आर्निका माँटॅना : (इं. आर्निका, मौंटन टोबॅको; कुल – कंपॉझिटी). सु. ०·३ मी. उंचीची ही लहान बहुवर्षायु (पुष्कळ वर्षे जगणारी) ⇨ ओषधी  मूळची उत्तर अमेरिका, आशिया, यूरोप येथील आहे.  हिचे मूलक्षोड खोड  बारीक, चिवट व तपकिरी रंगाचे असून त्याला खाली मुळे व जमिनीवर बिनदेठाच्या, रुंदट भाल्यासारख्या गुळगुळीत, अखंड पानांचा गुच्छ असतो.  हिचा पिवळा स्तबक [→ कंपॉझिटी ] फुलोरा लांब केसाळ दांड्यावर येतो.

आर्निका माँटॅना

सुके स्तबक, मूलक्षोड आणि मुळे औषधी असून ठेचलेल्या, लचकलेल्या व खरचटलेल्या भागांवर बाहेरून मद्यार्कातून लावतात.  वनस्पतीचे वरील भाग शक्तिवर्धक, जखम भरून काढणारे व क्षोभकारक आहेत.  या वनस्पतीत आर्निसीन नावाचे कटुद्रव्य व शेकडा ०·५ बाष्पशील तेल असते.  आर्निका-मद्यार्क शरीरात टोचल्यास प्रथम रक्तदाब कमी होतो परंतु नंतर बराच वाढतो.  ही ओषधी उत्तेजक, शामक व सूज उतरविणारी आहे.  ती बागेत शोभेकरिता वाफ्याच्या कडेने लावतात.

आफळे, पुष्पलता द.