आलार्कॉन, पेद्रो आंतोन्यो दे : (१० मार्च १८३३–२० जुलै १८९१).  स्पॅनिश कादंबरीकार आणि वृत्तपत्रकार.  जन्म ग्रानाडा प्रांतातील ग्वादीख येथे.  माद्रिद येथील एल् लाटिगो या वृत्तपत्राचा संपादक असताना राणी दुसरी इझाबेला हिच्यावर प्रखर टीका केल्यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला.  एल् फिनाल डे नॉर्मा (१८५५) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर लष्करात दाखल होऊन तो मोरोक्को येथे गेला (१८५९). यो मोहिमेवर असताना त्याने लिहिलेली डिआरिओ डे उन् टेस्ट्रिगो डे ला गेरा डे आफ्रिका (१८५९, इं. शी. डायरी ऑफ अ विटनेस ऑफ द आफ्रिकन वॉर)  ही कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली.  अनेक कादंबऱ्या, कविता व एल् हिखो प्रोडिगोसारख्या काही सुखात्मिका त्याने लिहिल्या. तो क्रियाशील क्रांतिकारक होता.  राजा १२ वा आल्फॉन्सो याला पुन्हा गादीवर बसविण्यात त्याने पुढाकार घेतला होता (१८७६).  त्यानंतर तो राज्यसल्लागार मंडळाचा आणि ‘ला रिआल आकाडेमिआ’ या संस्थेचा सभासद बनला. ला पोलिटिका  या वृत्तपत्रातील प्रभावी लेखांमुळे श्रेष्ठ स्पॅनिश वृत्तपत्रकारांमध्ये त्याची गणना होते.  माद्रिद येथे तो मरण पावला.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्य. (म.)