आमुनसेन, रोआल : (१६ जुलै १८७२ – ? १९२८). दक्षिण ध्रुवसंशोधक. याचा जन्म नॉवेंमधील सार्प्सबॉर शहराजवळील बोर्गे कँटन येथे झाला. सागरी जीवनाच्या हौसेखातर वैद्यकीय शिक्षणाला सुरुवातीलाच याने रामराम ठोकला. १८९७-९९ दरम्यान बेल्जियमतर्फे झालेल्या दक्षिण ध्रुवावरील समन्वेषणातील बेल्जिका बोटीवरील एक अधिकारी म्हणून त्याने काम केले. तेथून आल्यावर त्याने जर्मनीत थोडे तांत्रिक शिक्षण घेतले. १९०३ साली त्याने गोया नावाची छोटी होडी तयार केली व सहा सोबत्यांबरोबर मोठ्या धाडसाने त्या वेळेस गाजत असलेला ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’ शोधून काढला. अटलांटिकमधून उत्तर ध्रुवप्रदेशमार्गे पॅसिफिकमध्ये जाण्याचा हा रस्ता. याकरिता बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण प्रथम पूर्ण यशस्वी झाली ती छोटीशी गोया. या सफरीला त्याला तीन वर्षे लागली. नंतर उत्तर ध्रुवाच्या शोधाकरिता तो निघाला परंतु १९०९ साली पीअरीने उत्तर ध्रुवाचा शोध लावल्याची बातमी समजल्याने परतला. १९१० साली तो दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यास निघाला. १९११ मध्ये तो दक्षिण ध्रुवाजवळील रॉस बेटावर उतरला व तेथून कुत्र्यांच्या साहाय्याने १४ डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचला. तेथून परतल्यावर काही काळ त्याने उत्तर ध्रुवाजवळ समन्वेषण केले. १९२५ साली त्याने विमानाने नॉर्वेच्या स्वालबार बेटावरून अलास्कास जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला १९२६ मध्ये मात्र त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. या वेळेस त्याच्याबरोबर नॉबीले नावाचा इटालियन वैमानिक होता. १९२८ मध्ये नॉबीलेचे विमान उत्तर ध्रुवावर पडले म्हणून त्याचा शोध घेण्यास तो गेला असता समुद्रात त्याचा अंत झाला. त्याने लिहिलेल्या पुस्तकांवरून व आत्मचरित्रावरून त्याने केलेल्या शास्त्रीय पाहणीची माहिती मिळते.

शाह, र. रू.