आयगेन, मानफ्रेट : (९ मे १९२७ – ) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९६७ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म जर्मनीतील बोखुम या औद्योगिक शहरात झाला. त्यांचे शिक्षण गॉटिंगेन विद्यापीठात झाले. १९५१-५३ या कालात ते तेथेच भौतिकीय रसायनशास्त्राचे अध्यापक होते. त्यानंतर त्यांची माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमध्ये नेमणूक झाली. सध्या ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

आयगेन यांनी डिमेयर यांच्या समवेत, १९५६ मध्ये बर्फाच्या पातळ थरातून संपूर्णपणे संतृप्त विद्युत् प्रवाह घालविताना दर सेकंदास तयार होणाऱ्या नव्या आयनयुग्मांची (विद्युत् भारित अणू, रेणू वा मूलक यांच्या जोड्यांची) संख्या मोजण्यासंबंधी अन्वेषण (संशोधन) केले.

ज्या विक्रियांचा अर्धविक्रिया काल (विक्रिया अर्धी पुरी होण्यास लागणारा काल) दहा सेकंदांपेक्षा कमी असतो अशा विक्रियांच्या अभ्यासासाठी पूर्वी औष्मिक, रासायनिक, विद्युत व इतर पद्धती वापरीत असत. याहूनही अतिशीघ्र विक्रियांच्या अन्वेषणासाठी आयगेन व त्यांचे सहकारी यांनी नवीन ‘शैथिल्य पद्धती’ शोधून काढली.

युनायटेड स्टेट्स नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स, बन्सन सोसायटी फॉर फिजिकल केमिस्ट्री व फॅराडे सोसायटी या संस्थांचे ते सभासद आहेत. शिकागो, हार्वर्ड व वॉशिंग्टन या विद्यापीठांनी त्यांनी मानसेवी पदव्या बहाल केल्या आहेत. तसेच ते कॉर्नेल विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. १९६७ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना अर्धे आणि जॉर्ज पोर्टर व आर्. जी. डव्ल्यू. नॉरिश यांना मिळून अर्धे असे विभागून देण्यात आले. ऊर्जेच्या अतिसूक्ष्म स्पंदांनी रासायनिक समतोल बिघडविल्याने घडून येणाऱ्या अतिशीघ्र रासायनिक विक्रियांसंबंधीच्या अन्वेषणाबद्दल हे पारितोषिक त्यांना मिळाले.

कानिटकर, बा. मो.