ह्या द्वीपकल्पाच्या ईशान्य भागातून तसेच बीओशिया ह्या भागातून काही आयोनीय लोक इ. स. पू. १२०० ते १०००च्या दरम्यान वर उल्लेखिलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी आले. म्हणून ह्यास आयोनियन संस्कृती म्हणतात. तिथे आल्यानंतर त्यांनी तेथील लोकांना ठार मारून त्यांच्या विधवांबरोबर लग्ने केली आणि ह्या संकरातून मिश्रजमात निर्माण झाली. मायलीटस, मायस, प्रायईनी, एफेसस, कॉलोफॉन, लेबेडॉस, टीऑस, एरिथ्री, क्‍लाझॉमेनी, फोसीआ, सेमॉस व कायॉस ही त्यांची बारा शहरे होत. प्रत्येक शहर हे स्वतंत्र नगरराज्य होते. हे लोक व्यापारी व दर्यावर्दी असल्यामुळे इजीअन सागराच्या किनाऱ्याने त्यांनी आणखीही काही छोट्या वसाहती स्थापन केल्या होत्या. या सर्व वसाहतींचा एक स्वतंत्र राज्यसंघ अस्तित्वात होता. विस्तार व संपत्ती यांतील श्रेष्ठत्वामुळे मायलीटस नगराला प्राधान्य प्राप्त झाले. बहुतेक शहरे नदीच्या मुखापाशी होती व त्यांच्या भोवतालचा भाग सपाट होता. साहजिकच हर्मस, स्मर्ना, केइस्टर, मीअँडर इ. नद्या आणि त्यांची सुपीक खोरी ह्यांमुळे हा भाग सुपीक व संपन्न झाला होता. व्यापार व शेती यांतून आयोनीय नगरांना अपरंपार संपत्ती मिळाली. स्वाभाविकच शेजारचे बलवान सत्ताधारी आयोनियाकडे लुटीच्या दृष्टीने पाहू लागले. इ. स. पू. आठव्या शतकात लिडियाने व इ. स. पू. सहाव्या शतकात इराणने तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. इराणी सम्राटांच्या राजवटीत आयोनीय नगरांना काही प्रमाणात अंतर्गत स्वातंत्र्य मिळाले होते. याचा दुरुपयोग करून मायलीटसने इराणविरुद्ध बंड उभारले आणि त्यात अथेन्सची मदत मिळविली. साहजिकच ग्रीक-इराणी युद्धाचा भडका उडाला. मायलीटसचे त्यात फार नुकसान झाले एवढेच नव्हे, तर पुढे अलेक्‍झांडरच्या वेळेपर्यंत हा प्रदेश इराणच्या आधिपत्याखाली होता. पण अलेक्‍झांडरच्या वेळेसही मायलीटसने अलेक्‍झांडरला विरोध करून स्वतःचा विनाश पुन्हा ओढवून घेतला. यानंतर मॅसिडॉनचे आधिपत्य व नंतर पुढे इ. स. पू. ६४ पासून रोमचे आधिपत्य ह्यांमुळे आयोनियास फारच थोडा काळ स्वातंत्र्य उपभोगावयास मिळाले.

आयोनियात, मुख्यत्वे एफेसस व मॅग्नीझिया येथे झालेल्या उत्खननांत बरेच अवशेष सापडले असले, तरी त्यांतील बहुतेक अवशेष ग्रीक व रोमन काळातीलच आहेत. त्यामुळे प्राचीन आयोनीय इतिहास व संस्कृतीविषयी अद्यापि फारशी माहिती उजेडात आलेली नाही. आयोनीय राज्यसंघ मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता, त्यात राजकीय एकात्मतेची जाणीव फारशी नव्हती. मायकेल पर्वतावरील पॉझिडन हे सर्वांचे आराध्यदैवत होते. ह्याशिवाय एफेसस येथील डायोनाचे मंदिरही प्रसिद्ध होते. आयोनीय लोकांची भाषा हा सर्वांना एकत्र बांधणारा दुसरा महत्त्वाचा दुवा होता. कला आणि तत्त्वज्ञान ह्या दोन क्षेत्रांतही आयोनियनांनी प्रगती केलेली होती. ग्रीसवर आयोनियन कलेची छाप पडलेली दिसते.

अथेन्समधील ग्रीक व आयोनियाचे ग्रीक समानभाषी होते व त्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक जवळिक होती. ग्रीक लोकांच्या या दोन अत्यंत प्रगत शाखा होत्या. कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांतही आयोनीय आघाडीवर होते. प्रारंभीचे ग्रीक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ आयोनीय होते. होमरचे काव्य आयोनीय भूमीवरच स्फुरले, हे लक्षात घेता आयोनीय संस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते.

पहा : इजीअन संस्कृति मायलीटस.

संदर्भ : Durant, Will, The Life of Greece, New York, 1939.

माटे, म. श्री.